बुवा सामान्यांना गंडा दोरा आणि मुख्यमंत्र्यांच्या सौ.ना मात्र सोन्याची साखळी देतात. या बुवांनी सगळ्यांनाच सोन्याच्या साखळ्या वाटल्या तर किती बरं होईल! खरंतर मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेत लक्ष घालायला पाहिजे. या भावना व्यक्त करणारी कवी/वक्ते जगदीश ओहोळ यांची परखड कविता.
‘सोन्याची साखळी’
जिवाला आमच्या काळजी आहे
पिण्याच्या पाण्याची
मुख्यमंत्री साहेब
आम्हाला बी मिळंल का?
साखळी ती सोन्याची..॥1॥
आम्हाला बी आवड आहे
तुमच्या सारखं गाण्याची
पण आमचा ’घसा कोरडा’
ही दुसरी बाजू नाण्याची
मुख्यमंत्री साहेब
आम्हाला बी मिळंल का?
साखळी ती सोन्याची..॥2॥
आमच्या बी मायला नटावं वाटतं
सोनं नाणं भेटावं वाटतं
पांडुरंगाचं थेट दर्शन घ्यावं वाटतं
पण दुष्काळानं दशा झालीय
जगाचं पोट भरणार्या राणीची
मुख्यमंत्री साहेब
आम्हाला बी मिळंल का?
साखळी ती सोन्याची..॥3॥
साखळी देणार्या बाबाला
मुठीतून साखळी काढण्यापेक्षा
थोडं ‘पाणी’ काढ म्हणा
तहानलेल्या मराठवाड्यात
स्वत: जाऊन वाढ म्हणा
तुमच्या हाती साखळी
आणि आमच्या हाती फास
ही गोष्ट या जमान्याची
मुख्यमंत्री साहेब
आम्हाला बी मिळंल का?
साखळी ती सोन्याची..॥4॥
कवी – जगदीश अ. ओहोळ, पुणे
मो.- 9921858801