विज्ञान आणि धर्म हे दोन्हीही सत्य, ज्ञानाच्या शोधाचे मार्ग आहेत असे दाखविण्याची सध्या चाललेली धडपड ही बरीचशी मध्ययुगातील धर्माच्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि त्याच संकल्पनेचे पुनरुज्जीवनही आहे. उत्क्रांती म्हणजे नैसर्गिक जगताची रचना करण्याचा ‘ईश्वराचा मार्ग’; मानवामध्ये स्वसंवेद्यता निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे ‘उत्क्रांती’; ‘वैज्ञानिक शोधांमधून ईश्वराची योजनाच उघड होते’ आणि ‘विज्ञान ही माणसाला ईश्वरानेच दिलेली देणगी आहे,’ अशी अनेक विधाने आपल्या कानावर सतत आदळत असतात. काही वैज्ञानिक जाणूनबुजून किंवा अनावधानाने आपल्या वैयक्तिक अलौकिक श्रद्धा आणि संशोधनाचे विषय यामध्ये गुंतागुंत करून विज्ञान आणि अलौकिकशक्तीवाद यांना वेगवेगळे न ठेवता त्यात घोटाळा करतात.
कृतीचे समर्थन
अमेरिकन वैज्ञानिक डॉ. रिचर्ड स्नीड यांची सीएनएन या वाहिनीवर 1999 साली एक मुलाखत दाखविली होती. त्यांत त्यांनी मानवी क्लोनिंगचा पुरस्कार करताना म्हटले होते की, ‘ईश्वराने माणूस स्वतःच्याच प्रतिमेनुसार बनविला आणि देवाला जर क्लोनिंग पसंत नसते, तर त्याने माणसाला तसे करण्याची बुद्धीच दिली नसती; क्लोनिंग म्हणजे देवाच्या जवळ पोचण्याचाच एक मार्ग आहे.’ मानवी जिनोम संशोधन संस्थेचे संचालक फ्रान्सिस कोलीन हेही असेच एक मोठे धार्मिक ख्रिश्चन व त्याबरोबरच प्रमुख वैज्ञानिक आहेत. क्लोनिंग म्हणजे स्वतःच देव बनण्याचा प्रयत्न नाही; हा देवाच्या सृजनशीलतेचे आदरयुक्त कौतुक करण्याचा मानवाचा एक मार्ग आहे. यामुळे देवाला माणूस आव्हान देतो असे नव्हे; देवाला त्यापासून काहीही धोका नाही; मला तर वाटतं की, देवाला या चिमुकल्या माणसांचा त्याने बनविलेल्या निर्मितीची नियमपुस्तिका समजून घेण्याचा खटाटोप फार कौतुकास्पद वाटत असावा. कारण ती पुस्तिका खरोखरच ‘फार सक्षम आणि बिनतोड आहे.’ असे त्यांनीही एका टीव्ही वरील मुलाखतीत सांगितले होते.
अशा तर्हेने कोणत्याही रुढीचे किंवा कृतीचे समर्थन करून तिला वैधता देण्यासाठी देवाचा उपयोग करता येतो आणि सर्रासपणे केला जातो. त्यात वैज्ञानिक संशोधनही आलेच! तसेच काही ज्ञानक्षेत्रांवर बंदी घालण्यास आणि त्यात मुक्त संशोधन किंवा चिकित्सक विचार करू न देण्यासही देवाचा उपयोग केला जातो. या बंदीची अंमलबजावणी अर्थातच देवाचे रखवालदार आणि देवाच्याच नावाने या रखवालीला मान्यता देणारे त्यांचे चेले करतात.
वैज्ञानिकांनी लावलेले शोध हस्तगत करून ते धर्माचेच अंतर्भूत अंग म्हणजे धार्मिक सत्य आहे असे दाखविण्याचा सतत चालू असलेला प्रयत्न हाच गेल्या 500 वर्षांचा वैचारिक इतिहास आहे. एकमेकांविषयी ’आदर’, ‘सहकार’, ‘समानता शोधून संवाद साधणं’ आणि ‘मानवकल्याण’ ही सारी उद्दिष्टे मोठी स्पृहणीय आहेत. परंतु अलौकिकशक्तीवाद आणि विज्ञान यांना ज्ञानमीमांसात्मक दुव्याने जोडण्याने विज्ञानाबाबत एक विकृत दृष्टिकोन निर्माण होतो; त्यामुळे ईश्वराच्या अभिकल्पाचे किंवा योजनेचे खंडन करणारी वैज्ञानिक पद्धतीच नाकारण्यात येते.
