Categories
महिला

महिलांची कौमार्याची परीक्षा व पंचांसमोर नग्न विधीची शिक्षा!

मार्च - २०१६

जातपंचायतीच्या अमानुष कारभाराची प्रचिती देणार्‍या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. मअंनिसमुळे हे क्रौर्य लोकांना समजले व प्रथमच पोलिसांच्या कागदावर उतरले. कारण तीन वर्षांपूर्वी पोलिसांत जातपंचायत विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात जावे लागत असे. कायदा नसल्याने याचिकाही रद्द झाल्या होत्या. आता सामान्य माणूस पुढे येत तक्रार दाखल करत आहे. जातपंचायतीला मूठमाती अभियानाचे हे यश आहे. ‘मअंनिस’कडे आलेले हे प्रकरण मात्र काळजाचा थरकाप उडविणारे आहे.

नंदुरबार येथील एका महिलेला हा एल्गार आहे. एका समाजाच्या जातपंचायतीने तिचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुर्‍हाड हातात ठेवण्याची व शुद्धीकरणासाठी चक्क पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या जातपंचायतीच्या या फतव्याने संताप व्यक्त होत असून, सदर महिलेने ‘अंनिस’च्या मदतीने पंचाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जानुसार, (मूळ ओझर, जि. नाशिक) येथील सुनीताचा सन 2000 मध्ये नंदुरबार येथील युवकाशी विवाह झाला होता. सन 2013 मध्ये तिच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर ही महिला मुलांच्या मदतीने पतीचे दुकान चालवून उदरनिर्वाह करीत होती.

याच दरम्यान महिलेच्या मावस दिराने तिच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. आपल्या मुलांचा विचार करत तिने लग्नाला नकार देताच मावस दिराने सासू व दिराकडे खोटे आरोप केले. त्यातून या महिलेस मारहाण झाली. काही दिवसांनी मावस दिराने तिचा विनयभंगही केला. त्यानंतर महिलेने आई-वडिलांना बोलावून घेतले. याच दरम्यान जातपंचायतीच्या पंचांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन या प्रकरणाचा निवाडा जातपंचायतीत करण्याची जबरदस्ती केली. सुनीताच्या वडिलांनी जातपंचायत बसविण्याचे तीस हजार रुपये दिले. छळ करणार्‍यांना सोडून जातपंचायतीत या महिलेवरच अनैतिक संबंधांचे आरोप करण्यात आले. आरोप फेटाळूनही तिला वारंवार जातपंचायतीत बोलावण्यात आले. एकंदरीत दीड लाख रुपयांचा फटका बसला. जो पर्यंत तिच्या वरील तथाकथित कलंक दूर होत नाही, तो पर्यंत सासरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला, मारहाणही करण्यात आली. त्यामुळे ही महिला ओझर (नाशिक) येथे माहेरी राहू लागली. या दरम्यान ज्या परपुरुषाशी या महिलेचे संबंध असल्याचा जातपंचायतीत आरोप झाला, त्याने आधी नकार दिला व नंतर घूमजाव केले आणि महिलेशी आपले संबंध असल्याचे तो सांगू लागला.

