Categories
संविधान

संविधान जागर कशासाठी…?

जानेवारी - २०१९

एकात्मतेची शक्ती

कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत नेते, देशभक्त रत्नाप्पा कुंभार हे भारताच्या संविधान सभेचे एक सदस्य होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने तेव्हाचे लोकसभेचे सभापती शिवराज पाटील उपस्थित होते. आपल्या भाषणात देशभक्त रत्नाप्पा कुंभारांचा गौरव करताना त्यांनी आपल्या संविधानाचीही महती सांगितली. एखादा देश दीर्घ काळ एकात्म राहण्याच्या कोणत्या शक्यता असू शकतात हे सांगताना ते म्हणाले, ‘पहिली शक्यता अशी की,तो देश विस्ताराने, लोकसंख्येने इतका लहान असावा की, त्याचे आणखी तुकडे होऊ शकत नाहीत. दुसरी शक्यता अशी की, त्या देशामध्ये अशी एक सर्वमान्य व्यक्ती असते की, तिच्या प्रभावामुळे तो देश एकात्म राहतो. तिसरी शक्यता अशी की त्या देशातील सर्व लोक इतके सुज्ञ असतात, त्यांचं नागरिकत्व इतकं प्रगल्भ असतं की, ते आपले मतभेद शहाणपणानं सोडवतात आणि देशाचे तुकडे होऊ देत नाहीत.’ शिवराज पाटील पुढे म्हणाले की, देश एकात्म ठेवणार्‍या या तीनही शक्यता आज आपल्या देशात अस्तित्वात नाहीत आणि तरीही हा देश एकात्मतेने पुढे जातोय, याचं कारण काय? तर याचं कारण आहे, या भारताला एकात्म ठेवणारी शक्ती -‘भारताचे संविधान’.

विस्ताराच्या दृष्टीने जगात सातव्या नंबरचा, 32 लाख 85 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आणि लोकसंख्येने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा, 130 कोटी लोकांचा देश म्हणजे आपला भारत. जगातील सर्व प्रमुख धर्मांचे लोक वास्तव्यास असणारा, साडेसहा हजारहून अधिक जातींमध्ये विभागलेला, 200 हून अधिक भाषांत बोलणारा, विविध खानपान, चालीरीती, परंपरांचा बहु सांस्कृतिक देश म्हणजे भारत. अशा प्रचंड देशात महात्मा गांधी किंवा नेहरूंसारखा प्रभावी नेताही आज नाही आणि सुजाण नागरिकत्वाबाबत! आपण जाणतोच. परस्परविरोधाचे, संघर्षाचे अनेक प्रश्न आज आहेत, अशाही स्थितीत आपला देश एकात्म आहे, याचं कारण सर्वांना सामावून घेणारे आणि सर्वांना घेऊन पुढे जाऊ पाहणारे संविधान.

स्वातंत्र्याचा अर्थ संविधान

15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजी परकीय सत्तेपासून आपण स्वतंत्र झालो. तसे पाहिले तर, फार पूर्वी 1857 च्या व्यापक उठावातही आपण भारतीय विजयी झालो होतो. दिल्लीवर आपली सत्ता आणली होती, बहादूरशहा जाफरला आपला बादशाह म्हणून दिल्लीच्या गादीवर बसवलेही होते. परंतु आता पुढे काय, याचा काहीही स्पष्ट विचार तेव्हा आपल्यासमोर नव्हता. लवकरच आपण पुन्हा पराभूत झालो, पुन्हा पारतंत्र्यात गेलो. पण या इतिहासापासून आपण शिकलो, धडा घेतला की, स्वातंत्र्य हे ‘स्व-तंत्राने’ सिद्ध होते. परकीय सत्तेचं जोखड दूर करणं, हा स्वातंत्र्याचा एक अर्थ आहे आणि स्वतःची व्यवस्था निर्माण करून स्वतःच्या निर्णयाने ‘स्व-तंत्रा’ने राष्ट्र चालवणे हा स्वातंत्र्याचा पुढचा महत्त्वाचा अर्थ आहे. राष्ट्राचं स्वतंत्र्य टिकवून पुढे जाण्याचं ‘स्व-तंत्र’ म्हणजे आपले संविधान होय. म्हणून आपले संविधान जोपर्यंत आणि जेवढे अस्तित्वात आहे, तोपर्यंत आणि तेवढेच आपले स्वातंत्र्य अस्तित्वात असेल. म्हणजे संविधानामध्येच स्वतंत्र राष्ट्राचा प्राण आहे. संविधान हेच आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे.

