Categories
विशेष

सापेक्षता : अर्थ आणि अनर्थ

मार्च - २०१६

1905 साली आइनस्टाइनने विवक्षित सापेक्षता सिद्धांत प्रसिद्ध केला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1915 साली त्याचा व्यापक(जनरल) सापेक्षता सिद्धांत प्रसिद्ध झाला. या सिद्धांताचे मानवी संस्कृतीवर भौतिक आणि नैतिक क्षेत्रात दूरगामी परिणाम झाले. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता गुरुत्वलहरीपेक्षाही हे परिणाम समजून घेणे अधिक महत्वाचे आहे आणि हाच या लेखाचा विषय आहे.

सापेक्षतावादाचा आशय :

विवक्षित सापेक्षता सिद्धांतानुसार प्रकाशाचा वेग हा या विश्वातील अंतिम वेग आहे. कोणतीही वस्तू या वेगाला पार करू शकत नाही. मायकेलसन आणि मोर्लेयांनी केलेल्या प्रयोगातून वेगाने जाणार्‍या प्रकाश उगमापासून निघालेल्या प्रकाशवेगात उगमाचा वेग काहीही बदल करत नाही. न्यूटनचा गतिशास्त्रानुसार हा बदल व्हायला हवा. वस्तुचा वेग अधिक प्रकाशाचा वेग बरोबर प्रकाशाचा वेग हे प्रायोगिक सत्य स्वीकारून आइनस्टाइनला अजब निष्कष मिळाले. वेग, अवकाश आणि वेळ हे परस्पर सापेक्ष आहेत. हाच तो निष्कर्ष. या विश्वात निरपेक्ष आहे फक्त प्रकाशाचा वेग.

वेग, वेळ आणि अवकाश यांच्या सापेक्षतेतून काही महत्वाचे निष्कर्ष मिळत गेले. एखादी वस्तू वेगाने जात असेल तर वेगाच्या दिशेत तिची लांबी कमी होत जाते. वेग प्रकाशाइतका झाला तर तिची लांबी शून्य होईल. वेगात जात असताना घड्याळ हळू चालते हा दुसरा एक अजब निष्कर्ष. पदार्थाचे स्थिर असतानाचे वस्तुमान वेगामुळे वाढत जाते आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे वस्तुमान आणि ऊर्जा हे परस्परात रुपांतरीत होतात हा होय. हे रुपांतर E = mC2 या सूत्राने दाखविले जाते. सापेक्षता सिद्धांतापूर्वी पदार्थ आणि ऊर्जा यांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि पदार्थ अक्षयता आणि ऊर्जा अक्षयता हे स्वतंत्र नियम विज्ञानक्षेत्रात मांडले जात होते. पण सापेक्षता सिद्धांताप्रमाणे पदार्थ नष्ट करून तुल्यबळ ऊर्जा मिळविता येते हे समोर आले. उलटही घडू शकते. म्हणून या विश्वातील पदार्थ आणि ऊर्जा यांची बेरीज अक्षय आहे. हा नवा सिद्धांत मांडला गेला.

सापेक्षता आणि आपण :