त्यावर पंचकमिटीने या महिलेला सांगितले की, रात्रभर तीनशे गोवर्‍या जाळून त्यात तीन किलोची कुर्‍हाड तापवली जाईल. तुझ्या बारा वर्षांच्या मुलाच्या हातावर रुईच्या झाडाची पाच पाने कच्च्या दोर्‍याने बांधली जातील. रामाची शपथ घेऊन लालबुंद झालेली कुर्‍हाड हातावर ठेवत त्याला सात पावले चालण्यास सांगितले जाईल. कुर्‍हाडीमुळे दोरा जळाला अथवा मुलाचे हात भाजल्यास तुझ्यावरील कलंक सिद्ध होईल आणि हात भाजला नाहीतर चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध होईल. पंचाचे न्यायनिवाडे अंधश्रद्धेवर आधारित असतात, असे आपण नेहमीच म्हणतो ते यामुळेच. खरे तर चारित्र्याचा व हात भाजण्याचा काहीही कार्यकारणभाव नाही. तरीही असे अघोरी न्यायनिवाडे विविध जातपंचायतींकडून केले जातात. मागील वर्षी बीड येथील एका महिलेशी असाच प्रकार झाला. चारित्र्य शुद्ध असेल तर उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढताना तिचे हात भाजणार नाही, असे पंचांनी सांगितले होते. या महिलेने नकार दिला होता.तसाच नकार नंदुरबारच्या सुनीताने दिला.पंचांना न जुमानता ती पुन्हा ओझरला निघून आली.त्यानंतरही पंच कमिटीकडून तिच्या वडिलांना सतत फोनवर धमक्या येऊ लागल्या. तुमची मुलगी कलंकित असून, कलंकाचे निवारण करण्यासाठी तिला पंचांसमोर संपूर्ण नग्न होऊन दूध व पाण्याची अंघोळ करावी लागेल, असा अघोरी उपाय सांगण्यात आला. या प्रथेला ‘गोळ्यांची परीक्षा’ म्हटले जाते. कथित कलंकित महिलेने पंचांसमोर संपूर्ण कपडे काढून पंचांनी दिलेल्या फक्त सव्वा मीटर पारदर्शक कापडाने अंग झाकावे. एवढ्या छोट्या वस्त्राने महिलेच्या शरीराचा कोणताही एकच भाग झाकला जातो. अशा अवस्थेत तिने 107 पावले चालावे. तिच्यासोबत पंचासहित दोन महिला असतील. ते तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारतील, तर कुणी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल. मार वाचविण्यासाठी तिने पुढे पळायचे व इतर लोक तिच्या मागे पळतील. यानंतर या महिलेला पंचांसमोरच दूध व पाण्याने अंघोळ करावी लागेल. ही घाणेरडी प्रथा माणुसकीला काळिमा फासणारी आहे. असं काही होत असेल हे मानायला मन तयार होत नाही. मग जी भोगते त्या भगिनीच्या मनाची काय घालमेल होत असेल ? हे काही हरियाणा किंवा बिहार मध्ये घडत नाही तर आपल्या राज्यात घडतंय. अगदी पुण्यासहित अनेक ठिकाणी पंचांचा हा उन्माद दिसत आहे.या समाजाचे मुख्य पंच काही दिवस लाल दिव्याच्या गाडीत फिरत होते .

कोणते पुरोगामी महाराष्ट्र? कोणते सामाजिक न्यायाचे राज्य? हेच का कल्याणकारी राज्य? अजूनही आपल्या भगिनी असे जीवन जगतात. हे थांबवावे असे वाटत असेल तर तुम्हा प्रत्येकाला ‘जातपंचायत मूठमाती अभियान’ अधिक मजबूत करावे लागेल. आम्हाला तुमची सहानुभूती नव्हे, तर सहभाग हवा आहे. नंदुरबारच्या या घटनेत सुनीताने एक मोठे बंड केले. जे अजून कुणीही केले नव्हते. या प्रथेस नकार दिला. तिने पंचांना जुमानलेले नाही. त्यामुळे तिला वारंवार धमक्या येत आहेत. नाशिक विभागीय पोलीस आयुक्तांनी नंदुरबार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सुनीताने तक्रार दाखल करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेचे पुस्तक सुनीताकडे फेकून कोणते कलम लावायचे, ते तू आम्हाला शोधून सांग, अशी थट्टा केली. खरे तर या समाजातील कुणी पोलिसांत अथवा घटनात्मक न्यायालयात जात नाही.तसं करणं म्हणजे पाप समजले जाते. तरीही सुनीता परंपरेच्या बेड्या तोडून घटनात्मक न्यायालयात येऊ पाहत असताना पोलिसांनीच तिला रोखणे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. अगोदर तीन महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक गुळींग यांच्याशी मी बोलून गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती. मात्र असा अमानुष प्रकार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी संबंधित पंचांकडून लिहून घेतले व स्वतःची सुटका करवून घेतली.

