नट, निर्माता, लेखक अशा विविध अंगाने वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस, देऊळ अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीत आपला सहभाग आहे. त्यातले काही राष्ट्रीय पुरस्काराने तसेच परदेशातील काही महोत्सवात गौरवले गेले आहेत. या आपल्या यशाबद्दल आम्ही सर्व प्रथम आपले अभिनंदन करतो.
एक शिक्षक आणि ‘अंनिस’ कार्यकर्ती म्हणून आम्हाला हे जाणून घ्यायची कायम इच्छा राहिली आहे की, एक संवेदनशील, विवेकी व्यक्तिमत्त्व कसे घडते? त्या दिशेने आपली वाटचाल कशी झाली, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. आपले बालपण कसे होते, त्यावेळचे सामाजिक वातावरण कसे होते, याबद्दल आपण सांगावे.
गिरीश : मी माझ्या आत्याकडे वाढलो. मी लहान असतानाच माझी आई निर्वतली. मी व माझी मोठी बहीण आम्ही पुण्याच्या कसबा पेठेत आत्याकडे शिक्षणासाठी राहिलो. आई नसणे हे काय प्रकरण आहे, बाकीची मुले आपल्या आईवडिलांच्या घरात राहतात आणि आपण आत्याकडे राहतो याबद्दल मला कायम कुतूहल असे. परंतु आत्याने एवढी माया केली की पोरकेपण जाणवले नाही, आम्हाला आवर्जून उत्तम शाळेत घातले. सुरुवातीला न्यायमूर्ती रानडे बालमंदिरात आणि नंतर टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये.
त्या वेळचे पुण्यातील सांस्कृतिक वातावरण चांगले होते. गणेशोत्सव चांगल्या रीतीने साजरा केला जात असे. मला आठवते, एकदा कसबा पेठेतील गणपती उत्सवात मी काही संस्कृत श्लोक म्हटले आणि त्याचे कौतुक म्हणून आत्याने गोड शिरा केला होता, साजूक तुपातला शिरा म्हणजे तेव्हा अप्रुप होते. इतक्या लहान वयात एवढे स्पष्ट उच्चार वगैरे माझे बरेच कौतुक झाले. मी तेव्हा बालवाडीत होतो. मोठी मंडळी आपले एवढे भरभरून कौतुक करतात, ही काही तरी और मजा आहे असे वाटले. अशा रीतीने सांस्कृतिक विश्वाची पहिली ओळख मला गणेशोत्सवातून झाली.
तेव्हा रेडिओचे प्रस्थ होते. सवाई गंधर्व उत्सवाबद्दल चर्चा होत असे. घराघरातून काका, मामा कुणी गायक असे. त्यांच्या छोट्या गानमैफिली होत. त्यावेळचे राजकीय वातावरणही उत्साहाचे होते. 1977 म्हणजे आणीबाणी पश्चातचा काळ होता. राजकीय चर्चा होत. फारसे काही समजत नसे; पण मोठ्या माणसाचे बोलणे ऐकायला आवडत असे. गाय-वासरू, नांगरधारी शेतकरी ही चिन्हे लक्षात आहेत. एकदा विजयी उमेदवाराची मिरवणूक चालली होती; बहुधा ते अरविंद लेले असावेत. मी आत्याच्या कडेवरून बघत होतो आणि त्यांनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ आमच्याकडे फेकली. माझ्यासाठी ती खूप मोठी घटना ठरली. आपल्यात काही वेगळे आहे, असे वाटून गेले. आपली परिस्थिती पण इतर मुलांहून वेगळी आहे, त्याचा मी अर्थ लावायचा प्रयत्न करीत असे.
