Categories
कव्हर स्टोरी

शकाराऽऽऽ…रा. शकाराऽऽऽ हालेलुईया…. हालेलुईया

मार्च - २०१६

वसईच्या मार्टिनच्या बुवाबाजीचा स्पेशल रिपोर्ट

प्रार्थनेने रोग बरे करण्याचा दावा करणारा सबॅस्टियन मार्टिन याचा भांडाफोड अंनिस व प्रसार माध्यमाने केला. त्यानंतर पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या प्रार्थना केंद्रास टाळे ठोकले. अटकेच्या भीतीने दुसर्‍यांचे रोग बरे करणारा मार्टिनबाबा आजारी पडला. त्यामुळे त्यास अजून अटक होऊ शकली नाही. या केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सादर केलेला हा स्पेशल रिपोर्टाज…

काय आहे आशीर्वाद प्रार्थना केंद्र?

‘आशीर्वाद’ हे भुईगाव-वसई येथे सेेबेस्टियन मार्टिन या स्वयंघोषित ख्रिश्चन धर्मगुरूने सुरू केलेले प्रार्थना केंद्र आहे. येथे येशूच्या नावाने अनेक दैवी चमत्कारांचे दावे केले जातात. येशू अंगात येऊन किंवा येशूच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊन अनेक असाध्य व दुर्धर आजार सुद्धा बरे होत असल्याचा दावा या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये कॅन्सर, डायबेटीस, टीबी, टायफॉईड, किडनी फेल इ. अनेक आजारांचा समावेश आहे. त्याचबरोबर कौटुंबिक कलह, दारूचे किंवा इतर व्यसन किंवा इतर कोणत्याही गंभीर समस्यासुद्धा येथे आल्यावर बर्‍या होतात, असे इथले अनेकजण सांगतात. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून हे केंद्र येथे सुरू असून येथे निवासी व एकदिवसीय अशा प्रकारची शिबिरे चालतात. एकदिवसीय शिबिरे शुक्रवार, शनिवार व रविवारी सकाळी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालतात. यामध्ये शुक्रवार हा हिंदी भाषिकांसाठी व शनिवार-रविवार हे मराठी भाषिकांसाठी असतात. या तीनही दिवशी सकाळी 9 वाजता केंद्रात प्रवेश द्यायला सुरुवात होते. सकाळी 10 वाजेपर्यंत येणार्‍यांना प्रवेश मोफत असतो. 10 नंतर येणार्‍यांना 30 रुपये दंड आकारला जातो व दु.1 नंतर 50 रुपये दंड आकारला जातो. तसेच आतमध्ये बसण्यासाठी खुर्ची हवी असल्यास तिचे भाडे म्हणून 20 रुपये घेतले जातात. शनिवार, रविवारी या ठिकाणी किमान 3 ते 4 हजार लोक येतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, यापैकी जवळजवळ 90 टक्के लोक हे वसईच्या बाहेरील व ख्रिश्चन समाजाव्यतिरिक्त असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे सकाळी 10 नंतर येणारे आणि दंड भरून प्रवेश करणारेच असतात. दुपारी 3 वाजल्यानंतर मात्र प्रवेश बंद केला जातो. कारण 3.30 वाजता यांचा तथाकथित धर्मगुरू सेबेस्टियन मार्टिन केंद्रामध्ये येतो. त्यामुळे काहीजण दुपारी 1 नंतरच फक्त सेबेस्टियन मार्टिन येणार म्हणून येतात आणि त्यांना 50 रुपये दंड भरावा लागतो. केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नसते.

चमत्कारांच्या साक्षी?

