Categories
चिकित्सा

औषध नसलेले औषध होमिओपॅथी

एप्रिल – २०१७

होमिओपॅथी हे छद्मविज्ञान आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर विविध देशांत होमिओपॅथीच्या वापराबाबत कडक निर्बंध आणि कायदेकानून आहेत. जगभर झालेल्या डबल ब्लाईंड क्लिनिकल नैदानिक चाचणीत होमिओपॅथीला पुरावे मिळाले नाहीत. होमिओपॅथी डॉक्टर्स व्यवसायात अ‍ॅलोपॅथीचा सर्रास उपयोग करतात. खिद्रापुरे हा होमिओपॅथी डॉक्टर. धंदा चालत नाही म्हणून कदाचित असेल, त्याने अविवेकी लोकांची गरज ओळखून स्त्री-भ्रूण हत्येचा मार्ग धरला. अ‍ॅलोपॅथीची गोळी आणि त्या क्षेत्रातील लोभी भूलतज्ज्ञ, नर्सेस आणि इतर डॉक्टर्स यांची साखळी करून त्याने स्त्री-भ्रूण हत्येचा कत्तलखाना उघडला. अशा डॉक्टरांकडे लोक जातातच कसे? म्हणजे अजूनही जनसामान्यांमध्ये वैद्यकीय उपचारांबाबत अज्ञानच आहे. अं.नि.वार्तापत्र या अज्ञानाचा पर्दाफाश करणारे आरोग्याच्या क्षेत्रातील छद्मविज्ञान लोकांपुढे मांडत असते. स्त्री-भ्रूण हत्येला अप्रत्यक्ष कारण ठरलेल्या होमिओपॅथीबाबत सत्य काय आहे? याची चिकित्सा करणारा हा लेख यानिमित्ताने मुद्दाम देत आहोत. लोकांनी डॉक्टरकडे आणि विशेषत: होमिओपॅथी डॉक्टरकडे जाताना सावधानता बाळगायला हवी.

विज्ञानाच्या प्रगतीचे सर्वांत प्रभावी यश म्हणजे मानवी आरोग्यसेवेत झालेली नेत्रदीपक प्रगती. साथीच्या रोगापासून ते अनेकविध शारीरिक व्याधींवर आधुनिक उपचारपद्धतीने मात केली आहे. भौतिक, रसायन आणि शरीरविज्ञान यांच्यातील शोधामुळे हे शक्य होत गेले. पण ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकाच्या अगोदर नव्हती.

वैदू, शामन यांच्याबरोबरीने अनेक अघोरी उपचार 18 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत चालू होते. रुग्णांना मारझोड करणे, तीव्र मात्रेत रेचके व शमनके देणे, जळवा लावणे, धारदार सुर्‍यांनी रक्तमोक्षण करणे, असे जहाल उपचार त्या काळात रूढ होते. अशा उपचारांना हिरॉईक मेडिसीन (Heroiउ Mediउine) असं नाव होतं. याच काळात अशा अघोरी उपचाराला पर्याय म्हणून जर्मन डॉक्टर सॅम्युअल हानिमन यानं होमिओपॅथीची निर्मिती केली. जहाल अघोरी उपचारांना त्यानंच अ‍ॅलोपॅथी हे नाव दिलं जे आजच्या आधुनिक उपचारांनाही वापरलं जाऊ लागलं; पण अ‍ॅलोपॅथीतील अघोरीपणा आधुनिक उपचारातून कमी होत गेला आणि ज्ञानाच्या आधारावर आरोग्य विज्ञानात भरभराट होत गेली.

आधुनिक उपचारपद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कठोर नियंत्रित चाचणीद्वारे तावून सुलाखून परीक्षण केलेल्या पद्धती आणि औषधांचा वापर. या कठोर वस्तुनिष्ठ नियंत्रित चाचण्यांना कोणतंही औषध उतरायला हवं. पण आधुनिक औषधप्रणालीबरोबरच समांतरपणे प्रचारात असलेल्या अनेक इतर वैद्यकप्रणालीमध्ये काटेकोरपणाचा अभाव लक्षात येऊ लागला. मग वैद्यकक्षेत्रात सर्व औषधप्रणालीची काटेकोर चिकित्सा सुरू झाली. 18 व्या शतकात हानिमनने अघोरी उपचारांना पर्याय म्हणून होमिओपॅथीचा उपयोग सुरू केला. ही पॅथी 19 व्या शतकात जगभर लोकप्रिय झाली. पण या होमिओपॅथीची काटेकोर चिकित्सा सुरू झाल्यावर तिच्यातील धोके आणि अवैज्ञानिकता उघड होऊ लागली.

आजच्या स्थितीला होमिओपॅथी हे छद्मविज्ञान आहे, असं काटेकोर संशोधनातून सिद्ध झाल्याचे दृष्टित्पत्तीस आले. म्हणून प्रगत देशात होमिओपॅथीबाबत आरोग्य संघटनांमार्फत सावधानतेचे इशारे निघू लागले आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मानवी जीवाचे संरक्षण याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने आरोग्याबाबत सजगता दाखवायला हवी आणि विविध औषधप्रणालीचा चिकित्सक अभ्यास करून आपण कोणते उपचार घ्यायला हवेत त्याबाबत निर्णय घ्यायला हवा.

सिद्धांत आणि संकल्पना

व्हायटल फोर्स :-

व्हायटल फोर्स (Vital Foraउe) हा शरीरातील महत्त्वपूर्ण जीवनशक्ती किंवा जैविक बल आहे, असं होमिओपॅथीचा जनक हानिमन याचं ठाम प्रतिपादन होतं. त्याच्या संकल्पनेनुसार हे बल शरीरात सर्वत्र भरून राहिलेले असते. त्याचा तोल सांभाळला गेला असेल, तर शरीराचे गाडे सुरळीत चालते. याचा तोल बिघडला की, आपण आजारी पडतो. तो नष्ट झाला की, आपण मरतो. मात्र हे बल किंवा जीवनशक्ती इंद्रियगोचर नाही. हे बल मोजता येत नाही. ते दिसत नाही. त्याला स्पर्श करता येत नाही. त्याला वास नाही. ते ऐकू येत नाही. थोडक्यात, हे बल भुतासारखं आहे. भूत दिसत नाही; पण ते असतं. ते झपाटतं, ते आपल्याला आजारी पाडतं, अशी ही केवळ श्रद्धास्वरूप संकल्पना आहे.