मी नवीन मराठी शाळेत जाऊ लागलो. तेथे मला खूप चांगले गुरुजन लाभले. माझी भाषेबद्दलची समज वाढली. मी नाटकात, स्पर्धात भाग घेऊ लागलो. भाषा कशी वापरावी, संवाद कसा करावा, व्याकरण म्हणजे काय ते अगदी समाज स्त्रियांकडे काय दृष्टीने बघतो, इथपर्यंतची समज त्यांनी आम्हाला दिली. फक्त पाठ्यक्रमापुरते शिकवून ते थांबले नाहीत तर तदानुषंगिक प्रसंगांबद्दल चर्चा होत असे. त्यावर प्रश्न विचारायची मोकळीक आम्हाला होती. माध्यमिक शाळेत हे जास्त घडलं. प्रसंगनाट्यदर्शन नावाची स्पर्धा, नाट्यवाचन, काव्यवाचन स्पर्धा होत. मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेत असे. बाई आम्हाला स्पर्धेसाठी तयारी करायला लावायच्या. मला खरं तर ते पाठांतर आणि मेहनत नको वाटे. परंतु त्यांनी माझ्यातले गुण हेरले होते. आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीची आस आहे, ओढ आहे. आपल्याला काही वेगळे ऐकू येत आहे, वेगळे वाटत आहे ह्याची पहिली जाणीव मला तेव्हा झाली. आज मी जो कुणी आहे त्याचे सर्व श्रेय हे माझ्या या गुरुजनांचे आहे. आमच्या जाधव बाई शब्दांचे अर्थ उलगडून सांगत, कविता म्हणजे काय ते सांगत. हळूहळू आम्हाला कवितेचा अवकाश उमगू लागला. वाचनाची आवड निर्माण झाली.
तुमचे आवडते लेखक कोणते होते ?
मला तर जे जे वाचू ते सर्व आवडत असे. मी नरहर कुरुंदकर, पु. भा. भावे वाचत असे. जी. ए. कुलकर्णी तर माझे all time favorite होते. दुर्गा भागवत आमच्या हिरॉईन होत्या. त्यांची बरीच पुस्तके मी वाचली. या लेखकांचे धडे आम्हाला होते. या लेखकांचा वकूब, त्यांची महती याची ओळख आम्हाला शिक्षकांनी करून दिली. पुढे माझे माझे मी वाचू लागलो. पण माझ्या वाचनाला माझ्या गुरुजनांनी वळण लावले. वाचन माझ्यासाठी जीव की प्राण बनले.
मी धाडसी व्हावे म्हणून आत्याचे यजमान मला पुढच्या दाराने बाहेर पिटाळीत आणि दार लावून घेत. मग गुंडाच्या गणपतीला वळसा घालूनच मागच्या दाराने यावे लागे. मागे एक गोठा होता. तो प्रचंड अंधार, त्या म्हशी, त्यांच्या त्या काळ्या सावल्या, ते पळत पळत जाणं. ती एक कसोटीच असे. वाटेत एका बालमित्राच्या आजीचे घर होते. घराच्या खिडकीत त्याचा चेहरा दिसे त्याचेच मला अधिक महत्त्व वाटे. आत्याबरोबर मी भजनी मंडळात जात असे आणि तिथे मी गाणे म्हणत असे. वाड्यातल्या आत्या, मावशा कीर्तनाला जात; मग मीही त्यांच्याबरोबर वा मित्रांबरोबर कीर्तन ऐकत असे. तेथील वाद्यसंगीत, श्रोतृवृन्दावर ते करीत असलेले गारुड पाहून मी भारावून जात असे. त्यामुळे पहिल्यांदा मी स्टेजवर चढलो आणि तो limelight अनुभवला तेव्हा मला खूप मजा वाटली. आपण बोलत आहोत आणि सर्वजण आपल्याकडे बघत आहेत, त्यांच्या चेर्यावरील बदलता प्रतिसाद, त्या टाळ्या हे मला खूप आवडत असे.