विज्ञानात माहिती व आधारसामग्री सातत्याने गोळा करणे चालूच असते. त्या शोधाला अंत नाही. पण प्रत्येक पुढच्या पायरीला मिळालेल्या माहितीतून आणि साध्य केलेल्या मापनातून आकलन वाढतं. त्यासाठीच आपण जनुकक्रम ठरविण्याचे नवनवीन मार्ग शोधण्यात व लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या तारामंडळांचं निरीक्षण करण्यात सतत गर्क राहतो आणि त्यावर प्रचंड खर्च करतो. त्यामुळे आधिभौतिक स्पष्टीकरणं केवळ निरर्थक नाही, तर हानिकारक ठरतात. माहिती अपुरी असल्याने उत्तर सहज सापडत नसेल तर आपण ती माहिती उपलब्ध होईपर्यंत थांबतो किंवा स्वतःच माहिती मिळविण्यासाठी प्रयोग करतो. पण वैज्ञानिक कधी अलौकिकतेचा हवाला देत नाहीत. पुरेसा वेळ आणि माहिती मिळताच अनुत्तरित असलेल्या प्रश्नांमधले गूढ नाहीसे होते, ही गोष्ट इतिहासानेच स्पष्ट केली आहे.
धर्म व विज्ञान यांच्यातील मर्यादा
वस्तुनिष्ठ भौतिक पुराव्याने कोणतीही नैसर्गिक घटना अलौकिक कारणाने घडली असं कधीच सिद्ध झालेलं नाही. या उलट आकाशात चमकणार्या विजेपासून ते तर्हेतर्हेच्या रोगांबाबत उत्पन्न होणारी भीती, अंधश्रद्धा आणि पौराणिक कथा तर्कशुद्ध तपासणीमुळे एकामागून एक नाहीशा झाल्या आहेत आणि होत आहेत. हे सर्व म्हणजेच विज्ञान. जुन्या प्रश्नांची उत्तरे मिळविणे किंवा जुन्या उत्तरांमध्ये सुधारणा करणे या बरोबरच नवीन प्रश्नही तयार होतच राहतात. ‘नेचर’ या नियतकालिकाचे भूतपूर्व संपादक जॉन मॅडॉक्स यांच्या मते सखोल आकलन आणखी नवीन प्रश्न उपस्थित करत राहील.
दुर्दैवाने वैज्ञानिक स्वतःच केव्हा केव्हा ईश्वरतत्त्व किंवा दैवी इच्छा अशा बाबींचा उल्लेख करून विज्ञान आणि धर्म यांच्यातील मर्यादेचं उल्लंघन करतात. धर्म आणि विज्ञानातील दरी भरून काढण्यासाठी काही वैज्ञानिकांच्या मते पवित्र धर्मग्रंथांचं विज्ञान समर्थनच करतं; एवढंच नव्हे तर देवाच्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा ते उभं करू शकतं. आणखी काही वैज्ञानिक एका काहीशा अलौकिक अशा मानवतत्त्वावर म्हणजे मानवाला सर्व दृष्टींनी सोयीची होईल, अशीच सृष्टीची रचना केली गेली आहे, यावर विश्वास ठेवतात. उत्क्रांतीच्या चर्चेमध्ये आपण कसे निःपक्षपाती आहोत हे दाखविण्यासाठी काही वैज्ञानिक सत्याच्या शोधात आणि ज्ञानसंपादनात धर्म आणि विज्ञान या दोन्हींचे स्थान महत्त्वाचे आहे’ असे आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात. याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे वैज्ञानिकांकडून तडजोड आणि विनम्रतेची अपेक्षा करणं. परंतु अशा दृष्टिकोनाचा खरोखर काही उपयोग आहे का? असेल असं वाटत नाही.
इथे हे स्पष्ट करायला पाहिजे की धर्म आणि विज्ञान दोन्हीही आपापल्या प्रांतात जे काही स्वतंत्रपणे करतात तेवढ्यापुरते दोन्हीही वैध आहेत; परंतु एक दुसर्याच्या प्रांतात काही करू गेल्यास वैध नाहीत. विज्ञान ही एक नैसर्गिक घटनांचं स्पष्टीकरण करण्याची उत्कृष्ट पद्धती आहे. इतिहासाने हे सिद्ध केले आहे. परंतु विज्ञान नैतिकतेबाबत काहीच बोलत नाही. या उलट धर्म माणसाला नैतिक मार्गदर्शन करणारी उपयुक्त मांडणी आहे. परंतु निसर्गसृष्टीचं पद्धतशीर संशोधन करण्यास धर्म अगदीच निरुपयोगी ठरतो. जेनेसिस किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देणारा इतर कोणताही निर्मितीचा सिद्धांत ज्ञानसागर केवळ गढूळ करतो. थोडक्यात धर्म व विज्ञान वेगवेगळे आहेत का? असं विचारल्यास उत्तर हो आहेत असंच आहे. आणि समान आहेत? नाही, समान नाहीत.
