Categories
मुलाखत

मी ‘अंनिस’चा बहिःस्थ कार्यकर्ताच आहे! – नागराज मंजुळे

वार्षिकांक - २०१५

तुमची विवेकवादी विचारांची वाटचाल आम्हाला जाणून घ्यायची आहे. तुमचं कुटुंब, बालपण, त्यावेळचं वातावरण, याविषयी आम्हाला सांगा.

सगळ्या अंधश्रद्धा, अविवेकी विचार असं वातावरण असलेल्या माणसांतच मी वाढलो. म्हणजे माझं कुटुंबही तसंच होतं. म्हणजे मी ज्या जातीत जन्मलो, त्यांचे आचारविचार आणि त्यांच्या रूढी परंपरा म्हणजे वर्षाचं जर आपण बघितलं, त्यांचं एक वेळापत्रक केलं, तर त्यातले अनेक सणवार; म्हणजे आखाड सुरू आहे तर आखाडात देवाला जाणं, बोकड कापणं…. कोंबड्या कापणं… हिंदू-मुस्लिम अशा वेगवेगळ्या देवता… त्यांच्या देवता इतक्या की सगळ्या देवतांची मनधरणी करणार…. आणि मला जसं आठवतंय तसं घरात हे वातावरण.. परत अचानक घरात अंगात येणं… म्हणजे माझी चुलती होती, तिच्या अंगात अचानकच यायचं… बरेच भांडणतंटे असायचे ते इतके तर्कहीन असायचे, म्हणजे काही करणी – धरणी केलीय. तर हे होतं. आता मला हे आठवत नाही की, मला कुठल्या एका पॉईंटला हे कळायला लागलं. मी जसाजसा मोठा झालो तसा तसा आराध्यांच्या मेळ्यात जायचो; आराध्यांच्या मेळ्यात गाणी म्हणायला मिळायची, तेथे वाजवायला, खायला मिळायचं, वेगवेगळ्या वस्त्यांवरती गावात, गल्ल्यांत फिरायला मिळायचं…. त्या वयात मला ते खूप इंटरेस्टिंग वाटत असावं…. पण मला हे लक्षात यायला लागलं की, त्याच्यात खूप भांडणतंटे असायचे. आराध्यांचा ग्रुप म्हणजे या नवरात्रीत फिरून गाणी म्हणायचे आणि जोगवा मागणं असा वर्षाभराचा कार्यक्रम असतो, की दर मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी असं काहीतरी जोगवा मागतात आणि पीठ आणि धान्य मागून आणायचं. हे जोगवा मागणं कधीकधी गरिबीच्या पोटी पण होतं. जे गरीब आहेत त्यांना परडी दिली, तर त्याच्यावर तरी ते पोट भरतात. पण काही काही लोकं की, ज्यांना गरज नाही, ते पण… की ते देवीचं आहे आपल्याला तर ते केलं पाहिजे… आणि जर जोगवा नाही मागितला तर देवीचा कोपहोतो….तर सधन कुटुंबातली स्त्रीही त्या काळात जोगवा मागायची. माझ्या घरची परिस्थिती तेव्हा इतकी नव्हती की, खायला मिळत नाही; तरी पण जोगवा मागायचं. गळ्यात माळ, घरात परडी, येडाईला जाणं आणि मीरावाली बाबा म्हणून आहे त्याला जायचं… असा आराध्यांचा तो ग्रुप होता. तर लक्षात आलं की, यांची यांची खूप भांडणं आहेत आणि ही माणसं एकमेकांशी का भांडताहेत हे मला कळायचं नाही… बरं, आराध्याची गाणी म्हणून झाली तरी सगळी लोकं तंबाखू खाणारी होती. सिगरेट ओढणारी…. काही लोकं दारू पिणारी…. स्त्री-परुष अशी मंडळी होती आणि ती प्रेमळ पण खूप होती… पण वैफल्यग्रस्त आणि सतत किरकिर करणारी अशी ही लोकं होती. एक प्रसंग मला आता ठळक आठवतोय… आमच्या घरात आराध्यांचा मेळा होता. माझे चुलते… माझे दत्तक वडील नॉर्मली दारू वगैरे प्यायचे. तर पिऊन त्यांचं मेळ्यात गप्पा वगैरे सगळं चाललं होतं… हे गाणं म्हणा…. दुसरं