Categories
अभिवादन

दिवसाढवळ्या खून करण्याचं प्रात्यक्षिक….

ऑगस्ट - २०१५

म्हटलं तर एक गोष्ट रचलेली नि पुन्हा पुन्हा रचली जाण्याची शक्यता असलेली…..

म्हटलं तर साक्षात अगदी आता आता वर्तमानात

निर्घृणपणे तुमच्या-माझ्यासमोर घडलेली घटनासुद्धा

किंवा फारतर रिप्लेसुद्धा नजीकच्या काळात घडलेल्या गोष्टीचा

या गोष्टीसाठी लागणारे साहित्य

1. स्वत:च्या कोषात गुरफटलेला, निर्ढावलेला ढोंगी उच्चमध्यमवर्ग

नि पोटापुरतं मिळवण्यात हयात संपवणारा हताश, निराश, तळागाळातला माणूस

नि लेखक, कवी, चित्रकार, कलावंत, विचारवंत, अभ्यासक यांचा एक जथ्था

म्हणजे अशा इव्हेन्टसाठी यांची उपस्थिती इम्पॉरटन्ट असल्याने

नि सर्वसामान्यांच्या प्रक्षुब्ध भावना प्रक्षेपित करण्याचा तहयात वारसा

परंपरेनं याच वर्गाकडे चालत आलेला असल्याने

हा घटक या गोष्टीत अनिवार्य समजला जावा.

2. एखादे सांस्कृतिक, पुरोगामी वारसा असणारे शहर, उदाहरणार्थ पुणे किंवा कोल्हापूर…..

3. एक मोटारसायकल राजदूत, यामाहा, बुलेट तत्सम कोणतीही.

नवी किंवा जुनी-पुरानी, शक्यतो चोरीची किंवा सापडलीच तरी मालक नदारद असलेली.

4. एक पिस्तुल, कट्टा, रिव्हॉल्वर देशी-विदेशी-गावठी मेक कोणताही असो तत्परतेने गोळ्या झाडणारे.

5. दोन मारेकरी, निष्णात, मराठी किंवा कोणतीही तत्सम भारतीय भाषा सहजगत्या बोलू शकणारे

थंड डोक्याने सावज हेरून निर्घृणपणे हत्या करून निसटून, नि कायदा सुसव्यवस्थेच्या कानफटात मारून पाताळात जाऊन लपू शकणारे, नि कधीच कुणाच्या हाती न लागणारे.

6. तोंडावरची माशीही उडू न देता ‘मारेकर्‍यांना सोडणार नाही’…… अशी वल्गना करणारे तत्कालीन कोडगे राज्यकर्ते

7. नि सगळ्यात इम्पॉरटन्ट कॅरेक्टर या गोष्टीतले म्हणजे साठी-सत्तरी ओलांडलेला

कुणीही, एक असा इसम जा आपले उभे आयुष्य

आपल्या समाजासाठी खर्ची घालण्याचा आटापिटा करत असेल व्यर्थ.

घटनाक्रम 1 –

गोष्ट सक्सेसफुल्ल रन होण्यासाठी हा क्रम महत्वाचा असल्याने वेळ शक्यतो सकाळची म्हणजे मॉर्निंगवॉकला जाणारी

म्हातारी कोतारी माणसं असतातच असतात बेसावध अशावेळी

नि रेकी करून हेरून ठेवलेल्या कमीत कमी रहदारीच्या निर्जन रस्त्यावर

म्हणजे सावज टप्प्यावर येताच क्षणार्धात गोळ्या झाडून निसटून जाण्यासाठी

अनेक रस्ते असतील अशी जागा, स्थळ, चौक, कोपरा इत्यादी…..

घटनाक्रम 2 –

आक्रोश….. आक्रोश…… आक्रोश…. हज्जारवेळा

हळहळ….. हळहळ….. हळहळ… दोन हज्जारवेळा

राग…. राग…. संताप…. चीड… तीन हज्जारवेळा

अगतिक…अगतिक…अगतिक…संवेदनशील लोकसंख्येनुसार

नंतर

ब्रेकींग न्यूज… बेकींग न्यूज… ब्रेकींग न्यू…

टी.व्ही… चॅनेल्स… वर्तमानपत्रे… फेसबुक… ट्वीटर

आपापसात शेअरींग शेपाचशेवेळा पुढल्या सात-आठ दिवसांत उतरत्या क्रमाने

(याच सिक्वेन्समध्ये चर्चा, मंथन, निषेध, मोर्चेनि अज्ञात मारेकर्‍याचा आपापल्या वकुबानुसार अन्वयार्थ किंवा सामाजिक, राजकीय, वैयक्तिक सोयीसाठी रंगवून घेता येईल कॅरेक्टर वेगवेगळ्या रंगात उदाहरणार्थ भगवा, नारंगी, हिरवा वगैरे…..)

नंतर नंतर –

अधून-मधून ब्रेकींग न्यूज…. अधून-मधून चिंता…. अधून-मधून आठवण वगैरे…..

नंतर नंतर नंतर

लोकक्षोभास्तव दोन चार संशयीत, निरपराध, अपराधी किंवा अट्टल ‘डर्मी’ जेरबंद नि ‘मारेकरी सापडतीलच…. आम्ही सोडणार नाही’चे आश्वासन अधून-मधून.

गोष्टीचा शेवट

1. ‘माणूस मेला तरी विचार मरत नसतो’ हा मंत्र ज्यांना या गोष्टीचे अपरंपार दु:ख झाले आहे अशा पामरांनी दररोज एकशे एकवीस वेळा म्हणावा दु:ख हलके होईपर्यंत.

2. ‘आम्ही लढत राहू अशा फॅसिस्ट शक्तींवरूद्ध’ असं दोनशे चाळीस वेळा म्हणायचं याच समुहानं न विसरता पुन्हा अशीच गोष्ट रचली तर जाणार नाही ना या विचारानं मनोमन धास्तावून.

मंगेश काळे