आत्याच्या घरचे वातावरण फारसे धार्मिक नव्हते. कधी आत्या, तर कधी आत्याचे यजमान घरातल्या देवाची पूजा करीत. पुढे मी मोठा झाल्यावर कधी-कधी मीही पूजा करावी, अशी अपेक्षा असे. एक काम म्हणून मी ती करीत असे. पुढे लवकर नोकरीला लागता यावे म्हणून मी लातूरला वडिलांजवळ इंजिनिअरिंग डिप्लोमा करण्यासाठी गेलो. माझे वडील दत्तभक्त होते. त्यांनी गुळवणी महाराजांची दीक्षा घेतली होती. अगदी जातीने ते पूजेची उपकरणे घासून-पुसून घेत. देवावर मनुष्यरूपाचे आरोपण करुन ते यथासांग पूजा करीत. ती पूजा बघणे, त्यांचे उच्चारण ऐकणे हा एक सोहळा असे. परंतु त्यांनी कधी आम्हाला ‘हात जोड, इथे पाया पड’ अथवा ‘माझ्या पाया पड’ असे सांगितले नाही. एकंदरीत माझ्यावर कर्मकांड, देव-देव याचे फारसे धार्मिक संस्कार झाले नाहीत.
लातूरला, धुळे आणि इतर उत्तर महाराष्ट्रातील माझे मित्र झाले. मला आधी भाषेचं वेड होतंच. मी वेगवेगळ्या बोलीभाषेतील बोलण्याच्या तर्हा, वेगवेगळे पर्यायी शब्द याचे निरीक्षण करीत असे. हे मित्र गावाहून येताना तर्हेतर्हेची शिदोरी आणत. कुठे कुठे काय बनवितात, त्याला काय म्हणतात त्याचे कुतूहल वाटे. साधे पिठलं पण ते बनवायच्या अनेक तर्हा मला आढळून आल्या. प्रादेशिकतेचे एक वेगळे भान मला आले जे मला पुढे उपयोगी पडले. हे माझे मित्र डाव्या विचारसरणीचे होते. त्यांचे वाचन पण वेगळे होते. त्यांच्या खूप चांगल्या मोकळ्या चर्चा, वादविवाद होत. त्यात उजव्यांनाही प्रवेश असे. गणपती बसवावा की बसवू नये, धर्म ही अफूची गोळी म्हणजे नेमके काय, असे विषय असत. हा गट मुख्यत्वेकरून अखिल भारतीय बँक एम्प्लॉइजच्या कट्टर डाव्या युनियनचा असे. इथे माझी नाट्यविषयक जाण ही प्रगल्भ झाली. खरे नाटक काय हे समजू लागले. मोहन राकेश, शंकर शेष, बादल सरकार अशा सिद्धहस्त नाटककारांची नाटके माझ्या वाचनात आली. सतीश आळेकरांची ‘झुलता पूल’ एकांकिका मी तेव्हा बसवली होती.. पुण्यात शाळेत असताना मी शाखेत जात असे. तेव्हाही मला नाटकाचे वेड होते. परंतु तेव्हा आमची नाटके ही बाळबोध असत. राजा मंगळवेढेकर, बताराम ठकवे आदींची बालनाट्ये आम्ही करत असू. पुढे पुण्यात नोकरी करू लागलो तेव्हा मी नाटके लिहू लागलो. मी भरपूर नाटके बघत असे; पण माझ्या लिखाणावर व सादरीकरणावर कुणाची छाप असू नये, असा माझा आग्रही अट्टाहास असे.

तुम्ही लिहिलेल्या नाटकांबद्दल काही सांगता येईल का?
मी आठ-दहा तरी प्रायोगिक नाटके लिहिली. सांस्कृतिक दहशतवादावर उपहासात्मक विनोदी मांडणीचे एक नाटक लिहिले. त्यात आतंकवादी कवी समाजात घुसतात आणि त्यांच्या उठवळ काव्याने माणसे मारतात. त्यांच्या नवविचाराने तरुण बाधित होतात आणि हे घडते. जाहिरातीच्या जगाबद्दल दुसरे ‘जिंगल्स’ नावाचे नाटक होते. जाहिराती कसं खोटे बोलतात आणि त्यांचा जनमानसावरचा प्रभाव हा त्याचा विषय होता. नाटक लिहिणे आणि बसवणे दोन्ही माझे काम असे. मी आवर्जून नाटके बघत असे. जे प्रकर्षाने जाणवले त्यावर मी लिहीत असे. ही नाटके उजव्या विचाराच्या ‘संस्कार भारती’च्या नाट्यविभागाखाली होत. मग त्यात काही देशभक्तीपर नाटकेही होती. चाफेकर बंधूंनी रॅन्डचा खून केला त्याला शंभर वर्षे झाली म्हणून एक महानाट्य केले होते. त्या वेळी प्रत्यक्ष एक बग्गी पळवून विद्यापीठ रोडवर नेऊन नाटक केल्याचे आठवते.
