दैवी चमत्काराचा दावा करून स्वत:च्या अंगात असलेल्या दैवी शक्तीव्दारे दर अमावस्या, पौर्णिमा व शुक्रवारी स्वत:च्या घरात दरबार भरवून अनेक अडचणीत असलेल्या भक्तांना लाखो रुपयांना गंडा घालणारा भोंदू आप्पा शरणाप्पाचा पर्दाफाश सातारा अंनिस व कराड पोलिस यांनी प्रत्यक्ष दरबारात धाड टाकून केला. मूळचा कर्नाटक राज्यातून आलेल्या या भोंदूने ओंड (ता. कराड, जि. सातारा) येथे चांगलेच बस्तान बसवले होते. गवंडीकाम करून उपजीविका करणारे सुनील विश्वास काळे राहणार चरण ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर यांना आपल्या जाळ्यात ओढून, ‘तुला मोठी करणीची बाधा आहे. ती काढली नाही तर अत्यंत वाईट घडेल आणि त्यासाठी 10 हजार रुपये खर्च येईल. तो करताच तुझा गवंडी व्यवसाय चांगला चालेल,’ असे सांगितले. पैसे देऊन दोन महिने उलटूनही काहीच फरक पडत नसल्याने परत आप्पाकडे गेल्यावर त्याने अजब उपाय सांगितला. ‘तुला देवाचे बकरे, कोंबडा-कोंबडी द्यावी लागेल. तुला तो फटका बसलेला पण कळणार नाही.’ त्यासाठी 20 हजार ते 25 हजार रुपये येताच त्याने सातारा अंनिसचे मध्यवर्ती कार्यालय गाठले व सर्व हकिकत सांगितली. याच भोंदूमुळे माझा जिवलग मित्र रमेश मानसिक स्थिती बिघडल्याने निधन पावल्याचे सांगितले.
या सर्व प्रकाराची दखल घेऊन अंनिसच्या टीमने प्रत्यक्ष एका मंगळवारी ओंडला जाऊन खात्री केली. सातारा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून कराडचे डी.वाय.एस.पी. नवनाथ ढवळे यांना फोनवर सूचना देऊन अमावस्येला भोंदूला पकडण्याचा सापळा रचला.
सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार कराडचे डी.वाय.एस.पी. नवनाथ ढवळे व सातारा एल.सी.बी.चे पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सातारा अंनिसच्या टीमने प्रत्यक्ष भोंदूच्या दरबारात धाड टाकून भोंदूच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी त्याच्याकडे सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, पोशाख, कवड्या, वेताची काठी, काळी बाहुली, कवड्यांची माळ, मोबाईल इत्यादी साहित्य असा एकूण 73 हजार 452 रूपयांचा प्रत्यक्ष मुद्देमाल सापडला.
जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण मोहिमेत अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष विभागाचे भगवान रणदिवे, सीताराम चाळके, प्रतिभा कांबळे, ए.पी.आय. विकास जाधव, ए.एस.आय. आबा जाधव, ए.एस.आय. पृथ्वीराज घोरपडे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, विजय सावंत, सागर बर्गे, रमेश बरकडे, दीपक साठे, दीपक कोळी यांनी विशेष परिश्रम केले.
– प्रशांत पोतदार, सातारा