आता झालो आम्ही भारतीय

दीड-दोन हजार वर्षांच्या इतिहासात आपल्या देशातील लोकांमध्ये ‘हा माझा देश आहे,’ अशी भावना निर्माण होण्याची खूप तुरळक उदाहरणे आहेत. एक तर, आज आपण ज्याला भारत म्हणतो, असा नकाशातला संपूर्ण भारत इतिहासात एक राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हता. या भूभागावर अनेक राजे राज्य करत होते. शिवाजी महाराजांसारखे बोटांवर मोजता येतील, असे काही प्रजाहितदक्ष राजे सोडले तर स्वकीय असो वा परकीय, सगळे राजे प्रजेला छळणारे, लुटणारे होते. त्यामुळे लोकांना ते राजे किंवा ते राज्य आपले वाटण्याचे काही कारण नव्हते. शिवाय धर्माच्या भिंती आणि जातींच्या उतरंडी होत्याच. त्यांनी अनेकांचं माणूसपण नाकारलं होतं. राजापेक्षा धर्म आणि जातींचीच सत्ता लोकांवर चालायची. त्यामध्ये सर्व स्त्रियांसह बहुजन, दलित पुरुष होरपळून निघत होते. धर्म किंवा जात हीच त्यांची ओळख बनली होती. त्यामुळे भारतीय म्हणून सगळे एक आणि समान ही भावना दूरदूरपर्यंत कुठे अस्तित्वात नव्हती. अशा भारतात संविधान अस्तित्वात आले आणि ‘आम्ही भारतीय’ असा एकतेचा पहिला उच्चार आम्ही केला.

गुलाम असणारा मालक झाला कसा?

या देशामध्ये इंग्रज येण्यापूर्वी राजेशाही होती. राजेशाहीमध्ये राजा मालक असतो. लोक गुलाम असतात. सगळे हक्क, अधिकार, सगळी संपत्ती, सगळा न्याय राजाच्या हातात असतो. संविधान आले आणि या देशात राजेशाही जाऊन लोकशाही आली. लोकशाहीमध्ये लोक मालक असतात. आपण देशाचे मालक झालो. त्यामुळे पंतप्रधान असो वा राष्ट्रपती; ते लोकांना, संसदेला जबाबदार असतात. लोक त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांना समाधानकारक उत्तर द्यावे लागते; अन्यथा लोक सत्तांतर घडवू शकतात. याचा अर्थ पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता लोकप्रतिनिधी हे मतपेटीतून, मतयंत्रातून जन्माला येतात. अंतिम सत्ता लोकांच्या हातात आली, ती संविधानामुळे.

मग आजचे प्रश्न का निर्माण झाले?

आज देशातील सर्वसामान्य माणसांची परिस्थिती आणि त्यांचे प्रश्न पहिले तर या देशाचे ‘मालक’ आम्ही लोक आहोत, ही एक घोर फसवणूक आहे, असं वाटावं अशी आजची स्थिती आहे. पण खोलात जाऊन विचार केला तर हे सहज लक्षात येईल की, याचं कारण आपण लोकांनी संविधान न समजून घेणं, संविधानाला जगण्याचा भाग न बनवणं, हे आहे. शिक्षण आणि इतर माध्यमांतून आपण संविधान योग्य पद्धतीने पोचविले असते आणि इथले लोक हक्काबरोबरच कर्तव्याप्रती जागरूक असते, तर हे प्रश्न निर्माण झाले नसते. अनेकदा आपण स्वतःपुरते पाहतो, चुकीच्या गोष्टीबद्दल बोलत नाही आणि चांगल्या गोष्टींची पाठराखणही करत नाही. यातून प्रश्न गंभीर होत जातात. ‘लोक’ नावाची शक्ती जागृत आणि सक्रिय असल्याशिवाय संविधान काही करू शकणार नाही. बाबासाहेब म्हणाले होते, ‘संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे चांगले नसतील तर संविधान काही करू शकणार नाही.’ येथे संविधान राबवणारे म्हणजे केवळ राज्यकर्ते एवढाच अर्थ नाही, तर चुकीच्या राजकर्त्यांच्या पाठीशी असणारे लोकही त्यामध्ये येतात.