गाणं म्हणा, असं आणि अचानक ते असं बसलेले आणि त्यांनी तंबाखू मळलेली आणि ते कुणाला तरी चुना मागत होते…. तर ज्याच्या अंगात आलेलं… तो मध्येच थांबून ‘नाही’…. असं म्हटलं ही घटना मला खूप चांगली आठवते. आणि मग मी आब्बा म्हणायचो माझ्या चुलत्यांना…. ते त्याला खूप रागावले… शिव्या दिल्या. याचं वारं काही खरं नाही म्हणे…. लबाड आहे… याला उठवा. मग सगळ्यांनी त्याला शिव्या घातल्या… देवी तुझ्या अंगात येत नाही, तर तू कशाला उगाच नाटक करतो? देवीचा उगाच कोप…. असं ती चर्चा वेगळ्या दिशेला गेली. मला जाणवलं की, काहीतरी गमतीशीर खेळ आहे, ही काही खरी नाहीत लोकं. त्याच्यानंतर माझ्या मनात संशय निर्माण झाला की, यांच्या अंगात येते ते खोटेच येते… देव नाहीच येत.. आणि अंगात येणं… म्हणजे माझ्या चुलतीच्या अंगात यायचं… तर नॉर्मली चुलतीला काय असं घरात मोठं स्थान होतं, असं नाही… म्हणजे बाकीच्या वेळेला माझे चुलते तिला शिव्या द्यायचे…. म्हणजे असे अनेक पुरुष बायकांना वागवायचे. पण अंगात आलं की, सगळे पुरुष त्यांच्यासमोर नतमस्तक होणार. म्हणजे पाया पडणार बायकोच्या आणि ज्याच्या अंगात येतं त्याला ‘झाड’ म्हणतात.. म्हणजे ते स्वत:ला ‘झाड’ म्हणवून घेत….. मग ते अंगात येऊन सांगायचं की, ‘झाडा’ची काळजी घ्या. मला कळायला लागलं की, हे स्वत:ची पाठराखण करू शकत नाहीत, स्वत:चं संरक्षण करू शकत नाहीत तर ते असं काहीतरी करताहेत… हे खूप लक्षात यायला लागलं. दुसरी एक घटना सांगतो, माझ्या चुलतीच्या अंगात यायचा मीरावालीबाबा…. म्हणजे माझ्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट झाला आणि त्यांना जरासा पॅरलिसिसचा अ‍ॅटॅक आला तर त्याच्यासाठी भरपूर काय काय उपाय करायचे म्हणजे दवाखानाही करायचे आणि देवही करायचे; आम्ही गाणगापूरला जायचो, तुळजापूरला जायचो. तर कोणीतरी सांगितलं की, मीरावालीबाबाला जा. तर मीरावालीबाबाला जाऊन आल्यानंतर मीरावलीबाबा आमच्या चुलतीच्या अंगात यायला लागला आणि तो अंगात यायला लागला, असं म्हणायला लागल्यावर मी म्हणायला लागलो की…. ते अंगात यायचे तर हिंदीत बोलायचे मीरावालीबाबा… आणि ते हिंदी म्हणजे खूपच मजेशीर असायचं आणि मी हिंदी फिल्म खूप बघत असल्याकारणानं मला कळायचं ना, की हे खूपच वाईट हिंदी होतं. तर मी असं म्हणायचो, जेव्हा ते अंगात यायचं तेव्हा… की तू हिंदी का नीट बोलत नाहीस? मग तो मुस्लिम देव आहे ना… तर तू हिंदी नीट बोलायला पाहिजे. तर तिला खूप राग यायचा. मी असं विचारलं की आमची भांडणं व्हायची. या अशा छोट्या-छोट्या गोष्टी होत्या की, ज्यामुळे संशय निर्माण झाला की, या परंपरा खोट्या आहेत. परत असं व्हायचं की, म्हणजे एक बाई जिच्या अंगात यायचं ती दुसर्‍या बाईची तक्रार करते… म्हणजे देव येऊन काय करतो तर दुसर्‍या बाईची तक्रार करतोय. मागितलं तर काय करतोय तर खूप छोट्या गोष्टी आणि ‘झाडा’ची काळजी घ्या, त्याला जेवायला देत जावा इतक्या प्रश्नाला… मग मला वाटायचं, हे काय!