आई नसणे आणि मृत्यू म्हणजे काय या विचारांनी लहानपणी तुम्हाला ग्रासले होते, त्याची काही आठवण?
माझ्या वैयक्तिक जीवनात मला मृत्यूबद्दल सातत्याने कुतूहल वाटून राहिले होते ते माझ्या आईमुळे. आई नाही म्हणजे नेमके काय? ती मेली म्हणजे कुठे गेली, असे प्रश्न मला पडत. एकदा माझे वडील पुण्यात आले असताना मी त्यांना म्हटले, ‘मला एकदा काही वेळ थोडे मरून बघायचे आहे.’ माझे बाबा घाबरले. ते माझ्यासाठी ढेर सारी बिस्किटे, गोळ्या घेऊन आले. पुढे आमचे कसब्यातील घर पडले आणि आम्ही धनकवडीला राहायला गेलो. तिथे मी एका आजीचा मृत्यू बघितला. त्यानंतर हळूहळू मी मृत्यूकडे कुतूहलपूर्वक पाहू लागलो. अनेकदा मी एकटाच बसून आत्मसंवाद करीत असे. धनकवडीहून दोन बस बदलून यावे लागे. बराच वेळ एकट्याने प्रवास करावा लागे. खिडकीत बसून मी आभाळाकडे बघत देवाशी संवाद साधत असे. तार्यांकडे बघत असताना मला वाटे, गेलेला माणूस तार्याच्या रूपाने वर लटकत आहे. देव, मृत्यू या विषयावर कधी बालसुलभ तर कधी कूट प्रश्नाचा मी विचार करीत असे. पुढे ‘विहीर’ चित्रपटामध्ये मुलाच्या मनातील जन्म-मृत्यूबद्दलचे वादळ दाखविताना आणि ‘देऊळ’ मध्ये मला या संकल्पनांचा उपयोग झाला.

तुम्ही वर वर्णन केलेली सामाजिक स्थिती आणि आजची एकूण सर्वांगीण परिस्थिती याबाबत आपले काय म्हणणे आहे ?
गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रात फार मोठा बदल घडून आलेला दिसतो. एक मोठा बदल म्हणजे पूर्वी स्वतंत्रपणे विचार करायची मुभा होती आणि तो मुक्तपणे मांडणेही शक्य होते. आणीबाणीच्या काळातही हजारोंच्या सभा दुर्गाबाई भागवत घेऊ शकल्या. त्यांना कुणी दगड मारले नाहीत. ज्योतिबा फुल्यांच्यावर जसे शेण फेकले गेले, त्या काळची कर्मठता, तसे दिवस, आज परत आले आहेत, असे वाटते. मुक्त अर्थव्यवस्थेने पार उलथापालथ केली. आलेल्या पैशाच्या ओघाने फारच काही विपरीत घडले. आज संस्कृती कशाला म्हणायचे तेच लोकांना कळेनासे झाले आहे. जागतिकीकरणाने एक तर्हेचे सपाटीकरण झाले आहे. सर्वांची भाषा एक, आहार एक, पेहराव सारखा. जुन्या परंपरा आज मोडीत निघाल्या आहेत. आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्याशी सध्याच्या सांस्कृतिक (?) उठावाचा संबंध आहे की काय हे समाजशास्त्रज्ञ कदाचित सांगू शकतील. नव्याने आलेल्या पैशाच्या जोरावर थेट सत्ता हाती येऊ लागली. पूर्वी सत्तेसाठी विचाराची, एका भूमिकेची गरज होती. आता पैसा थेट सत्तेत परावर्तित होऊ लागला. जो-तो सत्तेच्या मागे लागला. तत्त्वासाठी सत्ता सोडणे अशी उदाहरणे मग पुस्तकातच राहिली. एकीकडे सारखा गांधी, फुले, शाहू ,आंबेडकर यांचा जप करायचा आणि आचार मात्र विपरीत, असे घडू लागले. कोणताही खास राजकीय विचार नसलेली सतरा पक्षांची कडबोळी, सत्तेसाठी काहीही तडजोडी करायची तयारी, राजकीय नेतृत्वासाठी कुठल्याही क्षमतेची पूर्वअट नसणे या राजकीय वास्तवाचे चित्रण माझ्या आगामी ’ जाऊ द्या ना बाळासाहेब ! ’ या चित्रपटात आहे. माझे वडील कुणीतरी आहेत म्हणून मी आपसूक नेता, असे होत आहे. राजपुत्र कसाही का असेना; त्याला राजा म्हणून स्वीकारावे लागते असे आज आहे.