तुम्हाला अशी शंका निर्माण होईल की, आपल्या भोवती सापेक्षता सिद्धांताचा अनुभव आपल्याला का येत नाही? याचे कारण पृथ्वीवरील वस्तूंचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा नगण्य असतो यात लपलेले आहे. मोटारी, आगगाडी किंवा विमान यांचे वेग प्रकाशाच्या वेगाशी नगण्य असतात. विमानाचा वेग एक हजार किलोमीटर प्रति सेकंदच्या दरम्यान असतो. प्रकाशाचा वेग तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद एवढा असतो. सापेक्षतेच्या सूत्रांमध्ये वस्तूचा वेग आणि प्रकाशाचा वेग यांच्या वर्गाचे गुणोत्तर येते. हे गुणोत्तर पृथ्वीवरल्या वेगाच्या बाबतीत शून्याच्या जवळपास येते. त्यामुळे पृथ्वीवरील पदार्थाचा वेगामुळे लांबी, वेळ किंवा वस्तुमान यांच्या किंमतीत नगण्य फरक पडतो. त्यामुळे सापेक्षतावादाचा अनुभव पृथ्वीवर आपणास येत नाही. न्यूटनचे गतीचे नियम आणि त्याचे गतिशास्त्र यावर आधारीत यंत्रांची निर्मिती किंवा इतर साधनांची निर्मिती यामध्ये सापेक्षतेच्या तत्त्वाचा विचार करण्याचे कारण नाही. मात्र अणुमधील मूलकणांची गती प्रकाशाच्या वेगाशी तुलना करण्याएवढी असते. त्याबाबतीत सापेक्षतावादाचे तत्त्व लागू पडते. सारांश, आपल्या नित्याच्या व्यवहारात सापेक्षतावादाला विचारात घेण्याचे कारण नाही.

सापेक्षतावादाचे भौतिक परिणाम :

विवक्षित सापेक्षता सिद्धांतातून निघालेला क्रांतिकारक निष्कर्ष म्हणजे E = mC2 हे सूत्र. 1939 ते 1945 पर्यंत चाललेल्या दुसर्‍या महायुद्धाचा शेवट करण्यात या सुत्रातून तयार झालेल्या अण्वस्त्राने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यू निर्वासित म्हणून अमेरिकेत आसरा घेतलेल्या आइनस्टाइनने प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली आणि आपले संशोधन चालू ठेवले. 1905 साली प्रसिद्ध झालेल्या सापेक्षता सिद्धांतातील सुत्रानुसार पदार्थापासून प्रचंड ऊर्जा मुक्त करता येईल असा निष्कर्ष निघाला होता. पण त्याला पुरावा मिळालेला नव्हता. जपान आणि जर्मनीला नमविण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी जंग जंग पछाडले होते. अशा परिस्थितीत अमेरिकन मुत्सद्यांनी आइनस्टाइनला विनंती करुन रूझवेल्टला पत्र लिहावयास सांगितले. या पत्रानुसार E = mC2 या सुत्राचा उपयोग करुन शक्तीशाली अण्वस्त्र बनविता येईल अशी सूचना रूझवेल्टला मिळाली. त्यातून अण्वस्त्र निर्मितीचा मॅन हॅटन प्रोजेक्ट आकाराला आला. गुप्तपणे अण्वस्त्र बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकण्यात आले. त्या संहाराची भीषणता एवढी होती की, लगेचच जपान दोस्त राष्ट्रांना शरण आला. आपण हे युद्ध जिंकत नाही हे लक्षात येताच जर्मनीत हिटलरनेही तळघरात आत्महत्या केली. सापेक्षतावादाचा युद्धक्षेत्रातील हा परिणाम जगाला अनुभवयाला मिळाला. मात्र या संहाराने व्यथित झालेल्या आइनस्टाइनने पुन्हा या अस्त्रांचा प्रयोग होऊ नये आणि जगात शांतता नांदावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले.

सद्यस्थितीला अनेक देश अण्वस्त्रधारी बनले आहेत. एखाद्या माथेफिरू हुकुमशहाने अण्वस्त्रे हस्तगत करुन त्यांचा वापर केला तर जगाचा विनाश होऊ शकेल. याच कारणाने सूज्ञ राष्ट्रांनी अण्वस्त्र कराराला महत्व दिले आहे.

