Categories
चळवळ

नागपुरात ‘अंनिवा’च्या तिसर्‍या खंडाचे प्रकाशन यशवंत मनोहर यांचे हस्ते संपन्न

एप्रिल – २०१७

नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्‍यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात् लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिकातील निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या तिसर्‍या खंडाच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा 20 मार्च ला विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मनोहर यांनी वर्तमान परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर विचार व्यक्त केले. आज अध्यात्माच्या नावावर समाजासमोर मोठा धोका निर्माण केला जात आहे. ईश्वर ही रूढी आहे, ते वास्तव नाही. ही रूढी माणसाने निर्माण केली. मात्र ही रूढी इतकी लोकप्रिय झाली की आज माणूस ती सोडायला तयार नाही. या देशातील लोकांचे मन धार्मिक, आध्यात्मिक, परंपरा, संप्रदायवादी व मूलतत्त्ववादी आहे. लोकांना यातच गुरफटून ठेवण्यासाठी आणि माणूस होण्याचा मार्ग रोखणारी आयुधे निर्माण केली गेली आहेत. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक जोखमीचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही वर्तमान परिस्थिती व राजकीय घटनाक्रमावर कडाडून टीका केली. आजचे नवतंत्रज्ञानाचे माध्यम परिवर्तनासाठी उपयोगी पडेल, ही आशा फोल ठरली आहे. भारतीय राज्यघटना ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा व शास्त्रीय समाज निर्माण करण्याचा जाहीरनामा आहे. असे दस्तावेज जगात कुठेही सापडणार नाहीत. मात्र या राज्यघटनेला अपेक्षित शास्त्रीय समाज निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकशाहीच्या सभागृहात अतिशय अशास्त्रीय लोक पोचले आहेत. लोकतांत्रिक अधिकारामधून अशी अव्यवहारिक व्यवस्था आकार घेत आहे आणि हा समाज, राजसत्ता, प्रसार माध्यमे व या सर्वांना भांडवल पुरविणारे उद्योजक नवतंत्रज्ञानाच्या मदतीने हे सर्व घडवून आणत आहेत. देशापुढे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीपुढे सर्वात मोठा धोका निर्माण झाल्याची टीका डॉ. जोशी यांनी यावेळी केली. संविधान हा नवभारत निर्मितीचा दस्तावेज आहे. मात्र हा जाहीरनामा नाहीसा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न होत आहेत. यासाठी राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक शक्ती प्रचंड वेगाने सक्रिय झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे या विषमतावादी परिस्थितीचे बळी ठरले असल्याचे मनोगत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समितीच्या भविष्यातील वाटचालीचे विवरण करीत अंनिसची चळवळ अधिक वेगाने गतिमान करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास महादेव भुईभार, अंनिसचे जिल्हाध्यक्ष संजय शेंडे, गजेंद्र सुरकार, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रभाकर नानावटी यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संपादक राहुल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिता धांडेकर यांनी केले. कार्यक्रमात मधुकर धंदरे, सुनील भगत, जयेंद्र पेंडसे, प्रा. सुशील मेश्राम, स्वप्नील हुमणे, राम काळे, रामभाऊ डोंगरे, चंद्रकांत श्रीखंडे आदींचा सहभाग होता. (दै.लोकमत, नागपूर, दि.21 मार्च 2017)