Categories
परिवर्तन

ज्योतिषी ते अंनिस कार्यकर्ता

फेब्रुवारी – २०१७

धार्मिक ते विवेकवादी’ असा प्रवास झालेल्या काही अंनिस कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास अं. नि. वार्तापत्रातून आम्ही ‘बि’घडलो या सदरातून दरमहा प्रसिद्ध करणार आहोत. कार्यकर्त्यांचा विवेकी जीवनप्रवास वाचून वाचकांना यातून प्रेरणा मिळेल.

मी प्रकाश तमण्णा हिरेमठ. वय वर्षे 43. रा. कोल्हापूर. व्यवसाय पौरोहित्य करणे. गेली 20 वर्षे मी पौरोहित्य करीत होतो, गेल्या 4 वर्षांपासून मी ज्योतिष (भविष्य) सांगणे सुद्धा चालू केले. माझ्या घरी माझे आजोबा भविष्यकथन करीत होते. मी लिंगायत समाजाचा असल्यामुळे आमच्या समाजातील लोकांचे; तसेच पोटजातीतील लोकांचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व धार्मिक विधी करणे हा आमचा पारंपरिक व्यवसायच होता आणि उदरनिर्वाहाचे साधन सुद्धा होते. माझे वडील नोकरी करीत असल्यामुळे त्यांचे विधी करण्याचे प्रमाण कमी होते. मी मात्र पौरोहित्य करून माझा उदरनिर्वाह चालवित होतो. हे करीत असताना वडिलांच्या जागी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नही करीत होतो आणि 2005 साली ठराविक बेसवर मला नोकरीवर घेण्यात आले. 2005 ते 2010 पर्यंत पाच वर्षे नोकरी केली. त्यानंतर काही कारणास्तव मला कामावरून कमी करण्यात आले. कामावरून कमी केल्यानंतर त्या खात्याविरोधात, तेथील अधिकार्‍यांच्या विरोधात मी कामगार न्यायालयात दावा दाखल केला, ज्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. हे सांगायचे कारण म्हणजे हा दावा चालू असताना मी लहानपणापासून आध्यात्मिक-धार्मिक असल्यामुळे दाव्याचा निकाल आमच्या बाजूने लागावा, आपल्याला नोकरी मिळावी, यासाठी मी कायम कुलदैवतांना अभिषेक करणे, जप करणे, वारंवार आपली जन्मकुंडली पाहणे, कुंडली पाहून निकालासंदर्भात किंवा ज्या दिवशी माझी कोर्ट तारीख असेल त्यावेळी आपणाला कसे ग्रहमान आहे. आपली बाजू त्यादिवशी स्ट्राँग असणार का, याचा अभ्यास मी करीत होतो. त्याचप्रमाणे माझे या ज्योतिषातील गुरू, माझ्यापेक्षा या विषयात सीनिअर असणारे उत्कृष्ट असे ज्योतिषी यांच्याकडून सुद्धा मार्गदर्शन घेत होतो. बर्‍याच वेळेला माझी जन्मकुंडली पाहून मला अनुकूल असणार्‍या दिवशी कोर्टाच्या तारखा घेण्याचा सल्ला मला मिळत होता. दावा करताना देखील मी जन्मकुंडली पाहून योग्यदिवशी ठराविक मुहुर्तावर दावा दाखल केला होता. त्याचप्रमाणे ठराविक एका कालावधीमध्ये निकाल माझ्या बाजूने लागणार, अशी भाकितेसुद्धा मला सांगितली जायची आणि हे सर्व ऐकून मी खूष होत होतो.

रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून बराच वेळ कुलदैवत, नक्षत्रदेवता, दाव्यासाठी आवश्यक असणारे ग्रह यांचे जप मी करीत असे. त्यानंतर पायात चपला न घालता मंदिरात जाऊन सर्व देवी-देवतांचे, नवग्रहांचे दर्शन घेऊन घरी जात असे. आजचा दिवस आपणाला कसा आहे, ते पाहत असे आणि मगच चहा, पाणी वगैरे घेत असे. असा माझा दिनक्रम असायचा. कोर्टामध्ये दावा चालू होता. तारखा पडत होत्या; पण याला गती लागत नव्हती. त्यामुळे मानसिक, आर्थिक त्रास वाढत होता. माझ्या मनात विचार यायचा, इतकं सर्व मी करीत असूनसुद्धा अजूनही निकालाच्या दिशेने वाटचाल का होत नाही? अडचणी वाढतात; पण कमी का होत नाहीत? मग मीच माझ्या मनाला म्हणत होतो की, आपण इतकं सर्व जपजाप्य, देवधर्म करतो, याचे निश्चित फळ मिळणार असून बहुतेक आपली योग्य वेळ आली नसणार, अशी मी मनाशी समजूत घालीत होतो आणि अडीच-तीन वर्षांनी माझ्या दाव्याचा निकाल लागला, तो माझ्या विरोधातच. मला काहीच समजेना. काय करावे, ते सुचेना. कोर्टात आपली बाजू भक्कम असूनसुद्धा, देवधर्म, जपजाप्य, धार्मिक विधी करूनसुद्धा आपल्या पदरी निराशा आणि ज्यांच्या विरोधात आपण दावा केलेला आहे, ते मात्र कुठलेही जपजाप्य, धार्मिक विधी करत नाहीत त्याचप्रमाणे त्यांची कायदेशीर बाजू योग्य नाही तरीदेखील त्यांच्या बाजूने निकाल? असे विचार मनात येऊन मी अस्वस्थ झालो. पुन्हा मी माझी जन्मकुंडली घेऊन संबंधित ज्योतिषांकडे गेलो. त्यांनी कुंडली बघून सांगितले की, निकाल लागलेला दिवस, ती वेळ, त्या दिवशीचे नक्षत्र हे माझ्यासाठी खराब होते. त्यामुळे निकाल माझ्याविरोधात लागल्याचे सांगितले आणि अशा बाबतीत फक्त माझीच कुंडली पाहून चालणार नाही, तर विरोधी पक्षाचीसुद्धा कुंडली पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले. तेव्हा ज्या शाखेअंतर्गत मी काम करीत होतो, त्या शाखाधिकार्‍यांची जन्मतारीख, जन्मवेळ मिळविली. कुंडली तयार केली आणि दाखविली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधी कुंडली तुमच्यापेक्षा स्ट्राँग आहे. माझ्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे, माझी कुंडली पाहून सांगणे ठीक आहे पण विरोधी म्हणजे त्या खात्याची, त्यातील मी ज्यांना जबाबदार धरले, त्या अधिकार्‍यांची, दोन्ही वकिलांची, न्यायाधीशांची कुंडली पाहून निर्णय घेतला पाहिजे. परंतु तसे होत नाही आणि तसे घडणे शक्यही नाही. तसेच निकाल ज्या दिवशी लागला तो दिवस पाहण्यापेक्षा न्यायाधीशांनी निकाल लिहिण्यास केव्हा सुरुवात केली आहे, ते पाहणे योग्य ठरले असते. मग पुन्हा मनात विचार आला की, विरोधी पक्षाची कुंडली स्ट्राँग असली तरीसुद्धा एवढ्या वर्षांत त्यांना देखील ग्रहमानाचा त्रास व्हायला पाहिजे. कारण ग्रहाचा कालावधी, त्यांची वक्री, अस्तंगत अशी स्थिती, त्यांना येणारी महादशा त्यातील अंतर्दशा, प्रत्यंतरीदशा असे बदल कायम होत असतात; पण त्यांना याचा त्रास कसा झाला नाही? असे बरेच प्रश्न मनात निर्माण झाले आणि हा सगळा विचार करून माझा हळूहळू या सर्व गोष्टींवरील, आध्यात्मिक, धार्मिक, ज्योतिष यावरील विश्वास ढळू लागला. पण या सर्व धार्मिक गोष्टींचा पगडा माझ्यावर इतका प्रचंड होता की, ते मी सोडूसुद्धा शकत नव्हतो.

