– महाश्वेतादेवी
प्रख्यात कार्यकर्त्या – लेखिका महाश्वेतादेवी यांचे या वर्षी 28 जुलै 2016 रोजी निधन झाले.
अनुवादक विलास गिते यांनी महाश्वेतादेवींच्या कथांचा अनुवाद केला आहे. महाश्वेतादेवींशी भेट झाली असता ‘आपली, आपण लिहिलेली सर्वांत आवडती कथा कोणती?’ हा प्रश्न त्यांनी महाश्वेतादेवी यांना विचारला होता. यावर महाश्वेतादेवी उत्तरल्या होत्या, ‘माझ्या कथांपैकी माझी सर्वांत आवडती कथा म्हणजे ‘मौल अधिकार ओ भिखारी दुसाद.’
त्याच कथेचा विलास गिते यांनी बंगालीवरून केलेला मराठी अनुवाद ‘मूलभूत हक्क आणि भिकारी दोसाध’
ते ठिकाण नवागडच्या सीमेवर आणि बस रस्त्यावर आहे. नवागड हे संस्थान किंवा मोठी जमीनदारी होती. जमीनदाराला ‘राजा’ ही पदवी होती. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा राजेसाहेब एक वर्ष वयाचे होते. तरीही ते ‘राजेसाहेब’ म्हणूनच ओळखले जात. जमीनदारी हातून गेली, तरी राजेसाहेबांचं काहीही नुकसान झालं नाही. संस्थानं विलीन करताना बरीच जमीन त्यांनी तेव्हाच्या प्रचलित नियमांनुसार पाचशे देवदेवतांच्या नावे राखून ठेवली होती. तरीही राजेसाहेबांवर प्रचंड अन्याय झाला. राज्य सरकारनं पाप केलं. बस-रस्ता आणि लोहमार्ग बांधण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ती राखून ठेवलेली जमीन ताब्यात घेतली.
हे सगळं राजेसाहेब किशोरवयाचे असतानाच घडलं. राजमाता आणि त्यांच्या अनुयायांना या अत्याचारामुळे खूप दु:ख झालं. त्यानंतर तिकडे रांची आणि पाटणा इथं वकिलांचा सल्ला घेणं आणि इकडे राजेसाहेबांच्या गुजराणीची व्यवस्था पाहणं, ही कामं एकाच वेळी चालू होती. जंगलतोडीची ठेकेदारी, लाकडं कापण्याचा कारखाना आणि लॉरी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पक्का झाल्यावर सरकारला प्रतिकार सुरू झाला.
सहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर हे झालं. आज नवागडमध्ये अगदी आनंदाचं वातावरण होतं. राजमाता ट्रान्सपोर्टच्या शंभर लॉरीचालकांना सुट्टी होती. ‘शूरनिवास’ या राजेसाहेबांच्या महालातून तोहरीची कचेरी आणि टाहाडचं शिवमंदिर अशा ठिकाणी रंगीत कागदांनी झाकलेली मिष्ठान्नांची ताटं भेट म्हणून पाठविली जात होती.
खूप दिवसांनंतर नवागडमध्ये सर्वांनाच जणू खूप मोकळं-मोकळं, स्वच्छंद वाटत होतं. राजेसाहेबांनी प्रजेसाठी फर्मान काढलं होतं – ‘आनंद साजरा करा, आपापल्या खर्चाने घरोघरी रोषणाई करा.’ तसं जरी झालं नाही, तरी सगळ्यांना जणू हलकं-हलकं वाटत होतं.
दहा महिन्यांपूर्वी राजेसाहेबांची जमीन कसणार्या बटाईदारांमध्ये प्रचंड प्रक्षोभ दिसून आला होता. असं गेली आठ वर्षे सतत चाललं होतं. पोलीस इथं कधीच वेळेवर येत नसत. आधी राजाचे लोक बटाईदारांना मारीत आणि त्यानंतर पोलीस येत. बटाईदारांमधले जे लोक गद्दार आहेत, असं त्यांना वाटे, त्या लोकांना पोलीस अटक करून नेत.
असं होतच होतं. असं चालणारच होतं. नवागडची माती जितकी पुराणी, तितक्याच या घटनाही पुराण्या.
दरवर्षी बटाईदारांची संख्या वाढत होती आणि आपल्या वाट्याबद्दलची त्यांची जाणीवही वाढत होती. कुणीतरी तिसरीच शक्ती यामागे आहे, असा पोलिसांचा संशय होता.
ही तिसरी शक्तीसुद्धा एका पक्षात एकत्रित नव्हती. कुणी होते कम्युनिस्ट, कुणी होते आदिवासी-हितरक्षक, कुणी होते अतिरेकी-लेकीन सभी साले गरीब किसानों की मदद करते है….
म्हणूनच यावेळी जरा गडबड वाटत होती. तीन महिन्यांपूर्वी बटाईदारांनी जे आंदोलन केलं होतं, त्यात त्यांनी एक कापडी फलक रंगवून, तो दोन्ही बाजूंना दोन बांबूंना बांधून आणला होता. त्या फलकावर लिहिलं होतं, ‘मेहनत की फसल के आधे हिस्सेपर हम लोगोंका मौल अधिकार है।’ (मेहनतीच्या पिकातील अर्ध्या वाट्यावर आम्हा लोकांचा मूलभूत हक्क आहे.)
हा मजकूर फारच संतापजनक होता. राजेसाहेबांचे भागीदार आणि त्यांनी केलेल्या श्रमांतून आलेल्या पिकाच्या अर्ध्या भागावर त्यांनी आपला हक्क सांगावा, हे काही ठीक नाही आणि त्यांच्यापैकी लिहिता कुणाला येतंय? लिहून कुणी दिला हा मजकूर?
आपली फसवणूक झालीय, असं राजेसाहेबांना तीव्रपणे वाटलं. अन्याय, अन्याय! राजेसाहेबच बिचारे शोषित होते. अत्याचार, अन्याय त्यांच्यावरच झाला होता. सरकारने त्यांच्याच जमिनीवर बसरस्ता आणि लोहमार्ग बांधला होता. आता त्याच रस्त्यांवरून ‘राजमाता ट्रान्सपोर्ट’च्या लॉर्या धावत होत्या आणि रेल्वे वॅगन्स. राजेसाहेबांच्या लाकूड कापायच्या कारखान्यातून फळ्या वाहून नेत होत्या, हा गौण भाग झाला. या अत्याचाराचा प्रतिकार करायचा सोडून बटाईदारांनी हा काय नवीन अत्याचार सुरू केलाय? सरकारी नियमाप्रमाणे पिकांमधला वाटा पाहिजे – हे काय?
