ब्लड कॅन्सर सारखा जिवघेणा आजार ही अमावस्येपुर्वीच विधी करुन 8 दिवसात बरा करतो असे सांगणार्या 2 भोंदु ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पेण शाखेतर्फे रचलेल्या सापळयामुळे पेण पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
पेणमध्ये सिद्धी विनायक ज्योतीष नावाने पंडित राजन स्वामी यांच्या मार्फत महाविर प्रसाद, व योगेद्र जोशी हयांनी 101 टक्के लिखत गॅरेंटीने सगळे आजार, धनप्राप्ती, विवाह समस्या, पुत्रप्राप्ती, करणार अशा दाव्याची प्रसिद्धी पत्रके पेण शहरात वाटली होती. त्यानुसार समस्याग्रंस्तांनी फोन केल्यावर सर्व आजार व समस्या सोडविण्यासाठी काही विधी करावा लागेल असे सांगुन रुपयांची मागणी केली जात असे. याची खबर महाराष्ट्र अंनिस पेण शाखेच्या कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी सापळा रचला. यानुसार कार्यकर्ते संदेश गायकवाड यांनी स्वत:ला ब्लड कॅन्सर झाला असल्याचे सांगुन ज्योतीषाकडे गेले. यावर येत्या नवरात्रीतच आजार बरा होईल असे लिखित देवुन रुपये 7200 ची मागणी केली. अंनिसचे कार्यकर्ता संदेश गायकवाड व पोलीसांनी या ज्योतिषाच्या दरबारावर धाड टाकून त्यांना अटक केली. या कारवाईत पेण अंनिसचे कार्यकर्ते अध्यक्ष एस.आर.कान्हेकर, कार्याध्यक्ष मिना मोरे, सावनी गोडबोले, हेमंत म्हात्रे, सनय मोरे व संदेश गायकवाड यांच्यासमवेत पेण पोलीस स्टेशनचे महिला पोलिस उपनिरिक्षक भडकमकर यांचे समवेत पो.हे.कॉ.दगडे, व पो.हे.कॉ.झिराडकर यांचा सहभाग होता.
– कमलेश ठाकूर, पेण, जि. रायगड