सध्या देशातील वातावरण अतिशय चिंताजनक आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या खुनासाठी पकडले गेलेले आरोपी हे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ‘आमच्या धर्माविरोधी बोललात, तर तुम्हाला संपवून टाकू,’ ही प्रवृत्ती अत्यंत घातक व संविधानविरोधी आहे. आमच्या विचारांच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही, सत्ताधारी मंत्री व अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, झुंडशाहीने विशिष्ट लोकांचा करण्यात येणारा खात्मा या सर्व गोष्टी संविधानप्रेमी नागरिकांना आणि पुरोगामी विचारांच्या लोकांना काळजीत टाकणार्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 9 सप्टेंबर 2018 रोजी पुणे येथे ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अनेक नामवंत विचारवंतांनी आपले परखड विचार स्पष्टपणे मांडले.
या परिषदेचे उद्घाटन कल्पक, अभिनव पद्धतीने प्रसिद्ध विचारवंत आर्यसमाजी स्वामी अग्निवेश यांच्या हस्ते करण्यात आले. एका मोठ्या बोर्डवर धार्मिक दहशतवाद, असहिष्णुता, जातीयवाद, अंधश्रद्धा या देशासमोरील समस्यांचे फलक लावण्यात आले होते. हे फलक हटवताच संविधानाची प्रास्ताविका उजागर स्वरुपात समोर आली. संविधान या समस्यांनी झाकोळले गेले आहे आणि या समस्या दूर करून संविधान आपल्याला जपायचे आहे, असा संदेश या उद्घाटनातून देण्यात आला. उपस्थित समुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात या संकल्पनेचे उत्स्फूर्त स्वागत केले. महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव प्रा. माधव बावगे यांनी अंनिसच्या कार्याची चतु:सूत्री व सनातनी प्रवृत्तीचा वाढता धोका, यावर भाष्य करत सर्वांचे स्वागत केले.
राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या बीजभाषणात परिषद का घ्यावी लागली, हे सांगितले. कट्टर धार्मिकता व जातीयवाद यांच्या वाढत्या धोक्यावर चर्चा होऊन त्याविरुद्ध प्रखरपणे लढण्याचा संकल्प करण्याचे उद्दिष्ट या परिषदेचे असल्याचे अविनाश पाटील म्हणाले. सर्वांनी अहिंसेची भूमिका स्पष्टपणे स्वीकारली पाहिजे, नक्षलवादी हिंसेचाही निषेध केला पाहिजे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
उद्घाटन सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून स्वामी अग्निवेश यांनी पुढीलप्रमाणे आपले विचार मांडले –
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपली संस्कृती असताना सध्या देशात जे विषारी वातावरण आहे, ते चिंता वाटायला लावणारे आहे. सध्या देशात दहशतीचे वातावरण आहे. या विरोधी दलित, शोषित घटकांनी एका झेंड्याखाली येऊन लढा देणे गरजेचे आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, तो धर्म नाही. संविधान हाच खरा धर्म आपण मानला पाहिजे. राजकीय गुलामगिरीपेक्षा अंधविश्वासाची गुलामगिरी अधिक धोकादायक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही केवळ एक समिती नसून ते एक आंदोलन आहे. त्याला सर्वांनी संघटितपणे पाठिंबा दिला पाहिजे. मानवता हा एकच धर्म सर्वांनी मानला पाहिजे. सामाजिक विषमता ही पण एक मोठी समस्या आहे. ‘कमानेवाला खाएगा, लुटनेवाला जाएगा,’ नया जमाना आएगा असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
मिलिंद देशमुख यांनी या सत्राचे आभार प्रदर्शन केले.
धार्मिक दहशतवाद-समाजासमोरील आव्हान व उपाय, या दुसर्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष रवींद्र टोणगावकर, पत्रकार अलका धूपकर, राजकीय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आणि राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष सुरेश खैरनार हे विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.
राहुल थोरात – स्वत:ला धार्मिक म्हणवणारेच खरे अधार्मिक आहेत. धर्माची चिकित्सा करते म्हणून कट्टरवादी अंनिसला धर्मद्रोही, दुर्जन, असुर ठरवतात, अंनिसच्या विधायक उपक्रमांना विरोध करतात. 2006 ते 2008 या काळात अंनिस विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी 12 कोर्ट केसेस दाखल केल्या. त्यापैकी 7 केसेसचा निकाल लागला असून त्या सर्व केसेस अंनिसने जिंकल्या आहेत. अंनिसला विविध प्रकारे त्रास देऊनही अंनिसच्या कामाला लोकमान्यता मिळत आहे, हे सहन न होऊन डॉ. दाभोलकरांचा खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सनातनी शक्तींना न घाबरता संघटितपणे विविध पातळ्यांवर त्यांचा मुकाबला केला पाहिजे.
धर्माची उत्पत्ती कशी व केव्हा झाली, हे सांगत अंनिसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. रवींद्र टोणगावकर यांनी जगात स्त्री व पुरुष याच दोन जाती असल्याचे प्रतिपादन केले. आत्मा व पुनर्जन्म नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. निर्भिड पत्रकार अलका धूपकर यांनी सत्य परखडपणे लिहिणार्या पत्रकारांच्यावर व प्रसारमाध्यमांच्या मालकांवर खोट्या केसेस टाकून त्यांची गळचेपी केली जात आहे, असे विचार व्यक्त केले. विचारांचा प्रतिवाद केला पाहिजे. तरुण पिढीशी संवाद साधून त्यांना बुद्धिभेद कसा केला जातो, विवेकवाद म्हणजे काय हे समजावून सांगितले पाहिजे.
