Categories
शाखा वार्ता शिबिर

‘अंनिस’चा जादूटोणाविरोधी कायद्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील शिबिरे

सप्टेंबर - २०१६

जून 2016 या महिन्यात रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील बांधवांना ‘जादूटोणाविरोधी कायद्या’ची माहिती व्हावी, याकरिता कार्यशाळा घेतल्याचा निरोप आला. पोलीस पाटील हा कायदा प्रशासनातला म्हणजे गावातला महत्त्वाचा घटक. गावात घडणार्‍या विविध गुन्ह्यांच्या तपासात त्याची भूमिका पोलिसांच्या इतकीच महत्त्वाची असते. विशेषत: अंधश्रद्धेच्या पिळवणुकीत त्याला गावाची इत्थंभूत माहिती असते. अशा या घटकाला महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा समजावून दिल्यास गावपातळीवर अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांच्या होणार्‍या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी सामान्य नागरिकांना पोलीस पाटलांची मदत होऊ शकेल. याकरिता त्यांना प्रथम प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

त्यानुसार मी संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस पाटलांसंबंधी माहिती गोळा करायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुके. प्रत्येक तालुक्यांत कमी-अधिक गावे. त्यानुसार प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त करण्यात आले आहेत. यात समाजातील सर्व वर्गांचे पोलीस पाटील आहेत; शिवाय महिलांनाही आरक्षण मिळाल्यामुळे पोलीस पाटील होण्याची संधी मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यत्वे कणकवली तालुका-63 पोलीस पाटील, कुडाळ-69, वैभववाडी-35, देवगड-74, मालवण-63, सावंतवाडी-63, दोडामार्ग-37 व वेंगुर्ला- 29 मिळून 433 पोलीस पाटील आहेत.

कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना तसे राज्य प्रधान सचिवांचे सहीचे विनंतीपत्र दिले. निरीक्षकांनी या प्रशिक्षणाला ताबडतोब परवानगी दिली. हा मेसेज ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुपवर राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत सरांनी व्हायरल केला. हा मेसेज प्रा. सुरेश पाटील सर, वैभववाडी कॉलेज यांनी वाचला. त्यांच्याकडून ताबडतोब विचारणा झाली. प्रा. पाटील सरांनी वैभववाडी पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. वैभववाडीत 12 जुलैला पोलीस पाटील बंधूंच्या प्रबोधनाची कार्यशाळा ठरली. सावंतवाडीतील ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या नीला आपटे यांनी सावंतवाडी स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन सावंतवाडीला 13 जुलैला कार्यशाळा घेण्याचे ठरले. कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशकाचे काम करणार्‍या दर्शना देसाई यांना व देवगडमध्ये संगणक प्रशिक्षणाबरोबर सामाजिक प्रबोधनात सहभागी होणार्‍या सामिया चौगुले या मैत्रिणींना विनंती केली, त्यांनीसुद्धा उत्तम प्रतिसाद देत कुडाळ व देवगड येथील पोलीस पाटलांच्यासाठी अनुक्रमे 14 व 15 जुलै रोजी कार्यशाळा ठरविल्या. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठपैकी पाच तालुक्यांत पोलीस पाटलांच्या कार्यशाळा घेण्याचे नियोजन निश्चित झाले. त्यानुसार ‘मध्यवर्ती’ला कळविण्यात आले. ‘मध्यवर्ती’कडून प्राचार्य मच्छिंद्र मुंडे, प्रधान सचिव सुशीलाताई मुंडे, नितीनकुमार राऊत, उल्हास मुणगेकर ही मंडळी प्रशिक्षणासाठी लागणारे कायद्याचे बॅनर, पुस्तके, चमत्काराचे साहित्य इत्यादी घेऊन 10 जुलै रोजी कणकवलीच्या ‘कोकण गांधी’ आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात हजर झाले.

पोलीस पाटील बांधवांच्या कार्यशाळेबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या मुलांचे प्रबोधन करण्यासंबंधीचे नियोजनही या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनेसुद्धा या दौर्‍यात प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या भेटीही घेतल्या.

एकंदर दि. 11 ते 15 जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 17 कार्यक्रम घेतले. यात पाच पोलीस पाटील कार्यशाळा; ज्यात 156 पोलीस पाटलांचा सहभाग मिळाला. हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील 1200 विद्यार्थी वर्गापर्यंत ‘अंनिस’च्या प्रबोधनाचा उपक्रम पोचवण्यात आला; तसेच सावंतवाडी तालुक्यातील बांदा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, शालेय समिती सदस्य, शिक्षक इत्यादींसाठी बांदा पोलीस निरीक्षकांनी 13 जुलैला अगदी अल्प वेळेत तयारी करून कायदा समजून घेण्याचा प्रयत्न केला. यात 70 व्यक्ती सहभागी झाल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील 70 ते 80 समविचारी व्यक्तींना एकत्र घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा पुढील काळात ‘अंनिस’च्या कार्यात सहभाग राहील.

या सर्वच कार्यशाळांमध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून ‘जादूटोणाविरोधी कायद्या’ची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थींना दिली व चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंकांचे निरसन आणि अंधश्रद्धांची वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.

