Categories
इतर

विदर्भात सहा महिलांची सहा दिवस सहा जिल्ह्यांत फटाकेमुक्त प्रबोधन यात्रा

जानेवारी - २०१९

फटाकेमुक्त अभियान प्रबोधन यात्रा, पूर्वविदर्भ असा प्रवास ठरला. सुरुवातीला मनात भ्रमण करावं, अशीच कल्पना होती. डॉ. हरिष पेटकर यांनी आम्हाला अंनिसचा उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जाण्यास सुचविले. त्यांनी सुचविलेली ही संकल्पना. परिवर्तन स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये सर्वांनाच आवडली. (प्रत्येकाच्या काही ना काही मर्यादा, अडचणी या होत्याच.) ज्यांनी होकार दिला आणि या फटाकेमुक्त अभियानात दुचाकीच्या प्रवासात सहभागी झाल्या त्या सहा जणी अशा – सारिका डेहणकर, डॉ. माधुरी झाडे, कविता राठोड, पंकजा गादेवार, कविता लोहट, प्रतिभा ठाकूर.

प्रवासाचा कालावधी 1 ते 7 ऑक्टोबर 2018 असा ठरला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा एक उपक्रम वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांतून राबविण्याचे ठरविले. तसेच जिल्ह्याचे एक-दुसर्‍यापर्यंतचे अंतर, त्याला लागणारा प्रवासाचा कालावधी, वाटेतील शाळा-महाविद्यालयातील कार्यक्रमांच्या वेळा, मुक्कामाचे ठिकाण हे सर्व आधीच ठरवून घेतले. आमच्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सोबतच इतर समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, आम्हाला वेळोवेळी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा फायदा झाला. नागपूर विभागीय पोलीस महानिरीक्षक यांना आमच्या यात्रेसंदर्भातील सविस्तर पूर्वसूचना देणे, प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना; तसेच निवासी जिल्हाधिकारी यांना पूर्वसूचनापर माहिती देणे, वर्धा शहर पोलीस स्टेशन ठाणेदार यांना दि. 1 ऑक्टोबरच्या आमच्या फटाकेमुक्त अभियान या रॅलीसंदर्भात पत्र देणे, रॅलीच्या उद्घाटनासंदर्भात वर्धा नगरपरिषदेच्या सी.ओ. माननीय वाघमळे मॅडम; तसेच डॉ. चेतना सवाई, संचालिका, सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसावटी, वर्धा यांना निमंत्रण पत्र देणे. ही सर्व स्थानिक पत्रव्यवहाराची जबाबदारी सारिका, प्रतिभा, कविता राठोड, कविता लोहट यांनी स्वीकारून ती पूर्ण केली. नियोजित सहाही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. शाळा, महाविद्यालय येथे कार्यक्रम घेतल्याचे प्रमाणपत्र, फटाके न फोडण्याचे संकल्पपत्र आमचे स्वत:चे शपथपत्र ते असे की, आम्ही आमच्या स्वेच्छेने या अभियानात सहभागी होत आहोत. अशा आशयाचे शपथपत्र तयार केले. त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येकीच्या जीवनसाथीकडून संमतीपत्र भरून घेतले. ही सर्व अभियानाला आवश्यक असणारी कागदपत्रे तयार केली. या अभियानात सादर करण्याकरिता अंनिसची काही गाणी म्हणण्याचा सराव केला. तसेच लोकांपर्यंत कमी वेळात पोचणारं पथनाट्य हे जास्त प्रभावी माध्यम आहे, म्हणून त्याची स्क्रीप्ट लिहिण्याचं काम हे मी स्वत: केले. आमच्यापैकी चार मैत्रिणी कविता, प्रतिभा, पंकजा; तसेच कविता लोहट यांनी तर कधीच अशा प्रकारची गाणी अथवा पथनाट्य सादर केले नव्हते. सतत 15 दिवस याचा सातत्याने सराव करावा लागला. आम्हाला अभियानादरम्यान लागणार्‍या प्रत्येक बारीक-सारीक बाबींचा विचार करून आम्ही त्याची यादीच केली. ती इतर कार्यकर्त्यांना वाचून दाखविली. त्यासंदर्भात मा. माधव बावगे सर, विनायक सावळे, गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, नरेंद्र कांबळे, अरुणभाऊ चवडे, मिसाळकाका, नूतनताई, श्रीकांत बारहाते, अतुलभाऊ शर्मा व प्रभाकरदादा यांसोबतच इतरही सर्वच मंडळींनी वारंवार सूचना देऊन आम्ही काय सोबत न्यावं व काय करावं, यासंदर्भात मार्गदर्शन केलं. सातत्याने समाजभान जपणारे डॉ. चंद्रकांत व डॉ. कल्याणी जाधव या दांपत्यानं आम्हाला प्राथमिक उपचारपेटीच भेट दिली. त्यात आम्हाला प्रवासादरम्यान लागणार्‍या सूक्ष्म बाबी लक्षात घेतल्या होत्या, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी आमची वैद्यकीय तपासणीदेखील करवून घेतली होती. आपापल्या गाडींची सर्व्हिसिंग करवून घेतली. गाडी पंक्चर झाली, तर ट्यूब बदलविण्याचे काम पडले, तर काय हे संभाव्य धोके लक्षात घेऊन कविता राठोड, सारिका, कविता लोहट यांनी चाक पंक्चर दुरुस्त करणे, ट्यूब, टायर बदलविणे या बाबी शिकून घेतल्या होत्या. हवा भरायचा लहानसा पंप व पंक्चर दुरुस्तीचे काही सामान मा. प्रा. किशोर वानखेडे आणि जयंत सबाने यांच्याकडून आणले होते. आमच्या पूर्वतयारीत आम्ही गाडीची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्मेट हे सर्व घेतले. आमच्या तीन गाड्यांचा क्रम कसा असणार, हेही ठरविलं. गाड्या एकापाठोपाठ एकच असतील, गाडीचा वेग 60 च्या वर जाणार नाही, प्रत्येक गाडीतील अंतर हे 50 फुटांपेक्षा अधिक राहणार नाही, पुढच्या गाडीला थांबवायचं असेल, तर कोणत्या विशिष्ट पद्धतीचा हॉर्न वाजविला, तर थांबायचं इतक्या इत्थंभूत बारीक-सारीक बाबी आम्ही सर्वजणींनी पूर्वीच ठरवून घेतल्या होत्या. अंधारापूर्वीच प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचं, हेही ठरवून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यातील शाखांना फोन करणं, निघताना व पोचल्यावर शाखांना माहिती देणं, प्रत्येक वेळी फोनचं चार्जिंग बघणं, गाडीमधील पेट्रोल बघणं, हवा बघणं, शाळेत गेल्यावर बॅनर लावणे-काढणे, कार्यक्रमाचे फोटो काढणे, अभिप्राय, संकल्पपत्र; तसेच प्रमाणपत्र भरून घेणे ही सर्व जबाबदारी प्रत्येकामधील कौशल्य ओळखून करण्यात आली. अतिशय सूक्ष्म नियोजन केल्यामुळेच आमचा हा प्रवास आनंददायी झाला, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते.

