“नेत्याचा खून पाडला. अनुयायी घाबरले… संघटना आणि पक्ष सोडून पळत सुटले… निषेध सभेत रिकाम्या खुर्च्या…. निषेध मोर्चात बावटा घ्यायला माणूस नाही…. वर्षाच्या आत ऑफिसला कुलूप लावावे लागले…. आता त्या पक्षात आणि संघटनेत कोणीच नाही….” असं काही सांगता येईल. “मुर्गी मरे, बच्चे दाणादाण” अशी परिस्थिती निर्माण करता येईल, अशा अपेक्षेने डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे आणि नंतर डॉ.कलबुर्गी यांचे सनातन्यांनी खून पाडले.
पण झाले भलतेच! अनुयायी पळत सुटण्याऐवजी ताठ उभे राहिले. काठावर असणारे कामात आले, पूर्वी कधी न मिळवलेले यश त्यांनी पदरात पाडून घेतले. गेल्या दोन वर्षांचा हा लेखाजोखा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आता बासनात गुंडाळून ठेवायचा, असे मनात मांडे खाणार्या ‘भोंदू बचाव समिती’ला हात चोळत बसावे लागले. कॉ.पानसरेंच्या खुनानंतर कोल्हापूर तीन दिवस उत्स्फूर्त बंद राहिले. वर्षभरात मोर्चे, आंदोलने, निषेधसभा, परिसंवाद, परिषदा, निदर्शने, शाहिरी कार्यक्रम, पुस्तक विक्री, व्याख्याने, पथनाट्ये, अर्धनग्न मोर्चा, निर्भय मॉर्निंग वॉक असे एकापेक्षा एक उपक्रम सुरू राहिले. त्यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. व्याख्यानासाठी सभागृहात खुर्च्या अपुर्या पडल्या. या सर्वांवर कळस चढवला तो 16 ते 20 फेबु्रवारी या पाच दिवसांच्या कार्यक्रमांनी.
16 फेबु्रवारी 2015 रोजी कॉ.गोविंद पानसरेंच्यावर खुन्यांनी भ्याड हल्ला केला. 20 फेबु्रवारी रोजी त्यांचे निधन झाले. 16 फेबु्रवारी 2016 रोजी या घटनेला वर्ष झाले. म्हणून याच काळात प्रबोधनाचा जागर करण्याचे ठरले. ‘शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समिती’ या बॅनरखाली स्मृतिदिन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाणी पक्ष(लेनिनवादी) श्रमिक मुक्तीदल(लोकशाहीवादी), महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जनस्वास्थ्य दक्षता समिती; याशिवाय राजकीय पक्षांच्या महिला, युवक, विद्यार्थी, कामगार संघटना वेगळ्याच! या कालावधीत विविध उपक्रम झाले, ते पुढीलप्रमाणे.
आंतरजातीय विवाह :- ‘अंनिस’तर्फे महाराष्ट्रामध्ये लातूर व कोल्हापूर या दोन ठिकाणी गेली दहा वर्षे आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्रे चालवली जातात. कोल्हापूरच्या केंद्राला कॉ.पानसरेंचा मोठा आधार होता. या कार्यात पानसरेंचा कृतिशील सहभाग होता. घरापासून सुरुवात करून त्यांनी विवाहातील अनेक अडचणी सोडवल्या होत्या. त्याची आठवण म्हणून दि.16 रोजी दु.4 वाजता कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफीसवर कोल्हापूरचे ज्ञानदेव कृष्णात जाधव आणि नागपूरच्या रूपाली खोब्रागडे यांचा आंतरजातीय विवाह संपन्न झाला. नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर अश्विनी रामाणे आणि गारगोटीचे ज्येष्ठ कार्यकर्तेकॉ.दत्ता मोरे उपस्थित राहिले. महापौरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांचा केलेला पुरस्कार आणि स्वत:च्या चुलत बहिणीचा लावून दिलेला आंतरजातीय विवाह यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
पानसरेंबद्दलचा आदर आणि चळवळीचा दबाव यामुळे महापालिकेने एका शाळेस कॉ.पानसरेंचे नाव दिले आणि पानसरेंच्या स्मारकासाठी जागा दिली. महापौरांनी आपल्या भाषणात या वर्षामध्ये आपण पानसरेंचे स्मारक पूर्ण करणार असून लवकरच समितीची बैठक बोलावत असल्याचे जाहीर केले.