आतमध्ये गेल्यावर मी आवारातूनच (केंद्राच्या हॉलच्या बाहेरच पण गेटच्या आतमध्ये) केंद्रावर येणार्‍यांची रांग व केंद्राचे फोटो काढत होतो. इतक्यात तिथला पांढरा शर्टवाला त्यांचा कार्यकर्ता धावत आला व मला ते फोटो डिलीट करायला लावले आणि पुन्हा फोटो काढताना दिसलात, तर मोबाईल जप्त करू, असा मला त्याने दम भरला. स्टेजच्या समोर एक भला मोठा हालता अद्ययावत कॅमेरासुद्धा होता. आम्ही गेलो तेव्हा तेथे आलेल्या लोकांच्या साक्षी चालू होत्या. प्रत्येकजण पुढे येऊन आपल्याला येशूच्या चमत्काराने काय फरक पडला ते सांगत होते. कोणाचे आठवड्यापासून डोके दुखत होते. आशीर्वादित तेल लावले आणि त्यांचे डोके दुखणे बरे झाले. कोणाला चार दिवसांपासून सर्दी झाली होती. दवाखान्यातील गोळ्या खाऊनसुद्धा फरक पडत नव्हता. आशिवार्दित तेलाच्या माध्यमातून त्यांना येशूचा स्पर्श झाला आणि त्यांची सर्दी बरी झाली. हा साक्षीचा कार्यक्रम खूप मनोरंजनात्मक होता. एक साक्ष-“या भावाचे नाव मुकुंद गोसावी (काल्पनिक) आहे. हे विलेपार्लेयेथे राहतात. या भावाचे दोन दिवस खूप पोट दुखत होते. खाल्लेलं काहीही पचत नव्हतं. गोळ्या-औषधांनी सुद्धा यांना फरक पडत नव्हता. मग या भावाने येशूचे आशीर्वादित तेल लावले. त्या तेलाच्या माध्यमातून या भावाला येशूचा स्पर्श झाला आणि या भावाचे पोट दुखणे आता पूर्णपणे बरे झाले आहे म्हणून हे भाऊ येशूला धन्यवाद देतात. आलेलुईया. दुसरी साक्ष- या बहिणीला दोन दिवस खूप जुलाब होत होते. ती अतिशय त्रस्त झाली होती. मग तिने येशूचे आशीर्वादित तेल लावले आणि या बहिणीचे जुलाब बंद झाले. पण ही साक्ष द्यायला बहीण येथे येऊ शकली नाही. म्हणून या बहिणीचे पोट दुखणे पुन्हा सुरू झाले. मग पुन्हा या बहिणीने येशूचे आशीर्वादित तेल लावले आणि या बहिणीला पुन्हा येशूचा स्पर्श झाला आणि तिचे पोट दुखणे बरे झाले. म्हणून आता ही बहीण साक्ष देण्यासाठी इथे आली आहे आणि म्हणून ही बहीण येशूला धन्यवाद देत आहे. अशा प्रकारे इतक्या मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात या साक्षी चालत. काही साक्षीदारांना तर या ठिकाणी साक्षीचे निवेदन चालू असताना सुद्धा येशूच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हायचा आणि ते स्टेजवरच खाली पडायचे. एक तर अगदी 25-30 वयाचा तरुण धिप्पाड पोरगा साक्ष देताना मागे कोसळला आणि स्टेजची मागची बाजू असणार्‍या उभ्या फळ्यांना जाऊन त्याचे डोके जोरात आदळले. लगेच तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याला उठवले. पण विशेष म्हणजे त्या तरुणाच्या चेहर्‍यावर कुठेही पडल्याच्या किंवा डोक्याला लागल्याच्या भावनासुद्धा नव्हत्या. मला मात्र ते पाहून उगाच मनात वाटले की, प्रभूने जरा थोडा हळूच स्पर्श करायला हवा होता ना. असो.