अशा निराशाजनक परिस्थितीत मला काही सकारात्मक बाबी आढळतात. आज समाजात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे आणि आज तो माध्यमांच्या प्रस्फोटाला तोंड देत आहे. त्यात काही विधायक बदलाची नांदी मला दिसते आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत, RTI खाली, अनेक तरुण हिरिरीने काम करीत आहेत. आज ‘अंनिस’मध्ये कित्येक तरुण झोकून देऊन काम करताना दिसतात. काही दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये जुडले आहेत. काही आमचे तरुण मित्र आज मेळघाटच्या कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या प्रदेशात शाळा चालवीत आहेत. सांस्कृतिक घडी स्थिर ठेवणे, योग्य वैचारिक दिशा ठरविणे ही समाजातील संवेदनशील माणसांचीच जबाबदारी बनून राहिली आहे. राजकीय व्यवस्था याबाबत आपला वाटा उचलत नाही. माध्यमानीही याबाबत भ्रमनिरास केला आहे. पूर्वीसारखी माध्यमे जनतेच्या क्षोभाला आरसा दाखवीत नाहीत.

सिनेमा हे एक सामाजिक बदलाचे साधन होऊ शकते का?
सामाजिक सिनेमा नावाचे मुळातच असं काही महत्त्वाचे, वेगळे व्यासपीठच नाही. वैयक्तिक प्रयत्नातून कोर्ट, देऊळ असे फुटकळ काही प्रयोग होत आहेत किंवा सुमित्रा भावेंसारखे सामाजिक दृष्टी घेऊन त्यांच्या, त्यांच्या पद्धतीने चित्रपट बनवीत आहेत. परंतु सिनेमाची जनमानसावरील प्रभावाची मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. सिनेमामध्ये सामाजिक बदल घडवून आणण्याची ताकद आहे, असे म्हणणे एक विनोद होईल. सिनेमा संवेदनशील बनविण्याचं, जाग आणण्याचं काम करू शकेल. सिनेमा बनविणारा अखेर एक कलाकारच असतो आणि त्याच्या आतल्या प्रवासाचा वेध आणि त्याच्या गूढ गर्भिताचा शोध हे त्याचे विषय असू शकतात. आपल्या सामाजिक अधिष्ठानाचं भान त्याला तपासून घ्यायचं असतं. सामाजिक बदलासाठी सिनेमावर अवलंबून राहता येणार नाही. साहित्यासारख्या गंभीर कलेची ती जबाबदारी आहे असे मानले पाहिजे. तसेच जोरकस साहित्य आज निर्माण व्हायला हवे. आपल्याकडे नाटक नावाचे भरभक्कम, सक्षम व्यासपीठ एकेकाळी होते. ती चळवळ आता क्षीण झाली आहे. ती पुन्हा सक्षम होण्याची गरज आहे. खेड्यापाड्यातून, गल्लोगल्ली प्रायोगिक नाटक होत असे. जसे की तेलंगण, केरळमध्ये शेतातूनही सिनेमा दाखविला जात असे. चांगला सिनेमा म्हणजे काय, सिनेमाचे व्याकरण त्यांना समजत असे. विचार प्रसृत करण्याचे ते एक साधन होते. आपल्याकडे अशी प्रायोगिक नाट्यचळवळ आपण सर्वदूर घेऊन जाऊ शकलो नाही. मर्यादित लोकांच्या हातात ती राहिली आहे. आर्थिक गणित सांभाळण्याचे बंधन आणि मनोरंजन करण्याची सक्ती याने ती चळवळ ग्रासली आहे.

