प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी आणि म. अं. नि. स. चे हितचिंतक गजानन(नाना) गोळे यांचे गेल्या 11 एप्रिल रोजी मुंबईत वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार निधनानंतर कुठलेही धार्मिक कर्मकांड करण्यात आले नाही व समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या चार संस्थांना देणग्या देण्यात आल्या. महाराष्ट्र अंनिस त्यापैकी एक. नाना गोळे यांचे चिरंजीव विनीत गोळे यांनी वडाळा येथील आपल्या घरी रूपये 50,000 चा धनादेश 11 जुलै रोजी नंदकिशोर यांजकडे सुपूर्द केला. त्यावेळी वंदनाताई शिंदे, विश्वनाथ चव्हाण व गोविंद काजरोळकर पती-पत्नी हजर होते.
सुशिला खादीवाले व शिवाजीराव खादीवाले, उदगीर, जि. लातूर यांनी समितीस रू. 25000/- देणगी दिली. त्याबद्दल अभिनंदन.
पालघर अंनिसचे उपाध्यक्ष मा. रंगराव गढरी यांनी आपली कन्या मीनलच्या लग्नात बँड, फटाके, सत्काराचे हारतुरे, वरदाव्याची घोड्यावरची वरात इ. प्रचलित प्रथांना फाटा दिला. अक्षता म्हणून तांदुळ नव्हे तर गुलाबपाकळ्यांची उधळण केली. आहेरासाठी आणलेली सर्व रक्कम वंचितांसाठी काम करणार्या महाराष्ट्र अंनिस, सिंधुताई सपकाळांचे अनाथालय, मासवण पालघरची आदिवासी मुलींचे वसतीगृह, अभिनव विद्यालय-पालघर, राष्ट्र सेवा दल, सृजन संस्था, अंबिका योग केंद्र इ. सामाजिक संघटनांना दान दिली. आलेल्या पाहुण्यांनीही मग सढळ हाताने आहेरांची बरसात केली. जवळ जवळ 1 लाख 10 हजारांची रक्कम जमा झाली.