लॉ ऑफ सिमिलर्स (Law of Similars)

ज्या सिद्धांतावर हानिमनने होमिओपॅथीची उभारणी केली, तो सिद्धांत लॉ ऑफ सिमिलर्स. यालाच लाईक क्युअर्स लाईक (Like उures Like) असं नाव आहे. एखादा पदार्थ निरोगी माणसाने सेवन केल्यावर त्याच्यात आजराची जी लक्षणे दिसतील, त्याच लक्षणांच्या रोग्याला संबंधित पदार्थ रोगमुक्त करेल. असा हा ‘लॉ ऑफ सिमिलर्स’ म्हणजे काट्याने काटा काढण्याचा प्रकार आहे. हानिमनने हा नियम सिद्ध करण्यासाठी स्वत:वरच प्रयोग केला. त्याने सिंचोना या वनस्पतीच्या सालीचे सेवन केले. परिणामी त्याला ताप आणि नंतर थंडी आणि सांधेदुखीची लक्षणे दिसली. ही लक्षणे मलेरियाची आहेत. या अनुभवाद्वारे हानिमनने असा निष्कर्ष काढला की, एखादं औषध निरोगी व्यक्तीला दिल्यास ते ज्या आजाराची लक्षणे दाखवील त्याच आजाराच्या रोग्याला संबंधित औषध बरं करतं. प्राचीन वैद्यांनी मान्य केलेल्या ‘लॉ ऑफ सिमिलर्स’चे हानिमनने या अनुभवाद्वारे समर्थन केले.

एखादे औषध (पदार्थ) मानवी शरीरावर काय परिणाम करते, याचे संशोधन हानिमनने हाती घेतलं. या चाचण्या ज्या व्यक्तीवर घेतल्या गेल्या त्यांच्यात कोणती लक्षणे दिसली, याची तपशिलात नोंद केली गेली. अशा चाचण्यांचा संग्रह केलेला ग्रंथ त्याने 1805 मध्ये प्रसिद्ध केला. नंतर त्यात 65 नव्या चाचण्यांची भर घालून 1810 मध्ये मटेरिया मेडिका (Materia Mediउa) हा ग्रंथ साकार झाला.

औषधांची चाचणी निरोगी व्यक्तीवर घेत असताना त्याची तीव्रता जास्त असे. असं अतितीव्र औषध त्याच लक्षणाच्या रोग्याला दिलं, तर त्याचा आजार वाढेल, हे लक्षात घेऊन हानिमनने आजारी व्यक्तीला दिला जाणारा औषधाचा डोस अतिशय सौम्य स्वरुपात द्यावा, अशी संकल्पना मांडली. हानिमनच्या मते, असे अतिसौम्य केलेल्या औषधात त्या औषधाची मेमरी सुप्त स्वरुपात साठून राहते. हानिमनने त्याच्या नव्या औषध पद्धतीवर आधारित ऑर्गेनॉन (The Organon of the Healing Art) हा ग्रंथ इ.स.1810 मध्ये प्रसिद्ध केला. त्याच्या पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या. हा ग्रंथ म्हणजे जणू काय होमिओपॅथीचा धर्मग्रंथच, जो आजही प्रमाणभूत मानला जातो. होमिओपॅथीचे डॉक्टर्स या ग्रंथाचा नेहमी संदर्भ घेतात.

औषध सौम्य करण्याच्या पद्धतीपैकी हानिमनने सुचविलेली पहिली पद्धत आहे सेंटिसिमल पद्धत. यामध्ये 100 भाग द्रावणात किंवा मिश्रणामध्ये (होमिओपॅथी औषधे पाणी किंवा अल्कोहोलमध्ये विरघळवून बनवितात किंवा लॅक्टोज साखरेत मिश्रण करून तयार करतात) 1 भाग औषध असते. हे झालं 1C औषध.

1C द्रावणातील 100 वा भाग घेऊन तो पुन्हा 100 भाग द्रावणात विरघळविला की, त्याच्या 10,000 भागात एक भाग औषध राहते. हे झालं 2उ औषध. अशा रीतीने 3C, 4C, अशा सौम्यतेची औषध द्रावणे बनविली जातात. 12C सौम्यतेच्या द्रावणात 1,000,000,000 भाग द्रावणात एक भाग औषधी द्रव्य राहते. हानिमनने बहुतेक औषधासाठी 3C सौम्य द्रावणाची शिफारस केली आहे.

होमिओपॅथी औषधे बनविण्याच्या दुसर्‍या पद्धतीत 10 भाग द्रावणात एक भाग औषध अशा पद्धतीने सौम्यता कमी कमी करता येते. याला डेसिबल पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये औषधाची मात्रा किंवा सौम्यता X किंवा D अक्षराने दाखविली जाते. 1X म्हणजे 10 भाग द्रावणात एक भाग औषध. 10X मात्रेचे औषध म्हणजे 10,000,000,000 इतका भाग द्रावणात एक भाग औषध.

