अंनिसचे कार्यकर्ते कायद्यावर विश्वास ठेवतात. विवेकाने आणि संयमाने प्रतिक्रिया देतात. नुकताच खुनी पकडल्याच्या बातम्या आल्या आहेत; पण खुनी पकडला तरी आम्ही जवाब मागतो आहोत. मास्टरमाईंडपर्यंत कधी पोचणार? खुनी पकडला ही चांगली बाब आहे. त्याबद्दल अभिनंदन; पण मास्टर माईंडपर्यंत पोचले पाहिजे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे हवेत. मिळवलेले पुरावे न्यायालयात मांडले पाहिजेत. मगच शिक्षा होणार आणि न्याय मिळणार. आजपर्यंतचा अनुभव काय सांगतो? मनात शंका आहे-
तपासाचा बाँब फुटणार की निकामी होणार?
2002 ते 2008 पर्यंत देशात अनेक ठिकाणी बाँबस्फोट झाले. प्रत्येक वेळी तपासयंत्रणेने काही मुस्लिम युवकांना पकडले, तुरुंगात टाकले. लष्कर-ए-तोयबा, सिमी अशा संघटनांनी बाँबस्फोट घडवले आहेत, अशा अधिकार्यांनी मुलाखती दिल्या. पाच-दहा वर्षे तुरुंगात काढल्यावर मुस्लिम युवक पुराव्याअभावी निर्दोष सुटले.
2008 साली मालेगावमध्येही बाँबस्फोट झाला. नेहमीप्रमाणे मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबण्यात आले; पण हा तपास पुढे एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे आला. त्यांनी गुन्ह्यात सापडलेल्या स्कूटरचा धागा पकडला आणि 2002 ते 2008 पर्यंतचे बाँबस्फोट धर्मांध अतिरेक्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी संशयित आरोपी पकडले. काही पुरावे कोर्टाला सादर केले. अजून तीन लॅपटॉपमधील माहिती वाचून पुढचे पुरावे सादर करण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागून घेतला आणि दुसर्याच दिवशी 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात करकरे शहीद झाले. त्यांनी जमा केलेल्या पुराव्याचे काय झाले? तीन लॅपटॉपमध्ये कोणत्या ‘राष्ट्रभक्तां’ची नावे होती, ते जनतेला कळले नाही आणि कोर्टालाही. हेमंत करकरेंनी पकडलेले साध्वी, कर्नल इत्यादी संशयित तुरुंगातून बाहेर आले, म्हणून पुरावा कोर्टात सादर होणे महत्त्वाचे आहे. पाच वर्षे झालेली दिरंगाई आणि सत्ताधार्यांचे संशयित संघटनेशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता तपासाचा बाँब निकामी तर होणार नाही ना, अशी भीती वाटते.
मास्टरमाईंड कोण?
एटीएसने पकडलेल्या आरोपींच्याकडे तयार बाँब मिळाले, पिस्तुले मिळाली. काही बाँब आणि पिस्तुले अर्धवट अवस्थेत आहेत, हे पकडलेले आरोपी केवळ जुळारी आहेत. स्कूटरच्या कारखान्यात विविध ठिकाणी तयार केलेले पार्ट जोडले जातात, तसे हे पिस्तूल आणि बाँबचे पार्ट एकत्र करून जोडण्याचे काम करणारे आहेत. हे पार्ट तयार करणारे ‘लघुउद्योजक’ अजून सापडलेले नाहीत. या कारखान्याचा मुख्य संचालक कुठे आहे? त्याच्यापर्यंत तपास यंत्रणा पोचणार काय? की या छोट्या जुळार्यांनाच बळीचा बकरा करणार आहे?
गोरक्षणासाठी हत्यारे?
यातील एक संशयित गोरक्षक आहे. देशातल्या गोरक्षकांच्या कथा तर प्रसिद्ध आहेत. गायीचे मांस आणले, या खोट्या आरोपावरून अकलाखचा खून करण्यात आला. राजस्थानमध्ये दोन मुxस्लिमांना हाच आरोप करून ठार मारले. या झुंडशाहीवर न्यायालयानेही ताशेरे ओढले.
गोरक्षणासाठी शासनाने कायदा केला आहे. या कायद्यामध्ये स्वयंस्फूर्त गोरक्षणाला स्थान आहे काय? कायदा हातात घेऊन शिक्षा फर्मावण्याची आणि अमलात आणण्याची सोय आहे काय?
