सांगली अंनिसने एका विचित्र भानामतीची केस सोडवली. एका तीन वर्षांच्या बालकाच्या अंगावर अचानक चटणी पावडर पडायची, बालकाच्या ढुंगणाला चटणीचा लेप लागायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. दारात हळद-कूंकू, लिंबू-मिरची, करणीची परडी, मुलाच्या कपड्याची बाहुली पडायची. बाहुलीवर सुई टोचून मुलाचा व आई-वडिलांचा फोटो लावलेला होता. त्या मुलाच्या आईच्या हातावर मागील आठवड्यात अचानक ओरखडे उठले होते. हा सर्व प्रकार गेली दीड वर्षे सुरू होता. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. देव-देवर्षी झाले. संकेश्वरच्या बुवाने ही भानामती काढण्यासाठी मोठी दक्षिणा वसूल केली.पण काहीच फरक पडला नाही. हजारो रुपये पाण्यात गेले; पण असे विचित्र प्रकार थांबत नव्हते.त्या कुटुंबांच्या एका पाहुण्यांनी अंनिसला भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेवटी त्यांनी सांगली अंनिसशी संपर्क साधला.
अंनिसने या भानामतीचा शोध घेण्याचा निश्चय केला. अंनिसचे प्रा.प.रा.आर्डे, डॉ.संजय निटवे, राहुल थोरात, शशिकांत सुतार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजकिरण साळुंखे यांनी त्या कुटुंबीयांच्या सदस्यांची एकत्र बैठक घेतली. तसेच या घटनाक्रमाबाबत प्रत्येक सदस्याशी वेगवेगळे बोललो. त्यांच्याकडून घेतलेल्या घटनाक्रमावरून अंनिसला त्याच कुटुंबातील एक संशयित व्यक्ती सापडली, जी संबंधित मुलाची मनोविकारपीडित आई होती. तिच्याकडून हे सर्व घडवले जात होते. त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजकिरण साळुंखेनी मोफत औषधोचार सुरू केले. त्या व्यक्तीला योग्य समज दिली गेली. तेव्हा ही अघोरी भानामती बंद झाली. अशा प्रकारे अंनिसने या पीडित कुटुंबांची अघोरी अंधश्रद्धेतून मुक्तता केली. याकामी अंनिसचे कार्यकर्ते चंद्रकांत वंजाळे, आशा धनाले, त्रिशला शहा, अण्णा गेजगे यांची मदत झाली.