26 जानेवारी गणतंत्र दिन; परंतु नगर जिल्ह्यात 26 जानेवारी गणतंत्रदिन साजरा करताना पोलीस प्रशासन मात्र वेगळ्याच चिंतेत होते. शनिशिंगणापूरचे गावकरीही काळजीत होते, तर विश्वस्त मंडळालाही आता पुढे काय काय घडते, याची चिंता लागून राहिली होती. धर्माचे व देवाचे तथाकथित रक्षक आक्रमक झाले होते. कारण काय तर शनिशिंगणापूरला शनिच्या चौथर्यावर प्रजासत्ताक दिनाचे दिवशी महिला प्रवेश करणार होत्या.
लातूरच्या सारा फौंडेशनच्या सारंगी महाजन त्यांच्या 133 महिला समर्थकांसह शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या रक्षणासाठी 26 जानेवारी 2016 ला डेरेदाखल झाल्या. शनिशिंगणापूरमध्ये ग्रामस्थ महिला, विश्वस्त महिला (संख्या-2), शनिमंदिर परिसरात पहाटेच येऊन थांबल्या, शनी चौथर्याभोवती पोलिसांनी अडथळे निर्माण केले. त्या अडथळ्यांच्या बाहेरच्या बाजूने ग्रामस्थ महिलांनी कडे केले. सारा फौंडेशनच्या रणरागिणी(?) परंपरा मोडीत काढून चौथर्यावर प्रवेश करू पाहणार्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना रोखण्यासाठी सज्ज झाल्या. थोडक्यात, काय तर शनिदेवाचे चौथर्यावर स्त्री गेल्यास शनिदेवाचा ओढवणारा कोप व नष्ट होणारे पावित्र्य जपण्यासाठी स्त्रियांनाच कडे करून शनिदेवाला सुरक्षा पुरवावी लागली. शनिदेवालाही सुरक्षा पुरवून त्याचं रक्षण करणार्या रणरागिणींचं कौतुक करावं तेवढं थोडंच.
28 नोव्हेंबर 2015 ला एक युवती शनिदेवाच्या चौथर्यावर गेली तिने शनीला तेल वाहिले व ती खाली आली. त्यानंतर शनिशिंगणापूर, तेथील विश्वस्त मंडळ, विश्वस्त मंडळात स्त्री-प्रतिनिधींचं नसणं या विषयावर चर्चा सुरू झाल्या. वर्तमानपत्रांमधून टीका सुरू झाली. जुने विश्वस्त मंडळ बरखास्त झाले. नवीन मंडळ नेमताना होणारी टीका टाळण्यासाठी दोन स्त्री प्रतिनिधी घेण्यात आल्या. त्यातल्या एकीला अध्यक्ष केलं. (स्त्रिया घेताना ती कोणाची सून, कोणाची भावजय हा विचार होताच) स्त्री अध्यक्ष झाल्यामुळे शनिदेवांवरचे संकट टळले नाही. अध्यक्षबाईही परंपरेची री ओढायला लागल्या. त्यांचे बोलविते धनी वेगळेच आहेत. बाईंना पुढे करून सूत्र मात्र आपल्याच हातात ठेवण्याच्या कलेचा इथेही अनुभव आला. अध्यक्षबाई पदभार स्वीकारल्यानंतर वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या, ‘मी समाजाचं प्रबोधन करेन’ हे ठळक वाक्य वाचून फार बरं वाटलं. चला एकदाचा शनी पावला(?) असंही वाटलं, पण छे! पुढचं वाक्य वाचलं अन् मनात आलं, सावित्रीमाय अजूनही आम्हाला तुझं असणं खूप गरजेचं आहे. आम्ही स्त्रिया फक्त साक्षरच झालो गं! सुशिक्षित झालोच नाहीत. शेकडो वर्षांची आमची गुलामी मानसिकता अजून नष्ट झालीच नाही. परंपरांची जळमटं अजून तशीच आहेत. बाईचं दुय्यमत्वही अजून सरळ नाही. पुढचं वाक्य होतं ‘परंपरांचा आदर करा. चौथर्यावर न जाता शनीचं दर्शन घ्या, असं मी स्त्रियांना सांगेन.’ खूप वेदना झाल्या हे वाचून, तिला सांगावं वाटतं, “बाई गं! आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यात खूप सुधारकांनी हालअपेष्टा, अवहेलना, कष्ट सहन केलेत गं! जोती-सावित्री-फातीमाबीबी, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई, आगरकर, कर्वे, शाहू महाराज, डॉ.आंबेडकर, डॉ.दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी. या सर्वांनी शिक्षणाचा वारसा तर दिलाच परंतु स्त्रीला माणूसपणही दिलं. तिचा आत्मसन्मान जागवला. सतीप्रथा, बालविवाह, विधवा केशवपन, विधवा पुनर्विवाह व सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री-शिक्षण वर्ज्य या सर्व प्रथा, परंपरा मोडीत काढत आजपर्यंतचा प्रवास आपण केला आहे. ही वाटचाल फार महत्त्वाची आहे. याच सुधारणेच्या वाटेने पुढे जाण्याऐवजी काही धर्माचे ठेकेदार, स्वार्थी लोक आपल्याला पुन्हा मागची वाट दाखवत असतील तर त्याला आपण ठाम नकार द्यायलाच हवा, विरोध करायलाच हवा.