रिंगणनाट्य: ‘आम्ही दाभोलकर, आम्ही पानसरे’ या पथनाट्याचा आता जन्म झाला असून, त्याचे पाच प्रयोगही सादर झाले. प्रत्येक प्रयोगाने गर्दी खेचलीच आणि काही दुरुस्त्याही सुचवल्या. पथनाट्यामध्ये स्वाती कोरे, अक्षय जाधव, संघसेन जगतकर, कपील मुळे, निशांत शिंदे, प्रमोद शिंदे, जोतिराम शिंदे इ.कलाकार कार्य करत आहेत.
चित्रपट : यानिमित्ताने जगप्रसिद्ध कलाकार चार्ली चाप्लिन यांचे ‘द ग्रेट डिक्टेटर आणि मॉडर्न टाईम्स’ हे हुकुमशाही आणि भांडवलशाहीमधील माणसांचे यांत्रिकीकरण यावर भाष्य करणारे चित्रपट आयोजित करण्यात आले. हे कार्य करून चित्रपट महामंडळाने आपला सहभाग नोंदवला.
‘अंनिस’तर्फे मॉर्निंग वॉक :- दि.20 फेबु्रवारी रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांनीं प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या रूईकर कॉलनीमधील घरापासून कॉ.पानसरे यांच्या घरापर्यंत मॉर्निंग वॉक करून आदरांजली वाहिली. सुरुवात करताना एन.डीं.नी हा मॉर्निंग वॉक नसून ‘लाँगमार्च’ आहे आणि तो समतेचे उद्दिष्ट गाठेपर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर केले, तर समारोप प्रसंगी उमा पानसरे यांनी आपण गोळ्यांना भिऊन काम बंद करत नसल्याचे सांगून उत्साह निर्माण केला. ‘मॉर्निंग वॉक’मध्ये राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माधव बावगे, सुनील स्वामी, सीमा पाटील, कृष्णात कोरे, विनायक सावळे, सुजाता म्हेत्रे, प्रशांत पोतदार, उमेश सूर्यवंशी, रमेश वडणगेकर, दत्ता घुटुगडे, मिलिंद देशमुख, गीता हासूरकर आदींनी सहभाग घेतला.
जाहीर व्याख्यान :- दसरा चौकामधील खुल्या पटांगणावर प्रचंड गर्दीमध्ये सायंकाळी अमरजीत कौर आणि सीताराम येचुरी यांचे जाहीर व्याख्यान झाले. सुरुवातीला विविध पक्षातर्फे पक्षप्रवक्त्यांची भाषणे झाली. कम्युनिस्ट नेते कॉ.उदय नारकर, जनता दलाचे शिवाजीराव परूळेकर, श्रमिक मुक्ती दलाचे गौतम कांबळे, भारिप – बहुजन संघाचे प्रशांत वाघमारे, लाल निशाण गटाचे अतुल दिघे, ‘अंनिस’चे अविनाश पाटील, शे.का.प.चे दिलीप पवार आदी मान्यवरांची भाषणे झाली.
अविनाश पाटील (महाराष्ट्र अंनिस कार्याध्यक्ष) :- कॉ.पानसरे सर्व कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहात, विचारपूस करत, धोक्यांबद्दल सूचित करत. शत्रू-मित्र विवेक कसा करावा, हे सांगत म्हणून त्यांचा खून केला आहे. संघ परिवाराच्या विरोधात संविधान परिवार वृद्धिंगत केला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त आपण पुन्हा संविधान समजून घ्यावे; कृतिशील करावे. समताधिष्ठीत लोकशाहीच देशाला पुढे नेऊ शकते. त्यातूनच खरा खरा राष्ट्रवाद काय? खरी राष्ट्रभक्ती कोणती? हे समाजाला समजेल. ‘अंनिस’ त्या कामात अग्रभागी राहणार आहे.