खरे तर पोलीसांची अशी निष्क्रिय भुमिका जातपंचायतींना खतपाणी घालते. नंदुरबार येथील सासरच्या मंडळींचा मात्र मोठा स्वार्थ होता. एकदा की सुनीता पंचायतीच्या परीक्षेत नापास झाली तर तिला कलंकित ठरवून घटस्फोट देता येईल. या समाजात नवरा मृत पावल्यानंतरही पत्नीला घटस्फोट देता येतो. मग तिच्या नवर्‍याचे नाव लावता येत नाही. नवर्‍याच्या संपत्तीत तिला वाटा मिळत नाही. सुनीताच्या सासरची मंडळी व पंचांकडून परीक्षेसाठी आग्रह सुरू राहिला. या घटनेतील संशयिताची पुरुषाची ‘गोळ्यांची परीक्षा’ घेण्यात आली. मात्र त्यात तो नापास झाल्याने काही लाख रुपयांची शिक्षा झाल्याची चर्चा आहे. पंच सुनीताच्या घरी येऊन आग्रह करायला लागले. मार्च महिन्यातील तारीख ठरविण्यात आली. परंतु नेमके त्याच वेळी ‘अंनिस’ने पाठपुरावा केलेले कासेकापडी जातपंचायत विरोधी लढ्यातील एका महिलेचे प्रकरण सुनीताने प्रसार माध्यमात बघितले. तीची लढण्याची हिंमत वाढली. मग तिने त्या परिवाराची भेट घेतली. सर्व ऐकून तिला अजिबात धक्का बसला नाही. कारण ही प्रथा मी अनेक महिलांच्या तोंडून ऐकली होती. दोन वर्षापूर्वी याच समाजातील कौमार्याच्या परीक्षेचे प्रकरण ‘एबीपी माझा’च्या मदतीने अंनिसने समोर आणले होते अंगावर काटा आणणार्‍या कौमार्याच्या परीक्षेबद्दल सांगतांना नेहमीच त्रास होतो परंतु आपल्या भगिनी काय भोगताय ते आपण कमीत समजून घ्यायला हवं.

जात पंचायतीने ठरवून दिलेल्या रिवाजाप्रमाणे लग्नानंतरचे सारे धार्मिक सोपस्कार पार पडल्यावर पहिल्याच रात्री नवर्‍या मुलीची कौमार्याची परीक्षा घेतली जाते. तिला आणि तिच्या नवर्‍याला पंचाच्या देखरेखीखाली एका खोलीत नेण्यात येते. इतर महिलांकरवी तिला विवस्त्र करत तिची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येते. तिच्या शरीरावर जखम तर नाही ना, याची खातरजमा करत तिच्या हातातील चुडाही उतरविला जातो. सर्व आभूषणे काढली जातात. कुठे ब्लेड सारखे धारदार शस्त्र लपवले नाही, याची खात्री केली जाते. पंचांकडून मुलाचीही अशीच तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांच्या हातात एक पांढरं शुभ्र वस्त्र सोपविलं जातं. ते वस्त्र बिछान्यावर अंथरून मुला-मुलीने त्यावर झोपायचे असते. दरवाजा बाहेरील बाजूने बंद करण्यात येतो. पंच बाहेर पहारा देत दारू मटणाचा आस्वाद घेत असतात. काही वेळाने पंच बाहेरून ओरडत एक प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचे उत्तर मुलाने ‘हो’ किंवा ‘नाही’ असे द्यावे लागते. तो प्रश्न असतो की माल खरा निघाला की खोटा? एका उत्तराने मुलीचे आयुष्यच बदलून जाते. मग पंच काही व्यूहरचना आखतात. काही वेळाने जातपंचायत बसते. मुलगा-मुलगी ते पांढरं शुभ्र वस्त्र पंचाकडे देतात. मुख्य पंच ते उजेडाकडे धरुन पाहतात. शारीरीक संबंधानंतर या पांढर्‍या वस्त्रावर रक्ताचा लाल डाग नसेल तर मुलगी बदफैली आहे, तिचे चारित्र्य शुद्ध नाही, असं ठरवलं जाते. तिचे लग्न रद्द करण्यात येते. आई-वडिलांनी तिचा व्यवस्थित सांभाळ केला नाही, असे सांगून पैशांचा दंड ठोठावण्यात येतो. तो लाखांत असतो. दंडाचे मिळालेले पैसे पंच आपसांत वाटून घेतात. मग त्या मुलीने आयुष्यभर आपल्या आई-वडिलांच्या घरी बिनालग्नाचे रहायचे असते. काही वेळा दंडाची रक्कम आई-वडिलांकडे नसेल तर मुलीला अक्षरश: विकले जाते. मुलगी कौमार्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी लहानपणापासून तिच्यावर बंधन घालण्यात येतात. ती शिकल्याने तर इतर समाजात सहभागी होईल, मग कदाचित प्रेम होईल. या भीतीने तिच्या शिक्षणावर बंदी घालण्यात येते. लग्नाच्या अगोदर व नंतरही तिला असे परंपरेच्या नावाखाली बेड्यात बंदिस्त केले जाते. या प्रथा नाकारून बंड करण्याची ताकद अजून कुणातही आली नाही. मात्र प्रसार माध्यमांतील बातम्या पाहून सुनीतात ‘गोळ्याची परीक्षा’ नाकारण्याची हिंमत वाढली. ‘अंनिस’च्या पाठबळामुळे शेवट पर्यंत लढण्याचे तिने ठरवले. हा लढा लढण्याचे का ठरवले, माझ्या या प्रश्नावर सुनीताने छान उत्तर दिले, ‘सासरी काही विशेष संपत्ती नाही, त्यामुळे मला या प्रथेला विरोध करायचा आहे. फक्त मला एकटीला नाही जातीच्या सगळ्या महिलांना याच्यातून बाहेर काढायचे आहे.

