विचारांच्या क्षेत्रात लहान-मोठे कार्य करणार्या, विचारांविषयी आस्था असणार्या मंडळींनी विचारांच्या क्षेत्रातील शोचनीय परिस्थिती सुधारण्याचे काम अंतर्मुख होऊन प्रथमत: हाती घ्यायला हवे. ही गोष्ट विचारवंतांची एक संघटना बांधून वा पक्ष स्थापन करून साध्य होणारी नाही. वैयक्तिक व छोट्या समूहांच्या पातळीवर चोख, कसदार विचार करावयास लागणे, हा एक मार्ग आहे. आपल्या सह-विचारवंतांच्या वैचारिक कृतींची चोख समीक्षा करणे व अंतर्गत जिवंत चर्चा उपस्थित करणे, हा दुसरा मार्ग आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी विचार करणे, हा तिसरा मार्ग आहे. या तिन्ही मार्गांचा अवलंब करीत गेली 40-45 वर्षे मराठी विचारविश्वात मोलाची भर टाकणार्या वसंत पळशीकरांचे नुकतेच नाशिक येथे निधन झाले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची चोख समीक्षा’ करणारा त्यांचा एक प्रदीर्घ लेख प्रसिद्ध आहे. त्यांच्या निधनाने आजच्या या आव्हानात्मक परिस्थितीत अंनिसने चळवळीचा चिकित्सक हितचिंतक, ज्येष्ठ साथी गमावला आहे.
वसंतराव पळशीकरांचा जन्म हैदराबाद येथे 18 फेब्रुवारी 1936 ला झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर गांधीवादी विचारांचे संस्कार झाले. त्यामुळे ग्रामदान चळवळ, भूदान चळवळ, सर्व सेवा संघ, आनंदवन अशा कार्यात सक्रिय सहभाग असल्याने त्यांचा अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, अच्युतराव व रावसाहेब पटवर्धन, साने गुरुजी, विनोबा भावे, बाबा आमटे यांच्यासारख्या दिग्गजांशी जवळचा संबंध आला. ‘समाजप्रबोधन पत्रिका’ आणि ‘नवभारत’ या वैचारिक मासिकांचे ते प्रदीर्घ काळ संपादक होते. मार्क्स, गांधी, धर्म, कुटुंबसंस्था, राज्यसंस्था, भारतीय समाजाची आजवर होत असलेली घडण व अनेक समकालीन प्रश्न यावरील त्यांचे चिकित्सक लेखन प्रचलित दृष्टिकोनाला छेद देणारे आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक शिबिरे, संमेलने, विद्यापीठीय व इतर चर्चासत्रे यातील सहभागाद्वारे त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंनिवाचे संपादक मंडळ या ज्ञानी प्रबोधकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत आहे.