यावेळी बटाईदारांनी राजेसाहेबांच्या माणसांना पीक कापू दिलं नाही. म्हणाले, ‘मारा बेट्यांना!’ मारून मारून त्यांनी मथुरासिंहला जखमी केलं. चंदनमलची बंदूक हिसकावून घेतली. बंदूक खुद्द राजेसाहेबांनीच चालवावी. ते एकत्र मिळून मरतील.
हे असंच होत असतं. नवागडची माती जितकी पुराणी, तितक्याच या घटनाही पुराण्या. नातवाला झोप लागावी म्हणून एखादी आजी परिकथा सांगण्याच्या सुरात त्याला सांगते, ‘उसके बाद आए राजासाहब। बोले, क्यो दुखिया, क्या गडबड है? फसल दिया करो और सिपाहियोंको जानेको बोलो। उसके बाद चलायी राजासाहबने गोली। मार दिया तेरे नाना को। फट गया कलेजा और खून निकला-जैसे भादोमें गंगाजी पानी में पानी…’
हे असंच होत असतं. श्रीमंत जमीनमालक आणि गरीब शेतकरी, शेतमजूर, बटाईदार यांची गोष्ट अशीच असते. ही कहाणी कुणीही बदलू शकत नाही.
पण यावेळी मात्र प्रचार वेगळाच होता. बटाईदार मारता-मारता, मार खाता-खाता घोषणा देत होते, ‘मेहनतीच्या पिकातल्या अर्ध्या वाट्यावर आम्हा लोकांचा मूलभूत हक्क आहे!’
असं नवागडच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं. त्यामुळे पोलीस नवागडला मुक्काम करून राहिले. दुखियाच्या प्रेताचा पंचनामा झाला. जखमी लोकांना दवाखान्यात हलविण्यात आलं. बटाईदारांविरुद्ध शांतता आणि कायदा भंग करण्याच्या आरोपावरून खटले भरण्यात आले. बटाईदारांच्या युनियननेसुद्धा कोर्टात अर्ज केला. तेसुद्धा आता लढणार होते.
या सगळ्या कारणांमुळेच नवागडमध्ये पोलीस आले. तीन महिने राहिले. त्या काळात राजेसाहेबांच्या काय हालचाली होताहेत, हे पाहत राहिले. सगळं काही कर्णोपकर्णीच समजत होतं.
भिकारी दोसाधला कुणीही विचारीत नव्हतं.
विचारण्याचं कारणही नव्हतं. अत्यंत भोळा-भाबडा होता तो. भटकत-भटकत मेंढरं चारणं, हीच त्याची जीविका होती. या कामात मदत करणारा एकमेव घटक म्हणजे मेंढरं. त्यांना काही फार लागत नाही. अनेक प्रकारची पानं ती खातात. घास तर खातातच. वर्षातून मेंढ्या एकापेक्षा अधिक वेळा वितात.
दुसरा कुणी असता, तर या व्यवसायात त्यानं खूप पैसा मिळविला असता; पण भिकारी दोसाधचं नशीब कसलं दळभद्री! धनगर होता तो. धनगराच्या कुटुंबाची त्याची कल्पना म्हणजे दोन बकर्या, एक बकरा किंवा एक बकरी, दोन बकरे-इसमें ज्यादा बढता ही नहीं, क्या किया जाय महाराज! आमचं नशीबच दरिद्री!
‘तुझं नशीब का बरं उजळत नाही?’
‘कसं काय उजळणार? मी जंगलात बकर्या चारतो. लांडगे किंवा तरस बकर्या उचलून नेतात. एक पाव सत्तू द्या लालाजी आणि थोडं लिंबाचं लोणचं – पाच पैशांचं. पाच पैशांचं मीठही द्या.’
‘बस्स, एवढंच?’
‘हां, लालाजी!’
‘अरे भिकार्या, तू बकर्या बाजारात का विकत नाहीस? विकल्यास, तर चांगली किंमत मिळेल.’
‘काय करणार! मला जास्त पैसे द्यावेत, असं कुणालाही वाटत नाही.’
भिकारी संकोचानं हसला आणि आपल्या अवांछित अस्तित्वाची जणू लाज वाटून निघून गेली.
अधूनमधून तो कडेवर बछडं घेऊन बकर्यांना जंगलाच्या दिशेने चरायला घेऊन चाललेला दिसे. त्याच्या चेहर्यावर आणि डोळ्यांत खूप भीती दिसे, उद्वेग दिसे. ओठांच्या कोपर्यांशी फेस. भीती वाटली, की त्याची जीभ कोरडी पडे आणि ओठांच्या कोपर्यांशी फेस जमे.
आधी आधी नवागडचे लोक अवाक् होत.
‘काय झालं रे भिकार्या?’
‘पुलिस आयी, पुलिस!’
‘त्यांचं तुला काय?’
‘बकरा उठा ले जाय वो लोग!’
भिकारी तिथून पळून जाई. जंगलात असतात तरस आणि कोल्हे. दोघेही बकर्यांचे दुश्मन. भिकारी दोसाधचा दुश्मन होता एकच – तो म्हणजे पोलीस. दोसाध जंगलात जाई. जंगलात गेल्याबरोबर कोयत्याने झाडांच्या फांद्या तोडी आणि आपल्या बकर्यांसाठी आडोसा तयार करी. त्यामध्ये बकर्यांना लपवी. भीतीने थरथरत त्या आडोशाजवळ बसे.
बकर्यांशिवाय संपत्ती म्हणून त्याच्याजवळ काहीही नव्हतं. ना जमीनजुमला, ना बायकापोरं, ना काही काम. अंगावर फक्त लंगोटी. बकर्या चारणं हे काही वाईट काम नाही. दहा-पंधरा बकर्या झाल्या, तर भिकारी त्यांना आनंदानं बाजारात विकायला घेऊन जाईल. खूऽप पैसे घेऊन विकेल. गाभण बकरी ठेवून बाकीच्या सार्या बकर्या विकून टाकील.
