शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण झालीत. 48 महिने म्हणजे मोठा काळ. एखाद्या खुनाचा तपास लागण्यास गती देण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो, तेव्हा काहीतरी तपास पुढे सरकतो, हे सारे संतापजनक आणि अविश्वसनीय असे आहे. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही त्याच पद्धतीने खून होतो, तेथेही तपासाची हीच गत व्हावी, हे सारेच वेदनादायी आहे; पण संघटनेने आपला विवेक न गमावता याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अजूनही कसा तपास लागत नाही, याचा आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. केंद्र व राज्य सरकारला खुनाच्या तपासाबद्दल उत्तरदायी राहण्यासाठी ‘जवाब दो’ आंदोलन राज्यात सुरू झाले आहे. केवळ राज्यात नाही, तर देशाच्या राजधानीसह परराज्यांमध्येही हे आंदोलन होत आहे.
केवळ खुनाच्या तपासासाठी आग्रही नाही आम्ही. संघटनेची कार्यप्रवृत्ती ही समाजात विवेकाचा कृतिशील संवाद करण्याची आहे. म्हणून केवळ धर्मांध किंवा जमातवादी नाही, तर अन्य सर्व प्रकारच्या हिंसेला नाकारण्यासाठी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे अभियानही सुरू झाले आहे. याबद्दल महाविद्यालयांमध्ये ‘युवा संकल्प परिषदां’चे आयोजन केले जात आहे.
अशा विपरीत परिस्थितीतही संघटनेने कामाची गती आणि पोत टिकवलाय. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा प्रत्यक्षात येणं, ही संघटनेच्या कामाची मोठी उपलब्धी आहे. जातपंचायतीचं शोषण आणि त्याविरोधात संघर्ष, आंदोलने, परिषदा, संवाद आणि अखेरीस कायद्याची मागणी, त्याचा पाठपुरावा, त्याची कायदेशीर आणि संसदीय प्रक्रिया या सर्व स्तरावर अंनिसने आपला सहभाग दिला. केवळ सहभाग नाही, तर याचे नेतृत्वच केले. कायदा अस्तित्वात आल्यानंतर तातडीने तीन गुन्हेही दाखल झाले. या तत्परतेबद्दल आपल्या पुणे आणि मुंबई अंनिसचे अभिनंदनच करायला हवे. आता हा कायदा समाजापर्यंत नेण्याचं कामही आपल्याला करावं लागेल, तसेच हा कायदा प्रत्यक्षात येण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं, त्यांचे आभार मानण्यासाठी मी परवा प्रत्यक्ष मुंबईला जाऊन आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नीलमताई गोर्हे यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांच्या, अधिकार्यांच्या भेटी घेतल्या. लवकर आपल्याला या कायद्याची स्वागत परिषद घ्यायची आहे.
या कायद्याची अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांनी या कायद्याचं महत्त्व मान्य केलं. ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अॅण्ड अथिस्ट युनियन’ अमेरिकन वकिलाती अशा संस्थांनीही या कायद्याची दखल घेतली. संघटनेचं हे एक ऐतिहासिक यश आहे.
बाकी संघटना म्हणून लढवायचे मुद्दे आहेतच. ‘व्यसनमुक्ती महाराष्ट्रासाठी’ यावर काम करणार्या विविध संस्था, संघटना, चळवळी, गट, व्यक्ती अशा सर्वांच्या प्रतिनिधींचा मिळून ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच पुणे येथे वसुधा सरदार यांच्याकडे याबाबतची बैठक संपन्न झाली. याबाबत शासनाच्या व्यसनाला प्रोत्साहन देणार्या धोरणांचा निषेध करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी मुंबईला आझाद मैदानावर ‘धरणे आंदोलन’ करण्यात येणार आहे.
खान्देश आणि विदर्भाच्या काही भागांचा दौरा केला. कामाला सर्वच ठिकाणी मागणी खूप; पण आपणच ती पूर्ण करायला कमी पडतोय, अशी स्थिती आहे. कार्यकारी समितीच्या पुढाकाराने औरंगाबादला नुकतीच ‘निर्धार कार्यशाळा’ संपन्न झाली. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिवांची ही कार्यशाळा खूपच यशस्वी ठरली. यातून मिळालेली प्रेरणा संघटनेच्या वाढ-विस्ताराला उपयोगी ठरावी.
‘कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार’ यावर्षी महाराष्ट्र अंनिसला मिळाला. आपल्याच जयसिंगपूरच्या टीमनं त्याचं दिमाखदार आयोजन केलं होतं. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात आपले ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘या तीनही माणसांचा खून का झाला? तर ते ‘सत्य’ सांगत होते म्हणून आणि हे सत्य जर समाजात प्रस्थापित झाले, तर ज्यांच्या हितसंबंधांना धोका निर्माण होणार, अशा सनातनी आणि कर्मठ लोकांनी भयग्रस्त होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा, कॉ. गोविंद पानसरेंचा आणि कलबुर्गींचा खून केला. ‘सत्य’ हे केवळ सत्य आहे म्हणून विजयी होत नसते, तर सत्याला सामर्थ्याचीही जोड असावी लागते. हे सामर्थ्य निर्माण करण्याची जबाबदारी आज आपणावर आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कल्पक आणि विजिगीषू वृत्तीने हे बाळकडू आपल्याला मिळालं आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वातली लवचिकता, कल्पकता, सातत्य, चिकाटी आणि कमीपणा घेण्याची तयारी, यामुळे संघटनेला विविध क्षेत्रातली अनेक सहकारी जोडले गेले. अंनिसच्या कामाबद्दलची आत्मियता आणि बांधिलकी यातूनच उभी राहिली. हेच खरे आपले भांडवल आहे, सामर्थ्यही आहे. म्हणूनच सत्याचा विजयही निश्चित आहे.
–अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष)
संपर्क ः 9422790610