अमरजीत कौर (भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) :- आज संविधानाची शपथ घेऊन खुर्चीवर बसलेले सत्ताधारी हिंदू राज्याची मागणी करत आहेत. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार यांच्यावर हल्ले चढवत आहेत. विरोधकांचे खून पाडत आहेत आणि त्यांचे मंत्री-संत्री गप्प बसताहेत. आम्ही भाजपवर बंदी आणा म्हणत नाही. कारण विचारांची लढाई विचाराने करायची असते. वर्णवर्चस्वाविरोधी ही लढाई फार पूर्वीपासून सुरू आहे. भक्तिसंप्रदाय, सुफीसंप्रदाय, कबीर, सूरदास यांनी विचारांचा जागर केला.
सिताराम येचुरी (राष्ट्रीय सरचिटणीस मा.क.प.):-
रूढीवादाच्या विरोधी नवभारत निर्माण करण्याचे काम दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी करत होते. तेच खरे भारताचे त्रिमूर्ती आहेत.
नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचे काम सुरू आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या जागी हिंदूराज्य आणि हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ब्रिटीश काळात राणीच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल ज्या कायद्याने भगतसिंगांना फाशी दिले गेले, त्याच कायद्याखाली आज कन्हैय्याला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
आर.एस.एस.ला शिक्षणव्यवस्थेवर ताबा हवा आहे. त्यासाठी एफ.टी.आय.आय., हैदराबाद विद्यापीठ, जे.एन.यू., बंगालमधील विद्यापीठ यावर हल्ले सुरू आहेत. ताबा आल्यावर ते इतिहासाऐवजी पुराण शिकवणार आहेत. हत्तीचे डोके माणसाला शिवण्याची प्लॅस्टिक सर्जरी भारतात होती त्याचे उदाहरण गणेश आहे, कर्णाचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला असले बाष्कळ दावे मोदींनी या पूर्वीच केले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात तीन विचारधारा होत्या. पहिली काँग्रेसची ज्यांनी स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष घटना तयार केली. दुसरी डाव्यांची ज्यांना धर्मनिरपेक्षतेबरोबरच आर्थिक समानता हवी आहे, समाजवाद आणायचा आहे. तिसरी विचारधारा दोन्हीच्या विरोधातील धर्मांवर आधारित राष्ट्रनिर्मिती करणारी. हे दोन जुळे भाऊ आहेत एक हिंदू राष्ट्रवाले, दुसरे मुस्लिम राष्ट्रवाले.
राष्ट्रीय भावनेचा दुरुपयोग करून देशद्रोही म्हणून निरपराध्यांना अडकवण्यात येत आहे. साहित्यिकांना पुढचे दिसते; म्हणून त्यांनी वर्षभरात पुरस्कार परत केले. अशी परिस्थिती असली तरी शेवटी जिंकणार आपणच आहोत. नवभारत घडवणार आहोत.
प्रा.एन.डी.पाटील (अध्यक्ष, म.अं.नि.स.):-
आज दोन अरिष्टे आहेत. पहिले अर्थव्यवस्थेचे. देशात गेल्या वीस वर्षांत तीन लाखापेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. दुसरे अरिष्ट आहे सामाजिक. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना टिकवायची की नाही? करोडो मतदारांनी निवडून दिलेल्या संसदेचे राज्य चालवायचे की, मूठभर धर्ममार्तंडांची धर्मसंसद राज्य करणार? या परिस्थितीत लोकांनी निर्भय बनले पाहिजे. प्रबोधनाच्या सभा सतत घेतल्या पाहिजेत. दाभोलकर, पानसरेंनी हे प्रबोधनाचे काम सुरू ठेवले. त्या रागातून त्यांचा खून करण्यात आला. त्यांनी नवीन माणूस घडविण्याचे कार्य केले. त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक लिहून बाबासाहेब पुरंदरेंच्या तुरुंगातून शिवाजी महाराजांची सुटका केली.
1902 साली राजर्षी शाहूंनी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या. बडोद्यात लग्नाला जाताना एक रेल्वे भरून त्यांनी वर्हाडी म्हणून मेंढपाळ, मांग, गारूडी, माकडवाले सोबत नेले. पानसरेंनी याच वर्हाड्यांसाठी कार्य केले. राजर्षी शाहूंनी हे कार्य पुढे केले. आपण पानसरेंचे कार्य पुढे नेऊ या!
-अनिल चव्हाण
लेखक संपर्क : 9764147483