मला रामायण आणि महाभारत बघायला आवडे आणि मला फिल्मची खूप आवड होती. मी मायाबाजार अशा फिल्म बघायचो. तिथं दिसायचं की, देव शक्तिशाली आहे, म्हणजे जादूच करतो आणि इकडे बघितलं तर हा अंगातला देव अगदी ताकदच नाही… तर यात मला वाटतंय, एक तर्क सुरू झाला. म्हणजे मी ज्या वयाचा असेन…. बालमनाला जे प्रश्न पडत असतील, तर ते प्रश्न विचारायला लागलो आणि हे लोक प्रश्न टाळताहेत असंही कळायला लागलं. असं हळूहळू कळत गेल्या मला या सगळ्या गोष्टी.

आपल्याला जे पटत नाहीये त्याला प्रश्न विचारले पाहिजेत, ही भावना मनात कशी आली? त्याची सुरुवात कशी झाली?

घरात वाचणारं कोणीच नव्हतं… लिहिणारं…. शाळेत गेलेलं कुणीच नव्हतं. माझ्या चुलत्यांना लिहिता-वाचता यायचं बर्‍यापैकी आणि वडिलांना खूपच असं अडखळत अडखळत यायचं. वाचणं किंवा विचार करणं अशी काही गोष्टच नव्हती; पण एक आहे ना की, जेव्हा देव-देव व्हायचे… म्हणजे आमच्या जमातीत ते बोकड कापण्याचे देव-देव खूप व्हायचे तर त्या देव-देवात हमखास भांडणं व्हायची आणि खूप मारामार्‍या…. डोकं फुटणे वगैरे नॉर्मल घटना होत्या आणि मला असं लक्षात आलं की, देव आणि असं काहीतरी विचित्र, विदारक, गंभीर घडणं हे एकत्रच आहे. माझ्या घरात देवाची अख्खी एक भिंत म्हणजे असे 30-40 फोटो असतील. घट बसले की, अनवाणी राहणं वगैरे हे सगळं केलंय मी पण लक्षात येतं… की हे करून काही होतच नाही आणि हे सगळं करणारी लोकं ही पण लबाडच आहेत. काही लोकं चांगली वाटायची. मला आठवतंय, आमच्या वरती एक शिक्षक होते जाधव सर म्हणून. त्यांना मूल नव्हतं आणि नेहमी त्यांच्याबद्दल असं वाईट बोललेलं मी आजूबाजूला ऐकायचो. पण त्यांच्या घरात गेल्या वर इतक्या प्रेमाने आम्हाला वागवायचे की खायला द्यायचे आणि अभ्यास कर म्हणायचे. जास्त संबंध न येऊनही त्या माणसांबद्दल प्रेम वाटायचं… बरं, ती माणसं कोणाबद्दल वाईट बोलत नव्हती. मला वाटतं की फिल्ममधून पण अशा गोष्टी कळत असतील. म्हणजे अमिताभच्या फिल्म्स बघितल्या तर त्याने अनेकदा देवाला प्रश्न विचारले आहेत. तर तो एक हिरोइझम डोक्यात बसलेला असावा. मी प्रचंड फिल्म्स बघायचो. मी शाळा कमीच केली. माझी हजेरी शाळेपेक्षा फिल्ममधली जास्त आहे. ‘दिवार’ असेल अमिताभचा… प्रश्न विचारण्याची सुरवात झाल्यावर माझे हे प्रश्न अधिक पोक्त होत गेले असतील. माझा विवेकवादी विचाराचा प्रवाह अगदी प्रॅक्टिकली झालेला आहे. त्या-त्या परिस्थितीत जगताना झालेला आहे…. आमच्या करमाळ्यातच मरिआईचं मंदीर होतं. लहानपणी बोकड कापायचे आणि कोंबड्या कापायचे… तर तिथून ते कापलेल्या कोंबड्या घेऊन येणं ते असं भारी वाटायचं. पण एका काळात हळूहळू त्याची लाज वाटायला लागली… ते रक्त सांडत आणि… किंवा आपल्या आईच्या अंगात येतंय आणि सगळ्या याच्यात तिची वरात निघतीय…. ते खूप विचित्र वाटायचं…. मग शाळेत जायचो तर तिथं वेगळंच वातावरण असायचं…. काही शिक्षक जे शिकवायचे, तेव्हा आपलं जगणं खूपच विचित्र आहे, असं वाटायचं त्या काळात. आणि मग हळूहळू त्याच्यातून बाहेर पडलो की, हे संपलं आणि जसजसा मोठा होत गेलो तसा वाचायला लागलो. दहावी नापास झाल्यानंतरच्या काळात मग माझं वाचन सुरू झालं. त्यातून प्रश्न अधिक प्रगल्भ होत गेले असतील आणि मग मी विरोधच करायला लागलो की, अंगात आणायचं बंद करा… हे बोकड कापायचे नाही… पण त्यावेळी कोणी ऐकत नव्हतं… मुलं आहेत… काहीतरी बोलतात म्हणून. पण मी असा विरोध करून करून ते बंद झाले आता.