कोकणातील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी प्रशिक्षणार्थींकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नवजा शंका, त्यांनी सांगितलेले अनुभव या माध्यमातून पुढील निरीक्षणे नोंदवण्याचा प्रयत्न केला. सहभागी प्रशिक्षणार्थींकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना शंका, त्यांनी सांगितलेले अनुभव या माध्यमातून पुढील निरीक्षणे नोंदविण्याचा प्रयत्न केला.

नरबळी कायद्यातील अघोरी प्रकारांची माहिती देताना पोलीस पाटील, अशा स्वरुपाच्या घटना आमच्या जिल्ह्यात घडत नाहीत, अशी प्रतिक्रिया सुरुवातीला नोंदवत, त्यांना नांदोस हत्याकांडाची आठवण करून देताच, हळूहळू इतर अघोरी अंधश्रद्धांच्याविषयी बोलायला लागत. अशा अंधश्रद्धांच्या विरोधी हा कायदा कसा उपयुक्त आहे, हे त्यांना ‘अंनिस’चे कार्यकर्तेपटवून सांगत, त्यानंतर त्यांना वस्तुस्थितीच्या जाणीव होई.

देवस्की (करणी) करणे हा अंधश्रद्धेचा प्रकार प्रत्येक गावात पाहायला मिळतो. यात एखादी तरुण विधवा, परित्यक्ता, मूल नसलेली बाई गावात देवस्की करते, असा समज पसरविला जातो. दुसर्‍या बाजूला गावातील गुरव, गावकरी मंडळी गावातील एखाद्या व्यक्तीला नोकरी, व्यवसायात अपयश आल्यास, ही भूतबाधा झाली आहे, असे सांगतात व त्यांना फसवतात.

अनेक गावांत भुताचे घर, भुताचे झाड, भुताची कोंड, तळे, विहिरी इत्यादी प्रकार आजही पाहावयास मिळतात. एखाद्या बाईचा मूल न होताच मृत्यू झाला किंवा एखाद्याने नैराश्यातून आत्महत्या केली असेल, तर त्या सर्वांचे भूत होते व त्यांचे अतृप्त आत्मे गावात भटकत असतात, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी गावातील गरोदर बाईला किंवा नवीन लग्न झालेल्या नवर्‍याला किंवा नवरीला छळत असतात, असा विश्वास गावातील मंडळी व्यक्त करतात.

ग्रामदैवतांना कौल लावूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करणे, ही जरी श्रद्धा असली, तरी ती 100 टक्के खरी नाही. एका गावात एखाद्या मुलास लग्न करण्यास देवाने उजवा कौल दिला नाही म्हणून त्या घरातील तीन मुलगे व एक मुलगी ही सर्व भावंडे लग्नाशिवाय राहिली, आज त्यांचे वय 45 ते 60 च्या घरात गेले आहेत.

साप, विंचू चावल्यास मांत्रिकाकडून विष उतरवण्याचे प्रयत्न केले जातात. अलिकडे हे प्रमाण कमी होत आहे. सर्पमित्रांचा उपयोग यासाठी केला जात आहे.

गावात अनेक ठिकाणे देवी-देवतांचे स्थान म्हणून घोषित केली जातात. कुठे झाडाखाली दगड ठेवला जातो. छोटे मंदिरही बांधले जाते. या ठिकाणी गावातील तरुण मुली, स्त्रिया मासिक पाळीच्या काळात फिरू शकत नाहीत. त्यामुळे महत्त्वाच्या कामांना सुट्टी द्यावी लागते. देवस्थानच्या परिसरात मासिक पाळी आलेली मुलगी अथवा तरुण स्त्री चुकून गेल्यास ब्राह्मण भोजन घालावे लागते.

कोकणात सर्वसामान्यांना चिंतेपासून मुक्त करण्यासाठी अवतारी पुरुषाचा मठ बांधण्यात आला आहे. या मठात अवतारी पुरुष, मठाधिपती, बुवा-बाबा मंडळीच आहेत. वर्षांतून चार ते पाच वेळा मोठे उत्सव या मठात भरतात. हजारो भाविक आपल्या मनातील चिंता दूर करण्यासाठी येतात.

या पाच दिवसांच्या काळात वरील माहिती मिळावी म्हणून ज्या लोकांपर्यंत गेलो, ते अधिक चिकित्सक बनत आहेत, असे जाणवले. अंधश्रद्धांपासून या लोकांना दूर जाण्याचा विचार पटल्याचे जाणवले.

या कार्यक्रमामध्ये प्राचार्य मुंडे सर म्हणाले होते की, मानवी जीवनात ताण-तणाव आला. मनाचा समतोल बिघडला की, मेंदूतील रासायनिक द्रव्यांचाही समतोल बिघडतो. यातून असंबद्ध बडबड, हातांची चित्रविचित्र हालचाल, काही लोकांचे डोळे बंद करून घुमणे, वारा येणे किंवा भुताची बाधा झाली आहे, असे सांगून अघोरी उपाय केले जातात. अशा भोंदूगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. अगदी साध्या-सोप्या सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत प्राचार्य मच्छिंद्र मुंडे सर, सुशीलाताई, नितीनकुमार राऊत सर यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. चमत्कारांचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थितांना विचार करायला लावला. चमत्काराचे प्रयोग पोलीस पाटील, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, निरीक्षक यांना शास्त्रीय माहिती घेण्यास उपयुक्त ठरले.

अर्पिता मुंबरकर