खुलताबाद येथील हजरत शेख शाह जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी दर्ग्याजवळ आशेच्या झाडाचे फळ खाल्ल्यास मुले होतात, असा दावा करणारे मौलाना मोहम्मद समीर मुजावर यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ महाराष्ट्र अंनिसच्या शहाजी भोसले, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चोतमल या कार्यकर्त्यांनी केले.
त्याबाबत ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग यांना निवेदन दिले गेले व त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कारण त्याच्या म्हणण्यानुसार तेथील दर्ग्यासमोरील आशेच्या झाडाचे फळं ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांनी खाल्ल्यास मुली होतात, तर दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आशेच्या झाडाचे फळ खाल्यास मुले होतात….! एवढेच नव्हे, तर तृतीयपंथींना देखील मुलं होण्याचा दावा केला आहे.
त्याचबरोबर दर्गा परिसरात असलेल्या ‘परियो का तालाब’ यामध्ये महिलांनी पाच गुरुवारी रात्री अंघोळ केल्यास त्यांना झालेली बाहेरील बाधा, भूत, पिशाच्च यांच्यापासून मुक्तता मिळते. एवढेच नव्हे, तर एड्स किंवा कॅन्सरसारखे दुर्धर आजार देखील बरे होतात, असा दावा केला जातो. महाराष्ट्र अंनिसच्या टीमने खुलताबाद येथील पोलिसांच्या मदतीने येथे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले असून त्याबाबतचे पूर्ण पुरावे जमा केले आहेत. अवैज्ञानिक दावा करणार्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून औरंगाबाद ग्रामीण मुख्यालयातील पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. भिडेंचा आंबा खाऊन पोरे होतात, हे दोन्ही धर्मांतील साम्य म्हणावे लागेल.
–शहाजी भोसले, औरंगाबाद