हानिमनची आजाराविषयीची संकल्पना

मियाझम् म्हणजे आजार निर्माण करणारे तत्त्व किंवा कारण. मियाझम् रोग्याच्या शरीरातील व्हायटल फोर्समध्ये बिघाड करते, असं हानिमनचं गृहितक आहे. प्रत्येक आजाराला वेगळा मियाझम् कारणीभूत होतो. मियाझम्चा प्रथम परिणाम शरीराच्या बाह्य भागावर होतो. उदाहरणार्थ, शरीरावर उठणारी खाज; पण या त्वचारोगाचा उगम खोलवर शरीरांतर्गत व्हायटल फोर्सशी असतो. खाजेवर मलम लावून खाजेचं मूळ तसंच राहतं. असा वरवरचा उपचार होमिओपॅथीला मान्य नाही. हानिमनने महत्त्वाच्या बहुतेक जुनाट आजाराचे कारण किंवा मूळ तीन बाह्य आजारात मानलं. सोरा (Psora), गुप्त रोग (Veneral diseases) आणि तीळ किंवा चामखिळ (Sycosis) यातील अतिमहत्त्वाचा आजार म्हणजे शरीराची खाज किंवा सोरा. मिरगी, कॅन्सर, कावीळ, बहिरेपण, डोळ्यात फूल पडणे, क्षय अशा आजाराचं मूळ सोरा हा त्वचा आजार आहे आणि हे सर्व आजार व्हायटल फोर्समध्ये मियाझम्मुळे बिघाड झाल्याने होतात, असा हानिमनचा युक्तिवाद आहे.

हानिमनची होमिओपॅथीची तत्त्वे आणि सिद्धांत यांचे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर जगभर मूल्यमापन झालं आहे, आणि अजूनही होत आहे. आधुनिक संशोधनाचा निष्कर्ष होमिओपॅथी हे छद्मविज्ञान असल्याचे दर्शवितो.

होमिओपॅथीची वैज्ञानिक चिकित्सा

होमिओपॅथीतील व्हायटल फोर्सची मध्यवर्ती संकल्पना आधुनिक शरीरविज्ञानाला मान्य नाही. निर्जीव आणि सजीव यांच्यात भेद करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे व्हायटल फोर्स, असं हानिमनपूर्व काळात विज्ञान जगतात मानलं जात होतं. आपल्या शरीरक्रियेतून जे सेंद्रिय (organic) पदार्थ बनतात (रक्त, लघवी, हार्मोन्स इत्यादी) त्यासाठी व्हायटल फोर्सची गरज असते, असं मानलं जाई. जर्मन वैज्ञानिक वूलर (Wohler) याने 1828 मध्ये लघवीतील घटकद्रव्य युरिया कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत रासायनिक संयोगाद्वारे बनविला. त्यानंतर सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीसाठी शरीरात खास व्हायटल फोर्सची गरज नाही, हा विचार मान्य होऊ लागला. नंतर जसजसं रसायन आणि जीवविज्ञानात नवंनवं संशोधन होऊ लागलं, तसतशी व्हायटल फोर्स संकल्पना मागे पडत गेली. जीवविज्ञानात सध्या व्हायटल फोर्स अमान्य करण्यात आला आहे. सर्व शरीरक्रिया व्हायटल फोर्स शिवाय घडतात, असा आधुनिक विज्ञानाचा निष्कर्ष आहे. सिद्ध ज्ञानाशी विसंगत संकल्पना स्वीकारणं म्हणजे छद्मविज्ञानाचा स्वीकार करणं होय. होमिओपॅथी यामुळे छद्मविज्ञानात मोडते.

हानिमनच्या ‘लॉ ऑफ सिमिलर्स’बाबत 19 व्या आणि विसाव्या शतकात आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात सखोल पुनर्मूल्यांकन झालं आहे. हानिमनच्या सिंचोनाबाबतचा अनुभव इतरांनी तपासला असता त्यात तथ्य नसल्याचा निष्कर्ष मिळाला. याबाबत ऑलिव्हर होम्स या अमेरिकन शास्त्रज्ञाने ‘लॉ ऑफ सिमिलर्स’ विरुद्ध पुरावे जातात, असा निष्कर्ष काढला आहे.

एड्झर्ड अर्न्स्ट हा पर्यायी उपचार मेडिसीनचा एम.डी. पदवीधर. तो म्युनिच (इंग्लंड) येथे होमिओपॅथीचे हॉस्पिटल चालवीत होता. अनुभवांती होमिओपॅथीबद्दल त्याचा भ्रमनिरास झाला आणि त्याने होमिओपॅथीच्या परिणामकारकतेबद्दल संशोधन हाती घेतले. अर्न्स्टचे मत बदलण्यास कारण ठरले 1991 मधील जर्मन फॉर्मकॉलॉजीचे प्राध्यापक डब्ल्यू. एच. हॉफ यांचे संशोधन. हॉफने हानिमनचा ‘लॉ ऑफ सिमिलर्स’ सिद्ध करणारा मूळ सिंचोनाचा प्रयोग पुन्हा करून बघण्याचे ठरविले. सिंचोनामुळं निरोगी व्यक्तीत मलेरियासदृश लक्षणं दिसत असतील, तर ‘लॉ ऑफ सिमिलर्स’चा पुरावा मिळेल. हॉफने या प्रयोगासाठी स्वत:च्या विद्यार्थ्यांची निवड केली. त्याचा निष्कर्ष असा की, प्लॅसिबोपेक्षा अधिक परिणामकारकता सिंचोनाच्या बाबतीत मिळाली नाही. अलिकडील संशोधनात असं सिद्ध झालंय की, सिंचोनामुळे मलेरिया बरा होतो, याचं कारण मलेरियाचे परोपजीवी जंतू सिंचोनामधील क्विनाइन या घटकद्रव्यामुळं मारले जातात. हानिमनचा ‘लॉ ऑफ सिमिलर्स’ पुनर्मूल्यांकनात नापास ठरला. गृहितकाच्या विरोधी पुरावा गेला, तर गृहितक त्याज्य मानावे लागते किंवा त्यात योग्य तो बदल करावा लागतो. मलेरिया जंतूमुळे होतो, हे कळाल्यावर व्हायटल फोर्स आणि लॉ ऑफ सिमिलर्स निकालात निघतात. पुढे तर अनेक आजारांचे मूळ जीवाणू आणि विषाणू यांच्या शरीरावरील आक्रमणात आहे, हे लक्षात आल्यावर व्हायटल फोर्सची कल्पना निकालात निघाली.

