एका सशाचं नाव होतं कापसू. तो अगदी धांदरट, वेडपट ससा होता. कुणी काहीही सांगितलं की, लगेच कापसूचा त्याच्यावर विश्वास बसायचा. सांगितलेली गोष्ट खरी की, खोटी हे तो बघतच नसे. अभ्यासही त्याला जमायचा नाही. प्राण्यांच्या शाळेत त्याचा ‘नंबर’ नेहमीच शेवटचा असायचा. ससुलीबाई त्याला ओळखायच्या. त्यांच्याच ससेवाडीत राहायच्या म्हणून कापसूला वरच्या वर्गात ढकलायच्या, इतकंच! कापसूला यश असं कधी मिळालं नव्हतं. खरं तर धावण्याच्या शर्यतीत तो जिंकू शकला असता, पण याला भागच घ्यायचा नाही! फार आळशी बनत चालला होता तो. सगळं आयतं मिळावं, काहीतरी ‘जादू’ घडावी आणि बदल व्हावा, असं त्याला वाटायचं. एखादा भोळाभाबडा मुलगा असतो, तसाच हा कापसू ससा वाटायचा. त्याचे वडील ससेराव त्याला खरं तर सांगायचे की, धडपड केल्याशिवाय काही मिळत नाही. फळ वरून पडेल म्हणून झाडाखाली वाट बघण्यात दिवस फुकट घालवायचा नसतो. आपल्याला-ससे-लोकांना झाडावर चढता येत नसेल, तर झाडावर राहणार्या खारूताईशी दोस्ती करावी. ती तोडून आणेल फळ! मैत्री, सहकार्य, मदत या गोष्टी चांगल्या. एका प्राण्याने दुसर्या प्राण्याला सांभाळून घ्यावं.’ वडिलांचं हे महत्त्वाचं बोलणं कापसूला पटत नसे.
प्राण्यांच्या शाळेतली वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर कापसूला फार ‘टेन्शन’ आलं. विषय नीट कळले नव्हते. अभ्यास झाला नव्हता. आळसाचा कळस झाला होता. ससेराव तसे कडक होते. ते म्हणाले, ‘कापसू, तुला एक सांगून ठेवतो. जर या वर्षी नापास झालास, त्याच वर्गात राहिलास, तर माझ्या या घरी पुन्हा यायचं नाही. तुझ्या एखाद्या उनाड मित्राच्या घरी राहा. नाहीतर कुठेतरी कामधंदा बघ. मी काही तुला पोसणार नाही. अस्वलदादाने दुकान काढलंय. तिथे जा हवं तर नोकर म्हणून. नीट शिकलास, तर हे घर तुझं. शिक्षणासारखं महत्त्वाचं दुसरं काही नाही. व्यापार केलास, तरी शिक्षण हवेच…’
कापसू जास्तच घाबरला. आता करणार काय? त्याच्या या भीतीचा, त्याला लागलेल्या काळजीचा गैरफायदा कुणी घेतला माहीत आहे का? मंकू नावाच्या माकडानं! मंकूने इशारा करून कापसूला बोलावलं. मंकू विचारू लागला, ‘तू हल्ली आजारी असल्यासारखा का दिसतोस? होतंय काय तुला? कुणी जादूबिदू केली नाही ना तुझ्यावर? छान, गोजिरवाणा दिसतोस. एखाद्या सशीणबायला पिल्लं होत नसतील म्हणून तिने तुझ्यावर जादूटोणा केला असेल.’ कापसूला आता रडू येऊ लागलं. तो रडवेला होत म्हणाला, ‘मंकूमामा, तूच मला मदत कर. काय करू मी? यंदा मी जर नापास झालो, तर माझे वडील ससेराव मला घरात ठेवणार नाहीत. कुठं जाणार मी? माझं कुणी नाही, हे कळलं, तर तो दुष्ट कोल्हा मला गाठेल आणि खाऊन टाकेल.’ मंकू काहीतरी ‘ठरवून’च आला होता. तो म्हणाला, ‘तू मला मामा म्हटलंच ना? आता तू माझा भाचा झालास! आपल्या या रानात ‘मंतरमियाँव’ सारखा ताकदवान प्राणी असताना आपल्याला रे कसली काळजी?’
‘मंतरमियाँव कोण आहेत?’ कापसूने विचारलं. त्याला खरोखरच काही ठाऊक नव्हतं. मंकू मंतरमियाँवची ‘जाहिरात’ करायलाच आला होता. तो लगेच म्हणाला, ‘वेडपटा, तू कुठल्या जगात वावरतोयस? तुला मंतरमियाँव माहीत नाही? फार मोठी गूढ शक्ती आहे त्याच्याकडे. रानउंदराचा अवघड आजार त्याने मंत्र वापरून एका दिवसात बरा केला. वाघाटीला पिल्लं होत नव्हती. मंतरमियाँवने मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर तीन पिटुकली पिल्लं झाली तिला. मंतरमियाँव काहीही करू शकतो. प्रत्यक्ष वनदेवतेने त्याला दर्शन दिलं आणि ही गूढ विद्या त्याच्याकडे सोपवली.’