त्यानंतर एक मोठं धोतर विकत घेईल. सदान्कदा ही लंगोटी किंवा पंचा कशाला? नवीन धोतर घेईल.
त्यानंतर सुमाधी गावात किंवा इतर दोसाध (धनगर) टोळ्यांत तो चौकशी करील. बाजारात न्हावी येतात, तेही माहिती देऊ शकतील. भिकारी एखाद्या विधवा किंवा प्रौढ दोसाध स्त्रीशी लग्न करील. त्यामुळे घर उभं राहील. दोघेजण असल्यावर बकर्यांची संख्याही वाढेल.

पण भिकारी दोसाधचं हे स्वप्न काही खरं होत नव्हतं. बाढा गावच्या दोसाध जमातीच्या लोकांनी जंगल जमिनीवर दोसाधवाडा स्थापन केला; पण काय करणार महाराज? बाढा गावचे गणेशसिंग जमीनदार मालकच होते जणू. दोसाधांशी त्यांचं खटकलं आणि दोसाधांनी गणेशसिंगांना मारून टाकलं. गावात पोलीस आले आणि दोसाधांकडचे बकरे-बकर्या घेऊन गेले. त्यात भिकारी दोसाधच्याही बकर्या आणि बकरे गेले.
भिकारी खूप रडला. ‘माझ्याकडे दुसरं काहीही नाही. या बकर्या हेच माझं धन! पण पोलिसांना काहीही समजत नाही. शेवटी रांका दोसाध म्हणाला, ‘गाभण बकरी घेऊन पळून जा. नाढा गावात काही गडबड नाहीय. बकर्या चारायला तिथं कुरणंही आहेत. तिथल्या वडाच्या झाडाखाली राहा.’
दोसाध नाढाला गेला. वडाच्या झाडाखाली झोपडी बांधून राहिला. बकरी व्यायली. ते कोकरू मोठं झालं. नाढाचे जमीनदार राजपूत होते. मांसाहारी. अंगात खूप जोर. ते भिकार्याकडे लक्षही देत नसत. मांसासाठी बकरे विकत घेत. खूप कमी पैसे देत. आठ नाहीतर दहा रुपये. दहा ते पंधरा किलो मांसाची किंमत काय फक्त दहाच रुपये? काय करणार महाराज? सगळ्यांच्या नशिबी सगळं थोडंच असतं? पण नाढाच्या एका जमीनदाराने एका स्त्रीला बंदुकीने मारलं. होळीच्यावेळी गाणं गाणार्या स्त्रियांमध्ये ती होती. झालं! नाढा गावातही पोलीस आले. पोलीस आल्याबरोबर जमीनदार म्हणाला, ‘भिकारी दोसाधकडून एक बकरा घेऊन या.’ तीन दिवस तीन बकरे पोलिसांना देऊन भिकारी तिथूनही देशोधडीला लागला.
भिकार्याला दुनिया फारच छोटी. नाढाहून भिकारी पोचला टाहाड गावाला. तिथल्या शिवमंदिरात पुजारी असलेल्या हनुमान मिश्राला नमस्कार करून आला. काय तेज:पुंज चेहरा या पुजार्याचा! कैसे नहीं होगा? तो रोज दूध पितो. दुधाने अंघोळ करतो. महादेवाशी संवाद करतो!
भिकारी नंतर तिथल्या जंगलातल्या दोसाधवाड्यात गेला. टाहाडच्या दोसाधांनी त्याला अगदी अगत्याने बोलावून नेलं. बकर्या चारताना एक म्हातारी दोसाध स्त्री त्याच्या गाभण बकरीकडे लक्ष देई. ते लोक त्याला म्हणाले, ‘आता इथंच राहा. आमच्या समाजात आणखी एका घराची भर पडेल. तुझ्या लग्नाचीही व्यवस्था करून देऊ.’
तिथं भिकार्याचं खूप चांगलं चाललं होतं, पण एकदा पुजार्याकडे एक दरोगा आला. सात दिवस गावात राहिला. पुजारी म्हणाला, ‘भिकारी दोसाध, तुझा एक बकरा दे दरोगाला खायला!’
‘हा बकरा मला विकायचाय, दरोगाजी!’
‘काय? विकायचाय? अरे, पोलीस-दरोगा हे देवदेवतांपेक्षाही मोठे असतात आणि तू त्यांच्याकडून पैशांची अपेक्षा करतोस?’
बकरा भेट देऊन भिकार्याने टाहाड गावसुद्धा सोडलं. तिथल्या इतर दोसाधांना वाईट वाटलं. काय करणार? भिकार्याला तर काही तुमच्यासारखं मजुरीचं, शेतमजुरीचं, परमिट घेऊन जंगलातली लाकडं तोडायचं काम नाही. बकरे-बकर्या हेच त्याचं धन. बकर्या पाळणार, विकणार; पाळणार, विकणार, पण पोलीस वारंवार त्याच्या जीविकेचं साधन नष्ट करतात.
टाहाडचा दोसाधवाडा भिकार्याला खूप आवडला होता. गरीब म्हणून कुणीही त्याला कमी समजत नव्हतं. एक म्हातारी त्याच्यासाठी स्वयंपाक करून देत हेती. हेरोबा दोसाधची बायको लोणचं, सणाचा प्रसाद भिकार्यालाही पाठवीत असे. हेरोबानं हरिण मारलं, तर त्याचं मांस भिकार्यालाही मिळायचं.
भिकारी आता सगळं सोडून नवागडला आला होता. प्राथमिक शाळेतले शिक्षक खूप चांगले गृहस्थ होते. शाळेजवळच्या वडाच्या झाडाखाली बसून ते भिकार्याशी गप्पा मारायचे. ते वयानं तरुण होते. इथले रीतिरिवाज त्यांन ठाऊक नव्हते. म्हणूनच ते म्हणाले, ‘रात्री-प्रौढ शिक्षणाचे वर्ग होत असतात, शाळेत. तुम्हीपण येत जा ना दोसाधबाबा!’
