महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली सतत 18 वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबविले, राज्यव्यापी कायदा जनजागरण यात्रा काढली. या कायद्याअंतर्गत राज्यात 275 हून अधिक प्रकरणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली व अनेक शोषित व पीडितांना यामुळे न्याय मिळाला.
महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांत आणि केंद्रातही असा कायदा व्हावा, यासाठी ‘मअंनिस’ कृतिशील आहे. कायदा करण्यासंदर्भातील ‘मअंनिस’चा दीर्घ अनुभव व तज्ज्ञता असल्याकारणाने अनेक राज्यांना मार्गदर्शन व माहिती देण्याचे काम चालू आहे. आपल्या शेजारील कर्नाटक राज्यात कायद्याबाबत हालचाली सुरू आहेत. दि. 4 जुलै 2016 पासून तिथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, हे लक्षात घेऊन कर्नाटक राज्यात हा कायदा संमत व्हावा आणि तेथील प्रसिद्ध विचारवंत व बसवसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास जलदगतीने होऊन मारेकरी व त्यामागील सूत्रधारांना कडक शासन व्हावे आणि तिथे अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य सुरु व्हावे, या प्रमुख तीन गोष्टींसाठी ‘मअंनिस’ने 29 जून ते 5 जुलै या कालावधीत कर्नाटक दौरा आयोजित केला होता. या तीन बाबींसंदर्भात कर्नाटकातील विविध समविचारी सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष, बसवविचारांनुसार कार्य करणारे विविध मठ व त्यांचे मठाधीश, पत्रकार, प्रसारमाध्यमे आणि प्रामुख्याने कर्नाटकचे कायदा मंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे, ही भूमिका घेऊन ‘मअंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव मा. माधव बावगे आणि राष्ट्रीय अनुसंधान विभागाच्या राज्य कार्यवाह प्राचार्य सविता शेटे यांनी हा दौरा केला.
दि. 29 जून रोजी बेळगाव येथे समविचारी संघटना आणि कार्यकर्तेयांची बैठक राम आपटे यांच्या कार्यालयात झाली. तेथील कामकाज वाढविणे, कायदा व खुनाचा तपास, याबाबत अविनाश पाटील आणि माधव बावगे यांनी सर्वांसोबत चर्चा केली. बेळगाव येथील कार्यकर्तेशंकर चौगुले, अशोक याळगी यांच्या सहकार्याने ही बैठक आणि पत्रकार परिषदही घेण्यात आली, ज्यात विविध दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मागण्या आणि भूमिकेस पाठिंबा दिला. तसेच बेळगावच्या महापौर सरिता पाटील (ज्या लातूरच्या आहेत) यांचीही भेट घेतली.
दि. 30 जून आणि 1 जुलै रोजी धारवाड येथे डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय समन्वय बैठकीस आम्ही उपस्थित होतो. सात राज्यातील 75 प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. वेगवेगळ्या ठिकाणी चालणार्या विविध कामांची ओळख, एकूणच सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती, धर्माचा पगडा व विविध फतवे ,त्याचा समाज आणि मानवी जीवनव्यवहारावर परिणाम, विचारवंतांचे खून, असहिष्णुतेचे वातावरण इत्यादी अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. यामधून राष्ट्रीय पातळीवर समन्वय ठेवून विविध राज्यात कार्य करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आणि राज्यनिहाय समित्या गठित करण्यात आल्या. महाराष्ट्रातील समितीमध्ये माधव बावगे यांचा समावेश करण्यात आला. या बैठकीत आपल्या चळवळीच्या कार्याविषयी माहिती, कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी कायदा करणे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासाबाबत शासनावर दबाव आणि इतर राज्यांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू करणे, याविषयी अविनाश पाटील यांनी माहिती देऊन आवाहन केले. त्यानुसार डॉ. गणेश देवी, बसवराज सुलीभावी, डॉ एच. एस. अनुपमा, माधव पलशीकर, यमुना गांवकर आणि के. फनिराज यांसह काही साहित्यिक, कलावंतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविली आहेत.
कर्नाटकात स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे आणि मोठे योगदान दिलेले नव्वदीच्या पुढील श्री. पाटील यांची दि. 1 जुलै रोजी अविनाश पाटील आणि सविता शेटे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना कायदा आणि डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या खुनाचा तपास याविषयी आपली भूमिका सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ. कलबुर्गी यांच्या पत्नी श्रीमती कलबुर्गी यांना भेटून अविनाश पाटील यांनी तपासाविषयी चर्चा केली.