अणुशक्तीचा दुसर्‍या महायुद्धानंतर शांततामय कारणासाठी उपयोग सुरू झाला आहे. नजिकच्या भविष्यकाळात खनिज इंधन तेलाचे साठे संपुष्टात येतील. अशी साधार भीती वैज्ञानिकांना वाटते. पर्यायी इंधन म्हणून सोलर ऊर्जा पवनचक्क्या, जलविद्युत सागरी लाटापासून वीजनिर्मिती आदी मार्गाने ऊर्जानिर्मितीचे प्रयत्न होत आहेत. पण यातून गरजेएवढी ऊर्जा मिळू शकेल असे वाटत नाही. मग अणुशक्तीशिवाय पर्याय नाही. भविष्यकाळात आपल्या उर्जेच्या गरजा पुर्‍या करण्यासाठी अणुशक्ती हा महत्त्वाचा पर्याय असेल.

अणुशक्तीचा वापर वीजनिर्मितीकडून उद्योगधंदे चालविण्यासाठी होतो. तसंच पाणबुड्यांना इंधन पुरविण्यासाठीही होतो. अण्वस्त्रावर चालणार्‍या पाणबुड्या महासागराच्या अंतर्भागातून जगभर संचार करीत आहेत.

सापेक्षता सिद्धांताचा न्युक्लिअर भौतिक विज्ञानाची संशोधनासाठी उपयोग केला जातो. मूलकण भौतिक विज्ञानात विवक्षित सापेक्षतेची सूत्रे वापरली जातात. पृथ्वीवरील इच्छित ठिकाणांकडे प्रवास करताना वाटाड्या म्हणून जी.पी.एस. (G.P.S.) साधनाचा उपयोग होतो. हे साधन आपण ड्रायव्हरजवळ बसवितो. याच्या कार्यामध्ये सापेक्षतेचे तत्त्व वापरले जाते.

मूल्यविचार : रिलॅटिव्हिटी आणि रिलॅटिव्हिझम :

1920 नंतर आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताचा जगभर बोलबाला सुरू झाला. सापेक्षता सिद्धांत प्रयोगशाळेच्या बाहेरही चर्चेत येऊ लागला. आइनस्टाइनची लोकप्रियता वाढू लागली. विसाव्या शतकातील महान जीनियस म्हणून त्याचा गौरव होऊ लागला. सामान्य लोक आणि विद्यार्थी यांचा आइनस्टाइन हा आवडता हिरो बनला. विविध जाहिरातींमध्ये आइनस्टाइनचे E = mc2 हे सूत्र झळकू लागले.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी, विवक्षित सापेक्षतावादाचा भौतिक आशय नैतिक क्षेत्रात घुसडण्याची सुरुवात झाली आणि यातून एक अनर्थकारी तत्त्वज्ञान आकाराला येऊ लागले.

राजकारण, समाजकारण, कला आणि तत्त्वज्ञान आदी क्षेत्रात सापेक्षतावादाचा विपर्यास करुन भलतेच तत्त्वज्ञान मांडले जाऊ लागले. भौतिक घटनांचा विचार करता आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताप्रमाणे या जगात निरपेक्ष गती नाही. निरपेक्ष वेळही नाही आणि निरपेक्ष अवकाशही नाही. याचा अर्थ असा, पृथ्वीवरील प्रत्येक निरीक्षकाचा विचार करता किंवा प्रत्येक संदर्भ चौकटीशी तुलना करता वेळ, वेग आणि अवकाश वेगवेगळे असतात. सर्वांसाठी एकच वेळ नाही. माझी वेळ वेगळी, तुमची वेळ वेगळी. मी मोजलेला वेग वेगळा, तुम्ही मोजलेला वेग वेगळा. म्हणजे सर्व घटना या मी सापेक्ष झाल्यात I महत्त्वाचा ठरला. मग सामाजिक आणि इतर क्षेत्रात हेच तत्त्व का लावू नये?

आपण जी मूल्ये मानतो ती वस्तुनिष्ठ स्वरुपाची असतात. याचं एक उदाहरण पाहू या.