‘कायकरणार महाराज? भिकार्याला तुम्ही वाचायला शिकवणार – बस्स, एवढंच? भागो भिकारी नवागडसे! राजेसाहेब पळवून लावतात, पोलीस हाकलून लावतात, लाला वाणीसामान देत नाही, गावातल्या विहिरीचं पाणी प्यायला मिळत नाही.’
सुखचंद म्हणाला, ‘ये कैसे हो सकता है?’
‘कैसे नहीं हो सकता?’ एक टॉर्च देखकर हमने पूछा, “उसका कित्ता दाम है, लालाजी?” तो लाला कितना गुस्सा हुआ! बोला, “क्यों भिकारी, दोसाध है तू, छोटा काम करता है, अब क्या टॉर्च जलायेगा?”
नवागडमध्ये भिकारी एक मोडक्या बसगाडीत राहत असे. मोडक्या बसगाड्या, मोडक्या लॉर्या, सऽगळ्या राजेसाहेबांचा वकील घेई. अशा खूप झाल्या की, त्या भंगार म्हणून विकी. अशा गाड्यांमध्ये भिकारी राही. तिथं राहून काही घरं भीक मागे. बसगाड्या आणि लॉर्यांमध्ये गवतही उगवलं होतं. त्यात बकर्या चरत. बकर्या चरण्यासाठी नवागडमध्ये अद्यापही कुरणं होती. पण कुरणात चरायला न्याव्यात, इतक्या बकर्या होत्या कुठं भिकार्याकडे?
जंगलात बसून भिकारी या सगळ्या गोष्टींवर विचार करी. विचार आणि विचार! पोलीस लालाजींचं दुकान लुटत नाहीत, लालाजींची गुरं पळवून नेत नाहीत. त्यांची त्यांच्याकडेच राहू देतात; पण आपल्याच बकर्या का हिरावून नेतात?
बकर्यांशिवाय त्याच्याकडे काहीही नाही.
त्यानंतर बकर्या आडोशाला बांधून, मनात रामनाम जपत, बकर्या वाचवण्यासाठी रामाला साकडं घालीत, घाबरत घाबरत भिकारी नवागड गावात आला. यावेळी त्याला दोरा नावाच्या लंगड्या, काण्या आणि कुष्ठरोगी मुलाने खूप मदत केली. त्यानेच भिकार्याला सांगितलं, ‘इथं पोलीस आले आहेत, पळून जा!’
पाण्याची कळशी आणि सातू-गूळ घेऊन भिकारी पुन्हा जंगलात परत गेला. रामाने कृपा केली होती. बकर्या सुखरूप होत्या. कधीकधी प्रभू रामचंद्रही भिकार्याचं साकडं विसरत, तेव्हा लांडगे बकर्यांना पळवून नेत, साप बकर्यांना चावत, कोल्हे बकर्यांना घेऊन जात.
जंगलात गेल्यावर भिकार्याने बकर्यांना पाणी पाजलं. स्वत: सातू आणि गूळ खाल्ला. असं दोन-तीन दिवस चाललं. रोजच त्याला नवागडला जावं लागे. पोलीस परत गेले असं समजलं की, तो परत गावात येई.
यावेळी तर तीन-तीन महिने नवागडमध्ये पोलीस होते. भिकारी एकदम जंगली झाला. जंगलाच्या कडेकडेने तो बाढा गावाकडे गेला. रांका दोसाधशी त्याची भेट झाली. रांकाने मदत केली नसती, तर भिकार्याला इतके दिवस जंगलात राहत आलं नसतं. रांकाने त्याची अडचण मनापासून ऐकली. मग म्हणाला, ‘थांब, बघतो काही मार्ग निघतो का?’
तीन-चार मुलांना घेऊन रांका जंगलाच्या मध्यभागी गेला. त्याने खूप पक्का असा आडोसा बांधला. जनावरांसाठी वरून फांद्यांचं छत. भिकार्याला म्हणाला, ‘तिथंच राहा. तिथल्या नाल्यापासून पाणी घेत जा.’
‘पण मी खाऊ काय?’
‘पैसे दे, मी सामान आणून देतो.’
‘हे घ्या.’
काही दिवसांनंतर रांका म्हणाला, ‘पोलीस किती दिवस राहणार कोण जाणे! बकर्या विकून टाक.’
‘कुठे?’
‘बाजारात.’
‘तोहरी गावच्या बाजारात?’
‘दुसरं कुठं?’
‘मी कुठंही जाणार नाही.’
‘विश्वास असेल, तर मग माझ्याकडे दे बकर्या.’
‘हे काय रांका, तुमच्यावर माझा विश्वास नाही, असं कधी होईल का?’
‘पाहतो, विकतो बाजारात.’ रांका म्हणाला.
रांकानं बकर्या विकल्या आणि भिकार्याच्या हाती साठ रुपये ठेवले. साठ रुपये मिळाल्यावर आपण राजे आहोत, असं भिकार्याला वाटलं. या तीन महिन्यांमध्ये त्याच्या बकरीला एक बछडं झालं. आणखी एक बकरा विकून भिकार्याने रांकाला खुराकीचे पैसे दिले.
रांका म्हणालो. ‘आता पोलीस नाहीत, अधूनमधून वस्तीवर येत जा भेटाला.’
बाढाच्या दोसाध वस्तीवरच एकदा कनू दोसाध म्हणाला, ‘नवागडमध्ये आता पोलीस नाहीत. तिथली चौकी काढून टाकली.’
भिकार्याला वाटलं, आता नवागडला गेलेलंच चांगलं. आता बकर्या आहेत; आठ-दोन बकर्या, दोन बकरे, चार करडं, रांका म्हणाला, ‘पोलीस जाऊ दे, मग जा!’
पोलीस निघून गेल्यावर भिकारी नवागडला गेला. आपल्या गावाला परत जात असल्याने त्याला आनंद वाटत होता.
काण्यानं झाडू घेऊन भिकारी दोसाधची बस झाडून दिली. आपल्या एका डोळ्यानं सगळं पाहून घेतलं आणि विचारलं, ‘काय दोसाध, बघून ये. सगळं जागेवर आहे ना?’
‘हो. सगळं जागेवर आहे. गवताची चटई, वरचा भाग फुटलेल्या बाटल्या, टिनाचा डबा.’
‘एक बातमी आहे भिकार्या!’
‘काय?’
‘दोरा तर पळून गेला.’
‘कुठं?’