हे ऐकून भोळसट कापसू अगदी भारावून गेला. ‘मला एखादा मंत्र सांगतील का तुमचे मंतरमियॉव? मला कसंही करून परीक्षेत पास व्हायचंच आहे. नाहीतर माझी काही धडगत नाही.’ मंकू म्हणाला, ‘थेट मंत्र नाही देणार; पण मंतरलेला काळा दोरा तुझ्या गळ्यात बांधतील ते. त्यामुळे आपोआप तुला परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं सुचतील. तुला सगळा अभ्यास त्यावेळी नीट आठवेल. हे ऐकल्यावर कापसूने आनंदाने जागच्या जागी उडी मारली! नंतर जरा हळू आवाजात मंकू म्हणाला, ‘बरं का कापसू, या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. तुला मंतरलेला दोरा दिल्याबद्दल तू एक गोष्ट करायलाच हवी. आपण पैसे म्हणून प्राजक्ताच्या बिया वापरतो. तसे शंभर पैसे म्हणजे शंभर बिया तू मंतरमियाँवला द्यायच्या. मग लगेच काळा दोरा तुझा!’
वेडाखुळा कापसू फसला! त्याने काय करावं? ससेरावांनी बरेच ‘बी’ पैसे कुठे साठवून ठेवले आहेत, ते शोधून काढलं. तिथल्या शंभर ‘बिया’ चोरल्या. ते पैसे घेऊन परीक्षेच्या आदल्या दिवशी हे पात्र मंतरमियाँवसमोर हजर झालं. मंतरमियाँवला खरं तर त्या गोजिर्या सशावर झडप घालावी आणि त्याला खाऊन टाकावं, असंच वाटत होतं; पण त्या क्षणी त्याने फक्त पैसेच घेतले; पण लबाड मंतरमियाँव म्हणाला, ‘परीक्षेचा निकाल लागल्यावर एक महिनाभर माझी सेवा करायला इथं यायचं. नाही आलास, तर मंकूमामा तुला उचलून इकडे आणेल आणि तसं करावं लागलं, तर मी तुला ‘शाप’ देईन! मग तुझा रंग बदलेल. तू काळाठिक्कर होशील. काळ्या सशाला तुमच्या त्या ससेवाडीत कुणी थारा देईल का? विचार कर.’ कापसू सेवेसाठी आला की, त्याची शिकार करायची, हे मंतरमियाँवने नक्की केलं होतं. म्हणजे प्राजक्ताच्या बियांचे पैसेही मिळाले आणि कोवळ्या सशाचं मटणही! ‘शाप’ दिला जाईल, या भीतीने तो येणारच! नाहीतरी नापास झाल्यावर त्याचे वडील त्याला ठेवणारच नाहीत. मग जातोय कुठे?… मंतरमियाँवला मंकूने सगळी ‘माहिती’ आधीच सांगितली होती. लबाड लोकांची ती पद्धतच असते.
मंतरमियाँवकडून मंतरलेला (!) काळा धागा कापसूने त्याच्या गळ्यात बांधून घेतला. घरी खोटंच सांगितलं की, आजकाल तशी फॅशन आलीय म्हणून धागा बांधलाय!’ परीक्षा सुरू झाल्यावर मंतरलेल्या दोर्याचा काहीच ‘प्रभाव’ जाणवेना. एकाही प्रश्नाचं उत्तर धड आठवेना. कापसूला घाम फुटला, प्रत्येक ‘पेपर’ कठीण गेला. नंतर सुट्टी पडली; पण कापसूचं मन शांत होत नव्हतं. त्याला धड झोप लागत नव्हती. त्यात पुन्हा त्याने चोरी केली होती. वडिलांच्या पैशावरच डल्ला मारला होता.
परीक्षेचा ‘निकाल’ लागला! कापसू सर्व विषयांत नापास झाला. मंतरलेला धागा फुकट गेला; पण संकट तेवढंच नव्हतं. मंतरमियाँवची सेवा करायला तो गेला नसता, तर शाप मिळाला असता! म्हणजे त्याला तसं भय घालण्यात आलं होतं. मित्रांनो, ही भीती फार वाईट असते बरं!
कापसू, रानरस्त्याने मंतरमियाँवच्या त्या छोट्या गुहेकडे चालला होता. नाहीतरी हे अपयश घेऊन ससेवाडीतल्या घरी जाण्यात काही अर्थच नाही, असं त्याला वाटत होतं. इतक्यात त्याला दिसला हत्तीप्पा! हत्तीप्पा हा जंगलातला सर्वांत अनुभवी, शहाणा हत्ती होता. माणसांनासुद्धा झाडं तोडण्यासाठी तो रानाकडे फिरकू देत नसे. वाघोबासुद्धा त्याची खोडी काढत नसे.