आधुनिक औषध विज्ञानाने क्षय हा आजार विशिष्ट जंतूमुळे होतो, हे सिद्ध केलंय. काविळीचे कारण देखील जंतू असतात. वेगवेगळ्या आजारांची कारणं स्वतंत्र असतात आणि व्हायटल फोर्स संकल्पना बाजूला ठेवून त्या त्या आजारांवर उपयोगी पडणार्‍या आधुनिक औषधांनी (ज्यांची कठोर चाचणी घेतली आहे) हे आजार बरे करता येतात, असं आधुनिक विज्ञानात मान्य झालं आहे. जंतूबरोबरच जेनेटिक्स (अनुवंशिकता) आणि बाह्य पर्यावरणातील घटक यांचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. मोतीबिंदू हा डोळ्यावर परिणाम करणारा लोकल आजार आहे. त्याचा काल्पनिक व्हायटल फोर्सशी काय संबंध? मोतीबिंदू शस्त्रक्रियेने दुरुस्त करता येतो. सारांश, हानिमनचे सर्व सिद्धांत आणि संकल्पना (व्हायटल फोर्स, लॉ ऑफ सिमिलर्स आणि मियाझम्स्) आधुनिक ज्ञानाच्या प्रकाशात निकालात निघतात.

औषध नसलेले औषध

होमिओपॅथी औषधाचे द्रावण तीव्र स्वरुपात रोग्यास दिल्याने रोग बळावेल, हे जाणून हानिमनने अशा औषधाची तीव्रता कमी करण्याची शिफारस केली. सौम्य स्वरुपातील औषधाची परिणामकारकता कमी होणार, हे उघड आहे. रसायनशास्त्रातील ‘लॉ ऑफ मास अ‍ॅक्शन’नुसार द्रावण जितके जास्त तीव्र, तितकी त्याची परिणामकारकता वाढते. या सिद्ध ज्ञानाशी होमिओपॅथीच्या औषधांची सौम्यता विसंगत आहे.

12 C औषधाच्या द्रावणात मूळ औषधाचा एखादा कण असेल की नाही, याबद्दल शंका घेण्यास वाव आहे. स्वत: हानिमनने लिहिलंय- साथीच्या रोगांवर औषधाची सौम्यता किती असावी? तर जिनिव्हाजवळील सरोवरात विषाची एक बाटली ओतल्यावर जी सौम्यता होईल, तेवढ्या सौम्यतेचे औषध वापरावे. होमिओपॅथीच्या टीकाकारांनी 12 C औषधाच्या सौम्यतेबाबत काय म्हटलंय पाहा – 12 C द्रावण म्हणजे उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागरात चिमूटभर मीठ विरघळवून तयार होणारे द्रावण. फ्ल्यूवर जे होमिओपॅथी औषध दिलं जातं, त्यात बदकाच्या लिव्हरचे कण असतात. त्याची औषध सौम्यता 200 C आहे. मार्केटमध्ये हे औषध ऑसिलोकोकीनम (Oscillococcinum) या नावानं ओळखलं जातं. आपल्या निरीक्षणाखालील विश्वात एकूण रेणुंची संख्या आहे 1080 या संख्येत होमिओपॅथी द्रव्याचा 1 रेणु घातला तर त्याची सौम्यता असेल 40 C.

होमिओपॅथी औषध अधिकाधिक सौम्य बनवत जाण्याच्या या क्रियेबाबत गंभीर आक्षेप घेतले जातात. कारण ज्यात औषध जवळजवळ नाहीच, ते औषध रोग कसा बरा करणार? हे म्हणजे चारचाकीच्या इंजिनात 1 थेंब पेट्रोल बॅरलभर पाण्यात मिसळून तयार झालेले इंधन वापरून चारचाकी पळवण्यासारखे नाही का?

मात्र सर्वच होमिओपॅथी डॉक्टर्स अतिसौम्य औषधे वापरत नाहीत. सर्वसामान्यपणे 3 X ते 6 X या दरम्यानच्या सौम्यतेची औषधे ते उपयोगात आणतात. तरीसुद्धा 6 X म्हणजे 1,000,000 म्हणजे 10 लक्ष C. C. द्रावणात 1 C. C.औषध. ते कसा काय रोग बरा करणार हे या डॉक्टरांना आणि हानिमनलाच माहीत! काही डॉक्टर्स हानिमनच्या मूळ सिद्धांताला चिकटून अतिसौम्य औषधेच वापरतात आणि व्हायटल फोर्स, मियाझम्स आणि आध्यात्मिक गूढता अशा संकल्पना वापरून रोगमुक्तीचा दावा करतात.

होमिओपॅथीच्या औषधात औषधी द्रव्याचा अंश अतिकमी असणे किंवा जवळजवळ नसणे याचा अर्थ हे औषध नसलेले औषध होय. ते निव्वळ पाणी किंवा अल्कोहोल किंवा फक्त साखर असते. आधुनिक फॉर्म्याकॉलॉजीशी विसंगत किंवा विरोधात होमिओपॅथी जात असल्याने तिच्या परिणामकारकतेवर आक्षेप घेतले जाऊ लागले. ते योग्यच म्हणावे लागेल.

पोटन्सी आणि वॉटर मेमरीचा नवा फंडा

होमिओपॅथीवरील टीकेला उत्तर देताना होमिओपॅथीचे समर्थक औषधाची पोटन्सी ही संकल्पना वापरतात. त्यांच्या युक्तिवादानुसार औषधाच्या द्रावणातील औषधी द्रव्य जरी कमी होत गेले तरी त्याच्या काही काळच्या वास्तव्याचा परिणाम म्हणून औषधाची पोटन्सी वाढत जाते. पोटन्सी म्हणजे औषधी द्रव्याची सुप्त शक्ती. ही शक्ती द्रावणात रेंगाळत राहते. याला औषधाची मेमरी म्हणतात. होमिओपॅथी औषध तयार करताना द्रावण घुसळणे किंवा हलविणे या क्रिया केल्या जातात. परिणामी औषधाची मेमरी किंवा पोटन्सी वाढत जाते, अशी ही संकल्पना आहे.