म्हणजे तुझा एकट्याचा प्रवास नाही झालातुला घरात खूप झगडावं लागलंतुझं अख्खं घर त्यात सहभागी होतं.

म्हणजे माझी भांडणंच व्हायची… हळूहळू भाऊ माझ्या बाजूने यायला लागले. एक किस्सा तो आता सांगायला हरकत नाही… मी बारावीला वगैरे असेन त्यावेळेस. मी वडिलांना म्हणायचो की, असं नाही करायला पाहिजे वगैरे…. तर ते म्हणायचे, ‘तू अजून शिकलायस काय…. चार बुकं शिकलास की लगेच शहाणपणा शिकवायला लागलास…. आणि ते एक एम. ए. शिकलेल्या मुलाचं उदाहरण द्यायचे मला की, तो बघ पार लांब शिकून आला पुण्यात, मुंबईत आणि तो बघ…. तो जो मुलगा होता, तो एका पायावर एक तास उभा राहून पूजा वगैरे करायचा. त्याचं उदाहरण द्यायचे. ते नेहमी असं व्हायचं….. आणि त्याचे वडीलही आमच्याकडे यायचे तर तेही सांगायचे की, माझा मुलगा असा- माझा मुलगा तसा… वडील म्हणायचे…. ही नालायक आहेत आपली पोरं… काही दिवसांनी असं झालं.. पाच सहा महिन्यांनी त्या मुलानं त्याच्या आईवडिलांना घराबाहेर काढून गल्लीत पळवून मारलं. लाथा-बुक्क्यांनी मारलं आणि आमच्या अख्ख्या गावात झाली ती बातमी. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की, बघा तो तुमचा भक्त मुलगा… तर आम्ही असं करणार नाही. मला कळतं की, हे नाही करायला पाहिजे. तुम्ही हेच आमच्यासाठी देवासारखे आहात. आम्ही भांडणार. तुम्हीच शिकवलं. ते म्हणायचे आम्हीच शिकवून चूक केली… मान्य करतो की, तुम्ही शिकवलं… पण हे आम्हाला कळलं, यात दोष नाही. हे तुम्हाला पण कळायला पाहिजे होतं…. तुम्ही शिकला असता तर तुम्हाला पण कळालं असतं… अशी आमची खूप चर्चा व्हायची. माझे वडील तसे खूप रागीट होते. पण त्यांना ते पटायचं पण. म्हणजे मला आठवतंय… हळूहळू त्यांनी पण ते मान्य करायला सुरुवात केली. मग काही गोष्टी त्यांनी बंद केल्या. ते खूप करायचे की, हात गहाण टाकणं असेल. म्हणजे हात वापरायचा नाही… उजवा हात त्यांनी खूप दिवस वापरलाच नाही आणि त्याचं कारणही ते सांगत नव्हते की का हात गहाण टाकलाय.. मला वाटायचं की, माझ्या काळजीमुळे टाकलाय. तर ते पण बंद करायला लावलं. माझा स्वभाव असा आहे की, मी भांडायचो पण लगेच बोलायचो. तर वडिलांना कळायचं की, हा भांडतो पण प्रेमपण करतो. भांडलो की, त्यांना राग यायचा, वैताग यायचा आणि आपली सत्ता धोक्यात येतीय का…. असं काहीतरी होत असेल ना त्यांच्या मनात. भांडणं आणि प्रेम करणं असं एकत्रच करत राहिल्या कारणानं कदाचित आमच्या घरात हळूहळू बदल होत गेला. माझी आईसुद्धा आता त्यातच वाढलेली असून हट्ट कशाचा नाही आता. आईच्या मैत्रिणी आहेत, नात्यातले आहेत. तर असं मी भेटेल त्याला बोलत असतो… तर असं खूप कमी झालंय. हे तर नक्की की माझे सगळे भाऊ, तर आता कोणी असं काही करत नाही.