26 जानेवारीपूर्वीच नगर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलकांना शिरूर व नगरच्या हद्दीवरील सुपे गावातच अडविण्यात आले. शनिशिंगणापूरमध्ये जाण्यार्या लोकांची कसून तपासणी होत होती. परंतु जमावबंदी आदेश असतानाही लातूरच्या सारा फौंडेशनच्या 133 महिलांना मात्र बिनदिक्कत 26 जानेवारी रोजी शनिशिंगणापूरमध्ये प्रवेश मिळाला. ग्रामस्थ व अन्य महिलांनी चौथर्यावर प्रवेश मागणार्या महिलांविरोधात निषेध नोंदवत मोर्चाही काढला. महिलाच्याच विरोधात महिलांनाच उभे करणारे कावेबाज मात्र काही अंशी का असेना यशस्वी झाले.
28 नोव्हेंबर रोजी युवती चौथर्यावर गेली होती, चौथरा अपवित्र झाला म्हणून विश्वस्तांनी चौथरा व शनिमूर्ती दुधाने अंघोळ घालून पवित्र(?) केली म्हणून ‘महाराष्ट्र अंनिस’ने 7 डिसेंबर रोजी अहमदनगर येथील कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले. कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. कलेक्टर कार्यालयाने निवेदनाची एक प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयात पाठविली. त्यावरून धर्मादाय आयुक्तांनी ‘महाराष्ट्र अंनिस’ला चुकीच्या पत्त्यावर पत्र पाठवून, “चौथरा व मूर्ती विश्वस्तांनी धुतली नाही, गावकर्यांनी धुतली. स्त्रियांना चौथर्यावर न जाऊ देणे ही परंपरा आहे. आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, आंदोलन करू नये,” असे पत्र पाठविले. त्या पत्रास ‘अंनिस’ने दि.30 जानेवारी 2016 रोजी लेखी उत्तर दिले. चौथरा विश्वस्तांनी नाही तर गावकर्यांनी धुतला. असे असेल तर मंदिर व चौथरा संपूर्णपणे विश्वस्तांच्या नियंत्रणात असतांना गावकर्यांनी अशी लिंगभेद करणारी कृती केली म्हणून विश्वस्तांनी त्यांच्यावर कारवाई केली का? आपण या कृतीसंबंधांने विश्वस्तांना विचारणा करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली का? किंवा करणार का? कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता निषेध व्यक्त करणं, धरणं-आंदोलन करणं ही कृती लेकशाही व संविधान संमत आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’ने शनिशिंगणापूर संबंधाने 2000 सालात केलेल्या शनी चौथर्यावर स्त्रियांना प्रवेश मिळण्यासाठीच्या आंदोलनानंतर 2001 सालात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, याची आपणास माहिती नाही का? असे लेखी प्रश्न या पत्राच्या उत्तरात धर्मादाय आयुक्त ऑफीस (नगर) यांना विचारण्यात आले व या पत्राची एक प्रत कलेक्टर अहमदनगर यांनाही देण्यात आली.