एखाद्या पैलवानाने रोज खच्चून व्यायाम केला, तर त्याची ताकद वाढत जाते, स्नायू मजबूत होतात, हे खरं आहे. पण पैलवानाने आपल्या आहारातील दूध किंवा अन्य खुराक कमी करत नेला आणि शेवटी त्याऐवजी फक्त पाण्याचाच आहार सुरू ठेवला तर त्याची ताकद वाढत राहील, असं म्हणणं वेडेपणाचं नाही का? तद्वतच औषध सौम्य करून पोटन्सी वाढत जाईल, हे म्हणणं खुळचटपणाचं आहे.

आपलं म्हणणं खरंच आहे, हे ठरविण्यासाठी चलाख मंडळी नाना युक्तिवाद करतात. वॉटर मेमरी हा असाच एक नवा फंडा होमिओपॅथीवाल्यांनी पुढं केला. पाण्यात विरघळलेल्या औषधी द्रव्यांची स्मृती पाण्याला लाभते. हे औषधमिश्रीत पाणी प्यायल्यावर स्मृतीरूपी औषधाची पोटन्सी रोगग्रस्त अवयवांना दिली जाते, अशी ही समजूत आहे. वॉटर मेमरीसाठी पॉलिवॉटर संकल्पना पुढं आली. पॉलिवॉटर म्हणजे पाण्याच्या रेणुंचे विशिष्ट असे आकृतिबंध. या आकृतिबंधात औषधाची मेमरी पकडली जाते. पण अशा पॉलिवॉटर रेणुंसाठी आधुनिक संशोधनात विश्वसनीय पुरावा मिळत नाही. पदार्थविज्ञानाच्या संशोधनातून पॉलिवॉटर संकल्पनेला पुरावा मिळालेला नाही.

‘नेचर’ मासिकाचा संपादक जॉन मॅडॉक्स याने केमिस्ट वॉल्टर स्टुअर्ट आणि प्रख्यात जादूगार जेम्स रँडी यांच्या मदतीने वॉटर मेमरीचा सिद्धांत चुकीचा ठरविला आहे.

कोंबडा आरवला म्हणून उजाडले?

होमिओपॅथीबाबतचे सिद्धांत आणि संकल्पना विज्ञानाच्या कसोटीवर फोल ठरतात, याचा आपण सविस्तर आढावा घेतला. पण होमिओपॅथी औषधामुळं आम्हाला गुण आला, असं सांगणारे अनेकजण भेटतात, त्याचं काय? माझा आजार बरा झाला, असं सांगणारी व्यक्ती हाच होमिओपॅथीच्या सत्यतेचा खरा पुरावा नाही काय, असा युक्तिवाद केला जातो. देशोदेशीचे वैद्य झाले, हकीम झाले आणि अखेरीस होमिओपॅथीची गोळी लागू पडली, असे सांगणारे होमिओपॅथीवालेही भेटतात. पण हा युक्तिवाद फसवा आहे. ब हा आजार अ कारणाने पळाला, हा युक्तिवाद वरवर वाटतो तसा खरा नाही. कोंबडा आरवला म्हणून सूर्य उगवला हे जसं खरं नाही तसाच हा युक्तिवाद आहे. कोंबडा आरवला नसता, तरी सूर्य उगवलाच असता, हा अनुभव आहे. जेथे कोंबडा आरवत नाही तेथेही सूर्य उगवतोच ना? म्हणून ब हा आजार अ मुळे बरा झाला हा योगायोग असू शकेल. खरं कारण वेगळे असू शकेल. आजार बरा होण्याची, जी अनेक कारणे आधुनिक मेडिकल विज्ञानाला माहीत झाली आहेत, त्यांचा विचार केला तर नेमका कोणत्या कारणाने आजार बरा झाला, याची चिकित्सा करणे औषधाच्या परिणामकारकतेविषयी अटळ ठरते. आजार बरा होण्याची इतरही कारणे संभवतात. ही कारणे विचारात घेतली नाहीत तर औषधाने आजार बरा झाल्याचा भ्रम निर्माण होऊ शकतो. होमिओपॅथीबाबतही हे खरे आहे.

1. प्लॅसिबो परिणाम – औषध नसलेली केवळ साखरेची गोळी औषध म्हणून रोग्याला दिली आणि यामुळे त्याला बरं वाटेल असा दिलासा दिला, सहानुभूती दाखविली, रोग बरा होण्याची खात्री दिली तर रोग्याची मानसिकता रोग बरा होण्यास अनुकूल बनत जाते. याला प्लॅसिबो परिणाम म्हणतात. या परिणामाचा प्रभाव म्हणून होमिओपॅथी द्रावणात औषध नसले तरी औषध समजून रोग्याला दिले जाते आणि त्याची भलावण केली जाते. रोग्याला दिलासा दिला जातो. याचा परिणाम म्हणून काही प्रकारचे आजार बरेही होऊ शकतात.

2. पुरेसा वेळ आणि शरीराची नैसर्गिकरित्या बरं होण्याची क्षमता यामुळे आजार बरा होऊ शकतो.

मेडिकल संशोधनानुसार नैसर्गिक प्रतिकार शक्ती आणि प्लॅसिबो व पुरेसा कालावधी या कारणांनी काही आजार बरे होऊ शकतात. म्हणून या कारणांनी आजार बरा झाला की, औषधामुळे याबाबत काळजीपूर्वक चाचणी घ्यावी लागते.

3. आजारात काही काळात उतार पडतो तर नंतर आजार वाढतो. आजारात नैसर्गिकरित्या उतार पडला आणि त्याचवेळी औषध घेतले तर औषधामुळे आजार बरा झाला, अशी समजूत औषध घेणारा आणि देणारा या दोघांचीही होते.

4. होमिओपॅथीचे उपचार चालू असताना इतर पॅथीचे उपचार चालू असतील, तर त्याचा फायदा रुग्णांना मिळू शकतो.

वरील सर्व कारणे लक्षात घेऊन होमिओपॅथीनेच आजार बरा झाला काय, याबाबत स्वैर डबल ब्लाईंड नैदानिक चाचणी आवश्यक ठरते. अशा वस्तुनिष्ठ चाचण्यांचे निष्कर्ष होमिओपॅथीच्या विरोधात जातात.