हे घडू शकलं, याचं अजून एक कारण म्हणजे मला मोकळीक खूप मिळाली होती. म्हणजे माझे भाऊ माझ्यासारखे नव्हते विचार करत. पण मी कसा… मला दत्तक दिल्या कारणानं. सैराटच होतो मी.. वडील-चुलते दोघंही काळजी करायचे; पण रागवायचे नाहीत. त्या विचारांना असा काही पायबंद नव्हताच माझ्या. त्यातून असं मुक्तपणे विचार करणं, बंधनं आली की गुदमरणं, हा माझा स्वभाव तयार झाला होता. तर त्या स्वभावातूनही हे प्रश्न उपस्थित झाले असतील. याप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगण्यात काही धोकेपण असतात आणि ते माझ्याबाबतीतही होते. तरलोय म्हणून सांगायला उरलोय आत्ता. नाही तर असं असतं की मी पण आराधी होऊन आता वाजवत बसलो असतो. असं वाटण्यासंदर्भात मागं मी एक उदाहरण दिलं होतं, ते यासंदर्भात सांगायला हरकत नाही… रस्त्यावरती जी कुत्री मरून पडतात ना… ती बर्‍याचदा गळ्यात पट्टा असलेली. तर ती असा तर्क बांधला… की ही पट्टा असलेलीच कुत्री मरतात कारण त्यांना रस्त्यावर कसं चालायचं माहीत नाही. भटकी कुत्री सहसा गाडीखाली येऊन मरत नाहीत. खूप क्वचित पट्टे बांधलेली कुत्री कशी असतात… की कारमधून फिरायचं आणि खिडकीत बसून भुंकायचं… त्यांना जग माहितीच नाही. बाहेर उतरलं की, त्यांची अडचण होते. तर मला वाटतं खूप सॉफिस्टिकेशन तुम्हाला कधीकधी मारून टाकतं… म्हणजे ते सगळ्या अर्थानं…. आता माझे मित्र…. सगळ्या पद्धतीचे मित्र आहेत माझे आणि ते आजही माझे मित्र आहेत. सरळ थेट भिडण्याचा अनुभव मला होता…

तुमच्या वाचनाविषयी सांगा.

दहावी नापास झालो ना… त्यानंतर करमणूक काही नाही म्हणून मी वाचायला लागलो. त्याच्याआधी मी वाचायचो. पण मायापुरी, पोलीस टाईम्स, चांदोबा. परत एक इंद्रजाल नावाचं पुस्तक होतं…. कॉमिक्स नाही… एक पुस्तकच होतं… ते इतकं मजेशीर पुस्तक आहे…. खूप अश्लील आणि खूप जादूटोणा! अशा पद्धतीचं… मग त्यात स्त्रियांचे प्रकार…. पुरुषांचे प्रकार. वशीकरणाचे प्रकार, असं ते पुस्तक होतं आणि ते मला माझ्या एका मोठ्या मित्रानं दिलेलं. ते अभ्यासासारखंच पुस्तक होतं. ते घेऊन त्यातल्या ट्रिक्स करायचा प्रयत्न करायचा…. अमावस्येला जाऊन स्मशानात कोणाचा केस पुरणे… चंदनाची बाहुली… तर अशा खूप ट्रिक्स होत्या. मी ऑथेंटिक माणूस का आहे? तर मी ते करून बघितलंय…. मी आराध्यांच्या मेळ्यात गाणी म्हटली आहेत आणि क्लासिकल संगीतही आवडतं. असं दोन्ही टोकाचं बघितलंय ना जग; त्यातून मला कळतं की, माझ्यासारखा माणूस जर इथे येऊ शकतो, विवेकाची कास धरून, तर मला वाटतं की, तर्क स्वत:चा नाही मरू दिला माणसाने. विचार जर केला, प्रश्न मनात जिवंत ठेवले आणि त्याचा पाठपुरावा केला तर आपल्याला आपलं सत्य सापडतं नक्कीच, पण आपणच ठरवलं की, आपल्याला नाहीच बघायचं तर… मला वाटतं की, जो विवेकाची कास धरेल. सत्याला सामोरा जाईल, तो आनंदी होईल.

देवाच्या आणि धर्माच्या नावाचा वापर करून आपल्याला फसवायची ही जी संकल्पना आहे ना, ती फार भारी आहे. ती घरबसल्या आपल्याला फसवते. कोणी मार्केटिंग करायला येत नाही; पण सगळे त्यांचे ग्राहक असतात.

तरुणपणात तुझे विचार अधिक टोकदार होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे काय काय घडले?