प्रार्थना केंद्राची दुकानदारी

नंतर एक ते दोन जेवणाचा वेळ झाला. त्यानंतर उरलेल्या साक्षी होणार असे सांगितले. याच वेळेमध्ये ज्यांना आशीर्वादित तेल, आशीर्वादित रूमाल, आशीर्वादित स्कार्फ, आशीर्वादच्या सी.डी.ज्, डी.व्ही.डी.ज्, मासिके, साप्ताहिके असे काहीही घ्यायचे असेल तर त्याचा स्टॉलसुद्धा सुरू असणार होता. स्टॉलवर वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी; तसेच काही खाद्यपदार्थ व इतरही काही गोष्टी होत्या. यामध्ये आशीर्वादित तेल 20 रू., आशीर्वादित रूमाल 40 रू., आशीर्वादित स्कार्फ 60 रू., साप्ताहिके मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत होते तसेच मासिकेसुद्धा तिनही भाषेत होते. साप्ताहिकाची किंमत 10 रू. व मासिकाची 30 रू. होती. डी.व्ही.डी.जची किंमत साधारण 100 किंवा 200 रू.असावी तसेच अनेक पुस्तके सुद्धा तिथे होती. खाद्य पदार्थांच्या किमतीसुद्धा अशाच 20 रू., 40 रू. वगैरे होत्या. मी एक साप्ताहिक, एक मासिक व एक आशीर्वादित रूमाल घेतला तर चव्हाण सरांनी दोन डी.व्ही.डी. व दोन छोटी पुस्तके घेतली. त्याची आम्हाला पुन्हा प्रवेशाच्या वेळी होती, तीच छोटी पावती देण्यात आली. ज्यावर लिहिलेले होते ‘Valuntarily Donation for Aashirvad Prayer Centre’ आणि रिकाम्या जागेत किंमत लिहिली होती. मधल्या काळात आम्ही तिथल्या काहीजणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एक अपंग मुलगा तिथे त्याच्या खुर्चीत बसलेला होता. तो गेल्या 2-3 वर्षांपासून येत असल्याचे कळले. मग आम्ही तिथल्या केंद्राच्या कार्यकर्त्याला विचारले की, याला अजून फरक का नाही पडला? तर त्याने सांगितले की, “त्याच्यावर अजून येशूची कृपा झालेली नाही.” ‘मग ती कधी होणार?’ असे मी विचारल्यावर तो म्हणाला, की ‘ते सर्व येशूच्या इच्छेवर अवलंबून असते. ‘कधी कोणाला येशूचा स्पर्श लवकर होतो तर कधी तो खूप वर्षही होत नाही. शेवटी देव परीक्षा पाहात असतो.’ मग मी त्यांना विचारले की, ‘माझे एक नातेवाईक आहेत. ते पण खूप आजारी असतात. त्यांना जर आम्ही इथे आणले तर त्या व्हिडीओमध्ये दाखवतात, तसे त्यांना पण इथे बरे करणार का?’ तर त्यावर तो म्हणाला की, ‘असे कुणालाही वर बोलवत नाही(स्टेजवर) जेव्हा देवाच्या मनात येईल, तेव्हाच ते ज्यांच्यावर त्यांची कृपा होईल, त्याला स्टेजवर बोलावून बरे करतात.’ पुढचे सत्र सुरू होणार असल्याने त्याने आम्हाला बसायला सांगून तो निघून गेला.

साक्षीचे दुसरे सत्र सुरू झाले. सुरुवातीला काही साक्षी झाल्या नंतर तिथल्याच ट्रस्टच्या माध्यमातून चालणार्‍या शाळेतील काही मुले स्टेजवर आली आणि आपापले अनुभव सांगायला लागली. एकदा एकदम पाच-सहा मुले स्टेजवर आली. त्यातला एकजण पुढे येऊन आपला अनुभव सांगायचा आणि बाकीचे मात्र येशूच्या स्पर्शाने की काय सारखे खाली पडत होते आणि पुन्हा उठून उभे राहत होते. ही सर्व मुले साधारण चौथी ते आठवी-नववीच्या दरम्यानची वाटत होती. ज्याची साक्ष आहे त्याने पुढे यायचे व आपला अनुभव सांगायचा आणि बाकीच्यांनी सारखे खाली पडायचे-उठायचे, परत पडायचे-उठायचे, असे चालू होते. हे पडणं-उठणं पुढे वाढतच गेलं. या मुलांना धड उभेही राहता येईना आणि अचानक हे करताना एक साधारण चौथीचा मुलगा स्टेजवरून डोक्यावरच खाली पडला. तो पडल्याचा आवाज झाला आणि त्यासरशी ही बाकीची मुले जी सेकंदभरसुद्धा धड उभे राहू शकत नव्हती, ती सर्व ताडकन् उठून एका जागेवर उभी राहिली. त्यानंतर त्यातला एकही जण पुन्हा पडला नाही. स्टेजच्या खाली समोरच आणखी मुले आणि त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते बसलेले होते. त्यांनी धावत जाऊन त्या मुलाला उचलले. स्टेजची उंची तशी फार नसल्याने त्याला गंभीर काही दुखापत झाली नाही. पण त्यांनी त्याची मान-डोकं चोळून दिले आणि त्याला बाजूला आणून बसवले.