‘सुमाधी गावाला बाजारात खूप पैसा मिळतो आणि लंगड्यानं काय केलं ठाऊक आहे? दालीला टाकून दुसर्या एका बाईशी संबंध ठेवलेत.’
‘आणि तुझं काय?’
‘मला कोण विचारणार बाबा? एका डोळ्यानं आंधळा आहे ना मी! दोन्ही डोळ्यांनी आंधळा असतो, तर भीक मागून जगलो असतो. माझं वयसुद्धा झालेलं नाहीय. लोक म्हणतात, “मेहनत करता येत नाही का?” आता मी काय कमी मेहनत करतो का? जातो ना तोहरीला? चालतो ना तेवढा रस्ता?
‘खरंय बाबा!’
‘आता किती बकर्या झाला रे तुझ्याकडे?’
‘चार. उद्याच विकण्यासाठी जाईन.’
‘नवागडमध्ये आणखी एक बातमी आहे.’
‘काय?’
‘राजेसाहेबांना काहीतरी मिळालंय म्हणे सरकारकडून. गावात खूप आनंद पसरलाय. संध्याकाळी शोभेचं दारूकाम आहे.’
‘वा! तुझी मजा आहे!’
‘कसली मजा? आपल्याला खायला थोडंच देणार आहेत राजेसाहेब? तोहरीच्या वैजनाथ लालाची आई वारली होती, तेव्हा त्यांनी तेराव्याला काय जेवण घातलं होतं! किती पुर्या, कचोर्या!’
‘होय रे बाबा!’
‘कुठं निघालास आता?’
‘जरा सुखचंदजींकडे चाललोय.’
भिकारी हा दोसाध (धनगर) जातीचा आहे म्हणून सुखचंदजी त्याचा तिरस्कार करीत नाहीत. नवागडमध्ये परतल्यावर त्यांनीच विचारलं होतं, ‘काय बाबा, इतके दिवस कुठं होता?’ भिकारी दोसाधच्या अस्तित्वाकडेही कुणाची नजर जात नाही. तो पुन्हा गावात आला, हेसुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही.
क्या किया जाय महाराज? नेहमी असंच होत असतं. बकर्यांचं मांस आणि बकरीचं दूध मिळविण्यापुरतीच भिकार्यांची गरज असते. अगदी स्वस्तात दूध आणि मांस मिळवण्यासाठी. पण त्यासाठी भिकार्याची दखल घ्यायची होय? नाही, नाही! ते होणे नाही! ही कहाणी खूप जुनी आहे. अगदी नवागडच्या मातीइतकी जुनी.
सुखचंदच्या शाळेला आज सुट्टी होती. ते वडाच्या झाडाखाली बसले होते. नवागडचे गवळी लोक खूप श्रीमंत होते. मोतिहार आणि भगत हे त्यांच्यापैकीच. कोण जाणे ते सुखचंदकडून काय ऐकत होते! सुखचंदजी त्या जिज्ञासू गवळ्यांना काहीतरी स्पष्ट करून सांगत होते.
‘या भिकारीभाऊ, कधी आलात?’
‘आज सकाळी आलो. सुखचंदजी!’
‘ठीक आहे ना सारं?’
‘जैसे रामजी रखें! आपण ठीक आहात ना?’
‘हो, भिकारीभाऊ! बसा.’
भिकारी संकोचानं हसून दूर बसला आणि त्याने हात जोडले. त्या गवळ्यांच्या पायांत मोठमोठे जोडे, कानांत पितळी बाळ्या, हातात लाठ्या आणि डोक्यांवर पगड्या होत्या. भिकार्याला त्यांची भीती वाटली.
मोतिहार गवळ्याने भिकारी दोसाधकडे लक्षच दिलं नाही. म्हणाला, ‘जाऊ द्या सुखचंदजी. पुन्हा एकदा सांगा सगळं.’
‘अहो, सांगितलंय ना!’
‘तरीही काही समजलं नाही बघा. राजेसाहेबांच्या मालकीच्या जमिनीवर बसरस्ता आणि लोहमार्ग बांधण्यात आला, यात काय चुकलं? नाही का रे भगत? सरकार काय मग आभाळात रेल्वेलाईन टाकणार, बस-रस्ता बांधणार?’
‘अगदी बरोबर, मोतिहार!’ भगत म्हणाला.
‘मग यावर राजेसाहेब का संतापले, हेच मला समजत नाही.’
सुखचंद म्हणाला, ‘का संतापणार नाहीत? ती जमीन कुणाची होती-राजेसाहेबांचीच ना?’
‘हो, त्यांचीच होती आणि केवढी जमीन हो!’
‘त्या जमिनीवर राजेसाहेबांचा हक्क होता की नाही? हा स्वत:च्या मालमत्तेवरचा जो हक्क असतो, तो भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीचा एक मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. असे मूलभूत हक्क सात आहेत आणि प्रत्येक भारतीयांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं, हे भारतीय राज्यघटनेचं कर्तव्य आहे.’
‘क्या ताज्जुब! पण हे मूलभूत हक्क कोई बुरी बात है क्या जी?’
‘बुरी बात कैसे? आपको ये खयाल कैसे आया मोतिहारजी?’
मोतिहार म्हणाला, ‘ते बटाईदार जेव्हा ‘मूलभूत हक्क’ म्हणून संघर्षाला उभे राहिले, तेव्हा त्यांना चिरडायला पोलीस आले ना?’
‘अरे नाही, नाही. मूलभूत हक्क कोणकोणते आहेत?’ भगतने विचारलं.
सुखचंदला आपलं ज्ञान जाहीर करायची संधी मिळाली. हाताची बोटं मोजत तो सांगू लागला, ‘पहिला मूलभूत हक्क म्हणजे समतेचा हक्क, कुठल्याही कारणासाठी माणसाची जातपात किंवा धर्म पाहिला जाऊ नये. सगळे समान आहेत. जातीमुळे कुणावरही अन्याय होता कामा नये. हा झाला पहिला मूलभूत हक्क.’
‘असं लिहिलेलं आहे?’
‘हो तर!’
मोतिहार म्हणाला, ‘ये जरूर ताज्जुब की बात है। मी आणि हा भिकारी दोसाध समान?’
‘हो. आपली राज्यघटनाच तसं सांगते.’
