खोपोली, जि. रायगड येथील ‘म.अंनिस’ शाखेचे कार्यकर्ते रमेश यादव यांचा छोट्या वैमनस्यातून दि. 13 मे 2016 रोजी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ते स्थानिक ‘अंनिस’ शाखेच्या कामात सहभागी होते व ते रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मागे पत्नी व मुलगी आहे. त्यांच्या खुनानंतर मुलगी मानसी हिच्या बारावीच्या वर्गातील प्रवेश घेण्यास व पुस्तके, कपडे यासाठीही आर्थिक अडचण आली.
‘म.अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्यसरचिटणीस नितीनकुमार राऊत व प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली व परिस्थितीची कल्पना आली.
त्यानंतर खोपोली व रायगड ‘अंनिस कार्यकर्त्यां’नी काही मदत उभी करून कुटुंबाला पुढे करावी, असा प्रयत्न केला. ही गोष्ट कळताच रायगड, ठाणे, मुंबईतील अनेक कार्यकर्तेमदतीसाठी पुढे आले व राज्य पदाधिकारी गणेश चिंचोले यांनी पुढाकार घेऊन रमेश यादव कुटुंबियांच्या मदतीसाठी ‘व्हॉटस् अॅप ग्रुप’ करून मदत गोळा केली. यामध्ये ‘अंनिस’चे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी; तसेच नेत्रदान, देहदान कार्यकर्तेश्रीपाद आगाशे यांनी स्वत: व अनेक मित्रांना विनंती करून आर्थिक मदत मिळवून दिली. ‘अंनिवा’च्या सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी पाच हजार रुपयांची पुस्तके ‘दिवंगत रमेश यादव’ पुस्तक स्टॉल नावाने खोपोली शाखेला दिली. दि. 3 जुलै रोजी गणेश चिंचोले, श्रीपाद आगाशे, मुक्ता दाभोलकर, नितीनकुमार राऊत, यशवंत गायकवाड, अशोक जाधव, प्रभाकर नाईक, राजेंद्र लांजेकर, अपर्णा दळवी, नंदकिशोर तळाशीलकर, नरेंद्र राणे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बौद्धविहार सभागृहात सांत्वन भेट घेऊन दिवंगत रमेश यादव यांच्या पत्नी व मुलगी मानसी यांना ही मदत चेक व रोख स्वरुपात देण्यात आली. कोणत्याही प्रकारे यादव कुटुंबियांनी किंवा त्यांच्या वतीने मागणी न करता सहृदय भावनेने ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी हा निधी उभा केला, याला विशेष महत्त्व आहे.
-नितीनकुमार राऊत