मला मात्र हे सर्व प्रकार पाहून असे वाटत होते की, ‘खरंच का येशू असं करत असेल? काय मिळेल येशूला असं करून? आणि येशूला आपल्या भक्तांवर कृपा करायचीच, तर तो त्यांना उभे राहायला शिकवील, की पडायला?’ माझ्या समोर स्टेजजवळ बसलेली ती 50-100 कोवळी मुले होती. जी या बाबाच्या तालमीत शिकून स्वत:ला मानसिक गुलाम बनवून घेणार होती. माझ्या देशाच्या भावी पिढीतील ही मुलं अशा प्रकारे बळी जाताना पाहून वाईट वाटत होतं.

मार्टिनबाबाचा चमत्कारी अवतार

तोपर्यंत साडेतीन वाजले. सेबेस्टियन मार्टिनची यायची वेळ झाली होती. सर्वजण उभे राहिले मार्टिन आला आणि प्रार्थनेला सुरुवात झाली. सर्वजण उभे राहून हात वर करून काहीतरी म्हणत होते. आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहायला लागल्यामुळे आम्हालाही हात वर करावे लागले. वातावरण एकदम भारावून गेलेले होते. साऊंड सिस्टीम पण खूप चांगली होती आणि तिथे लावलेली गाणी किंवा प्रार्थना असेल कदाचित, ती पण खूप लयबद्ध, सुंदर होती. त्यामुळे सर्व लोक त्यात गुंगून गेले होते. मध्येच काहीजण अचानक खाली पडत होते, काहीजण नाचत होते, मागे पडायला लागलेल्या काहीजणांना मागचे लोक हात लावून पुन्हा पुढे ढकलत होते. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसत होते. जवळजवळ 15 मिनिटे हे सर्व चालले. मग सर्वांना खाली बसण्यास सांगण्यात आले. मग स्टेजवर मार्टिनचे कार्यकर्तेमार्टिनच्या भोवती गोलाकार उभे राहिले आणि मार्टिनने हाताचे बोट समोर करून ‘सरासरा’ करत स्वत:भोवती एक गोल फेरी मारली आणि त्यासरशी सर्व कार्यकर्ते धडाधड खाली कोसळले. नंतर सर्व कार्यकर्तेदोन रांगा करून मार्टिनसमोर उभे राहिले. मार्टिन त्यांच्यापासून दोन हात अंतर ठेवून समोर उभा राहिला आणि ‘टच्’ असे म्हणत त्याने आपला एक हात कार्यकर्त्यांच्या दिशेने जोरात पुढे केला. त्यासरशी सर्व कार्यकर्ते धडाधड पुन्हा एकमेकांच्या अंगावर कोसळले. नंतर मार्टिनने ‘अग्नी…..’ असे म्हणताच खाली पडलेले सर्व कार्यकर्ते हातपाय आपटत ओरडायला लागले. पुन्हा ‘पाणी…(किंवा बर्फ….)’ असे म्हणताच सर्वजण हातपाय सैल सोडत सुस्कारे सोडायचे. असे एकूण दहा-पंधरा मिनिटे चालले. हे सर्व चालू असताना बॅकग्राऊंड म्युझिक आणि सर्व लोकांचा ‘हालेलुईया… हालेलुईया…’ असा आवाज चालूच होता. विशेष म्हणजे स्टेजवर हे सर्व चालू असताना खाली बसलेल्यांपैकी सुद्धा कित्येक जणांवर याचा परिणाम होत होता आणि ते सर्व सुद्धा हात-पाय झाडायचे आणि ओरडायचे प्रकार करत होते. माझ्या शेजारीच बसलेला एकजण सुद्धा हे सर्व करत होता आणि मोठमोठ्याने ओरडत होता. त्याचे हे सर्व प्रकार करून झाल्यावर तो शांत झाला, तेव्हा मी त्या माणसाला विचारले की, ‘हे सर्व तुम्ही काय करत होतात?’ तर तो मला म्हणाला की, ‘मलाच माहीत नाही, मला काय झाले ते. आपोआपच होत होते हे सर्व.’ मग मी विचारले, ‘तुम्ही कधीपासून येता इथे?’ तो म्हणाला दोन वर्षांपासून आणि तुम्हाला हे असे कधीपासून होते, असे मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘जवळपास एक वर्षापासून’ (मग माझ्या लक्षात आले की, याला मानसिक गुलाम बनण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे पहिले 1 वर्ष.) मग मी विचारले की, ‘तुम्ही इथे कसे आलात?’ तर तो म्हटला की, ‘त्याचे खूप दिवसांपासून सारखे अंग दुखायचे. कधी हात, कधी पाय तर कधी काय. सारखे दुखणे चालू होते. तो अंधेरीला एका कंपनीमध्ये मजुरीचे काम करत होता. तिथे त्याच्याबरोबर काम करणार्‍या एक जणाने त्याला केंद्राबद्दल सांगितले इथे आल्यावर त्याने आशीर्वादित तेल लावायला सुरू केले आणि त्याचे दुखायचे बंद झाले. आता त्याला सारखा सारखा त्रास होत नाही आणि झाला तरी तेल लावले की, बरे होते.’