‘तरीही ते झूठ आहे. सगळीकडे अगदी स्पष्ट भेदाभेद दिसतो. जातीमुळे भिकारी दोसाधला कुणीही आपल्या घरात प्रवेश देत नाही. त्याने स्पर्श केलेलं पाणी पीत नाही. ही राज्यघटना नक्कीच कुणातरी दुश्मनानं लिहिली असावी, नाही का सुखचंदजी? ब्राह्मण आणि दोसाध यांना समान मानताना मी तरी कुणाला पाहिलं नाही,’ मोतिहार म्हणाला.
सुखचंदने वाद घातला नाही. त्याचा उद्देश राज्यघटनेनुसार मूलभूत हक्क कोणकोणते आहेत, हे सांगणं एवढाच होता.
आता भगतही म्हणाला, ‘झूठ बात!’
सुखचंद हसला आणि म्हणाला, ‘मी संध्याकाळी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतो. त्याला तुम्हीही या, इतरांनाही यायला सांगा. वाचायला शिकल्यावर तुम्हाला स्वत:लाच हे सगळं वाचता येईल.’
‘आता या वयात शिकून काय होणार?’
‘अहो, शिक्षणासाठी काही वय लागतं का?’
‘जाऊ द्या. पुढचं सांगा.’
मोतिहार आणि भगत खूप लक्ष देऊन ऐकत होते. संभ्रमात पडल्याप्रमाणे दोसाध सुखचंदच्या तोंडाकडे पाहत राहिला.
आता मोतिहार म्हणाला, ‘हो, प्रत्येकाची मालमत्ता कितीही असो, ती कुणीही हिरावून घेऊ नये, हे मात्र चांगलं लिहिलंय, बरं का!’
‘त्यामुळेच तर राजेसाहेबांना सहा लाख रुपये मिळाले.’
‘सहा लाख!’
‘सहा लाख’ हे शब्द ऐकून भिकार्याच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. कारण सहा लाख रुपये म्हणजे किती रक्कम याची त्याला काहीच कल्पना नाही. मोतिहार आणि भगत मात्र थक्क झाले, ‘बाप रे! सहा लाख रुपये!’

सुखचंदला पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे पगार मिळतो. त्याच्याही मनावर ‘सहा लाख’ या संख्येमुळे काही परिणाम झाला नाही. तो आपला मूलभूत हक्क स्पष्ट करण्यातच मग्न होता.
‘तेच तर सांगतोय. राजेसाहेबांचा त्यांच्या जमिनीवर मूलभूत हक्क होता. सरकारने जेव्हा बस आणि लोहमार्ग बांधण्यासाठी ती जमीन ताब्यात घेतली, तेव्हा राजेसाहेबांच्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण झालं.’
‘ते कसं काय?’
‘अहो, सरकारने त्यांची परवानगी घेतली नाही. सरकारला वाटलं, ही जमीन आपलीच आहे. असा गोंधळ झाला.’
‘असं! मग त्यानंतर?’
‘राजेसाहेबांनी खटला भरला.’
‘कुणावर?’
‘पूर्व रेल्वेवर.’
‘राजेसाहेब खटला जिंकले?’
‘जिंकले तर!’
‘हे मात्र ठीक झालं हं! पण संपत्ती म्हणजे फक्त जमीनच असं काही नाही ना?’ ‘नाही. आता हेच पाहा, तुमच्या गायी-म्हशी आहेत, ही तुमची संपत्तीच. दोसाधच्या बकर्या आहेत, ही त्याची संपत्ती, त्याची मालमत्ता. तिच्यावर त्याचा हक्कच आहे.’ याप्रमाणे सुखचंद मूलभूत हक्क एकामागून एक समजावून सांगत राहिला.
पण हे सगळं वरवरचं. सुखचंदही शेवटी त्या गवळ्यांसारखाच होता. भिकारी दोसाधचा स्पर्श झालेलं अन्न खाण्याची तर तो कल्पनाही करू शकत नसे; पण जातपात, स्पृश्यास्पृश्य भेद या गोष्टी व्यर्थ आहेत, असं छापील पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे आणि छापील अक्षरांवर सुखचंदचा प्रचंड विश्वास होता. या विश्वासाच्या बळावरच तो म्हणे, ‘हे सगळे गावठी लोकांचे चुकीचे समज आहेत!’
‘पण तरीही जातीपाती आहेत, स्पृश्यास्पृश्य भेद आहेत – आहेत की नाही? आणि ते असणारच. असं पाहा, हे सगळं ईश्वरानं बनवलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी काहीजणांना ब्राह्मण बनवलं, काहीजणांना दोसाध बनवलं. इसीसे छुआछूत चलता है। मला तर काहीच ठाऊक नाही, पण टाहाडचा पुरोहित हनुमान मिश्र हा एक चांगला ब्राह्मण आहे. आहे की नाही? तो दोसाध जातीच्या माणसांची सावलीही कधी आपल्या अंगावर पडू देत नाही. त्याच्याशी तर खुद्द भगवान महादेव बोलतात!’ मोतिहार म्हणाला.
सुखचंदने मोतिहार-भगत यांच्यासमोर हात टेकले आणि ‘मूलभूत हक्क’ या विषयावर बोलणं बंद केलं. मग तो भिकार्याला म्हणाला, ‘बोला भिकारी, काय खबर?’
आता भिकार्याचा चेहरा उजळला. तो म्हणाला, ‘ठीक चाललं होतं. इतकं ठीक चालेल, असं वाटलं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बकरे-बकर्या एकूण दहा झाल्या आहेत.’
‘दहा! म्हणताय काय?’
‘दोन बकरे जवान आहेत. त्यांचं प्रत्येकी पंधरा-सोळा किलो मांस असेल. बाजारात मटण आठ रुपये किलो भावानं विकतात. किमान सहा रुपये किलो भाव जरी धरला, तरी किती पैसे मिळतील?’
‘दोनशे रुपये?’ भिकार्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. म्हणाला, ‘असाच आशीर्वाद द्या सुखचंदजी. दोनशे रुपये मिळाले, तर माझी दु:खं दूर होतील.’
‘कशी काय?’