1 ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आम्ही शिवाजी चौक, वर्धा येथून निघालो. निघताना आमच्या कुटुंबीयांसोबतच अंनिसची कार्यकर्ती मंडळी, ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असणारी अनुभवी मंडळी म्हणजे अतुलभाऊ व प्रभाकरदादा अगदी लहान मुलं, तरुण; तसेच ज्येष्ठ नागरिकही या रॅलीला सदिच्छा देण्याकरिता आवर्जून सपत्निक उपस्थित होते. डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशलवर्क येथील अविस्मरणीय स्वागताने तर आम्ही सर्व भारावून गेलो. अशाच प्रकारे ठिकठिकाणी आमचं स्वागत होत होतं. लोकं आम्हाला भेटून आमच्याशी संवाद साधण्यास उत्सुक असायची. या यात्रेदरम्यान आम्ही सहाही जिल्ह्यांचा मिळून 860 किलोमीटरचा प्रवास करून 22 शाळा/महाविद्यालयांपर्यंत पोचलो. चौदा कार्यक्रम व शाखा बैठका घेतल्या. आम्ही जवळजवळ एकूण 11,200 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. 5 लाख 53 हजार रुपये संकल्प त्यांनी केला. ही राशी खरी तर फार अल्प आहे. याचं कारण असं की, सर्वच विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरून घेणे आम्हाला शक्य नव्हतं. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या ही 2200, 2700 तर काही ठिकाणी 3600 पर्यंत होती. वेळेचे भान व आमची एका गावावरून दुसरीकडे प्रवासाची मर्यादा लक्षात घेता ते शक्य नव्हते. म्हणूनच ही संकल्प राशी ही प्रातिनिधिक स्वरुपाची आहे.

अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस व अंनिसची मंडळी आमच्या स्वागताला तयार असायची. एक प्रसंग आवर्जून सांगावा वाटतो, आमची गाडी काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडली. तिला दुरुस्त करून ठिकठाक होईपर्यंत आम्ही सर्व जणी व वरोरा येथील सर्व अंनिसची कार्यकर्ते मंडळी यांनी चहा कँटीनवरच शाखा बैठक घेऊन सविस्तर चर्चा करीत संवाद साधला. तशीही आजची आमची शाखा बैठक ऊर्जानगर (चंद्रपूर) येथील गाडीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे रद्दच करावी लागली होती. आमची गाडी दुरुस्त झाली, तेव्हा अंधाराचे साम्राज्य वाढले होते. रात्री प्रवास करायचा नाही, हे ठरवूनही आता मात्र आमच्याकडे काही पर्यायच नव्हता. अंधारातून प्रवास करीत आम्ही चंद्रपूरला पोचणारच होतो, तेवढ्यात पुन्हा गाडी बंद पडली. इरई नदीच्या पुलाजवळ, पुलावरून धक्का मारीतच आम्ही गाडीला रस्त्यावरील दिव्याखाली आणलं. शोरूमला फोन करून मेकॅनिकला बोलावून घेतले. चंद्रपूर, ऊर्जानगर शाखा येथील अंनिसचे कार्यकर्तेएक-दोन नाही, तर तब्बल दहा ते बारा जण आम्ही उभे असलेल्या ठिकाणी आले. गाडी लवकर दुरुस्त होणार नाही, असं मेकॅनिक म्हणाला. अंनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या मदतीने आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच मा. कोटकर यांच्याकडे पोचविले. या शाखेचे आदरणीय जाधव सर यांचं वय 80 वर्षे आणि ते संपूर्ण चंद्रपूरचा प्रवास संपेपर्यंत सतत आमच्या सोबत होते. याही वयात त्यांचा उत्साह, कार्यावरील निष्ठा हे सारं आम्हाला शिकवून गेली. आमची वर्ध्याची मैत्रीण शहनाझ पठाण हिची गाडी सकाळी 10 ला आम्हाला डॉ. हरिष पेटकर यांनी आणून दिली. त्यांच्या या मदतीमुळेच आमचे वेळेचे नियोजन होऊ शकले; तसेच नवी गाडी मिळाल्यामुळे आम्ही बिनधास्त झालो. आम्ही 1 ऑक्टोबरला रद्द झालेली शाखा बैठक 2 तारखेला सकाळी घेतली. या बैठकीला महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग मिळाला.

प्रत्येक जिल्ह्यातील पूर्वनियोजित कार्यक्रमांसोबतच काही शाळांच्या आग्रहास्तव कार्यकर्त्यांनी वेळेवर ठरविलेले कार्यक्रमही आम्ही घेत होतो. बर्‍याच ठिकाणी आमचं पथनाट्य, गाणी मागितली, तर काहींनी पथनाट्याची स्क्रीप्ट, आमचा ड्रेसकोड आमच्याप्रमाणेच इतरांनाही आकर्षित करणारा ठरला.

महात्मा गांधींची 150 वी जयंती असल्याने बापूंचा वैज्ञानिक दृष्टिकोनही आम्ही आमच्या प्रबोधनात समजून सांगायचो. वैज्ञानिक दृष्टिकोनाची, अंनिसच्या कामाची, उपक्रमांची मांडणी करीत फटाकेमुक्त अभियान, पर्यावरण संवर्धन यावर प्रबोधन करायचो. आम्ही यावर अगदी पी.पी.टी.देखील तयार करून घेतली. शपथ घेताना तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही घ्यायचे. काही शिक्षकांनी तर सर्वांसमोर सांगितले की, मी यानंतर घरी कधीच फटाके आणणार नाही.

संविधान चौक, गोंदिया येथील स्वागताच्या वेळी अगदी 60 नंतरच्या वयोगटातील महिला होत्या. आमचे स्वागत त्यांनी पाण्याची बाटली व बिस्किटांचे प्रत्येकी एक-एक पॅकेट देऊन केले. याच गावात पुढल्या एका चौकात आमचे चक्क औक्षण करून ओवाळणी केली. हे त्यांचं आमच्यावरील प्रेम, आपुलकीचं असेल; पण आम्ही आमचं धान्यांनी स्वागत करून घेणं टाळलं. धान्यांनी आमचं स्वागत न करता ते धान्य पक्ष्यांना खायला घाला व यापुढे शक्यतो धान्य वाया घालवू नका, अशी नम्र विनंती केली. या महिलांनी आम्हाला सुचविले की, तुम्ही आमच्या सर्व महिलांकरिता एक कार्यक्रम घ्यायला जरूर या.