आपल्या तडाखेबंद भाषणात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार म्हणाले, ‘केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून प्रश्न सुटणार नाही. बहुजन समाजातील अनेक तरुण कट्टरवादी संघटनांकडे जाती आहेत, याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे.’ विनायक सावळे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. ठकसेन गोराणे यांनी आभारप्रदर्शन केले.
भोजनानंतर झालेल्या ‘असहिष्णुता-आव्हान व उपाय’ या सत्रात ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, वारकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नुर महाराज, ज्येष्ठ विचारवंत व लेखक उत्तम कांबळे, हे सहभागी झाले होते. एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशनचे सचिव प्रा. सुभाष वारे अध्यक्षस्थानी होते.
जतीन देसाई – संघ व जमाते इस्लामी सारख्या संघटनांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. हेच लोक धर्मरक्षणाच्या नावाखाली दहशतवाद पसरवीत आहेत. गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी होता. धर्म ही खासगी बाब असून ती सार्वत्रिक करू नये. धार्मिक कट्टरतावादी हे धर्मनिरपेक्षतावाद्यांना आपला शत्रू मानतात. संविधानावर विश्वास असणार्यांनी पुढे येऊन कट्टरतावाद्यांचा मुकाबला केला पाहिजे. जेथे असहिष्णुता आहे, तेथे शांती नाही व प्रगती नाही.
श्यामसुंदर सोन्नुर महाराज – असहिष्णुता ही आजची समस्या नसून ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या बाबतीतही असहिष्णुता दाखविली गेली. संतांनी समतेचा विचार मांडून असहिष्णुतेचा प्रतिवाद केला, हे आपण समजून घेतले पाहिजे. धर्म धोक्यात आहे, अशी आवई उठवून वारकर्यांची व तरुणांची माथी भडकवणार्यांना आपण रोखले पाहिजे.
उत्तम कांबळे – जो देश जात, धर्म, लिंग या भेदांवर उभा असतो तो असहिष्णूच असतो. जातिअंताची लढाई म्हणजेच असहिष्णुतेविरुद्धची लढाई. आजची परिषद ही जातिअंताविरुद्ध टाकलेले एक पाऊल आहे. सत्ता-संपत्ती ज्यांच्या ताब्यात आहे, धर्मशाही त्यांची बटीक झाली आहे. संशयावरून हत्या करणार्या झुंडशाहीला अद्याप अटक नाही, ही खेदाची गोष्ट आहे. असहिष्णुतेविरुद्ध लढण्यासाठी संविधान हे सर्वांत धारदार हत्यार आहे. सहिष्णुतेचा जागर वैचारिक पातळीवरच चालला पाहिजे. काहीही झाले, तरी हिंसेकडे वळायचे नाही. असहिष्णुतेमुळे माणसाचे जीवन कुरूप बनते. मनुष्य सुरूप झाला, तर समाज सुरूप होईल, समाज सुरूप झाला की, देश सुरूप होतो. असहिष्णुतेमुळे समाज हटवादी व अविवेकी बनतो. तत्त्वज्ञान खराब होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रा. सुभाष वारे – धार्मिक कट्टरतावाद आणि असहिष्णुतेचे संकट प्रत्येकाच्या दारी पोचले आहे, हे लोकांना जाणीवपूर्वक समजावून सांगितले पाहिजे. गेल्या चार वर्षांत असहिष्णुतेला राजमान्यता मिळाली आहे. घटना जाळणार्यांविरोधात खरे तर राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे; पण त्याविरुद्ध पंतप्रधान काही बोलतच नाहीत. आर्थिक विषमता हेही दहशतवादाचे एक कारण आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. संविधानातील अनेक कलमे ही संतांच्या विचारांशी जवळीक साधणारी आहेत. संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटवून दिले पाहिजे.
या सत्राचे सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी केले, तर श्रीपाल ललवाणी यांनी आभारप्रदर्शन केले. कुणाल शिरसाठे यांनी परिषदेत करण्यात आलेल्या संकल्पाचे वाचन केले. हे संकल्प पुढीलप्रमाणे –
1) धार्मिक उन्माद व त्यातून निर्माण झालेली दहशत, भीती या विरोधात संशयमुक्त, संवाद व विचारस्वातंत्र्याचा आदर करणारा समाज निर्माण करण्यासाठी सातत्याने कृतिशील राहीन.
2) हिंसामुक्त समाजनिर्मितीचा आग्रह ही परिषद धरीत असून आयुष्यभर कोणत्याही प्रकारच्या हिंसेत सहभाग, समर्थन वा पुरस्कार न करण्याचा आणि समताधिष्ठित शांततामय सहजीवनासाठी सातत्याने कृतिशील राहीन.
3) माझ्या परिसरातील सर्व जातीधर्मनिहाय किमान एका कुटुंबाशी सौहार्दपूर्ण जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करू.
4) संविधानावर विश्वास असणार्या सर्व पुरोगामी चळवळींचा परिवार समृद्ध होण्यासाठी परस्पर सहयोगाची भूमिका घेण्याचा संकल्प परिषद करत आहे.
संकल्पवाचनानंतर ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सामूहिकरित्या म्हणून परिषदेची सांगता झाली. या परिषदेमुळे धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी लढ्याचे एक पाऊल नक्कीच पुढे पडले. सर्व थरांतून या परिषदेचे स्वागत करण्यात आले. अशाच परिषदांचे आयोजन राज्यात विविध ठिकाणी करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
संपर्क : 9823997472