माझी द्विधा मन:स्थिती निर्माण झाली. अशावेळी मी माझी कैफियत माझे मित्र पुरुषोत्तम माने, उमेश सूर्यवंशी यांच्यासमोर मांडली. ते दोघेही पुरोगामी, विवेकी, विज्ञाननिष्ठ विचारांचे. त्यांच्याकडून मला थोडाफार आधार मिळाला. मी शांतपणे विचार करून पुन्हा त्या निकालाविरोधात अपील केले आणि यावेळी माझ्या वकिलांनी पहिल्यापेक्षा जोरदार मांडणी करून त्यातील काही त्रुटी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या. अपिलामधील न्यायाधीशांनी माझ्या विरोधात लागलेला पहिला निकाल रद्द करून पुन्हा निकाल देण्याचे आदेश दिले आणि पुन्हा दावा सुरू झाला, जो आजतागायत चालू आहे. यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, धार्मिक विधी, जपजाप्य, काही रत्ने वापरण्यापेक्षा कायदेशीर बाजू, पुरावे, वकिलांची अभ्यासपूर्वक मांडणी अशा प्रकारच्या गोष्टी दाव्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी मनाशी ठरविले की, आता येथून पुढे आपण या आध्यात्मिक-धार्मिक कर्मकांड, ज्योतिष यातून बाहेर पडून वास्तवाशी निगडित विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टींचा अभ्यास, चिकित्सा करून त्याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. याची सुरुवात कशी करायची, याचा शोध कसा घ्यायचा, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मग मी माझ्या मनातील प्रश्न, धार्मिक बाबी, कर्मकांड, जपजाप्य याविषयी माझे मित्र पुरुषोत्तम माने, उमेश सूर्यवंशी यांच्याशी सल्लामसलत करू लागलो, कारण या दोघांचे वाचन फार आहे. चर्चा वाढतील, प्रश्न वाढतील, तसे त्यांच्याकडून मला श्रद्धा-अंधश्रद्धा, समज-गैरसमज, वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल माहिती मिळू लागली आणि त्यांच्याकडून मला मिळालेला वाचनाचा सल्ला मोलाचा ठरला. याच कालावधीमध्ये कोल्हापुरात मुख्याध्यापक संघ हॉल येथे झालेला ‘फलज्योतिष : समज आणि वास्तव’ हा इस्लामपूरचे प्रा. नितीन शिंदे यांचा कार्यक्रम पाहिला आणि ज्योतिषाबद्दलचा फोलपणा माझ्या लक्षात येऊ लागला. अंनिसचे वार्तापत्र वाचू लागलो. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या व्याख्यानाच्या सीडी ऐकू लागलो. डॉ. आ. ह. साळुंखे यांची चिकित्सा करायला लावणारी पुस्तके, इतिहास संशोधक अशोक राणा यांचे देव-देवता, धार्मिक विधी यावरचा खरा इतिहास सांगणारे लेख वाचू लागलो. मी अंनिस वार्तापत्राचा वर्गणीदार बनलो. अंनिसच्या मीटिंगला जाऊ लागलो. तिथे मला देवधर्म, जात-पात यापलिकडे जाऊन माणूस हा दृष्टिकोन ठेवून विचार करणारी विवेकी, विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, अभ्यासू असे लोक पाहावयास मिळाले. यातून मला खर्‍या अर्थाने कसे जगावे, कसा विचार करावा, याची समज येऊ लागली. अशा वातावरणामुळे मी भारावून गेलो. चिकित्सक झालो. अंनिसच्या कार्यक्रमांस मी जाऊ लागलो; तेथील व्याख्याने, कार्यकर्त्यांचे विचार यामुळे माझ्यात परिवर्तन घडत गेले आणि कधी मी अंनिसचा कार्यकर्ता बनलो, हे समजलेच नाही. संकटसमयी ऊठसूट धार्मिक विधी, जपजाप्य, ज्योतिष या उठाठेवी करण्यापेक्षा विवेकी, विज्ञाननिष्ठ, चिकित्सक बनून आपले मन, मेंदू, मनगट बळकट ठेवून कृती केली पाहिजे. यश नक्कीच आपल्याला मिळते, हे आता समजले आहे.

एक पुरोहित, भटजी, स्वामी म्हणून सांगायचा उद्देश हाच की, सर्व समाजसुधारक, विचारवंतांची पुस्तके वाचली, त्यांची परिवर्तनाची लढाई पाहिली की, लक्षात येते ते म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली कर्मकांड, पौरोहित्य करून आपला चरितार्थ चालविणे अयोग्य आहे. वर्षानुवर्षे आपले धार्मिक ग्रंथ, अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांचा वापर करणार्‍या धर्माच्या ठेकेदारांमुळे आपला समाज अंधश्रद्ध बनत चालला आहे. यातून त्यांचे होणारे शोषण थांबवून समाजाला विवेकी बनवून अंधश्रद्धामुक्त करण्याचा प्रयत्न मी आता करीत आहे. मला खात्री आहे की, मला जमेल तेवढे यश मी नक्कीच यात मिळवेन. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे पौरोहित्य करीत असताना ज्या योग्य चालीत मी मंत्र-स्तोत्र, आरत्या म्हणत होतो त्याच जोशपूर्ण आवाजात चळवळीची गाणी म्हणण्याचे काम मी सध्या करीत आहे.

ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली

अखंड श्रमाने ज्याने आपला देह दाखवला,

कष्ट उपसले पोटासाठी

ज्याने आपले तन आणि मन श्रमपूर्वक झिजविले

-प्रकाश त. हिरेमठ