Categories
कार्याध्यक्षांची डायरी

शेवटी विवेकधर्माचीच प्रस्थापना…

जुलै - २०१६

प्रथमत: राज्य कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे औपचारिक नव्हे, तर मन:पूर्वक मी अभिनंदन करतो. कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांच्या अंगी असलेल्या क्षमता-कौशल्य आणि संघटनेची गरज अशा तिनही अंगांनी विचार करून सहमती समितीने राज्य कार्यकारिणीची घोषणा शहादा येथील विस्तारीत बैठकीत केली. ही राज्यकार्यकारिणी म्हणजे तरुणांना भरपूर संधी आणि अनुभव, सातत्य, बांधिलकी यांचा समतोल अशी राज्यकार्यकारिणी आहे. लोकशाही पद्धतीने ही निवडप्रक्रिया बहुमताने नव्हे, तर एकमताने पार पडली, याचा आनंद आहे. आपले कल्पक नेतृत्त्व शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्याशिवाय ही पहिलीच राज्यकार्यकारिणीची निवडप्रक्रिया होती; पण संघटनेने आपला समंजस, विवेकवादी चेहरा आताही अजिबात हरवू दिला नाही. उलट अधिक समर्थ आणि मजबूत केला, असं माझं निरीक्षण आहे. सलाम सर्व कार्यकर्त्यांना !

संघटनेत गटबाजी नसणे, अतिमहत्त्वाकांक्षा आणि त्यायोगे येणारी स्पर्धा नसणे, ही बाब किती आश्वासक आणि आधार देणारी असते, याचा गेली अनेक वर्षे कार्याध्यक्ष म्हणून मी अनुभव घेत आहे; पण आता ही झाली आपली शिदोरी, या शिदोरीवर आता पुढचा टप्पा आपल्याला गाठावा लागणार आहे. संघटनेने आपली समाजातील उपयुक्तता नेहमीच सिद्ध केली आहे. कालानुरूप विविध उपक्रमांच्याद्वारे समाजाशी सतत संवादी राहून विवेकभान देण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नात कधीही आक्रस्ताळी भूमिका घेतली नाही, म्हणून तर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं प्रसिद्ध वाक्य आपण सातत्याने कोट करीत आलोत, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पंचवीस वर्षांत आपण संघटनेचं काय रूप पाहू इच्छितो? याचा आता नव्या राज्य कार्यकारिणीने विचार करायला हवा, असे वाटते. देशपातळीवर विस्तार की, जगाच्या पाठीवर या विचारांचं संघटन करणारी मार्गदर्शक संस्था की, आणखी काही वेगळं?

मी आताच मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका कार्यक्रमासाठी जाऊन आलो. कबीर जनविकास समूह म्हणून पुरोगामी विचारांचा गट गेली अनेक वर्षे इंदूर परिसरात कार्यरत आहे. डॉ. सुरेश पटेल हे एक ध्येयवेडे गृहस्थ याचं संचलन करतात. एक चांगला गट तरुणांसह त्यांनी उभा केलाय. त्यांची मागणी आहे की, मध्य प्रदेशात अंनिसचं काम सुरू व्हावं, डाकीण प्रश्नांवरील देशव्यापी चर्चासत्रात मी सहभागी होण्यासाठी राजस्थानात अजमेरला गेलो होतो, तेथे आपल्याला प्रचंड मागणी आहे, आपले कार्यकर्ते गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली मध्यप्रदेश इतकी राज्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरले. त्यांचाही अनुभव या विस्ताराला अनुकूल असाच आहे आणि या क्षेत्रातील संघटना आणि विचार दोन्ही पातळीवरील आपली तज्ज्ञता एकमेव आहे, आत्मस्तुतीचा धोका पत्करत मी हे विधान करतोय, तेव्हा आपण पुढील पंचवीस वर्षांत स्वत:ला कुठे पाहू इच्छितो, याचा आपण सर्वांनी आताच विचार करायला हवा, वाचकांनीही यात सहभागी व्हावे, असे मी आवाहन करीत आहे.

सध्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला गती आलीय. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मा. उच्च न्यायालयाचे मी आभार मानतो आणि सध्यातरी कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करणार्‍या तपासयंत्रणांनाही मी धन्यवाद देतो. अखेर सर्वच कार्यकर्त्यांची शंका खरी ठरली. सनातनचे साधकच संशयीत म्हणून सध्या पकडले गेले आहेत. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सनातनचा संबंध सिद्ध होतोय. हा तपास थोडा अधिक गतिमान आणि योग्य दिशेने व निर्भयतेने असाच पुढे गेल्यास तपासयंत्रणा थेट मूळापर्यंत पोचू शकतात आणि आज आम्ही नाही त्यातले म्हणणारे उघडे पडतील. आजही आपण आपला तोल ढळू दिला नाही. ही भूमिका काही सहकार्‍यांना भित्री अथवा मिळमिळीत वाटते; पण आपण ज्या संयमाने आणि सातत्याने तपासाचा विषय लावून धरला, त्यामुळेच हे शक्य झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत याचे महत्त्व कमी लेखून कसं चालेल? सनदशीर मार्गाने तुमची मागणी रेटत राहणे आणि ती मान्य करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीला मजबूत करणारी गोष्ट आहे, ती आपण घडवली आहे. लोकशाहीचे मूल्य म्हणून आपण या भूमिकेकडे बघीतल्यास त्याचे मोल आपल्याला नक्की कळेल.

सनातन आजही आपला आक्रस्ताळेपणा माध्यमांतून पुढे आणित आहे. समाजाला आता गुन्हेगार समजले आहेत, असे माझे निरीक्षण आहे. विवेकाचे भान सतत सजगतेनं बाळगत पुढे चालत राहण्याचं व्रत आपण स्वीकारत आहोत. विवेकधर्माच्या मारेकर्‍यांचं आव्हान अनेकदा सुजाण लोकांनी टोलवून लावलंय. इतिहासात थोडं जरी डोकावलं, तरी याची अनेक उदाहरणे देता येतील. याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार, शेवटी विवेकाचाच जय होणार, विवेकधर्माचीच प्रस्थापना होणार यात शंका नाही.

– अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष)

संपर्क: 9422790610