संविधान हा राष्ट्रभक्तीचा विषय आहे का?

भारतीय संविधानाने नागरिकांच्या कर्तव्यांमध्ये पहिलेच कर्तव्य असे सांगितले आहे की, ‘संविधानाचे पालन करणेे आणि तत्प्रणित आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.’ या कर्तव्याचा अर्थ समजून घेताना हे सहज लक्षात येईल की, राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत याबद्दल आपल्याला जेवढा अभिमान वाटतो, तेवढा संविधानाबद्दल वाटत नाही. संविधान हे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताएवढेच तोलमोलाचे आहे; किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे, हे आपण कधी रुजवले आहे का? राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याबद्दल आपण संवेदनशील असतो, त्यांचा अवमान करणार्‍याला आपण देशद्रोही ठरवतो, तसे संविधानाचा अवमान हा सुद्धा राष्ट्राचा अवमान आहे, एवढ्या जाणिवेने आपण जेव्हा संविधानाकडे बघू तेव्हा आताचे अनेक जटिल प्रश्न सुटू लागतील.

बाबासाहेबांचा संदेश

संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय, या विचाराने माझे मन चिंताग्रस्त झाले आहे. जाती आणि धर्म या शत्रूंच्या जोडीला आता राजकीय पक्षांची भर पडणार आहे. भारतीय जनता आपल्या देशापेक्षा आपल्या धर्माला महत्त्व देईल काय अशी मला चिंता वाटते. तसे झाले तर देश पुन्हा संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही; मग आपले सर्वस्व कायमचेच नष्ट होईल.या आपत्तीपासून आपण दृढनिश्चयपूर्वक आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाणवलेली चिंता आज तंतोतंत खरी ठरत आहे. काही पक्ष देशापेक्षा धर्माला अधिक महत्त्व आणू पाहत आहेत. संविधानाचा वापर करून संविधानविरोधी कारवाया करू पाहत आहेत. संविधान बदलण्याची भाषा ऐकायला मिळाते आहे. अशा वेळी बाबासाहेबांनी दिलेले ‘संविधान धोक्यात असणं म्हणजे स्वातंत्र्य धोक्यात असणं,’ हा संदेश लक्षात घेतला पाहिजे.

संविधान बांधिलकी महोत्सव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 2007 पासून ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ आयोजित करीत आहे. यामधून गाणी, अभंग, भारूड, पोवाडा, नाटक अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून, व्याख्यानांमधून, चालता बोलता संविधान प्रबोधन फेरी, पोस्टर प्रदर्शन, प्रश्नमंजुषा इत्यादी अनेक माध्यमातून संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्यासाठी संविधान विषयावरच्या कार्यशाळा घेतल्या जातात. अशा प्रयत्नांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभागी झाले पाहिजे. कारण-

भारताचा प्राण। आहे संविधान।

तयाला जाणून। घेई घेई ॥

तयाला जाणता । जाणशी स्वतःला ।

तव अस्तित्वाला । अर्थ येई ॥

होते येथे सारे । वेगवेगळे मी ।

आता झालो आम्ही । भारतीय ॥

भूमी जरी तीच । भूमिपुत्र तेच ।

नाते हे नवेच। निर्मियेले॥

देश ना राजाचा । ना एका धर्माचा।

आता हा सर्वांचा। सर्वांसाठी ॥

स्वामी म्हणे याची। करू नका पूजा ।

सांगा एका दुजा । अर्थ याचा॥

क्रमश:

लेखक संपर्क : 9881590050