Categories
भांडाफोड

चर्चच्या बिशपकडून लैंगिक अत्याचार

ऑक्टोबर - २०१८

एके काळी एअर इंडियाची ‘केरला नन्स, नन् ऑफ माय बिजिनेस्स’ ही जाहिरात भरपूर गाजली होती. त्याकाळी लक्षणीय प्रमाणात ख्रिश्चन्स असलेल्या केरळ राज्यात चर्च, प्रीस्ट्स व नन्सबद्दलच्या जोक्सना उधाण आले होते. परंतु नंतरच्या काळात याच राज्यातील कष्टकर्‍यांनी परदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलनात भर घातली. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ शंभर टक्के असल्यामुळे एक सुसंस्कृत राज्य म्हणून याची ओळख वाढली. परंतु अलिकडील या राज्यातील नन्सवरील लैंगिक अत्याचाराच्या बातम्या कुठल्याही सुज्ञ माणसाला अस्वस्थ करणार्‍या ठरत आहेत. त्यामुळे ‘नन् ऑफ माय बिजिनेस्स’ म्हणून या बातम्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

केरळमध्ये अलिकडेच मोठ्या प्रमाणात महाभयंकर महापूर आल्यामुळे वित्तहानी व जीवितहानीच्या संकटातून हे राज्य सावरत असताना लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांमुळे येथील सरकार अडचणीत आले आहे. एका चर्चचा बिशप आपल्यावर दोनेक वर्षे लैंगिक अत्याचार करत होता व त्याच्यावर खटला भरावा म्हणून एका ननच्या आरोपामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. कोची येथील उच्च न्यायालयासमोर पाच तरुण नन्स बैठा सत्याग्रह करत आहेत. या तरुणींच्या हातातील पोस्टर्स वाचत असताना या क्रूर कृत्याची कल्पना येईल व वाचणार्‍यांची मान शरमेने खाली जाईल. 5 मे 2014 ते 23 सप्टेंबर 2016 या दरम्यान जालंधर येथील फ्राँकिन्स मिशन होम, कुरुविलंगाडू येथे एका ननला कोंडून ठेवून बलात्कार केल्याचा आरोप तेथील बिशपवर आहे. पीडित महिलेने हे प्रकरण लावून धरलेले असून ख्रिश्चियन धर्माचे सर्वेसर्वा असलेल्या व्हॅटिकन सिटीतील पोपपर्यंत हे गार्‍हाणे नोंदले गेले आहे. शेवटी पोलिसांनी त्या बिशपला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. त्यामुळे ख्रिश्चनधर्मियांच्या जगात खळबळ उडाली आहे. बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत केरळमधील नन्सवरील लैंगिक अत्याचाराच्या बातमीला सर्व माध्यमांनी उचलून धरलेले आहे. परंतु राज्य व देशातील धार्मिक मुख्यस्थ वेळीच या गोष्टीची दखल न घेता वेळकाढूपणा करत आहेत, असे माध्यमांना वाटत आहे.

या (किंवा कुठल्याही) धर्माचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास धर्माच्या ठेकेदारांना कुठलेही धरबंद नाहीत, हे लक्षात येते. धर्मप्रचारकांच्या विरोधात कितीही सज्जड पुरावे असले तरी काही अपवाद वगळता त्यांना जबर शिक्षा झाली किंवा धर्मोपासकांच्या मनात चलबिचल झाली, असे काही होतच नाही. प्रकरण विसरून पुन्हा नव्या जोमाने धर्माचे कार्य चालत असतात असाच सर्वसामान्य अनुभव आहे. धर्माचे ठेकेदार अशा आरोपांना (व पुराव्यांना) केराची टोपली दाखवतात, असेच सामान्यांना वाटत आले आहे. ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे, त्यांना समाजाकडून सहानुभूती मिळत नसल्यामुळे ते पीडित अन्याय सहन करत जगतात किंवा आत्महत्या करून जीव देतात.

अशा प्रकारच्या बातम्या वाचत असताना मुळात काय चुकत असावे याचा विचार करावासा वाटतो. गूगलवर याविषयी शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास गेली कित्येक वर्षे या समाजात अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंबंधीची माहिती मिळते. काही ठिकाणी नन्सवर चर्चच्या बाहेरच्यांकडून; तर काही ठिकाणी चर्चमधील पदाधिकारीच अशा कारनाम्यामध्ये पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. कदाचित बायबलप्रणीत धर्मातील या कट्टर बंधनामुळे व त्याचे काटेकोर पालन करण्याच्या दबावामुळे संधी मिळाल्यास व पकडण्याची भीती नसल्यास अशा प्रकारचे गुन्हे घडत असावेत. चर्चमधील धार्मिक शिक्षण घेणार्‍या मुलांवर व आयुष्यभर धर्माची सेवा करण्याचा वसा घेतलेल्या नन्सवर सर्रासपणे अत्याचार होत असावेत. पुरुषी वर्चस्व असलेल्या या समाजात एक संघटित धर्म म्हणून मोठ्या अपेक्षेने महिला तेथे जातात व त्यातील काही लैंगिकतेचे बळी ठरतात. या धर्माच्या हितचिंतकांनी वेळोवेळी काढलेल्या ‘कोड ऑफ कंडक्ट’च्या नियमांचा उल्लंघन करत यातील काही जण असले दुष्कृत्य करतात, हे नाकारता येत नाही.

हिंदू धर्माप्रमाणे इतर धर्मांतसुद्धा धर्मचिकित्सा होत आहे. (व अशा धर्मचिकित्सेला विरोधही होत आहे.) बर्ट्रांड रसेल ते रिचर्ड डॉकिन्सपर्यंत अनेक तत्त्वज्ञांनी, नास्तिकांनी या धर्मातील उणिवांवर बोट ठेवलेले आहे. तरीसुद्धा हा धर्म अजूनही लाखो, करोडो सामान्यांना आकर्षित करत आहे. आपल्यात असल्याप्रमाणे बुवाबाजी येथे नसली, तरी या धर्माचे प्रचारक असलेले ‘इव्हँजलिस्ट्स’ना बळी पडणारे भरपूर आहेत. बातमी वाचल्यानंतर लैंगिक अत्याचार फक्त याच धर्मात होतात असे नसून हिंदू धर्मासकट जगभरातील सर्व धर्मांत कमी-जास्त प्रमाणात ते होत असतात. फक्त काही कारणांमुळे माध्यमांनी या बातमीला जास्त प्रसिद्धी दिल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला असावा. खरे पाहता या धर्माने एका मोठ्या समुदायाला काळ्याकुट्ट इतिहासातून बाहेर काढून एक प्रगत समाज म्हणून हा धर्म घडवत होता, हे आपण विसरू शकत नाही. परंतु त्याच वेळी मानवी नैसर्गिक प्रवृत्तीला नको तितके बंधन घालून अपप्रवृत्तीला उत्तेजन दिले गेले, हेही आपण विसरू शकत नाही.

धर्म नेहमीच भीतीमुळे तगून आहे. जगात हार पत्करण्याची भीती, मरणाची भीती, पालकांच्या क्रौर्याची भीती, इत्यादीमुळे धर्म नेहमीच भीतीच्या हातात हात घालून तग धरून आहे. ख्रिश्चन धर्मही याला अपवाद नाही. त्यामुळे केरळातील पीडित महिलेने एका प्रकारे या भीतीतून बाहेर पडण्याचे धैर्य दाखवल्यामुळे तिला सहानुभूती दाखवत असतानाच तिचे कौतुक करावेसे वाटते.

प्रभाकर नानावटी, पुणे