कठोर चाचण्याचे निष्कर्ष

प्लॅसिबोचा परिणाम लक्षात घेतला तर होमिओपॅथी औषधाचा त्यापेक्षा अधिक परिणाम संशोधनात दिसून आलेला नाही. सुरुवातीला संशोधनाची गुणवत्ता शंकास्पद होती, प्रयोगांची रचना कमकुवत होती. रिपोर्टिंग संशयास्पद होते. सँपलचा आकार लहान होता. प्रयोग निवडीत एकांगीपणा (Selection bias) होता. जसजशा चाचण्या वरील दोषापासून मुक्त झाल्या तसतशी होमिओपॅथीची परिणामकारकता घटत गेली. गुणवत्तापूर्ण संशोधनात होमिओपॅथी औषधांचा अंगभूत परिणाम शून्य असल्याचे दिसून आले. विविध स्वैर नियंत्रित नैदानिक चाचण्यांचे एकत्रित संख्याशास्त्रीय पद्धतीने निष्कर्ष मिळविण्याला मेटॅअ‍ॅनॅलिसिस म्हणतात. अशा चाचणीद्वारे होमिओपॅथीच्या परिणामकारकतेविषयी विश्वसनीय निष्कर्ष मिळाले नाहीत. 2005 मध्ये लॅन्सेट या प्रख्यात मासिकाने 110 प्लॅसिबो नियंत्रित होमिओपॅथी औषधांच्या चाचण्यांचे मेटॅअ‍ॅनॅलिसिसद्वारे फेरनिरीक्षण केले. त्याचा निष्कर्ष होमिओपॅथीचे परिणाम म्हणजे प्लॅसिबो परिणाम, औषध परिणाम नव्हे असाच निघाला. लॅन्सेटच्या संपादकियाचे शीर्षक होते- होमिओपॅथीचा शेवट (The End of Homeopathy) इ.स.2010 मध्ये होमिओपॅथीबाबतच्या मागील सर्व संशोधनाचा रिव्ह्यू (पुन:परीक्षण) कोक्रेन कोलॅबोरेशनमार्फत घेण्यात आले. यामध्येही प्लॅसिबो परिणामाच्या पुढं जाऊन होमिओपॅथी अधिक परिणामकारी नाही, असाच निष्कर्ष निघाला.

काही लोक कोणत्याही घटनेबाबत एक युक्तिवाद करतात. ‘बरं वाटलं ना, मग ते कशामुळं याची फाजील चौकशी कशाला?’ हा म्हणजे होमिओपॅथी किंवा अन्य पॅथी सत्य आहे की, नाही याच्या तपासणीची गरज नाही; पण हा युक्तिवाद बरोबर नाही. सत्य या मूल्याचा सत्य म्हणून आग्रह धरायला हवा. दुसरं म्हणजे असत्य गोष्टीच्या उपयोगातून काही धोकेही संभवतात. प्लॅसिबोमुळे सर्वच आजार बरे होत नाहीत. उदाहरणार्थ, मेंदूत कॅन्सरचा ट्यूमर असेल, तर प्लॅसिबोमुळे तो बरा होणार नाही. अशावेळी होमिओपॅथीचा प्लॅसिबो धोकादायक ठरेल. क्षय, तीव्र कावीळ, अ‍ॅपेंडिक्स, कॅन्सर, मूतखडा यासारखे तीव्र आजार होमिओपॅथीने बरं करण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. म्हणून नैतिक मूल्याचा आग्रह आणि होमिओपॅथीचे धोके समजून घ्यायला हवेत.

नैतिकता आणि धोके

होमिओपॅथीची औषधनिर्मिती अनैतिक आहे, अशी टीका आरोग्यक्षेत्राशी संबंधित जाणकार करतात. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील मेडिकल ह्युमॅनिटीज् आणि सर्जरीचा प्राध्यापक मायकेल बॉम यांनी होमिओपॅथी म्हणजे क्रूर फसवणूक (Cruel deception) अशी टीका केली आहे.

एडझर्ड अर्न्स्ट हा ब्रिटनमधील पर्यायी औषधोपचार प्रणालीचा प्राध्यापक आणि एकेकाळचा होमिओपॅथीचा प्रॅक्टिशनर. त्याने औषधविक्रीबाबतचे नैतिक संकेत न पाळणार्‍या औषध विक्रेत्यावर कठोर टीका केली आहे. कारण ही मंडळी होमिओपॅथी औषधाच्या बाटलीवर आवश्यक आणि त्या औषधासंबंधित लेबल न लावता त्याची भलावण आणि विक्री राजरोस करतात.

पुराव्यावर आधारित औषधाऐवजी होमिओपॅथी औषधांचा वापर करणारे पेशंट त्यांच्या आजाराचे योग्य वेळी निदान करण्यास मुकतात; तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर परिणामकारी इलाज करून घेण्यास मुकतात.

सन 2013 मध्ये ब्रिटनमध्ये जाहिरात अ‍ॅथॉरिटीने असा निष्कर्ष काढला आहे की, होमिओपॅथी डॉक्टर्स, आजारामुळे हळवे झालेल्या पेशंटना लक्ष्य करतात आणि आवश्यक मेडिकल उपचारापासून वंचित ठेवून स्वत:च्या औषधांची टिमकी वाजवून पेशंटस्ची दिशाभूल करतात. आपल्याकडेही हा प्रकार चालू असतो.

इ.स.2015 मध्ये ‘फेडरल कोर्ट ऑफ ऑस्ट्रेलिया’ने ‘होमिओपॅथी प्लस लिमिटेड’ या कंपनीला दंड केला. त्याचं कारण होतं कोरडा खोकला (ढास) या आजारावर शिफारस केलेल्या आधुनिक व्हॅक्सिनऐवजी होमिओपॅथीची व्हॅक्सिन अधिक उपयोगी आहे, अशी खोटी आणि चुकीची माहिती या कंपनीने पसरवली होती. हा ऑस्ट्रेलियन ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग होता.

