Categories
भानामती

भानामती म्हणजे ‘मन्चाऊसन सिन्ड्रोम हा मानसिक आजार

मार्च - २०१९

मन्चाऊसन सिन्ड्रोम हा एक मानसिक विकार असून, या आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वत:ला शारीरिक अथवा मानसिक आजाराची लक्षणे असल्याचा आभास तयार करून असे वागतात की, जेणेकरून त्यांना गंभीर स्वरुपाचा आजार असल्याचा इतरांचा समज व्हावा; मात्र प्रत्यक्षात ही लक्षणे किंवा परिस्थिती त्यांनी स्वत: कृत्रिमरित्या तयार केलेली असते.

या विकाराचे नाव 18 व्या शतकातील जर्मन अधिकारी बेरोन वॉ मन्चाऊसेन या व्यक्तीवरून पडले. हा अधिकारी स्वत:बद्दलचे अतिशय मनोरंजक, अविश्वसनीय; पण खोटे किस्से सांगून इतरांची वाहवा मिळवायचा.

या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा हेतू हा आजारपणाचे सोंग घेऊन सुट्टी घेणे अथवा इतर भौतिक लाभ मिळविणे हा नसून आजारपणामुळे इतरांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेणे, इतरांची मानसिक सहानुभूती मिळविणे हा असतो.

लक्षणे :

1. शारीरिक लक्षणे शारीरिक दुखणी, कोणत्याही जखमेशिवाय रक्तस्त्राव होणे, शरीरावर जखमा करून घेणे.

2. मानसिक विविध आजारांचे भास होत असल्याचे सांगणे, न घडलेल्या घटनांचे वर्णन करून सांगणे.

3. आई/पालक हे मुलाला उपचार देऊनसुद्धा तब्येतीमध्ये फरक न पडणे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये दोष नाही; पण पेशंटबद्दलच्या आईच्या/पालकाच्या तक्रारी सांगण्यामध्ये मात्र खंड पडत नाही.

शारीरिक आजाराचा आभास निर्माण करून असे रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत फिरत राहतात. अगदी शस्त्रक्रिया करून घेण्यापर्यंत सुद्धा यांची मजल जाते; तसेच लघवी व रक्ताच्या सॅम्पलमध्ये भेसळ करून प्रयोगशाळेतून स्वत:चे चुकीचे रिपोर्ट्ससुद्धा निर्माण करू शकतात.

मन्चाऊसन सिन्ड्रोम बाय प्रॉक्सी

(Manchausan syndrome by proxy) :

या प्रकारामध्ये आजारग्रस्त व्यक्ती आपल्या घरातील लहान मुलाला अथवा वयोवृद्ध व्यक्तीला काहीतरी आजार झाल्याचा अथवा मुलासोबत काहीतरी चमत्कारिक घटना घडत असल्याचा आभास निर्माण करते. सहसा भावनिक समस्याग्रस्त स्त्रिया अशा आजाराला बळी पडतात. त्यामुळे आजारग्रस्त व्यक्तीच्या घरातील लहान मुलांचे शारीरिक शोषण होण्याचा धोका निर्माण होतो.

उदा.

1) आई बाळाला वारंवार अ‍ॅडमिट (इमर्जन्सी) घेऊन येते. फीट आली होती/मूल अचानक गप्प झाले होते अशी कारणे सांगत ती वारंवार बाळाला आणत असते. बाळाला उपचारासाठी अ‍ॅडमिट करा, असा आग्रह करते. औषधोपचारांचा बाळावर काय परिणाम याची तिला पर्वा नसते; परंतु सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा तिचा उद्देश तिला यात साधायचा असतो. त्यातच तिचे समाधान असते; किंबहुना तीच भावनिक व मानसिक गरज असते.

2) अतिशय काळजी आहे, असे दाखवितात. बाळाला अजिबात एकटे सोडतच नाहीत. जर अशी आई/पालक रुग्णापासून दूर गेला, तर तो रुग्ण/बाळ बरे झालेले दिसून येते.

3) बाळाला मुद्दामहून आई जास्त प्रमाणात औषध पाजते व त्याचे दुष्परिणाम (उलटी….) होऊ लागले म्हणून त्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यास घेऊन येते. (वारंवार अशा घटना घडतात).

4) बाळाला संडासला लागले आहे, असे सांगते.

5) बाळाला लाल रंग लावून इजा झाली आहे, असे भासविते. सांगली अंनिसकडे आलेल्या केसमध्ये अशी लक्षणे दिसून आली होती.

6) डॉक्टरांनी तपासण्या करून बाळाला काहीही गंभीर आजार झाला नाहीये, असे सांगितले, तर ती डॉक्टरांवर तुम्ही नीट तपासण्या करीत नाही, दुर्लक्ष करताय, निष्काळजीपणा करताय असे आरोप करू लागते किंवा दुसर्‍या डॉक्टरांकडे जाते. जोपर्यंत तिला असा दवाखाना मिळत नाही की, ज्या दवाखान्यात तिच्या म्हणण्यानुसार उपचार केला जाईल, अ‍ॅडमिट केले जाईल. तोपर्यंत ती दवाखाने/डॉक्टर फिरत व फिरवत राहते. यातूनच ते कुटुंब भोंदू बाबा, मांत्रिक यांच्या सापळ्यात अडकतात.

7) आई बाळ – यांच्याशिवाय वयोवृद्धांची आजार्‍याची काळजी घेणारी एखादी व्यक्तीही असे वागते व लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करते.

कारणे : हा मानसिक विकार असून व्यक्तीच्या पूर्वायुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी उदा. शारीरिक किंवा मानसिक शोषण, सततचे आजारपण, प्रेम अथवा आपलेपणाचा अभाव इत्यादी कारणांमुळे निर्माण झालेल्या भावनिक गुंतागुंतीमुळे असे आजार होण्याचा संभव असतो. आजाराचा अथवा काहीतरी अघोरी चमत्कारी शक्तीमुळे होणार्‍या घटनांचा आभास निर्माण करून आजारी व्यक्ती स्वत:विषयी सहानुभूती, दिलासा व आपलेपणा इतरांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करते. इतरांचे लक्ष वेधून घेणे हा आजाराचा उद्देश असून, सतत आजारपणाच्या छायेत असल्यासारखे भासवण्यात या व्यक्तींना मानसिक सुख मिळते.

उपचार : आपल्याला अशा घटनांचा संशय आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे व वेळीच उपचार करून पुढील हानी टाळणे गरजेचे असते. चिकित्सक मनाने परिस्थितीचा अभ्यास करून आजारग्रस्त व्यक्ती ओळखणे हे आव्हानात्मक असते. कारण आजारग्रस्त व्यक्ती परिस्थिती व घटनांमध्ये हेराफेरी करून वास्तवापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. अशा रुग्णांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून व्यक्तीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करून गरज असल्यास औषधाच्या उपचाराने रुग्णास बरे करता येते.

डॉ. राजकिरण साळुंखे, डॉ. आनंद अनुसे

(मनोविकारतज्ज्ञ, सांगली)