‘आज लोकांच्या भल्यासाठी आवाज उठविणारे पकडले जात आहेत, त्यांचा आवाज थांबवले जात आहे. लेखक-पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रस्थापितांना त्रासदायक असे कुणी बोलू नये, लिहू नये असा प्रयत्न केला जाण्याचे प्रमाण जगभरातच वाढत आहे. अशा वेळी वंचितांचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी ‘पेन’सारख्या संस्थांची गरज आहे. एक नव्या स्वरुपाचा हिंसक समाज निर्माण होऊ लागला आहे; पण त्याचे प्रत्युत्तर हिंसेच्या नव्हे, तर प्रेम आणि करुणेच्या माध्यमातून देणेच आपल्या हाती आहे. गांधींकडे असलेले सत्य बोलण्याचे धाडस आपल्याकडे यायला हवे. हिंसेशी अहिंसेने लढण्याचे धाडस आम्हाला हवे आहे…’ अशी अपेक्षा भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.
लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल, तर ते रोखण्यासाठी भक्कम आघाडी उभी करणे, नागरिकांचे भाषाधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे यांसह साहित्यविषयक विविध आवश्यक कार्ये करणार्या ‘पेन इंटरनॅशनल संस्थे’तर्फे दर वर्षी भरविले जाणारे ‘पेन काँग्रेस’ हे महत्त्वाचे अधिवेशन यंदा पहिल्यांदाच भारतात आणि पुण्यात होत असून, त्याच्या उद्घाटनप्रसंगी देवी बोलत होते. पेन इंटरनॅशनलच्या अध्यक्ष जेनिफर क्लेमेंट, संचालक कार्ल्स टोर्नर, जया जेटली, सिम्बायेसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यावेळी उपस्थित होते. आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करून पेन काँग्रेसचे उद्घाटन करण्यात आले.
देवी म्हणाले, ‘देव आणि मानव यांच्यात तत्कालीन कर्मठ समाजाने निर्माण करून ठेवलेले प्रचंड अंतर संपवून माणूस आणि देव हे दोन्ही एकमेकांत तादात्म्य पावण्यासाठी ही चळवळ संतांनी उभारली होती. त्यातून परमेश्वर आणि माणूस असा, एक निर्मळ संवाद खरे तर तत्कालीन संतांना या चळवळीतून निर्माण करायचा होता. तत्कालीन भारताचे ‘भारतीयत्व’ हे मध्ययुगातील असंख्य संतकवींनी केलेल्या वैचारिक मशागतीतून तयार झाले आहे. हे सारे आधुनिक भारतीय भाषांचे आणि साहित्याचे खर्या अर्थाने निर्मिकच होते. त्यांनी भारताला विविधांगी दृष्टी दिली. भारताला भिन्नतेशी, विविधतेशी मैत्री करायला शिकवली.’