आपला आणि डॉ. दाभोलकरांचा कधी, केव्हा आणि कसा संबंध आला, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
डॉ. दाभोलकरांबद्दल मला पहिल्यापासून खूप कुतूहल वाटत होते. सुरवातीला ते नकारात्मक होते. त्यातच त्यांच्या बरोबर असणार्या डॉ. लागूंचे ते ‘आता देवाला रिटायर करा ’ हे वाक्य कानी आले. मला वाटलं काय हा वेडेपणा ? देव नाकारा ? हे म्हणजे आता अतिच झालं. मला राग आला. ही माझी आणि डॉक्टरांची पहिली मुठ्भेड. तेव्हा मी 5 वी, 6 वी त असेन. देवासंबंधी माझ्या बालसुलभ भावना होत्या. माझ्या आजूबाजूच्या समाजात तर डॉ. दाभोलकर म्हणजे कुणी अतिहुशार वेडा माणूस आहे, अशा तर्हेचे काहीतरी भलते काम करीत आहे, असे भाबडे आकलन होते. मला प्रश्न पडे की या माणसाची काय बाजू असेल, का बरं तो हे काम करीत असेल? माझ्या आजूबाजूंच्या लोकांचे आकलन मी विचार न करता स्वीकारावे का? या आजूबाजूच्या आयाबाया माझ्या समोर, ‘काय हा बिच्चारा, आईविना पोरका!’ अशी माझी कीव करायच्या. मी तर खरं मजेत वाढत होतो. याचा अर्थ इतर लोकांचे आकलन नेहमी बरोबर असतेच असे नाही. आपण ते तपासून घेण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीत स्वतंत्रपणे विचार करणे हा पुढे माझा छंदच बनला.
मी न्यू इंग्लिश स्कूलमधे असताना ‘लग्नाची बेडी’चे सराव प्रयोग असत. तेथे सामजिक कृतज्ञता निधी संकलनासाठी हे प्रयोग असल्याचे व त्यासंबंधी भूमिका मांडली जात असे. तोवर अशा समाजकार्य वगैरे प्रकाराबद्दल मी अनभिज्ञ़ होतो. माझा पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा नव्हता. मला स्वतःच्या लिहिण्यात, निर्माण करण्यात रस होता. तरी पण मला समाजाशी जोडून राहणे आवडे. सगळी माणसे; मग ती कशीही असोत, माझ्या कुतुहलाचा विषय होती. नंतर लातूरलाही हा नाट्यप्रयोग मी बघितला आणि डॉ. दाभोलकर आणि लागू उभयतांबद्दलचे माझे प्रेम, आदर वाढला. डॉ. दाभोलकरांबद्दल मी वाचत राहिलो. जादूटोणा कायदा आणि त्याची वाटचाल याबद्दल मी जाणून घेतले. त्यांची भूमिका हळूहळू मला समजू लागली. आणि मला ते चक्क ग्रेट वाटायला लागले.