न्यायाची निवड करताना मी निरपराधी आहे असं प्रत्येक अपराधी म्हणत असतो. मग अपराध कोणी केला? याचा निवाडा वस्तुनिष्ठपणे न्यायालयात होतो. याचप्रमाणे चांगलं-वाईट किंवा सुंदर आणि कुरूप याबाबत वस्तुनिष्ठ कसोट्या लावून मूल्यमापन करण्याची आवश्यकता असते. विशेषत: नीतीच्या क्षेत्रात चांगलं आणि वाईट याचा निवाडा काळजीपूर्वक करावा लागतो. याचबरोबर सर्व ठिकाणी सर्वकाळी सत्य असणारी वैश्विक मूल्ये सामाजिक व्यवहारात आपल्याला पाळावी लागतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सत्य, अहिंसा या मूल्यांना समाजात निरपेक्षता असते. दुसर्‍या भाषेत ही मूल्ये सर्वांना समान लागू पडतात आणि त्यांची निर्मिती ही कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते. नीतीचं क्षेत्र आणि भौतिक सृष्टीचं क्षेत्र हे स्वतंत्र आहे. निरपेक्ष नीतीमूल्ये मानवी समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक असतात. पण आइनस्टाइनच्या भौतिक सृष्टीबाबतच्या सापेक्षता सिद्धांताचा विपर्यास्त करून नीतीमूल्यांचा निरपेक्षपणा बदलण्याची प्रक्रिया विसाव्या शतकाच्या मध्यास जोर धरू लागली. यातून अनेक अनर्थकारी घटना जगाच्या पाठीवर घडत गेल्या.

चांगलं काय? आणि वाईट काय? मला जे चांगलं ते तुम्हाला चांगलं असेलच असं नाही. माझ्या दृष्टीनं जे वाईट ते वाईटच आणि त्याबाबत काही कृती करण्याचा माझा अधिकार हा योग्यच. माझी सौंदर्याची किंवा न्यायाची कल्पना ही माझीच असेल. तुमची याबाबतची धारणा तुमची असेल. सापेक्षता तत्वातून ख म्हणजे मी सुप्रीम झाला. विंदा करंदीकरांच्या कवितेत ‘प्रेम कसं असतं – तुमचं आमचं सेम असतं’ असं म्हटलंय. सापेक्षता तत्वाप्रमाणे तुमचं प्रेम वेगळं. माझं वेगळं. मी माझ्या जातीवर प्रेम करेन दुसर्‍या जातीतल्या माणसाचा द्वेष करीन. प्रेम, सत्य, करुणा ही मूल्ये शाश्वत नाहीत किंवा निरपेक्ष नाहीत ती सापेक्ष आहेत. अशा तर्‍हेने रिलॅटिव्हिटीतून रिलॅटिव्हिझम पुढं आला. यामुळे वैश्विक निरपेक्ष मूल्यांना आव्हान दिलं जाऊ लागलं. यातून पोस्ट मॉडर्न विचारसरणीला प्रोत्साहन मिळालं.

ज्यूंचा नरसंहार :

चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य, श्रेष्ठ-कनिष्ठ हे मी ठरविणार याला मूल्यांची सापेक्षता किंवा मॉरल रिलॅटिव्हिझम म्हणता येईल. डार्विनचा उत्क्रांतीवाद, शरीरशास्त्रातील जीन्सबाबत युजेनिक्सची कल्पना आणि नीतीमूल्यांची सापेक्षता यातून हिटलरने ज्यू हे ठार करण्याच्या पात्रतेचे आहेत असा निष्कर्ष काढला. जर्मन आर्य लोक हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि ज्यू लोक क्षूद्र आहेत, वाईट आहेत याला आधार देणारं विज्ञान त्यानं आपल्या प्रचारात वापरलं. कनिष्ठ, रोगग्रस्त लोकांचे जीन्स त्याप्रकारचे असतात. असे जीन्स् नष्ट केले. म्हणजे अशा जीन्स्च्या लोकांची पिढी नष्ट करून टाकली तर श्रेष्ठांवरचा भार हलका होईल. याला युजेनिक्स म्हणतात. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार जे सबल आहेत ते टिकतात बाकीचे नष्ट होतात. मग निसर्गाचा हा नियम सिद्ध होण्यास मानवी हस्तक्षेपाची मदत झाली तर ते योग्यच होईल. म्हणजे कनिष्ठांना आणि निर्बलांना संपविण्याच्या निसर्गाच्या प्रयत्नात आपलाही सहभाग हवा. असं हिटलरला वाटलं असावं आणि मला जे योग्य वाटते किंवा खरे वाटते तेच मूल्य असं मानून ज्यू मारण्याच्या पात्रतेचे आहेत असा निष्कर्ष हिटलरने काढला. उत्क्रांतीतत्त्व, युजेनिक्स आणि नैतिक सापेक्षता या विज्ञान तत्त्वाचा सामाजिक प्रश्नात उपयोग करणार्‍या हिटलरने लक्षावधी ज्यूंची कत्तल केली. नैतिक रिलॅटिव्हिझम विनाशकारी ठरला.

हिटलर, स्टॅलिन आणि तत्सम हुकुमशहांनी मी, माझी जात आणि माझी सत्ता यांचं श्रेष्ठत्व या विचारसरणीनुसार निरपराध लोकांची हत्या केली. दु:ख याचे की, ही हत्या ज्या विचारसरणीतून झाली. त्या विचारसरणीला विपर्यस्त पद्धतीने सापेक्षतावादाचे पाठबळ घेतले गेले. खरं तर आइनस्टाइनचा सापेक्षतावाद हा नैतिक प्रश्नाबद्दल काहीही सांगत नाही. सापेक्षतेचं तत्त्व हे भौतिक घडामोडींचे नियम सांगते. भौतिक नियमांचा आशय नैतिक जीवनात घुसडणे हे सर्वस्वी अज्ञानमूलक आणि चुकीचे आहे. आज जर आइनस्टाइन हयात असता तर मानवी मूल्यांचे अध:पतनासाठी आपल्या भौतिक सापेक्षता संकल्पनांचा उपयोग केला जातोय हे पाहून त्याला आतोनात दु:ख झाले असते आणि तो म्हणाला असता, ‘याची साठी केला होता का मी हा अट्टाहास?’

नीतीतत्त्वांची मोडतोड करणारा रिलॅटिव्हिझमचा अंमल आजही जगात धुमाकूळ घालतोय. धर्मश्रेष्ठता, जातीश्रेष्ठता, लिंगभेद, वर्णवर्चस्व यामध्ये निरपेक्ष, वस्तुनिष्ठ विचारांचा अभाव दिसतो. विविध संस्कृतीत असलेली भिन्नता नाकारली जाऊन माझी संस्कृतीच श्रेष्ठ, माझा धर्मच श्रेष्ठ हा अहंकार वाढविला जातो. आपल्या ताटात काय असावे हे आम्ही ठरविणार म्हणजे विशिष्ट विचारसरणीचे ठेकेदार ठरविणार हे भयंकर आहे. सर्व जग हे माझ्याच संस्कृतीप्रमाणं चालावं असा अहंकार वाढू लागला आहे. धर्माधारीत राष्ट्र ही कल्पना रिलॅटिव्हिझममधून निर्माण झाली आहे. भविष्यकाळात भारतात आणि इतरत्र अहंकारी राजसत्ता सामर्थ्यवान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं होऊ नये यासाठी निरपेक्ष नीतीमूल्ये मानणार्‍या जगातील सर्व नागरिकांनी एकत्र यायला हवे. वास्तव स्वतंत्रपणे अस्तित्वात असतं. ते तुमच्या आमच्या सापेक्ष नसतं हे भौतिक आणि नैतिक विश्वातलं खरं सत्य आहे.

-प्रा. प. रा. आर्डे