दि.5 फेब्रुवारी 2016 रोजी मला अहमदनगरच्या कलेक्टर कार्यालयातून फोन आला. ‘मॅडम, उद्या दुपारी 12 वाजता कलेक्टर साहेबांनी शनिशिंगणापूरच्या संबंधात बैठक बोलावली आहे. तुम्ही बैठकीला या, तुमच्या व्हॉटस् अॅपवर पत्र पाठवले आहे. मिटींगसाठी कोण कोण येणार, असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे. 14 लोकांनाच निमंत्रण आहे. त्यात ‘अंनिस’कडून तुम्ही, भूमाताच्या तृप्ती देसाई, विश्वस्त मंडळातले काही प्रतिनिधी व शिंगणापूरचे सरपंच व लोकप्रतिनिधी. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बैठकीसंबंधी बातम्या झळकल्या. 6 तारखेला 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जाताच तिथला पोलीस बंदोबस्त, प्रसारमाध्यमांचे ताफे, ओबी व्हॅन, कर्मचार्यांची लगबग हे सर्व पाहून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत होते.
बरोबर 1.30 वाजता कलेक्टर, अहमदनगर अनिल कवडे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्ष अनिता ठेटे, विश्वस्त, शिंगणापूरचे सरपंच, देवस्थान संरक्षण समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. प्रसार माध्यमांच्या कुणाही प्रतिनिधीला आत प्रवेश देण्यात आला नाही.
कलेक्टर साहेबांनी बैठक घेण्यामागची भूमिका व शनिशिंगणापूर संबंधात प्रलंबित असलेल्या याचिका याचीं माहिती देऊन समन्वयाने तोडगा निघावा, अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी शनी चौथर्यावर प्रवेश मिळालाच पाहिजे, मी शनिभक्त आहे. आज माझा उपवास आहे. मी शनीला तेल वाहून आले आहे. विश्वस्त सांगतात तशी परंपरा नव्हती व नाही, असे मत व्यक्त केले. त्यानंतर शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांच्या एका प्रतिनिधीने परंपरा पाळल्या पाहिजेत. स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्यावर जाऊन दर्शन घेता येत नाही, असे मत मांडले. त्यानंतर मी ‘अंनिस’ प्रतिनिधी म्हणून बोलले. 1) परंपरेचा आधार घेऊन स्त्रियांना चौथर्यावर प्रवेश नाकारणे भारतीय संविधानाच्या विरोधातील कृती आहे. 2) अनिष्ट परंपरा बदलायला हव्यात. (मागील चुकीच्या प्रथा, परंपरा कशा बदलल्या, याचा संदर्भ दिला.) 3) मुळात शनी चौथर्यावर स्त्रियांनी जाऊच नये, अशी परंपरा कधीही नव्हती. माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी लग्नानंतर सपत्निक चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले. 4) भारतीय संविधानानुसार स्त्री-पुरूष समानतेचे तत्त्व प्रस्थापित केले आहे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेत उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करावा, असेही संविधान सांगते. संयुक्त राष्ट्रसंघाने, स्त्रियांबाबत भेदभाव दूर करण्यासाठी केलेल्या करारातही स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करावा, असे सूचित करण्यात आले आहे व त्यावर 1993 सालात आपल्या देशाने स्वाक्षरी करून तो करार स्वीकारला आहे. म्हणून लिंगभेद करून स्त्रीला शनिचौथर्यावर प्रवेश नाकारणे गैर आहे, अशी मांडणी करत मत मांडले.