माझा ‘देऊळ’ रिलीज झाल्यानंतरची गोष्ट. डॉक्टरांनी मला त्यांच्या भाषणाच्या सीडींच्या प्रकाशन समारंभाला बोलाविले. मला तर एकदम लॉटरी लागल्यासारखे वाटले. ही माझी आणि त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट. सिनेमाचे माध्यम वापरून आपले म्हणणे सर्वदूर पोचवावे, असे त्यांच्या मनात होते. त्याविषयी ते माझ्याशी बोलले. आतून भरून आल्याविना बाहेरून रोपण करून चांगली कलाकृती बनणे कठीण या माझ्या म्हणण्याशी ते सहमत होते. त्यांनी आपली सर्व पुस्तके मला वाचायला दिली. त्यातून डॉ. दाभोलकर मला आकंठ भेटले. आमच्या भेटीगाठी वाढल्या. आपले अनुभव त्यांनी मला सांगितले. त्यांची बोलण्याची शैली, भूमिका समजावून सांगण्याची पद्धत यामुळे मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो. तास-दोन तास आमच्या गप्पा चालत. मला सिनेमासाठी अखेर काहीतरी बीज मिळते आहे असा मी त्यांना फोन केला. ते खूप उत्साहित होते आणि आम्ही भेटणार होतो. तोच 20 ऑगस्टला त्यांच्यावर तो हल्ला झाला. मला ते सहन झाले नाही. परत एकदा माझा बाप मेल्यासारखे मला झाले. आता कुठे मी माझी नाळ त्यांच्याशी जोडू पाहत होतो तोच हे घडले.
ते म्हणत, ‘मला जे धाडस करून म्हणावेसे वाटते ते वेगळे आहे. ते तुम्हाला आवडत नाही म्हणजे मी तुमच्या विरोधात आहे असे नाही किंवा माझे तुमच्यावर प्रेम नाही असे नाही. ही माझी भूमिका आहे आणि ती मला पूर्णत्वाने पटलेली आहे. त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा असा हट्ट नाही की, तुम्ही येऊन त्याचा गजर करावा. तुम्हाला तुमची वेगळी भूमिका असण्याची मुभा आहे.’ हे त्यांचे म्हणणे मला फार महत्त्वाचे वाटत असे. हे फार विरळा होते. मतभिन्नता (difference of opinion) इतक्या शांतपणे मान्य करणे, ही एक अत्यंत लोकविलक्षण गोष्ट होती. सद्य परिस्थितीत आपल्या समाजात हा गुण प्रस्थापित करायची तातडीची, नितांत गरज आहे. तुमच्या शेजारचा त्याला पाहिजे ते खाऊ शकणार आहे आणि हे त्याचे स्वातंत्र्य तुम्ही मान्य केले पाहिजे. ‘तुम्ही हेच बोला’, ‘हेच कपडे घाला’ आणि ‘हेच खा’ असे सांगण्याचा मूर्खपणा तुम्ही करू शकत नाही. तो हक्क तुम्हाला नाही. ज्या समाजात इतक्या पद्धतीच्या देव नावाच्या गोष्टीचा आधार घेऊन प्रच्छन्नपणे इतके शोषण चालू असते, तिथे साधेपणाने असे सांगितले की, ‘बाबा रे तुमचे देव देव सगळे चालू दे; पण तुम्ही शोषण करू नका.’ तर त्यात काय वावगे आहे? मला नाही वाटत की, सश्रद्ध असण्याबद्दल डॉक्टरांचा काही आक्षेप होता. तुमची श्रद्धा कुणा माणसावर असेल, एखाद्या विचारावर असेल किंवा तुमच्या कामावर असेल तर ते माणसाला घडविणारे, त्याला प्रगतिपथावर नेणारे लक्षण आहे असे मी मानतो. परंतु म्हणून श्रद्धेच्या नावावर ‘तू हेच कर’, ‘मी सांगेन तेच प्रमाण मान’ असे अंधानुकरण करायला लावणे या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणण्याचे सध्याचा समाज नाकारत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माणूस आपल्या बुद्धीचा वापर करीत नाही; अन्यथा ही अंधश्रद्धा आहे, हे खरे तर पहिली, दुसरीतल्या मुलालाही कळेल. त्यात कोणतेही अवघड रॉकेट सायन्स नाही न कळायला.

गिरीश आपल्याशी हा संवाद साधताना वेळ कसा गेला, ते कळलेच नाही. आपल्या शब्दाशब्दातून आपल्यातील कलावंत डोकावत होता. एका संवेदनशील विवेकी व्यक्तिमत्त्वाकडे झालेली आपली ही वाटचाल म्हणजे ‘आपुलाची वाद आपणाशी’ असे भासले. ‘अंनिस’च्या तरुण कार्यकर्त्यांना आपण काय सांगू इच्छिता?