वैज्ञानिक व आध्यात्मिकता
बराच ऊहापोह केल्यावर एक गैरसमजूत उघड होते. वैज्ञानिकांमध्ये आध्यात्मिकतेचा एवढा अभाव का जाणवतो? असा प्रश्न ऐकून वैज्ञानिकांना आश्वर्याचा धक्काच बसतो. या प्रश्नाचं उत्तर देताना प्रथम आध्यात्मिकता आणि धर्म यांच्यातील भेद स्पष्ट केले पाहिजेत. विज्ञानामध्ये स्थान नाकारलं जातं ते धर्माला; अध्यात्माला नाही. विज्ञानात आध्यात्मिकता शक़्य आहे एवढेच नव्हे, तर त्यामुळे जर नैसर्गिक जगताचं प्रेम आणि ते कसं चालतं हे जाणून घेण्याची इच्छा बळकट होत असेल तर आध्यात्मिक असणं फायद्याचंच आहे. वैज्ञानिक स्वतःला आध्यात्मिकही मानतात. वैज्ञानिकही समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळांच्या खडकातून जाताना स्तीमित होतो; फाल्गुनातल्या तजेलदार रात्री तार्यांच्या वैभवापुढे नतमस्तक होतो; एकएक इवलीशी पेशी विभाजित होताना पाहून त्याला नेहमीच आश्चर्य वाटत राहतं आणि मानवाच्या सृजनशीलतेमुळे तो प्रेरित होतो. शिवाय निसर्गनियमांच्या आणि यंत्रणेच्या आकलनामुळे वैज्ञानिकांचा निसर्गसौंदर्याचा आस्वाद अनेक पटीने वाढतो. प्रत्येक वैज्ञानिक ‘वैज्ञानिकांमध्ये आध्यात्मिकतेचा अभाव असतो’ या विधानाला आक्षेप घेईल. धार्मिक आणि शैक्षणिक समुदायांनी असा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्याला खोडून काढणं वैज्ञानिकांना क्रमप्राप्त होईल.
विज्ञानात जरी केवळ तथ्ये, पुरावे आणि गृहितके यांनाच स्थान असले तरी इतरांचा आपापल्या श्रद्धा बाळगण्याचा अधिकार मान्य करायलाच हवा. मग त्या श्रद्धा तुमच्या विचारांच्या वा वैज्ञानिक पुराव्यांच्या उलट का असेनात. पण त्याच वेळी ही खबरदारी घ्यायला हवी की कट्टरवाद्यांचा आपले वैयक्तिक विचार इतरांच्या गळी उतरविण्याचा किंवा त्यांना शिक्षण प्रणालीमध्ये घुसडण्याचा प्रयत्न किंवा आमच्या श्रद्धांना विज्ञानाचा भक्कम आधार आहे असा आवेश आणून विज्ञानाच्या चर्चेत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे.
संघर्षाचे मुद्दे
विज्ञानात नैसर्गिक जगताचे आकलन करण्याचा प्रयत्न केला जातो. धर्मामध्ये विचार असतो, माणसाच्या सदाचाराच्या आणि नैतिक व पारमार्थिक गरजांचा. हा भेद जर इतका सरळ सोपा असता तर! विज्ञान व धर्म जर आपापल्या क्षेत्रांच्या मर्यादांमध्येच राहिले असते तर काही वादच उरला नसता. परंतु या क्षेत्रांचे विभाजन इतके स्पष्ट नाही. बराच भाग दोन्हींनी व्यापलेला आहे. असं होणं अपरिहार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्हीमध्ये सतत नवनवीन शोध लागतच राहतात. त्यांचा माणसाच्या जीवनावर बरा-वाईट परिणाम होतोच आणि त्यातून नैतिकता आणि मानवी मूल्यांबाबत नवीन समस्या उत्पन्न होतात. काही भली माणसं विज्ञान व धर्म यांच्यातील सरमिसळीला प्रोत्साहनही देतात. त्यांना दोन्हीमध्ये काही सखोल मौलिकता दिसते आणि विज्ञान व धर्म यांचा संगम घडवून आणण्याचा ते प्रयत्न करतात. वैयक्तिक तत्त्वज्ञानामध्ये असे कप्पे असू नयेत, असं त्यांना वाटतं. विज्ञान व धर्म दोन्हीही जग आणि त्यातील माणसाचे स्थान या गहन प्रश्नांचा विचार करतात हे त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. जगाबद्दल कुतूहल, जिज्ञासा आणि दरारा यातूनच दोन्हीही जन्माला येतात. तेव्हा या दोन्हीमध्ये काही अंशी मिलाफ होणं शक्य आहे; परंतु त्या दोन्हीमधील प्रचंड भेद ध्यानात ठेवले तरच.