‘पाहा ना, त्यानंतर मला लग्न करता येईल. स्वत:चा संसार होईल. दोसाध बायका कष्टाळू असतात. बकरे-बकर्या चारण्यात-विकण्यात जिंदगी चांगली जाईल. एखादी झोपडी बांधीन कुठंतरी. बासनं-बिसनं विकत घेईन.’
‘तुम्ही कुठे राहता भिकारीबाबा?’
‘बिजूपाडाजवळ.’
‘तुमचं कुणी नाही?’
‘नाही.’
‘तुमचं चांगलं होवो.’ सुखचंद अगदी मनापासून म्हणाला. भिकारीबाबाबद्दल त्याला खूप कळकळ वाटली.
‘चलतो सुखचंदजी!’
‘या!’
‘आज शोभेचं दारूकाम होणार म्हणे!’
‘ऐकतोय खरं!’
भिकारी घराकडे निघाला. त्याला खूप बरं वाटत होतं. बकरे-बकर्यांबद्दल त्याच्या मनात माया दाटून आली. पोलीस त्याच्यावर उपकार करून गेले. नवागडला पोलीस आले नसते, तर तो बाढा गावाला पळाला नसता. बाढा गावाला गेल्यामुळेच बकर्यांची संख्या दहा झाली.
घरी जाताना भिकार्याने आटा, मीठ, तिखट, लोणचं विकत घेतलं. लालाला विचारलं, ‘ठीक चाललंय ना लालाजी?’
पण लालाने त्याच्या प्रश्नाकडे लक्षही दिलं नाही. रामधारी ठेकेदाराशी गप्पा मारण्यातच तो मग्न होता. सामान घेता-घेता भिकार्याने ऐकलं की, शोभेचं दारूकाम ‘शूरमहल’च्या समोर असलेल्या मैदानात होणार आहे. हे ऐकल्यावर भिकार्याने ठरवलं की, आपणही या कार्यक्रमाला जाऊ. आता त्याने कपडे धुण्याचा एक छोटा साबण घेतला. साबणाने कपडे स्वच्छ धुऊ.
घरी गेल्यावर त्याने स्वयंपाक केला. आज-उद्या असे दोन दिवस धकून जातील. दोनशे रुपये. तो लंगडा जर दुसरी बायको करू शकतो, तर भिकार्यालाही एक बायको मिळेलच. नंतर थोडी जमीन मिळवता येईल. लग्न करून समाजात स्थिर होता येईल. समाजातले लोकही मदत करतील. एकट्यानंच राहून काय मिळणार? बाढा आणि टाहाड गावातल्या लोकांचीही मदत आणि सहकार्य मिळेल.
भिकार्यानं कपडे धुतले. स्वयंपाकात थोडा वेळ गेला. जेवण होईपर्यंत संध्याकाळ झाली. नंतर बकर्या नीट मोजून त्यानं घरात नेल्या.
आता दार लावणार, तेवढ्यात ते आले.
राजेसाहेबांचे शिपाई, दोघेजण पोलीस.
पोलीस!!
भिकारी प्रचंड भीतीने थरथरत भिंतीला टेकून उभा राहिला. हा काय प्रकार? पोलीस चौकी उठली, पोलीस निघून गेले, म्हणूनच भिकारी नवागडला परतला होता. आता पुन्हा पोलीस?
‘क्यो भिकारी, डर गया क्या?’
गजानन शिपाई हसला. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता.
‘चल, दे! बकरा निकाल! राजासाहेबने पूरे थाने को खाने पर बुलाया है। अब कहाँ मिलेगा गोश्त?’
‘नहीं, नहीं! बकरा नहीं है।’
‘तो बकरी निकाल।’
‘ऐसा न करियो सिपाहीसाहब। पाँव पडता हूँ तुम्हारे। वही हमारा जीवन है साहब, न लिया करो।’
‘भाग साले दोसाध।’
गजाननने खाड्कन भिकार्याला थोबाडीत मारली. भिकार्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागलं. तरीही भिकारी ओरडत राहिला, ‘पुलिस के डरसे मरते है हम, भाग जाते हैं बाढा, न लिया करो।’ पण पोलिसांनी बकर्या बाहेर काढल्याच.
आणि का काढणार नाहीत? राजेसाहेबांनी बोलावलं म्हणूनच पोलीस आले ना? आणि मटण काय ते विकत घेणार? ‘गोश्त क्या हम खरीदके खायेगा? तू राजासाहब के मुलुक में रहता है ना? चल, भाग।’
भिकारी दु:खानं वेडापिसा झाला. म्हणाला, ‘या बकर्यांवर माझा अगदी तसाच हक्क आहे, जसा राजेसाहेबांचा त्यांच्या जमिनीवर आहे. त्यांची जमीन सरकारने घेतली, तेव्हा सरकारने हिशेब करून त्यांना पैसा दिला. मी माझ्या बकर्यांवरचा हक्क का सोडू?’
‘क्या? क्या बोला दोसाध?’
शिपाई आणि पोलीस दोघांनीही दोसाधला मारहाण केली. या मारहाणीला प्रशासनाचं अनुमोदन होतं, पाठिंबा होता. मारता-मारता पोलीस म्हणता होता, ‘ऐकलंस गजानन? बटाईदार लोक लढता-लढता स्वत:च्या हक्कांबद्दल जागे झाले. ते या भिकार्याला शिकवून गेले. पुलिस बकरा नहीं खायेगी तो क्या खायेगी साला? कौन खायेगा फिर? पुलिस नहीं खायेगी? गजानन, ये तो और एक राजासाहब निकला नवागड में। राजेसाहेबांचा त्यांच्या जमिनीवरचा हक्क आणि या भिकार्याचा त्याच्या बकर्यांवरचा हक्क एकाच प्रकारचा? आं?’
मारून-मारून रक्तबंबाळ झालेल्या भिकार्याला ढकलून शिपायांनी आणि पोलिसांनी झापं उघडली. चार बकरे-बकर्या घेऊन ते मजेत निघून गेले.