अमेरिकन फिजिशियन ऑलिव्हर वेंडेल होम्स यानं होमिओपॅथी म्हणजे “a mangled mass of perverse ingenuity, of tinsel erudiction, of imbecile incredibility and of artful misrepresentation’ अशी कठोर टीका केली आहे. बौद्धिक चलाखीचा वापर करून कलात्मक पद्धतीने सजविलेला; पण तथ्यहीन, केवळ दिखाऊ आणि बनावट असा माल म्हणजे होमिओपॅथी.

मायकेल बॉम या मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञाने ‘होमिओपॅथी ही श्रद्धेवर आधारित औषध प्रकारातील सर्वात वाईट पद्धत आहे,’ अशी टीका केली आहे.

औषधांचे दुष्परिणाम

होमिओपॅथीच्या काही औषधांमध्ये बेलाडोना, आर्सेनिक आणि विषारी आयव्ही (ivy) यासारखी विषद्रव्ये असतात. औषधनिर्मितीच्यावेळी होणार्‍या चुकांमुळे या द्रव्यांचे अयोग्य प्रमाण औषधात आल्यास रोग्याला झटके; आणि प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो. काही औषधांच्या अतिरिक्त डोसामुळे वास येण्याची क्षमता रोगी हरवून बसल्याचे दाखले मिळालेत.

‘अमेरिकन फूड अँड ड्रग ऑर्गनायझेशन’ने 2012 मध्ये होमिओपॅथी औषधांच्या दुष्परिणामाबद्दल नियोजनबद्ध आढावा घेतला. त्यांचा निष्कर्ष असा- ‘होमिओपॅथी औषधांमध्ये पेशंटला अप्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे घातक ठरण्याची क्षमता आहे.’

होमिओपॅथीच्या नादाला लागून वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा पेशंटचा हक्क हिरावून घेतला जातो. होमिओ उपचारात वेळ दवडल्यामुळे मूळ आजार बळावतो, पसरतो, निदानाला उशीर होणे असे धोके संभवतात. चेहर्‍यावर पुरळ आले अशा समजुतीने नागीण रोगाकडे दुर्लक्ष झाल्यास बुबुळावर फूल पडू शकते. संडासवाटे रक्तस्त्राव होत असेल तर सर्व तपासणी केलीच पाहिजे. निव्वळ रात्री चादर पांघरली की दुलई, यावरून औषध ठरवले तर आतड्याच्या कॅन्सरचे निदान होण्यास खूप उशीर झालेला असतो. थोडक्यात, वेळ जातो, पैसा जातो. उपचार चालू असल्याचे खोटे समाधान मिळते, जे घातक ठरू शकते. होमिओउपचार हे लक्षणलक्ष्यी आहेत. म्हणजे लक्षणे दिसल्यावरच उपचार होऊ शकतात. आधुनिक उपचारामुळे अनेक आजार लक्षणे दिसण्यापूर्वी ओळखता येतात आणि ते टाळता येतात. उदाहरणार्थ – गर्भपिशवीचा कॅन्सर. होमिओउपचारामुळे असे रोगी खर्‍या उपचारापासून वंचित राहतात.

देशोदेशीचे अहवाल आणि नियंत्रणे

होमिओपॅथीचा वापर जगभर चालू आहे. लोकशाहीतील व्यवसायस्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना असतो; मात्र हे स्वातंत्र्य अनिर्बंध नसते. सार्वजनिक आणि व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येत असेल तर आरोग्य सेवेवरही बंधने घालावी लागतात. अशी बंधने होमिओपॅथीलाही घातली गेली आहेत. बर्‍याचदा राज्यसत्तेतील मंडळींना हाताशी धरून आपल्या व्यवसायाला मान्यता मिळविण्यात चतुर मंडळी कौशल्य दाखवितात. परिणामी खर्‍या-खोट्याचा बाजार समाजात चालूच राहतो. यावर उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार वाढविणे, सत्य अन्वेषणाचे रिपोर्टस् प्रसिद्धिमाध्यमात प्रसिद्ध करणे आणि जनचळवळी व प्रबोधन मोहिमा तीव्र करणे हेच आहेत. देशोदेशीचे आरोग्यविषयक अहवाल आणि नियंत्रणे याची माहिती घेतली तर होमिओपॅथीबाबत जग किती दक्ष आहे, याची प्रचिती येते.

बेल्जियममध्ये होमिओपॅथी सरकारी आरोग्यसेवेसाठी ग्राह्य नाही. ऑस्ट्रियामध्ये पब्लिक हेल्थ सेवेसाठी सर्व औषधीपॅथींना वैज्ञानिक कसोटीतून जावे लागते. तेथे होमिओपॅथी सरकारी पातळीवर विचारात घेतली जात नाही. पाच वर्षांच्या चाचणीनंतर स्वीडनमध्ये होमिओपॅथीचे संरक्षण काढून घेण्यात आले; पण समर्थकांच्या आग्रहामुळे पुढच्या सहा वर्षांसाठी होमिओपॅथीला ट्रायल पिरीयड म्हणून मान्यता देण्यात आली.

मार्च 2015 मध्ये नॅशनल हेल्थ अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाने होमिओपॅथीबाबत खालील बंधने आणि शिफारशी जारी केल्या आहेत.

* होमिओपॅथी परिणामकारक आहे, याला खात्रीशीर पुरावा नसल्याने ती उपचार म्हणून योग्य नाही.

* जुनाट, गंभीर किंवा गंभीर होऊ पाहणार्‍या आजारावर होमिओपॅथीचा उपयोग करू नये.

* ज्या औषधांच्या सुरक्षिततेविषयी आणि परिणामकारकते विषयी विश्वसनीय पुरावे आहेत, अशी औषधे नाकारून होमिओपॅथीच्या उपचाराचा धोका स्वीकारू नये.

* होमिओपॅथीच्या औषधांचा वापर करण्यापूर्वी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी परवानगी दिल्यावरच त्याचा वापर सुरू ठेवावा.