मी दहावी नापास होणं, ही मला वाटतं, माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची घटना आहे. दहावी नापास झालो नसतो तर मी असा नसतोच. कारण की मी खूप मित्रांत असायचो. सतत म्हणजे विनोद करणे, पोरांना हसवणे… पोरांच्यामध्ये मुख्य असायचो. म्हणजे हा असला की, मजा येते असं सगळ्यांना व्हायचं. दहावीच्या काळात असं झालं होतं की, घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. जवळ पैसे नसायचे आणि दहावी नापास झाल्याने सगळे मित्र माझ्या पुढच्या वर्गात गेले. मित्राचा गोतावळाच बंद झाला आणि अचानक एकाकीपणच आलं. मग आता काय करायचं? टी.व्ही.नव्हता घरात. घरात लाईटही नव्हती आणि मग असं झालं की, काहीतरी वाचायला कुठल्यातरी मित्राकडून एक पुस्तक घेतलं होतं. मग ते पुस्तक वाचलं तर म्हटलं की अजून आहे का पुस्तक? तर तो कुठल्या लायब्ररीतून आणतो, मग त्या लायब्ररीत गेलो. मला वाटतंय चार-पाच महिने मी तिथली खूप पुस्तके वाचून काढली. सहा महिने, वर्षात तर त्या लायब्ररीतील सगळीच पुस्तकं वाचून काढली. मग त्यात सुहास शिरवळकरपासून, बाबा कदमांपासून काय भेटेल ते वाचलं मी. ज्यात काही चांगली पुस्तकं सापडली. ती आवडली. मग त्यांचे संदर्भ. चंद्रकांत पाटलांच्या अनुवादित कवितेत ज्यांची नावं होती, त्यांच्या मूळ कविता वाचायला लागलो. मग इंग्लिश संदर्भ यायचे. मग ते. मग खांडेकरांचं असेल ‘ययाति’पासून सगळं सगळं. मग मला वाटायचं की हे आपल्याशी…. म्हणजे चर्चा कोणाशी व्हायला लागली, तर पुस्तकांशी व्हायला लागली. आपण जे विचार करतो, ते काहीतरी इथे आहे आणि आपल्या घरच्यांना कळत नाही; पण हे आहे… असं व्हायला लागणं आणि मग मला वाटतं…. अजून टोकदार ज्याला म्हणू ना… असा विचार करायला लागलो. दहावी नापास झाल्यावर खूप कष्टानं मी दहावीतले दोन पेपर सोडवले. गणित आणि इंग्लिश. मग मी अभ्यास करून पास झालो आणि अकरावीत पोलिसात भरती झालो, पण परत माघारी आलो. कारण मला वाटलं की, मला शिकायची आत्ता गोडी लागलीच आणि आता मला शिकता येणार नाही. तो एक मोठा फोर्स होता; नोकरी सोडण्यामागचा आणि मग तिथून पुढे मी खूप वाचायला लागलो. मी कधी हुशार विद्यार्थी नाही राहिलो; पण जेवढी अभ्यासक्रमाला पुस्तकं आहेत ती सगळी मुळातून वाचलेली असायची मी. मग मी ‘ज्ञानेश्वरी’ वाचली. मला आठवतय मी एफ.वाय.लाच ‘ज्ञानेश्वरी’ सगळी वाचली… एक खंड अभ्यासाला होता; पण मी सगळीच वाचली. ‘ज्ञानेश्वरी’तली जी त्यांची प्रतिभा आहे, मला खूप मजा आली. मग तुकाराम, नामदेव, एकनाथ, संत साहित्य, पंत साहित्य, लावणी, फटके आणि पोवाडे ते वाचल्यावर वाटायचं की, याचं अजून वाचायला पाहिजे, असं खूप वाचायला लागलो. मग बी.ए.ला पण वाचलं. मला मार्कस् खूप पडले नाहीत. असे 50%, 52% पडले. मग एम.ए.ला पुण्यात आलो. तर ‘जयकर’ माझं खूप आवडतं ठिकाण होतं. मग आगरकर, फुले… फुले मी एम.ए.च्या पहिल्या वर्षाला वाचले असतील आणि आंबेडकरांबद्दल कधीतरी दहावी बारावीच्या काळात मला कळालं की, आंबेडकर काय होते! तेही असंच काही लोकांकडून. माझा एक मित्र आहे बाळू बनसोडे म्हणून. तर त्याच्या वडिलांकडून मला आंबेडकरांबद्दल खूप कळले. त्याचे वडील शिकलेले होते. काहीतरी आणि पी.डब्ल्यू.डी.मध्ये कामाला होते आणि खूप छान माणूस. खूप प्रेमळ, खूप असा मवाळ आणि ते खूप छान बोलायचे. त्यांच्याकडे बरीच आंबेडकरांची पुस्तकं असायची. त्यावेळेस मला त्याचं काहीच महत्त्व वाटायचं नाही आणि बुद्धांबाबत सांगायचे आणि ते जे बोलायचे त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. मला तेव्हापण वाटायला लागलं की, आंबेडकर खरं आपल्यासाठी काम करणारा माणूस आहे. तोवर आंबेडकर नावाचं प्रकरण मला माहीत नव्हतं. त्यानंतर मी बी.