एम. जी. कॉलेज ऑफ पॅरामेडिकल या कॉलेजमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर जवळजवळ सर्वच विद्यार्थी अंनिसचे सभासद होण्याकरिता तयार झाले. सर्वांचाच सभासद फॉर्म लगेच भरून घेणे हे वेळेअभावी आम्हाला शक्य नव्हतं. स्थानिक कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपवून आणि त्यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांचा सभासद फॉर्म आम्ही भरून घेतला. काही अंगणवाडी शिक्षिका व महिलांचे देखील सभासद फॉर्म प्रातिनिधिक स्वरुपात आम्ही भरून घेतले. ऊर्जानगर, चंद्रपूर येथेही आमची शाखा बैठक झाल्यानंतर एका व्यक्तीने लगेच सभासद फॉर्म भरून दिला. गडचिरोली येथे महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवू, असेही सांगण्यात आले, येथे तर रात्रीच्या शाखा बैठकीमध्ये त्रिवेणी संगम साधला गेला. तो असा की, सर्वोदय मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ आणि अंनिस यांचा मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे त्यांचं संघटित सहकार्य उल्लेखनीय असंच आहे. सर्वच शाखांनी भरगच्च कार्यक्रम घेऊन आम्हाला सहकार्य केलं. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांनी तर कार्यक्रमाचे अगदीच सूक्ष्म नियोजन केले होते. त्यामुळे कमी वेळेत त्यांनी अधिकाधिक कार्यक्रमांचे नियोजन करून संधीचं सोनंच केलं.

या संपूर्ण प्रवासात न मागताही आम्हाला मदत करणारे एक निनावी बस ड्रायव्हरही मिळाले. खराब रस्त्यामुळे उशीर होऊन रात्र झाली. अशावेळी आमच्या मोटारसायकलमागे ‘त्या’ एस. टी. ड्रायव्हरने आपली गाडी ठेवून आम्हाला सुरक्षा दिली. चंद्रपूर ते गडचिरोली ते गोंदिया या मार्गावरील निसर्गसौंदर्य आम्ही दुचाकीवरून अनुभवत होतो. निसर्गाचा हा अमूल्य ठेवा कायम राहावा, प्रदूषण थांबविण्याचा प्रयत्न करून पर्यावरण संवर्धन व्हावे, मानवी जीवन व पर्यावरण यांचा समतोल साधावा याकरिताच तर आमची ही सारी धडपड होती.

नागपूरला तर निसर्गाच्या सान्निध्यात सक्करदरा येथील बगिचारमध्ये आम्ही पथनाट्य व अंनिसची गाणी सादर केली. एका महिलेने इथे जे अनुभवकथन केले ते हृदयस्पर्शी आहे. तो अनुभव त्यांनी विषद केला तो असा. “एका दांपत्याला दहा ते बारा वर्षांनंतर कन्यारत्न जन्माला आले. अत्यानंदात उत्सव साजरा करण्याच्या नादात त्यांनी खूप फटाके फोडले. फटाक्यांच्या आवाजामुळे लहान बाळाला बधीरपण आलं; एवढेच नाही, तर ती तिच्यावर एवढा गंभीर परिणाम झाला की, सहा महिने हे बाळ सतत दवाखान्यात भरती राहूनही अखेर तिने शेवटचा श्वास घेतला. बारा वर्षांनंतर आई-वडील होण्याचा आनंद निसर्गनियमांच्या विरुद्ध वागल्यामुळे हिरावला गेला.”

आमच्या या संपूर्ण प्रवासात आम्हाला सतत साथ देणारी प्रत्येक जिल्ह्यातील अंनिसची कार्यकर्ती मंडळी या सर्वांचीच नावं इथे नमूद करणे मला शक्य नाही; परंतु ते सतत आमच्या स्मरणात राहतील. त्यांनी प्रत्येकांनीच दिलेला आदर, सन्मान, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, आमच्याविषयी वाटणारी काळजी हे अभूतपूर्वच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची या संपूर्ण प्रवासादरम्यान खूप आठवण यायची. त्यांनी लावलेले अंनिसचे रोपटे आता प्रचंड वटवृक्षात विकसित होत आहे. हा संपूर्ण प्रवास आमच्यासाठी खुले विद्यापीठच होते. प्रत्येक दिवसातील प्रत्येक क्षण हा नवा अनुभव प्रदान करून अनुभव विश्व समृद्ध करणारा होता.