सायंकाळी गदग येथील तोंताड मठाचे तोंताड सिद्धिलिंगय्या महास्वामीजी यांची भेट घेतली. त्यांच्याशी दोन्ही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. हा कायदा व्हावा, यासाठी या मठाने पुढाकार घेतला आहे. स्वतः सिद्धिलिंगय्या स्वामीजी मुख्यमंत्र्यांशी अनेक वेळा बोलले आहेत. डॉ. कलबुर्गींचे विद्यार्थी राहिलेल्या या स्वामीजींनी ‘म.अंनिस’च्या कार्याची दखल घेऊन कौतुक केले. भगव्या वस्त्रातील स्वामीजी धार्मिक कर्मकांडावर नव्हे, तर स्वतःच्या अनेक शिक्षण संस्थांतून शिक्षणाचे कार्य, सामाजिक कार्य आणि बसवेश्वरांनी दिलेल्या विचारांचा वसा पुढे नेण्याचे मोठे कार्य या मठाच्या माध्यमातून करीत आहेत, असे दिसले. त्यांनी आम्हा सर्वांचा बसवेश्वरांवरील मराठीतील पुस्तके, महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा व शाल देऊन सत्कारही केला. त्यांच्याच शिक्षण संस्थेतील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. तोडकर यांनी आमच्या सोबत येऊन स्वामींची भेट घडवून आणली.
दि. 2 जुलै रोजी सकाळी धारवाड येथे समाजपरिवर्तन समुदाय आणि ‘भारतीय विकास सेवा’चे वरिष्ठ मार्गदर्शक डॉ. एस. आर. हिरेमठ यांना भेटण्यास गेलो; पण ते कामानिमित्त बाहेरगावी होते. दूरध्वनीद्वारे त्यांनी सर्व मुद्द्यांवर आपल्यासोबत असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यालयातील श्री. हबीब आणि श्री. दीपक सी. एन. यांना भेटलो. त्यांच्या कामाची माहिती घेतली व आपलेही काम सांगितले. दुपारी प्रवासास सुरुवात करून रात्री दीड वाजता बेंगलोर येथे पोचलो.
दि. 3 जुलै रोजी डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे चिरंजीव श्रीविजय कलबुर्गी यांच्याशी तपासासंबंधी चर्चा केली. भारत ज्ञान-विज्ञान समिती (BJVS) कर्नाटकचे राज्य सचिव श्री. जयकुमार यांनी म.अंनिसच्या वतीने समविचारी संघटनांची बैठक आयोजित केली होती. त्यांच्या समवेत कायदा व खुनाच्या तपासाची स्थिती आणि शासनाची भूमिका, संघटनांचा दबाव आदी विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने BJVS आणि KRVP चे कार्यकर्ते उपस्थित होते. बेंगलोर येथील मिडूमामिडी मठाधीश श्री. वीरभद्र चन्नमल्ला महास्वामी यांची भेट घेऊन त्यांच्याशी कायदा मंजूर करणे व डॉ. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास, यावर सविस्तर चर्चा झाली. त्यांनीही निवृत्त न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची स्वतंत्र समिती करून कायद्याचा मसुदा तयार केला आहे व तो मा. मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत आणि कर्नाटकातील काही मठांच्या स्वामींसह हा कायदा संमत व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे सांगितले. ‘मअंनिस’ करीत असलेल्या कार्याचेही कौतुक केले.