ए.ला असताना आंबेडकरांचं कोणीतरी लिहिलेलं चरित्र वाचायला लागलो आणि आंबेडकरांचं स्वत:चं तर मी आत्ता आत्ता वाचायला लागलो. आता ते मला समजून यायला लागलं. हे सगळं वाचल्यावर मला असं खूप व्हायचं की, आपण खूपच नालायक आहोत आणि हे दहावीत का कोणी वाचायला दिलं नाही? मी आयुष्यातल्या खूप चुका टाळू शकलो असतो. मी खूप छान जगलो असतो. माझी अट्टहासानं मी एक वाट धरली असती. हे सगळं वाचून आणि आत्ताही मला असं वाटतं की, मुलांना लवकर वाचायला द्यावं. दहावीच्या नंतर ना जितकं गंभीर आहे, ते सगळं… मग त्यांना समजो ना समजो…. त्यांच्यासमोर यायला पाहिजे. माझा एक मित्रही एकदा असं म्हटला होता की यार हे खूप आधी मिळालं असतं ना आठवीत तर किती भारी झालं असतं! सहज बोलला आणि मला त्याची जाणीव झाली. मला वाटतं की, फुले, आंबेडकर किंवा इतर विचारवंत हे आठवी-नववीतच वाचायला पाहिजेत. उगाच कुठल्यातरी कविता फुलपाखराच्या वगैरे बंद करून टाकायला पाहिजेत. म्हणजे हे बालपण बळजबरीने लांबवण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून मला शिक्षणाचा कधी-कधी राग येतो खूप. म्हणजे मी शाळेत बालक होतो आणि बाहेर अ‍ॅडल्ट होतो. म्हणजे पाचवी पासनंच मी पोक्त आहे. म्हणजे बाहेर बसायचो, तंबाखू खायचो, सिगरेट ओढायचो आणि शाळेत गेलो की, सर मला परिकथा सांगायचे आणि बाहेर आल्यावर ब्ल्यू फिल्म बघायचो. म्हणजे परी आणि इकडची पोर्न स्टार काहीच संबंधच नाही. आता लक्षात येतं की, मोठा खूप लवकर झालो होतो, म्हणजे सगळ्याच अर्थाने, मला समजत खूप होतं; पण ते सगळं बॅन केलेलं होतं… हे तुमचं ज्ञान तुम्ही सांगू शकत नाही. मी दारू वडिलांना आणून देत होतो खूप लहानपणी. म्हणजे एकदा म्हटलं मी आणतो… म्हणजे मला माहिती आहे. अनेक गोष्टी अशा किंवा मला बर्‍याचदा माझ्या वडिलांनी काम करू दिलं नाही, की तू आत्ता कशाला करतो? मला वाटायचं की, काम करायला पाहिजे लवकर. एक परिस्थिती होती. आई शिव्या घालायची की इतकी चौघं, चौघं आहेत, घरी उपाशी मरायला लागलेत; मग काम तर करा की आणि वडिलांचं असं असायचं. की तुम्ही काम नका करू. असं सगळं जेव्हा बघतोय ना मी. मला तर टाईमपास…. रांग मेंटेन करायची आहे…. म्हणजे तुमचं दुकान आहे आणि तुमच्याकडे ग्राहक खूप आलेत तर तुम्हाला ते मॅनेज करता येत नाही. मग ते रांग लावायला लावतात. मग रांगेचं महत्त्व. हे नंतर प्रकरण सुरू होतं. रांग असणं हेच तुमच्या अव्यवस्थेचं लक्षण आहे आणि ही रांग म्हणजे शैक्षणिक रांग आहेत, असं मला वाटतं. मुलांना दहावी-बारावीनंतर नोकर्‍या द्याव्यात असं बर्‍याचदा वाटतं. इंजिनिअरिंग शिकता तोपर्यंत तुम्ही पंचविशी-तिशीपर्यंत आलेला असता आणि मग तुम्ही काय करणार? तोपर्यंत सगळंच गेलेलं असतं. मला वाटतं की, असं सतराव्या-अठराव्या वर्षी पोरं जर कामं करायला लागली… माझा आता उत्साह…. शारीरिक एनर्जी गेलीय…. मी ज्या काळात ‘पीक’ला होतो, त्या काळात मला काहीच करू दिलं नाही. आता मला लक्षात येतं की, मी खूप चांगला कॅरमचा प्लेअर झालो असतो, बास्केटबॉल चँपियन झाले असतो. अशा कितीतरी गोष्टी मी होऊ शकलो असतो. म्हणून पैलवानकीत कसं असतं की कुठलाही पैलवान विसाव्या वर्षी सगळ्यात चांगला पैलवान होऊ शकतो. पुढं त्याच्या शक्यता कमी होत जातात. मला वाटतं, सगळ्या क्षेत्रात तसं आहे…. आपल्या कल्पना… आपला उत्साह टिकवून धरणं… आपली शिक्षणव्यवस्था लईच विचित्र आहे.