धर्मशास्त्र विज्ञानाशी संघर्ष करते का? तात्त्विक दृष्टीने तशी गरज नाही. परंतु वास्तवात मात्र असा संघर्ष होतो. कारण धर्माला कोणताही बदल करण्यासाठी विज्ञानापेक्षा कितीतरी मोठ्या जनसमुदायाची संमती मिळविणे आवश्यक आहे. कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करणेच चांगले आहे. पण विज्ञान सर्वच समस्यांची वा घटनांची सारी उत्तरे देण्याचा दावा कधीच करीत नाही. याचे कारण सरळ आहे. आपल्याला अजून कितीतरी ज्ञान मिळालेले नाही. धर्म मात्र त्याच्या सहजप्रवृत्तीमुळे अशी उत्तरे देतो; निदान पूर्वी तरी देत असेच. धार्मिक परिवर्तनाच्या या अत्यंत धीम्या गतीमुळे विज्ञानाकडून जास्त पुराव्यांची अपेक्षा केली जाते. त्यामुळे विज्ञानाला नवनवीन पुरावे गोळा करण्यासाठी व उत्तरे शोधण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहावे लागते. धर्म जेव्हा धार्मिक श्रद्धांचे नियम घालून देतो आणि त्याद्वारे विज्ञानाच्या या उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा धर्मच आणखी दुबळा होतो.
बरेचसे वैज्ञानिक, धर्म जोपर्यंत त्यांच्या कामात लुडबूड करीत नाही, तोपर्यंत धर्माला त्याच्या मार्गाने जाऊ देण्यास खुशीने तयार असतात. परंतु दुर्दैवाने जे धर्म आपली धार्मिक सत्ता श्रेष्ठ असल्याचा दावा करतात ते मात्र विज्ञानाला किंवा वैयक्तिक वैज्ञानिकांना आपापले काम शांतपणे करू द्यायला तयार नसतात. बहुधा धार्मिक गटच, ज्यांचे त्यांना भय वाटत असते अशा वैज्ञानिक समस्या हाताळण्यात पुढाकार घेतात. त्याबाबत त्यांना माहिती मात्र जवळजवळ नसतेच. त्यामुळे तात्त्विक दृष्टीने संघर्ष असायचे कारण नसले, तरी वास्तवात संघर्ष होतोच. कारण श्रद्धावंतांना विज्ञान आपल्या श्रद्धांचा पायाच उखडेल अशी भीती वाटते आणि तेच विज्ञान आणि धर्म यांच्या संघर्षात सध्या सर्वांच्या पुढे आहेत. यांच्याचमुळे विज्ञानाला स्वतःच्या संरक्षणासाठी या संघर्षात पडणे अपरिहार्य झाले आहे.
थोडक्यात, हा लढा प्रत्यक्ष धर्माचा नाही. आपली धार्मिक मते विज्ञान व वैज्ञानिकांवरच नव्हे तर सार्या जगावर लादायला निघालेल्या संख्येने थोडे असलेल्या अस्सल श्रद्धावान मंडळींचा हा संघर्ष आहे. सर्व समस्यांची उत्तरे ते जाणतात अशी त्यांची खात्री आहे आणि बाकी सार्यांनी ते मान्य केले पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास आहे. त्यांनी ही लढाई विज्ञान आणि ऐहिक समाजाविरुद्ध तर सुरू केली आहे.
– प्रभाकर नानावटी, सुमन ओक
संदर्भ :
1. Science and Religion, Ed: Paul Krutz, Prometheus Books
2. Cosmic Variance, Sean Carroll , Discover, 2009
3. Faith vs. Fact, Jeffrey Schloss, Washington Post, 2015
4. Why Science and Religion are Incompatible, Victor Stenger, Huffington Post, 2011