इकडे मार्टिनने बायबलमधील कुठले तरी एक वचन घेऊन त्यावर तो बोलत होता. वचन काय होते आठवत नाही. पण त्या वचनाचा त्याने सांगितलेला अर्थ काहीसा असा होता- देवाने सांगितलंय की, तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर अविश्वास ठेवला तर तू मला मिळवू शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवूनच तुला माझ्या जवळ येता येईल. बाकी लोकांनी तुला काहीही सांगितले तरी तू माझ्यावर विश्वास ठेव- वगैरे अशा आशयाचे ते वचन होते आणि मग त्यांना अनुसरून त्याने अनेक उदाहरणे दिली. प्रार्थना केंद्राविषयी कसे कोण कोण अपप्रचार करते आणि मग काहीजणांची उदाहरणे त्याने सांगितली, ज्यामध्ये एका डी.वाय.एस.पी.चे उदाहरण होते. त्या डी.वाय.एस.पी.चा या प्रार्थना केंद्रावर अजिबात विश्वास नव्हता. पण त्याच्या पत्नीचा विश्वास होता. मग एक-एक दिवस ते दोघेही प्रार्थना केंद्रात येतात. त्यांना पहिल्या रांगेत बसवले जाते आणि इथले कार्यक्रम चालू असताना अचानक त्या डी.वाय.एस.पी.ची बायको खाली पडते आणि मग त्यांना विश्वास बसतो की खरोखर येशूचा स्पर्श होतो म्हणून.

मार्टिनबाबाचे विज्ञानवाद्यांना आव्हान!

