संपादक महाशय,
अं.नि.वार्तापत्रात फादर वेन्सी डिमेलो यांनी लिहिलेल्या उपरोक्त लेखाला स्थान दिल्याबद्दल मी माझी तीव्र असहमती नोंदवीत आहे. उपरोक्त लेख आणखी कुठे छापू शकेल; परंतु अं.नि.स.च्या वार्तापत्रात स्थान देणे माझ्यासारख्या प्रखर बुद्धिवाद्याला फार मोठी चूक झाल्याचे वाटते. उपरोक्त अंकातील इतर सामग्रीशी सुद्धा तो समन्वित होत नाही.
मुख्य गोष्ट अशी सुद्धा आहे की, ‘मंथन’चे वरील लेखक एक समर्पित धर्मोपदेशक; ईसाई धर्माचे धर्मापदेशक आहेत. धर्मोपदेशकाला स्वत:च्या धर्मातील उणिवा दिसत नाहीत; परंतु अन्य धर्मनिष्ठांना त्या-त्या धर्मात चुकांशिवाय दुसरे काही दिसतच नाही. ‘श्रद्धा’ व ‘विश्वास’ या दोन्हीमधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. श्रद्धा ही फक्त धार्मिक क्षेत्रात कार्यरत असते. ‘श्रद्धावान लभते’ व ‘संदेहात्मा विनश्यीत’ हे त्या क्षेत्रांतील प्रमुख सूत्र आहे. धार्मिक समजल्या जाणार्या गोष्टी-ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या व अशा गोष्टींवर धार्मिक माणूस श्रद्धा ठेवतो. त्या सिद्ध करण्यासाठी पुरावा मागत नाही. ईसाई धर्मात ईश्वर, पवित्र आत्मा (होली घोस्ट) व ईश्वराच्या पुत्राच्या रुपाने ईसा मसीह ही त्रिपुटी (ट्रिनिटी) मान्य आहे. अन्य धर्मियांना उपरोक्त त्रिपुटी मान्य नाही.
उपरोक्त व अशाच इतर धार्मिक श्रद्धांचे विवेचन मी माझ्या ‘Beyond God and Religion’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे मराठी रुपांतरण कोल्हापूरच्या ‘एक्स्प्रेस पब्लिकेशन’ने प्रकाशित केले आहे. जिज्ञासू व्यक्तींनी ते अवश्य वाचावे. माझा असा पक्का विश्वास आहे की, ज्या ठिकाणी मंथन (विचार-विनिमय) असते, तिथे श्रद्धा असू शकत नाही. माझ्या म्हणण्याचे समर्थन करणारी स्वत: ईसाई धर्मातच एक प्रमुख धारणा आहे, ती अशी-
फार आधी, आदिमानवाचे अॅडम व ईव्ह हे जोडपे ईश्वराबरोबरच स्वर्गात ‘गार्डन ऑफ ईडन’मध्ये राहत होते. सगळा काही आनंदीआनंद होता. त्या आदिमानवांना ईश्वराने बुद्धीच्या वृक्षाचे फळ खाण्याची तेवढी मनाई केलेली होती; परंतु त्या आदिमानवांनी ते फळ एकदा खाल्ले, ही गोष्ट ईश्वराला समजली. ईश्वराची उपरोक्त आज्ञा मोडल्याचे जे आदिपाप आदिमानवांनी केले, त्याची शिक्षा म्हणून ईश्वराने आदिमानवांना स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले. या घटनांना म्हणायचे आदिपाप व आदिपतन. ईश्वराची आज्ञा मोडल्याचे आदिपाप मानवांनी प्रायश्चित्त (रिपेण्टस) करून धुऊन काढले पाहिजे. सरतेशेवटी दयाळू ईश्वर मानवांना क्षमा करेल व पुन: स्वत:बरोबर स्वर्गात राहण्याची परवानगी देईल, ही ती श्रद्धा.
पण मग वरील श्रद्धेचा हा अर्थ निघतो की, जिथे मंथन असेल, तिथे श्रद्धा असणे शक्य नाही, बुद्धी व श्रद्धा एकत्र असू शकत नाही. तथापि हेही तितकेच खरे की, आपल्या स्वत:च्या धर्मातील दोष कुणा श्रद्धावान धर्मनिष्ठाला दिसत नाहीत.
मी धर्माला एक संघटित अंधश्रद्धाजाळ समजतो. अशा अर्थाने धर्माला निर्मूलन करण्याच्या दृष्टीने अं.नि.स.च्या वार्तापत्रात स्थान दिले पाहिजे, असे मला वाटते. हे काम पुष्कळदा वार्तापत्राच्या प्रतिनिधींनी विविध धार्मिक ठिकाणी जाऊन त्या-त्या ठिकाणी चालत असलेल्या अंधश्रद्धानिर्मित गोष्टी उघडकीला आणलेल्या आहेत. उदा. हिंदू धर्माचे पंढरपूर व शनिशिंगणापूर, अजमेरचे सूफी केंद्र, प्रजापिता ब्रह्माकुमारींचा अहमदाबाद जवळचा आश्रम, पाटण्याजवळचे जैनांचे सम्मेद शिखर, दक्षिण भारतातील जैनांचा आश्रम वगैरे.
धर्माच्या विरुद्ध माझ्या स्पष्ट विचारांबद्दल क्षमा करावी; परंतु माझ्या बुद्धिवादी निष्ठेशी माझे विचार मला तर्कसंगत वाटतात. असो.
आपला
–प्रा. डी. डी. बंदिष्टे, इंदौर (मध्य प्रदेश)