म्हणून मग चळवळीसारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात की जे शिक्षणात मिळत नाही ते इथे मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं?

मला हे सगळे उशिरा भेटले. मी एस.वाय., टी.वाय.ला असताना मला दाभोलकरांचं पुस्तक भेटलं. म्हणजे ही जर परंपरा कळाली आणि हे जर कळालं की, आपल्यासारखा विचार करणारे लोक आहेत. तर तो विचार आणि त्याचा उच्चार करण्यासाठी बळ येतं. आणि मला वाटतं की असे खूप छुपे ‘अंनिस’चे कार्यकर्ते असतील. माझं मत आहे की, ‘अंनिस’ विचार करतं, असा खूप लोक विचार करतात. ते चळवळीत नाहीत. त्यांचं त्यांनी जे आखून घेतलंय जगणं, ते पाळण्यात ते व्यस्त आहेत. पण असा तर हात भेटला, असा जर आवाज आला आजूबाजूनं तर अंधारात कसं वाटावं की, कुणीतरी प्रकाशात असल्याची जाणीव व्हावी, तसं होतं मग हे.

तुमची ही सगळी वाटचाल डोळ्यासमोर ठेवून, तुम्ही ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना काय सांगाल?

मी मागं म्हणालो होतो नं… मी ‘अंनिस’चा बहिःस्थ कार्यकर्ता आहे…. खूप पहिल्यापासून. मी एकटा लढत होतो… मला माहीत नव्हतं की, असं कोणीतरी विचार करतंय. आणि मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत-विचारत, विवेकाची वाट धरत धरत आपापले संदर्भ जोडत मी खूप उशिरा इथे पोहोचलोय. माझी 35 वर्षे गेली याच्यात. मला आत्ता कळायला लागलंय की, हे नीट आहे. आपण म्हणतो ना तसे… हे अनुभवाचे बोल आहेत माझे. अनुभव घेतलाय त्यामुळे अधिकाराने मी हे सांगू शकतो की हे लवकर कळायला पाहिजे. आपण ही वाट धरून सगळ्या गोष्टी करताना प्रश्न विचारलेच पाहिजेत. व्यक्तिगत कोणतीही गोष्ट केली, तरी की काय होणार आहे, याचं नेमकं. प्रश्न चीड आणतात, प्रश्न वैताग आणतात, प्रश्न तुम्हाला इनसेक्युअर करतात; पण प्रश्नांसारखी दुसरी गोष्टच नाही, सुंदर की तुम्ही त्याला जर भिडायला लागलात, सामोरं जायला लागलात तर प्रश्न तुम्हाला एकदम तुमचं खरं स्वरूप दाखवत दाखवत तुम्हाला बळ देतात. आणि जे आपण नाहीये ते उघडं पडायला पण हरकत नाही. प्रश्न हा आरशासारखा आहे खरं म्हणजे. तुम्ही सगळ्यापासून लपला तरी तुम्ही तुमच्या मनातील प्रश्नापासून कसं लपणार? तरुण पोरं, मित्र यांना पण मी बोलतो ना…. तर ते प्रश्न टाळतात. त्यांना काही म्हटलं तर ते तसं असतं म्हणतात. आता हे गावाकडचं उरलेलं उत्तर आहे की हे असंच असतं. तुला काय करायचंय आणि याला काही उत्तरच नाही असू शकत. प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला कळतं आता तुम्ही सोंगच घ्यायचं ठरवलं असेल, तर त्याला काही उत्तर नाही.

मुलाखतकार : मुक्ता दाभोलकर