होमिओपॅथीच्या विश्वसनियतेबद्दल आणि परिणामकारकतेविषयी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनासमोर दोन्ही बाजूच्या विशेषज्ञांकडून 2015 मध्ये सुनावणी झाली. या सुनावणीसाठी अमेरिकेतील नामवंत वैज्ञानिक, मेडिकल तज्ज्ञ आणि होमिओपॅथीच्या समर्थकांना निमंत्रित करण्यात आले होते. अमेरिकेत ‘सेंटर फॉर इन्क्वायरी’ नावाची विवेकवादाचा प्रसार करणारी संघटना कार्यरत आहे. या संघटनेचा प्रतिनिधी मायकेल ऐरा याने या सुनावणीवेळी आपली भूमिका मांडली. त्याच्या मते होमिओपॅथीचे सिद्धांत हे आधुनिक जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यातील सिद्धांताशी विसंगत आहेत आणि प्लॅसिबो परिणाम सोडला तर होमिओपॅथीच्या परिणामकारकतेला विश्वसनीय पुरावा मिळालेला नाही. ऐरा यांनी 10311 पेशंटना होमिओपॅथी औषधांनी विषबाधा झाल्याचे सांगितले. (2012 मधील रिपोर्ट) सी.एफ.आय.ने (उऋख) अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाला खालील सूचना केल्यात.

* सर्व पॅथींच्या औषधांना लागू असलेली सुरक्षिततेची आणि परिणामकारकतेची वस्तुनिष्ठ नैदानिक चाचणी होमिओपॅथी औषधांनाही लागू करावी.

* होमिओपॅथी डॉक्टरांनी दिलेल्या औषधपुडीवर किंवा बाटलीवर संबंधित औषधात कोणते घटक आहेत, ते लेबलवर लिहिणे आवश्यक करावे, तसेच संबंधित औषध अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुरक्षितता आणि परिणामकारकता याबाबत चाचणी झालेले आहे, असे लिहिण्याची सक्ती करावी.

* सार्वजनिक आरोग्य बिघडलेल्या काळात किंवा साथीच्या काळात होमिओपॅथी औषधांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी.

लोकचळवळी

जेम्स रँडी हा प्रख्यात विवेकवादी जादूगार आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीला किंवा जादूचे प्रयोग सुरू करण्याआधी होमिओपॅथीच्या झोपेवरच्या गोळ्यांची आख्खी बाटली सर्वांसमोर फस्त करी. त्यामुळे साधी जांभई देखील त्याला येत नाही, हे तो दाखवून देई. इंग्लंडमध्ये 2010 साली एका चळवळीद्वारे होमिओपॅथीचे अतिरिक्त डोस सर्वांसमोर घेऊन आपणावर काहीही परिणाम होत नाही, हे दाखविणारी प्रात्यक्षिके दाखविली गेली. असेच प्रयोग इतर देशांतही केले गेले.

बॉयरॉन हा ऑसिलोकोकिनम या फ्ल्यूवरच्या औषधाचा घाऊक निर्माता आणि विक्रेता. इ.स.2011 मध्ये त्याच्या या व्यवसायाबाबत त्याच्यावर कोर्ट केस झाली. फिर्यादीने हे औषध म्हणजे केवळ साखरेची गोळी असून लेबलवर मात्र त्यात अ‍ॅक्टिव्ह औषध असल्याचा उल्लेख केला आहे आणि ही फसवणूक असल्याचा युक्तिवाद केला. मार्च 2012 मध्ये बॉयरॉनने आरोप मान्य करून त्याबद्दल 12 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याचे मान्य केले.

समाजहितदक्ष संघटनेने (Good Thinking Society) इशारा दिल्यामुळे ब्रिटनमध्ये इ.स.2016 या वर्षात आरोग्य विभागातर्फे होमिओपॅथी औषध राष्ट्रीय औषध विभागात समाविष्ट करण्याच्या योग्यतेचे आहे काय, यावर समितीद्वारे निर्णय घेण्याचे ठरविले आहे आणि ते तसे आढळले नाही तर त्याचा समावेश काळ्या यादीत करण्याचे निश्चित केले आहे.

भारतात आरोग्य मंत्रालयाच्या अधिकारात 1975 मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी’ची स्थापना झाली आणि होमिओपॅथीचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झाली. या महाविद्यालयातून होमिओपॅथी डॉक्टराचे पीक जोरात सुरू झाले. पदवी होमिओपॅथीची घ्यायची आणि प्रॅक्टीस मात्र आधुनिक उपचाराची करायची, अशी भूमिका अनेक डॉक्टर घेऊ लागले. कारण त्यांना होमिओपॅथी परिणामकारक नाही, हे चांगलेच माहिती असते. लोकशाहीतील व्यवसाय स्वातंत्र्याचा हा दुरूपयोग आहे. एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळाला नाही की, हो बी.ए.एम.एस. त्यालाही प्रवेश नाही मिळाला तर हो बी.एच.एम.एस. अशी ही गंमत आहे. बी.एच.एम.एस.कोर्सला मुलींचाच भरणा अधिक. डॉक्टर म्हणवून घेण्यासाठी बी.एच.एम.एस. ची माळ गळ्यात पडली की, एम.बी.बी.एस.वाल्याची माळ गळ्यात पडण्याला अडचण नाही. आपण नागरिकांनी मात्र विचारपूर्वक कोणती पॅथी उपचारासाठी निवडायची, हे आपल्या हातात ठेवायला हवं. त्यासाठी खालील निष्कर्ष काळजीपूर्वक समजावून घ्यायला हवेत.

* होमिओपॅथी हे औषध नसलेले औषध आहे.

* होमिओपॅथीचे सिद्धांत विज्ञानविरोधी आहेत.

* आधुनिक नैदानिक चाचणीत होमिओपॅथी नापास आहे.

एवढं असूनही तुम्ही होमिओपॅथी डॉक्टराच्या जाळ्यात अडकायचं ठरवलं असेल तर प्रख्यात विनोदी लेखक मोलियर याचं सुभाषित वाचून मगच त्या मार्गाला लागा. मोलियरने म्हटलंय-

बहुतेक माणसं त्यांना झालेल्या रोगामुळं मरत नसावीत, तर ती त्या रोगावरील उपचारामुळे मरत असावीत.