त्यानंतर विश्वस्त, शिंगणापूरचे सरपंच यांनीही परंपरांचा आदर केला पाहिजे, अशा अर्थाचीच मते पुन्हा पुन्हा मांडली. अध्यक्ष अनिता शेटे मात्र एक शब्दही बोलल्या नाहीत. मी त्यांना ‘तुमचे मत मांडा’ अशी विनंती केली असता, त्यांनी मत मांडण्यास नकार दिला. पोलीस अधीक्षकांनी या मुद्द्यांवर मत व्यक्त करताना म्हणाले की, शासनाचा, कोर्टाचा निर्णय होईलच; परंतु तोपर्यंत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अशी कोणतीही कृती करू नये. त्यानंतर मी पुन्हा ‘अंनिस’ने 2000 सालातील अहिंसक मार्गाने केलेले आंदोलन, डॉ.दाभोलकर, डॉ.श्रीराम लागू व अन्य नेत्यांना झालेली अटक, याची आठवण करून देत. सतत 15 वर्षेआमचा लिंगभेदाविरुद्धचा लढा चालू आहे. डॉ.दाभोलकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘समता वर्तावी’ असा संदेश देणारी ज्ञानेश्वरी या नेवासे तालुक्यातच ज्ञानेश्वरांनी लिहिली. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ सांगणार्या भागवत धर्माची स्थापना केली आणि मग आपण त्याच नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूरच्या शनी चौथर्यावर स्त्रियांना न जाऊ देणे म्हणजे ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरांचा अवमान काही का, असे सांगत भारतीय संविधानाचा आदर करून स्त्रियांना शनी चौथर्यावर प्रवेश देण्याबाबत आवाहन केले. लोकप्रतिनिधी आ. मुरकुटे बैठकीला उशिरा आले. त्यांनीही परंपरा पाळल्या पाहिजेत, अशा अर्थाचे मत व्यक्त केले. त्यानंतर संभाजी दहातोंडे यांनी पुन्हा ‘आजपर्यंत महिला चौथर्यावर गेल्या नाहीत. आजच ही मागणी का?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांना पुन्हा ‘अंनिस’च्या आंदोलनाची आठवण करून द्यावी लागली. शनिशिंगणापूरचे सरपंच म्हणाले की, शनी चौथर्यावर स्त्री-पुरुषांनी जाऊ नये असा आम्ही 2011 मध्ये ग्रामसभेत ठराव केला आहे. विश्वस्त म्हणाले की, आमच्या घटनेमध्येही आम्ही स्त्रियांनी चौथर्यावर जाऊ नये, असे नमूद केले आहे. त्यामुळे घटनेच्या बाहेर जाता येणार नाही. तेव्हा मी म्हणाले की, भारतीय राज्य घटनेपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. भारतीय राज्यघटनेच्या विसंगत कायदा, ठराव, निर्णय काहीही असेल ते रद्दबातल ठरते.
शेवटी भूमाता ब्रिगेड व विश्वस्त, शिंगणापूर सरपंच म्हणाले की, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. मी मात्र ‘अंनिस’च्या वतीने सांगितले की, भारतीय संविधानाच्या कक्षेत झालेला निर्णय आम्हाला मान्य असेल.
शेवटी कलेक्टर, अहमदनगर यांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर भाष्य करून, न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. कोर्टाचा निर्णय होईलच. या प्रश्नावर तोडगा निघेपावेतो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही कृती न करणेची विनंती केली. अशा प्रकारे सुमारे दीड तास चाललेली बैठक संपली. बाहेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वाट पाहत थांबले होते. बाहेर पडताच प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
दुसर्या दिवशी पुण्यात श्री श्री रविशंकर, शिंगणापूर विश्वस्त व भूमाता ब्रिगेड यांची याच विषयावर बैठक झालेचे समजते; परंतु तोडगा निघाला नाही, असेही समजते. कोणत्या प्रश्नात कोणी मध्यस्थी करावी-करू नये कोणाला नैतिक अधिकार-जबाबदारी याचे मापदंडही बदललेले दिसतात. चालायचं ‘अच्छे दिन’ आये है।
सध्या या विषयाला धरून डॉ. दाभोलकरांनी, शनिशिंगणापूर संबंधात दाखल केलेली याचिका (मुंबई उच्च न्यायालय), हाजीअली दर्ग्यासंबंधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिका, अय्यप्पा मंदिर याचिका व औरंगाबाद खंडपीठात शनिशिंगणापूर संबंधात डॉ.पवार या महिलेने दाखल केलेली याचिका अशा चार याचिका प्रलंबित आहेत पैकी दोन याचिका सुप्रीम कोर्टात आहेत. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. हे असे आहे तरीपण, हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे घरी बसणार नाही. लढेंगे-जितेंगे!
-अॅड. रंजना गवांदे
संपर्क : 9850491611