संदेश देण्याइतका मी स्वतःला मोठा समजत नाही परंतु माझ्या तरुण मित्रांशी माझे काही विचार ‘शेअर’ करायला मला आवडेल.
एखाद्या विचारावर विश्वास ठेवण्यापूर्वी हे समजणे गरजेचे आहे की, आपले एखाद्या गोष्टीचे जे काही आकलन असते ते त्या त्या काळचे असते. त्याचे नीट परिशीलन करून, वेळ पडेल तर त्याची चिरफाड करुन, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. अशा उलटसुलट तपासणीअंती जर आपण आपल्या विचारावर ठाम असाल तर हा विचार धाडसाने, निर्भयपणे लोकांपुढे मांडला पाहिजे. सध्या ही निर्भयता पळापळाने नष्ट होत आहे. सध्या भय साकळून राहावे अशी राजकारण्याची चाल दिसते.
एके काळी येथे चार्वाक होऊन गेला. प्रागतिक विवेकी समाज आणि विवेकी विचारांची परंपरा कित्येकदा येथे दिसली; परंतु परत ‘येरे माझ्या मागल्या’ आणि पुनः बाकी शून्य ! हे असे ‘चक्र नेमिक्रमेण’ तर चालत नाही ना? या गोष्टीचा अभ्यास व्हायला हवा. इथे वेगवेगळ्या राजसत्ता, वेगवेगळ्या राजकीय विचासरणी सत्ता गाजवून गेल्या. परंतु तरीही लोकशिक्षणाची, जनजागृतीची गरज आज कायम आहे. गेल्या काही दिवसांतील चित्र बघितले तर भयशंकित होण्यासारखी अवस्था आहे. तुम्ही स्वतंत्र विचार केलात, स्वतंत्रपणे काही मांडणी केलीत, तर तुम्हाला गोळी मारली जाऊ शकते. इतक्यापर्यंत ती पोचली आहे.
आमच्या धर्मभावना दुखावतात, हे एक दुसरे थोतांड आहे. मला नाही वाटत की, मी त्यांच्या दत्ताला नमस्कार केला नाही म्हणून माझे वडील दुखावले गेले. त्यांचं, त्यांचं ते दत्ताचे उत्तम करीत. त्यामुळेच त्याची मला अगाध गोडी लागली. त्यांचा दत्त कधी बाहेर येत नाही. माझ्याकडून कुठल्याही कर्मकांडाची अपेक्षा करीत नाही. माझ्यावर कुठलेही बंधन घालीत नाही. म्हणत नाही की, ‘तू आता आरती कर.’ आणि तो माझा दोस्त बनतो, माझा आत्मसंवादाचा आरसा बनतो. अशा तर्हेने उन्नयन साधण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी देवसंकल्पनेचा वापर केला त्यांच्या साठी तो आहेच. ज्या लोकांचा खरच कुणी वाली नाही ते जेंव्हा भयग्रस्त होतात, इथल्या राज्यसत्तेकडून नाडले जातात तेंव्हा ते देव ह्या संकल्पनेचा आधार घेतात, असं लक्षात येते. आज जणू देवाच्या आत यंत्र लावून, प्लास्टिकच्या बाहुल्याप्रमाणे त्याच्याकडून खेळ करून घेऊन चमत्कार करून दाखवले जात आहेत. भोळ्या लोकांना फसविले जात आहे. या सर्वांच्या विरोधात आजचा प्रौढ, जाणता समाज उभा न रहाणे यापरते दुःख नाही, आश्चर्य नाही. खास करुन आजच्या जमान्यात जेव्हा सर्व माध्यमे गौप्यस्फोट करायला सक्षम आहेत, तयार आहेत आणि जेव्हा यातील तथ्य शोधू गेले जाता सहज उमगण्यासारखे आहे. तेव्हा एका परीने तरुणांनी हे काम करीत राहायला हवे, ही फसवणूक थांबवायला हवी. नवे विचार मांडीत राहिले पाहिजे.
- मुलाखतकार : प्रा. प्रभा पुरोहित व सुनीता ओक