मारेकरी सापडावेत, ही इच्छाशक्तीच नाही – डॉ. एन. डी. पाटील
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, अशी सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. गैरकृत्य करणार्या धर्मांध संघटनांवर बंदी घाला, अशी आमची मागणी असतानाही सरकार काहीच करीत नाही. या संघटनांवर बंदी का घालत नाही, असा सवाल करीत पाटील यांनी गैरकृत्य करणार्या धर्मांधसंघटनांना धडा शिकवा, असे आवाहनही केले.
मनोवैज्ञानिकांची तपासासाठी मदत घ्या – अॅड. अभय नेवगी
‘दिवंगत ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणार्या मारेकर्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मनोवैज्ञानिकांकडून चौकशी करण्याची गरज आहे. मारेकरी अतिशय चाणाक्ष आणि प्रशिक्षित असल्याने एनआयएकडून तपास केल्यास पानसरे हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंच पोचणे शक्य होईल,’ असे मत दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’शी बोलताना व्यक्त केले.
अॅड. नेवगी म्हणाले, ‘विवेकवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या करणार्यांचा तपास सीबीआय आणि एसआयटीकडून सुरू आहे. पानसरे हत्येचा छडा लावण्यासाठी कोल्हापूरच्या एसआयटी पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. हत्येचा कट नियोजनबद्धरित्या रचला आहे. अटक केलेल्या संशयितांकडून माहिती घेत हत्येचा तपास सुरू केला आहे. मात्र सर्व आरोपी अतिशय चाणाक्ष आणि प्रशिक्षित आहेत. हत्येचे नियोजन, हत्यार, पुरावा नष्ट करणे, पोलिसांनी ताब्यात घेतल्यास कोणत्याही प्रकारची माहिती न देणे, तपास यंत्रणेची दिशाभूल करणे अशा प्रकाराचे त्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्याकडून विशेष माहिती घेण्याचे कौशल्य मनोवैज्ञानिकांकडे आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) विशेष प्रशिक्षित मनोवैज्ञानिक आहेत. त्यांना संशयिताकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे वर्तन, मानसिकता आणि बोलण्याच्या अचूक कौशल्यातून तपास यंत्रणेला महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. त्याचा मोठा फायदा पानसरे हत्या तपास प्रकरणात होऊ शकतो. सध्या सीबीआय आणि एसआयटीकडून वेगवेगळ्या पातळीवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे; मात्र अशा पद्धतीने तपासाला अधिक मदत होईल, अशी अपेक्षा असल्याचे अॅड. नेवगी यांनी सांगितले.
मात्र सीबीआयने एनआयएला विनंती केल्यास पथकाकडून चौकशी होऊ शकते. तपास यंत्रणेच्या हाती दाभोलकर यांचा मारेकरी सापडला आहे. या मारेकर्याकडून मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’
बुद्धिवंतांच्या हत्येला राजकारणी जबाबदार – निखिल वागळे
दहशतवाद्यांना वाचवणारे राजकारणी बुद्धिवंतांच्या हत्येला जबाबदार आहेत, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आता पकडलेला मारेकरी खरा असेल, तर तो खरा असल्याचे पुरावे सादर करा. लोकांचा तपास यंत्रणेवर विश्वास नाही. तपास यंत्रणेला कीड लागली आहे. जी पकडापकडी करता ती खरी करा.
हिंसेला अहिंसेतून उत्तर देणे हाच खरा विजय आहे. हत्यांच्या मास्टर माईंडपर्यंत पोचायला हवे. हक्क संघर्ष करून मिळावायला हवेत. सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. पैसा-सत्ता महत्त्वाची आहे, सत्य नाही. अशा परिस्थितीत भविष्यात आपली पुढची पिढी प्रेम, सहिष्णुतेच्या वातावरणात वाढवायची असेल, तर मूलभूत हक्काच्या लढाईत सामील व्हावे. अंनिस म्हणजे माणसाला जगवणारा विचार आहे. माणुसकी संपविण्यासाठी पुढे येणार्या धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी सज्ज व्हा. कोणत्याही धर्माच्या नावाखाली होणारा दहशतवाद धोकादायक आहे.
धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ल्यासाठीच स्फोटके – रावसाहेब कसबे
“पोलिसांनी कट्टरपंथियांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठी ठेवला होता.” असा आरोप ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केला. आता जे मारेकरी पकडले गेले आहेत, त्या बातमीतून एक संदेश दिला जातो की, विशिष्ट धर्माचेच लोक दहशतवादी असतात, असे नाही. जे लोक मूलतत्त्ववादी असतात, ते दहशतवादी बनतात; मग धर्म कोणताही असो.
प्रा. कसबे यांनी दाभोलकरांच्या कार्याचे महत्त्व सांगताना ‘कठोर धर्मचिकित्सा’ केली, तर ती दाभोलकरांना खरी आदरांजली ठरेल, असे मत मांडले.