अशा जातपंचायतींना मूठमाती द्यायची आहे.’ सुनीताची हिंमत पाहून माझीच हिंमत वाढली. जातपंचायतीला मूठमाती हा शब्द किती प्रचलित झाला,याचेही कौतुक वाटले.

आम्ही नाशिक जिल्हा अधीक्षक यांना निवेदन दिले. गुन्हा दुसर्‍या जिल्ह्यात घडला असला तरी नाशिकला दाखल करण्यात यावा,अशी मागणी केली. परंतु त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. मग आम्ही प्रसार माध्यमांत जाऊन सामाजिक दबाव निर्माण करण्याचे ठरविले. मग मात्र राज्यच नव्हे तर देशातील हिंदी व इंग्रजी प्रसार माध्यमांनी नोंद घेतली. आंतरराष्ट्रीय ‘एएनआय’ वाहिनी व अमेरिकेच्या नॅशनल रेडिओ सर्व्हिसनेही दखल घेतली. मग कुठे प्रशासनाला जाग आली. तिसर्‍या दिवशी ओझर पोलिसांनी ऑन कॅमेरा जबाब घेत एफ.आय.आर.नोंदवला. भा.दं.वि 354(अ) (ब),384, 504, 506, 120(ब) या कलमान्वये अकरा व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला.

प्रसार माध्यमात ही घटना पाहून याच समाजातील आणखी एक महिला पुढे आली. तिला न विचारता परस्पर घटस्फोट दिल्याने तिने तळोजा (नंदुरबार) येथील पोलिसांत याच पंचांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या समाजात घटस्फोट करण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. पतीने जातपंचायतमध्ये हजर व्हायचे. अर्थातच महिलांना ते स्वातंत्र्य नाही. पतीने बोरीच्या वृक्षाचे एक छोटे लाकूड आणायचे. जातपंचासमोर त्याचे दोन तुकडे करायचे. एक स्वतःकडे तर दुसरा बायकोकडे पोहच करायचा. झाला घटस्फोट! घटस्फोटाला काडीमोड असा दुसरा शब्द यामुळेच आला की काय? अगदी पतीचे निधन झाले असले तरी पत्नीचा दीर पंचासमोर लाकडाचे दोन तुकडे करत मृत भावाचा काडीमोड करतो.

या प्रक्रियेत महिलांच्या परवानगीचा कुठेही विचार केला जात नाही. राज्यात महिलांचे अशा प्रकारे शोषण चालू आहे. यावर्षी महिला दिन साजरा करताना महिला आयोगाला अध्यक्षाची प्रतीक्षा आहे. जातपंचायतीच्या विषयावर सरकार गंभीर नाही. सरकारचे प्राधान्यक्रम वेगळे असल्याचे दिसते आहे. मात्र दुसर्‍या बाजूने मलाला इतकेच किंवा अधिक हिमतीने या भगिनी पुढे येत आहेत, हे निश्चितच आश्वासक व अभिनंदनीय आहे.

-कृष्णा चांदगुडे

लेखक संपर्क : 9822630378