तसेच मार्टिनबाबा म्हणाला, “अनेकजण असे म्हणतात की, जर तुमचं हे खरं असेल तर तुम्ही आम्हाला पाडून दाखवा किंवा आम्ही काही आजारी माणसे आणतो, त्यांना बरं करून दाखवा. पण मी तुम्हाला सांगतो की, ही सर्व माणसे खोटारडी आहेत, ढोंगी आहेत. तुम्ही त्यांचे ऐकू नका. कारण ‘माझ्यावर परिणाम झाला तर मी मान्य करेल’ असं म्हणणं म्हणजे इथं स्टेजवर येऊन जी लोकं बरं झाल्याचं सांगतात ती सर्व खोटी आहेत का? त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की, अशी ढोंगी माणसे तुम्हाला बाहेर खूप भेटतील. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही माणसे म्हणतात की, ‘जर तुमच्या स्पर्शात एवढी ताकद आहे, तर रस्त्याने जाणार्‍या माणसांना तुम्ही पाडू शकता का?’ पण ही माणसे एवढी खोटी असतात की, उद्या मी जर रस्त्याने जाणार्‍या दहा माणसांपैकी नऊ माणसांना जरी पाडले तरी ‘एकाला का नाही पाडले?’ म्हणून ही लोकं मला खोटं ठरवतील. तेव्हा तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही लोकं म्हणतात की, जगात कुठेही चमत्कार होत नाही. पण मी सांगतो की, इथे प्रार्थना केंद्रात फक्त चमत्कारच होत नाही, तर चमत्कारांचा पाऊस पाडला जातो आणि यासाठी मी या अंधश्रद्धावाल्यांना आणि पोलिसांना किती वेळा चॅलेंज केलंय. पण कोणीही पुढे येत नाही. कारण हे सर्व खरं आहे. कोण म्हणतं जगात चमत्कार घडत नाही? माणूस जन्माला आला हाच किती मोठा चमत्कार नाही? असे कित्येक चमत्कार जगात रोज घडत असतात, ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. कोण म्हणतं विज्ञानाने सर्व काही करता येतं? जर सर्व काही करता येत असेल तर मग जसे पाण्याची निर्मिती हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून होते, तशी दुधाची निर्मिती कशापासून होते हे सांगू शकते का विज्ञान? नाही मग कशावरून विज्ञानाला सर्व येतं? विज्ञानाला डायबेटीस बरा करता येतो? नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला करता येत नाहीत; पण त्या इथे होतात.” अशा प्रकारे खूप काय काय उदाहरणे देऊन विज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी इथं होतं आणि बाहेरची लोकं तुम्हाला इथल्या विषयी काय काय बोलू शकतील, हे सर्व सांगून तिथे येणार्‍या प्रत्येकाचा एक भक्कम बौद्धिक ताबा तो घेत होता. पण या सर्वांतून तो खूप चलाख आहे आणि त्याच्याकडे आलेल्या लोकांना पूर्णपणे बाहेरच्या विवेकी, विचारी जगापासून कसे दूर ठेवायचे याचे कौशल्य त्याला चांगलेच आत्मसात झालेले दिसत होते.

नंतर मग त्याने सर्वांना भावनिक आवाहन करायला सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून येशू माझ्या स्वप्नात येतो. माझे रोज येशूशी बोलणे होते आणि येशू मला रोज सांगायचा की, ‘या हॉलमध्ये वरच्या मजल्याचे बांधकाम लवकर करून घे. आपल्या इथे येणार्‍या महिलांची गैरसोय होता कामा नये.’ आज गुड फ्रायडेचा दिवस आहे आणि हा हॉल पूर्णपणे भरलेला आहे. हा काय निव्वळ योगायोग नाही. हे येशूने स्वत:हून घडवून आणलंय. भावनिक आवाहन करून अशा प्रकारे दिवसातून दोन वेळा दानाची पिशवी फिरवली जाते. त्यातून सरासरी किमान लाखभर रुपये तरी मिळत असतील. त्यानंतर मार्टिनबाबा निघून जातात आणि काही भाविक प्रार्थनेनंतर स्टॉलकडे जातात, तर काही घरी जाण्यासाठी बाहेर पडतात.