स्फोट घडविणारे देशद्रोही आणि धर्मद्रोही
बेकायदेशीररित्या तयार केलेल्या या बाँबचे काय करणार होते, हे समजले नाही. परराष्ट्रात जाऊन बाँब टाकणार होते काय? तशी तयारी दिसत नाही. म्हणजे इथल्याच गर्दीत हे बाँब फुटणार होते. ‘देव, देश आणि धर्मासाठी’ तळहातावर शीर घेतलेले हे वीर देशातल्याच नागरिकांना ठार मारणार होते. लहान मुले-तरुण-वृद्ध पुरुष-महिला असा काही भेद न करता नागरिक मारणार होते, जखमी करणार होते, अनाथ करणार होते. एटीएसचे आभार मानतानाच हे खुनी धर्मद्रोही आणि देशद्रोही आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे.
मीडियाची भूमिका
देशात बाँबस्फोट घडवणारे हे एकटेच देशद्रोही नाहीत? अतिरेकी नाहीत. अशा अनेक घटना घडतात. त्यातील अनेकजण पोलीस कारवाईत मरतात; काही सापडतात; पण यापैकी कोणाच्या आई-वडिलांना काय काय वाटते? भाऊ-बहीण आणि बायको काय म्हणते? त्याचे सहकारी त्याला निर्दोष म्हणतात, अशा गोष्टी टी.व्ही.वर दाखवल्या जात नाहीत; मग हाच का अपवाद? या देशद्रोह्यांबद्दल मीडियाला पुळका का? सत्ताधार्यांशी जवळीक की धर्मांध म्हणून? कदाचित दुसरी बाजू दाखवली नाही, तर आपल्याला बदनामी केली म्हणून कोर्टात खेचतील, ही भीती मीडियाला असावी.
हे आमचेच : आमचे नव्हे!
संशयित संघटनेचे वकील मीडियासमोर सांगतात, “हे आमच्या संघटनेचे साधक नाहीत; पण आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करणार आहोत.” या बोटावरची थुंकी त्या बोटावर नेणार्या अशा प्रवक्त्यांबद्दल काय म्हणावे?
द्वेषाचे राजकारण करणार्यांवर कारवाई का नाही?
झाकीर नाईक नावाच्या गृहस्थावर गुन्हा दाखल करण्यात आला. तो सापडला नाही. ‘त्याचे लिखाण वाचून आपण अतिरेकी कारवायांकडे वळलो’ असा जबाब बांगला देशातल्या तरुणांनी दिला होता. त्यामुळे झाकीर नाईकला पोलीस पकडणार आहेत. मग देशात धर्मनिरपेक्षवादी, समाजवादी आणि वैज्ञानिक जागृती करणार्या पुरोगाम्यांविरोधात द्वेष पसरवणार्या, त्यांना खुनाच्या धमक्या देणार्या, प्रत्यक्ष खून पाडल्याचा आरोप असणार्यांवर कारवाई का नाही? की ते स्वत:ला‘ धर्मरक्षक’ म्हणवून घेतात म्हणून? अशा शंका सामान्यांना आल्या तर ते चूक नाही.
सत्संग?
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणीत असलेले लोक आधार शोधत असतात. त्यांना सत्संगाच्या नावाखाली एकत्र करायचे. ‘गुरुवे: नम:’ किंवा ‘कुलदेवताय नम:’ असा मंत्र देऊन काल्पनिक वाईट शक्तींवर विजय मिळविण्याच्या कामाला लावायचे. त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनवाले, पुरोगामी, निधर्मी आणि अल्पसंख्याकांबद्दल द्वेष पसरावयाचा. द्वेषाचे कुंड जास्त भरले की, त्यांना दंगलीत उतरवायचे. गोरक्षा, भोंदू बचाव, पाकिस्तानातले मंदिर पाडले, अशा कारणांनी निदर्शनात सहभागी करायचे. अर्पणच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे. ही बुवाबाजी करून मिळालेल्या पैशांवर धर्मांध पोसायचे, यावर उपाय काय?
अशा बुवाबाजीवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार असा प्रबोधनाचा उपाय वापरला पाहिजे. 20 ऑगस्ट ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करण्याचे जाहीर झाले आहे, ही आशादायक बाब आहे.
या वर्षी 20 जुलै ते 20 ऑगस्ट ‘जवाब दो’ आंदोलन प्रत्येक शाखेने त्वेषाने केले. 20 ऑगस्ट मॉर्निंग वॉक, परिसंवाद, निदर्शने, सभा यांनी साजरा केला. वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त सप्रयोग व्याख्याने दिली.
बुवांची कार्यपद्धती समजून घेतली व पुरोगाम्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले, तर बुवाबाजीवर मात करणे अवघड नाही.