भिकारी एखाद्या जनावरासारखा रडत राहिला. रडतच राहिला. शारीरिक वेदनांबरोबरच वंचनेच्या वेदनाही त्याला असह्य झाल्या. सुखचंदजी सांगतात त्या सगळ्या बाता खोट्या आहेत. बकर्यांवरचा त्याचा हक्क हासुद्धा एक मूलभूत हक्क? मूलभूत हक्कांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी भारताची राज्यघटना घेते? झूठ! सब झूठ! भिकार्याच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण का होतं? ते पायदळी का तुडवले जातात? राजेसाहेबांना नुकसानभरपाई मिळते, तशी भिकार्याला का मिळत नाही? राजेसाहेबांना सहा लाख रुपये दिले म्हणजे त्यांची नुकसानभरपाई होते. भिकारी दोसाधचा बकरे-बकर्या पाळीत जगण्याचा मूलभूत हक्क इतरांकडून पायदळी तुडवला गेला, तर त्याची नुकसानभरपाई देण्याची क्षमता भारत सरकारमध्ये नाही, म्हणूनच त्याला नुकसानभरपाई मिळत नाही ना?
भिकार्याला आपल्या अंगावर कुणाचा तरी मायेचा स्पर्श जाणवला. काणा; तसेच लंगडा आणि लंगड्याची मुलगी यांनी भिकार्याला सावरलं. मुलीने ओल्या फडक्याने भिकार्याच्या अंगावरचं रक्त पुसलं. काण्याने त्याच्या चेहर्यावरचं रक्त पुसलं. लंगडा म्हणाला, ‘पानी पी ले, भिकारी।’
लंगड्याची मुलगी म्हणाली, ‘जरा चुना घेऊन येते मी, त्याने रक्त बंद होतं, वेदनाही होत नाहीत.’
जखमा सुकायला आणि उठून उभं राहता यायला भिकार्याला दहा दिवस लागले. त्यानंतर भिकारी म्हणाला, ‘चल लंगड्या, बछडी विकून येऊ बाजारात. मिळतील तेवढे मिळतील!’
वीस रुपयांना चार बछडी विकली गेली. भिकार्याची कंबर आता सरळ होणार नाही. मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी त्याने केलेल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रयत्नांच्या खुणा म्हणून त्याच्या चेहर्यावर जखमांचे व्रण कायम राहतील.
‘आता काय करणार, भिकार्या?’
‘भीक मागणार!’
‘भीक? आणि इथं?’
‘नाही…’ भिकार्याने नकारार्थी मान हलवली. सगळ्यांची देणी द्यायला निघाला. लालाची सहा रुपये उधारी होती. मोतिहारच्या नोकराकडून बकर्या बांधायला घेतलेल्या दोरीचे पैसे म्हणून त्याला दोन रुपये दिले. झाडाची एक सरळ फांदी तोडून तयार केली. तोहरीच्या बाजारात आता तो एक कटोरा विकत घेईल, भिक्षापात्र म्हणून! सहा आण्यांपर्यंत किंमत असेल.
त्याला पाहून सुखचंद दरवाजाबाहेर आला आणि त्याची सारी हकिकत ऐकली.
‘भिकारी भाऊ!’
‘चाललो सुखचंदजी!’
‘कुठं?’
‘जिथं भीक मिळेल अशा ठिकाणी!’
‘तुम्ही भीक मागणार?’
‘हो, सुखचंदजी!’
‘पण तुमच्या अंगावरच्या जखमा अद्याप बर्या झालेल्या नाहीत…’
‘पुन्हा तेच! क्या किया जाय महाराज! आप तो झूठ बोले हमसे। माझ्यासाठी तर हे मूलभूत हक्क अस्तित्वातच नाहीत; फक्त राजेसाहेबांसाठीच आहेत ते. निघतो!’
काठीवर भार देत भिकारी चालू लागला. अगदी हळूहळू; पण निर्भयपणे. आता पोलीस आले, तरी त्याला भीती वाटणार नाही. बकरे-बकर्या, जमीन, बासनं-बिसनं अशी काही संपत्ती दोसाधकडे असती, तर त्याला पोलिसांची भीती वाटली असती. तो जंगलात पळून गेला असता. असा एखादा दोसाध दिसला, तर पुलिस जरूर मारेगी। छीन लेगी सब। पण असा एक दोसाध दिसला, तर पोलीस मारणार नाहीत. कधीही मारणार नाहीत. भिकार्याला वाटलं, आपल्याला हे आधीच का उमजलं नाही? आपल्या मातृभूमीत दोसाधला जर राजेसाहेब, लालाजी, पोलीस, हनुमान मिश्र यांचा उपद्रव न होता राहायचं असेल, तर त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे भिकार्याचा पेशा स्वीकारणं – हे पूर्वीच का उमजलं नाही? इतर माणसांप्रमाणे जगू पाहणार्या दोसाधांवरच सगळ्यांची वक्रदृष्टी असते!
आपण एकटे आहोत, असं आता भिकारी दोसाधला वाटलं नाही. भिकारी कुठं नसतात? काणा, लंगडा, दोरा… सगळीकडे असतात. भिकारी दोसाध आता एका प्रचंड मोठ्या समाजाचा सदस्य झाला होता.
सुखचंद त्याच्याकडे पाहत उभा राहिला. त्याला वाटलं, भिकारी दोसाध सातव्या मूलभूत हक्कापासून वंचित झालेला असला, तरी त्याचा तिसरा मूलभूत हक्क कायम आहे – तो म्हणजे हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क. भिकारी दोसाधने आता भीक मागण्याचा व्यवसाय अंगिकारला होता. भिकारी हा जन्मोजन्मी भिकारीच राहील, याची काळजी भारताची राज्यघटना सर्वतोपरी घेईल; पण त्याला जर कुणी अधिक चांगला व्यवसाय देण्याचा, त्याची उन्नती करण्याचा प्रयत्न केला तर? तो तिसर्या मूलभूत हक्कामध्ये हस्तक्षेप ठरेल आणि भारताची राज्यघटना ते सहन करणार नाही. असा अन्याय भारतात कुठेही झाला, तरी भारताची राज्यघटना तिथं पोलीस, राखीव पोलीस, लष्कर, रणगाडे पाठवील – भिकारी हा भिकारीच राहिला पाहिजे, याच्यासाठी.
भिकारी दोसाध पाय खरडत-खरडत वळणावरून दिसेनासा झाला. आता गमावण्यासारखं त्याच्याकडे काहीही उरलेलं नाही, काहीही नाही…
अनुवादक – विलास गिते
मोबा. 9764316921