दि. 4 जुलै प्रेस क्लब, बेंगलोर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत चालविणार्या जाणार्या विविध इंग्रजी, कन्नड वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मअंनिस’ची भूमिका, कायदा व कार्य; तसेच खुनाचा तपास व कायदा याबाबत राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि प्राचार्य सविता शेटे यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायदा, त्याचा उपयोग, कर्नाटकात होऊ घातलेला अंधश्रद्धाविरोधी कायदा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास यावर सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. विविध कन्नड प्रसारवाहिन्यांवरून त्याचे प्रसारण झाले. तसेच ‘द हिंदू’ पासून विविध इंग्रजी व कन्नड वर्तमानपत्रांमधूनही याची प्रसिद्धी झाली. बेंगलोर येथील प्रसिद्ध प्रसारवाहिनी ‘सुवर्ण टी. व्ही.’ आणि ‘कन्नड प्रभा’ हे कन्नड लोकप्रिय दैनिक अत्यंत प्रभावीपणे चालविणारे श्री. सुगथा श्रीनिवास यांची त्यांच्या कार्यालयात आम्ही भेट घेतली. त्यांना ‘मअंनिस’च्या कार्याची चांगली माहिती आहे व डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनापासून ते डॉ. कलबुर्गी यांच्या खुनापर्यंतचा तपास व कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी कायदा व्हावा, यासाठी त्यांची प्रसारवाहिनी कशी आग्रही व प्रभावी मांडणी करते, हे कळले. अनेकांचा विरोध पत्करून त्यांचे कार्य सुरू आहे, हे त्यांनी सांगितले. त्यांनी अजून या बाबी जास्त पुढे आणून आपल्या चळवळीला, प्रयत्नांना साथ देणार असल्याचे दिले.
कर्नाटकाचे कायदामंत्री मा. टी. बी. जयचंद्र यांची विधानसौद येथे भेट घेऊन कायद्याविषयी चर्चा करून तो संमत करण्याविषयी विनंती केली. त्यांनी आमचा मसुदा तयार आहे व तो कॅबिनेटमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्नाटकाचे गृहमंत्री मा. परमेश्वरम यांची भेट झाली. त्यांनी पुरेसा वेळ देऊन सविस्तर चर्चा केली. डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या खुनाचा तपास अग्रक्रमावर असल्याची माहिती देऊन कर्नाटक शासन काय-काय प्रयत्न करीत आहे, याची माहिती दिली आणि आम्ही ही केस सोडवू, याचा आम्हाला विश्वास आहे, असे सांगितले. तसेच कायदा संमत करण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे व आम्ही सकारात्मक आहोत, हे सांगितले . या दोन्ही भेटी बेंगलोर येथील कार्यकर्तेविश्वनाथ स्वामी यांच्या सहकार्याने झाल्या.
दि. 5 जुलै रोजी सकाळी आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री मा. सिद्धरामय्या यांची भेट घेतली. त्यांना कर्नाटकात कायदा संमत होणे व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास गतीने व्हावा, याबद्दल ‘मअंनिस’ची भूमिका अविनाश पाटील यांनी सांगितली. त्यांनी त्यास सकारात्मक उत्तर दिले. ही भेट बेंगलोर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वसुंधरा भूपती यांच्या प्रयत्नामुळे झाली. या भेटीच्या वेळी कर्नाटक येथील इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही आमच्या समवेत उपस्थित होते.
त्यानंतर कर्नाटक CID चे इन्स्पेक्टर जनरल (IG) श्री. हेमंत निंबाळकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यासाठी आम्हा तिघांबरोबर श्रीविजय कलबुर्गीही उपस्थित होते. श्री निंबाळकर यांनी चर्चेस योग्य वेळ दिला व सविस्तर चर्चा केली. त्यांनी एकूणच त्यांचा तपास, महाराष्ट्रातील तपास, त्याची दिशा, दोन्ही राज्यांतील शासनाची भूमिका, खुनामधील साधर्म्य या अनेक बाबींवर सविस्तर चर्चा केली. ‘मअंनिस’च्या वतीने तपासासाठी संपूर्ण सहकार्य राहील, हे अविनाश पाटील यांनी त्यांना सांगितले व आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
सर्व भेटींमध्ये आम्ही ‘मअंनिस’ची इंग्रजी पुस्तिका, वार्तापत्र, खुनाच्या तपासातील चार संशयित आरोपींचे फोटो, आवाहन, सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची प्रत, सनातन संबंधी माहितीची फाईल आणि इतर साहित्य यांचा संच दिला.
या भेटीमध्ये एकूणच ‘मअंनिस’सारखे प्रभावी, मोठे व राज्यभर जाळे असणारे संघटन कर्नाटकात नाही, जो दबाव डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर सतत तीन वर्षे आपण आपल्या शासनावर आणला आहे, तशा पद्धतीची यंत्रणा तिथे असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे आपण तिथे जाऊन हे करीत असल्याबद्दल तिथल्या संघटना व संस्थांनी आपले स्वागतच केले. एकूणच हा दौरा आशादायी ठरला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामास तिथे खूप मागणी आहे, हे लक्षात आले. त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
-सविता शेटे