हत्तीप्पाने रडणार्या एकट्या कापसूची चौकशी केली. मंतरमियाँवची कहाणी त्याने हत्तीप्पाला सांगून टाकली. हत्तीप्पा कापसूचा मूर्खपणा पाहून चकित झाला. त्याला म्हणाला, ‘कापसू, तू शाळेत शिकतोस ना रे? मग काहीच विचार कसा करत नाहीस? गळ्यात दोरे बांधून अभ्यास येत असता, तर सगळ्यांनी तेच केलं असतं. चल माझ्याबरोबर त्या मंतरमियाँवच्या गुहेकडे!’ कापसू घाबरला, पण हत्तीप्पाला नाही म्हणून शकला नाही. हा हत्तीप्पा मूळचा तसा म्हैसूरचा; पण आता महाराष्ट्रातल्या जंगलात राहून आपलाच झाला होता.
हत्तीप्पाला पाहून मंकू घाबरला. त्याने लगेच लबाड मंतरमियॉवला सावध केलं. दोघं खोटी-खोटी लाडीगोडी करू लागले. ‘हत्तीप्पा, तुम्ही का तसदी घेतली? आम्हाला तुमच्याकडे बोलवायचं, असंही मंकू म्हणाला. ‘तुम्हालाही मंतरलेला दोरा देऊ का? फक्त पन्नास प्राजक्ताच्या बिया द्या. तुमच्यासाठी खास सवलत!’ मंतरमियाँव बोलून गेला. ‘तुला सोंडेत उचलून गरगर फिरवू की, माझ्या ताकदवान पायांखाली रगडू? बावळट प्राण्यांना फसवायची, लुबाडायची परवानगी तुला दिली कुणी? किती जणांना ठकवलंस? ताबडतोब गुन्हा कबूल कर, तर तुझा जीव वाचेल, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. तुझा हा मंकूही सुटणार नाही माझ्या सोंडेतून.’ हे ऐकताच दोघांनी, मंकूने व मंतरमियाँवने हत्तीप्पासमोर लोळणच घेतली. ‘नका हो मारू आम्हाला! वाचवा! तुमच्या पायांतली ताकद, तुमच्या सोंडेतली शक्ती सगळ्या दुनियेला माहीत आहे. आम्ही यापुढे ‘तंत्रमंत्र’ काही करणार नाही.’ मंतरमियाँव रडत-ओरडत विनवणी करू लागला. मंकूने तर क्षमा मागण्यासाठी हत्तीप्पाचे पायच धरले. हत्तीप्पाने त्यांना ताबडतोब ते जंगल सोडून जाण्याची आज्ञा केली, हद्दपारच करून टाकलं! महाराष्ट्रातल्या जंगलात यायचंही नाही. नुसते दिसलात, तरी भारी पडेल! अशी तंबी दिली. मग प्राण्यांची सभा बोलावून त्यांनाही चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.
हत्तीप्पा म्हणाला, ‘जंगल सोडण्यापूर्वी अळूच्या पानावर मंतरमियाँवने माझी माफी लेखीच मागितलीय. हे बघा ते पान! लबाडीच्या गुन्ह्याची त्यात कबुलीच आहे. यापुढे लक्षात ठेवा, असा कुणी भोंदू जंगलात आला, तर मला वर्दी द्या. मी बघतो त्याला! मी मेहनतीने रोज व्यायाम करून हे शरीर कमावलं म्हणूनच तो मंतरमियाँव की फियाँव कोण तो मला घाबरला ना? माझ्यावर का नाही मंत्र फेकला त्याने? गडाबडा का लोळला? काहीही करू शकत होता ना तो? मियाँव सांगायचा आणि तुम्ही मान डोलवायचात. काय रे बैला?’… बैल आता मान खाली घालून उभा होता. तोही मंतरमियाँवच्या बुवाबाजीचा बळी ठरला होता. त्याच्याकडून तर दोनशे प्राजक्ताच्या बिया घेतल्या होत्या. तुझी शिंगं खर्या सोन्याची होतील, अशी खोटी आशा दाखवली होती. बिचारा बैल सोन्याच्या शिंगांची वाट बघत होता.
हत्तीप्पाने कापसूच्या वडिलांची समजूत घातली. लुटलेला पैसा मंतरमियाँव तिथेच टाकून जंगलातून निघून गेला होता, नाहीतर हत्तीप्पाने त्याचा पाठलाग केला असता. मग प्राण्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. कापसूने घरी चोरी केल्याबद्दल वडिलांची माफी मागितली. हत्तीप्पा कापसूला म्हणाला, ‘तू माझ्याकडे येत जा. अरे, मी शाळेत पहिला नंबर काढला होता, पण फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही. शरीरप्रकृतीही दणदणीत हवी. रोज तुझा अभ्यास घेईन आणि माझ्या व्यायामशाळेत तुझा चांगला घामटा काढीन. उद्यापासून माझ्या घरी हजर व्हायचे! तो मंतरमियाँव गेला उडत!’
कापसू आता बदलतोय! स्वत:ला सुधारतोय. ‘शाप’ नावाची काहीही बाधा नसते, हे सुद्धा त्याला आता पटलंय. मुलांनो, तुम्हीही निर्भय व्हा! चतुर व्हा! बोला, हत्तीप्पा की जय!
–माधव गवाणकर, दापोली (मोबा. 9765336408)