या अभियानाची किमया तर बघा, सात वर्षांची श्रेया गाडेकर नावाची मुलगी आम्हाला म्हणाली, ‘मी आता अजिबात फटाके फोडणार नाही, या वर्षी मी एक हजार रुपयांची मिठाई गरीब मुलांना वाटणार आहे.’ हा संकल्प अथवा शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी केलेला फटाके न फोडण्याचा संकल्प; तसेच तरुणांनी अंनिसचे सभासदत्व स्वीकारणं, नवीन काही लोकांनी अंनिसच्या वार्तापत्राचे वर्गणीदार होणं, हे सारं काही; त्याचप्रमाणे एका व्यक्तीने आमच्याजवळ व्यक्त केलेली प्रतिक्रिया – ‘डॉक्टर गेल्यावर वाटले होते की, आता हे संघटन संपणार; पण तुम्ही तर महिला असूनही निधड्या छातीने पुन्हा नव्या जोमाने निर्भय होऊन फिरत आहात, हे अत्यंत प्रेरणादायी व हिंमत वाढविणारं काम आहे. तुमच्या या कार्याला सलामच केला पाहिजे.’ कार्यकर्त्यांमधील आत्मियता, एकमेकांना देणारी साथ हे सारं या अभियानाचं फलित नाही का?

या अभियानात सात दिवस घराबाहेर राहताना खरं तर आमच्या सर्वांपुढे अनेक आव्हानं होती. आमच्यापैकी काहींची मुलं शाळेत जाणारी आहेत. कुणाकडे स्वयंपाकाची अडचण होती, तर कुठे जीवनसाथी बाहेरगावी नोकरी करीत असल्यामुळे मुलांना सात दिवस कोण सांभाळणार, हा प्रश्न होताच. अशा विविध अडचणींवर मात करत आमचं हे हाती घेतलेलं कार्य पूर्ण केलं. यात आमच्या सर्वांच्याच कुटुंबीयांची, आमची चिमणी पाखरं आणि जीवनसाथींची विशेष मदत झाली.

संघटनेतील एकमेकांवरील विश्वास, एकीचं बळ आणि निर्धार हेच अंनिसला पुढे घेऊन जाण्यास उपयुक्त आहे. आम्हा सहाही जणींचा हा अनुभव केवळ शब्दबद्ध करता येऊन त्याला बंदिस्त करावा, एवढा मर्यादित नाही, तर तो अविस्मरणीय, अवर्णनीय असाच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ओळी मला इथे आठवतात. ते म्हणायचे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे.’ त्यांची हीच शिकवण आमच्या सदैव स्मरणात ठेवून अंनिसची वाट सुकर करू.

आम्ही सहाही महिला विविध क्षेत्रांत कार्यरत आहोत. सारिका या विविध सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. डॉ. माधुरी या डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशलवर्क येथे प्राध्यापक आहेत. कविता ही वकिलीचं शिक्षण घेत आहे. प्रतिभा सामाजिक कार्यकर्ती आहे, तर कविता लोहट ही उत्तम शेतकरी आहे. विविधतेने नटलेला हा आमचा गट अंनिसच्या एकसूत्रात बांधला गेला. आम्हा सर्वांमध्ये सामंजस्य होते. प्रत्येकजण एक-दुसरीला समजावून घ्यायचे. आमच्यातील सतत आनंदी आणि खेळीमेळीचं हसतं वातावरण आम्हाला सदृृढ ठेवत होतं. रोज रात्री आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी मूल्यांकन करायचो. दिवसभरातील गमती-जमतीवर चर्चा करीत हसत-हसत झोपी जायचो. एकमेकींच्या साथीने विश्वासाने केलेला हा प्रवास सदैव स्मरणात राहील, असाच आहे. आम्हाला हे अभियान प्रेरणा देऊन आमचं भावविश्व समृद्ध करणारं ठरलं, हे निश्चित. परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या या वाटेवर आम्हाला सहाय्य, मार्गदर्शन व प्रेरित करणार्‍या सर्वांच्या मी सदैव ऋणात राहू इच्छिते.

डॉ. माधुरी झाडे

लेखक संपर्क ः 9423420263