अंनिसची मार्टिनविरोधात पोलीसात तक्रार

दोन वेळा जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आल्यानंतर आम्ही या प्रकाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. नंदकिशोर तळाशीलकर सरांनी या संदर्भातील सर्व कायदे व त्यांची कलमे बैठकीत आम्हाला समजावून सांगितली. त्या कायद्यांच्या प्रती त्यांनी मिळवल्या. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड.दीपक भाते सरांशी या संदर्भात बोलणे झाले आणि सर्वानुमते निर्णय झाल्यावर पालघरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना यासंबंधी निवेदन देण्याचे ठरले. नंदकिशोर सरांनी ‘मध्यवर्ती’शी यासंबंधी चर्चा केली आणि दिनांक 09 एप्रिल 2015 रोजी ‘महाराष्ट्र अंनिस’चे कोकण विभाग सचिव नंदकिशोर तळाशीलकर, पालघरचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.भाते सर, मुंबईचे कार्यकर्तेविश्वनाथ चव्हाण, आदिती कुलकर्णी, पालघरचे कार्यकर्तेविद्याधर ठाकूर व मी असे आम्ही सर्वांनी मिळून पालघरचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमद सुवेझ हक यांना निवेदन दिले. या कामी भाते सरांनी व त्यांच्या ऑफीसच्या सहकार्‍यांनी खूप मेहनत घेतली. अधिक्षकांनी भेटीसाठी 11 ची वेळ दिली. तेथे वेळेत पोहोचलो पण दुपारी 4 वाजेपर्यंत ताटकळलो. 4 वाजता भेट मिळाली. त्यांच्याबरोबर त्यांचे पी.ए.मनोज लांडगे सुद्धा होते. अ‍ॅड.भाते सरांनी अधीक्षकांना आशीर्वादाची केस थोडक्यात समजावून सांगितली. त्यानंतर मी लॅपटॉप मध्ये असणारे ‘आशीर्वाद’चे काही व्ही.डी.ओ.ज् त्यांना दाखवले. ते पाहून हकसाहेब मनापासून हसले व ‘हा सर्व वेडपटपणा आहे’ हे त्यांनीही मान्य केले. पण याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्याला तक्रारदारांची गरज आहे असे त्यांचे मत होते. मग आम्ही त्यांना लातूरमध्ये ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी अशाच एका पास्टरचा भांडाफोड करून त्याला पोलिसांकडून अटक करवली. त्याचे उदाहरण सांगितले. तक्रारदारांशिवायही पोलीस स्वत: हस्तक्षेप करून अशा गोष्टी बंद करू शकतात, अशा जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदी यांना सांगितल्या. त्यावर हकसाहेब म्हणाले, ‘हे असं झालंय की, ज्याच्या घरात चोरी झाली तोही शांत आहे, ज्याने चोरी केली तो सुद्धा शांत आहे आणि शेजारी आमच्याकडे तक्रार घेऊन आले आहेत.’ त्यानंतर त्यांनी ‘या संदर्भात सरकारी वकिलांशी बोलून कायदेशीर बाबी जाणून घ्याव्या लागतील व त्यासाठी मला किमान 3 आठवड्यांचा अवधी द्या. त्यानंतर यासंबंधीची कारवाई आम्ही करू,’ असे सांगितले. त्यांनी अ‍ॅड.भाते सरांचा नंबर घेऊन या संदर्भात पुढे मदत करण्यासाठी व पोलिसांचे कायदेविषयक प्रशिक्षण घेण्याविषयी विनंती सुद्धा केली. हक साहेबांनी आमच्या समोर वसईचे पोलीस उपअधीक्षक (डी.वाय.एस.पी.) भोसले यांना फोनसुद्धा केला होता, त्यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यासंबंधी. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. शेवटी हक साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तक्रार अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कायद्यांच्या प्रती (जादूटोणा विरोधी कायदा Drugs & Magic Remedies Act, Medical Practitioner Act. IPC ची कलमे 420 व इतर इ.) आशीर्वाद केंद्रातून प्रकाशित होणारे त्यांचे साप्ताहिक, मासिक तिथे मिळणार्‍या त्यांच्या व्हिडीओ सीडीज् व यू ट्यूब वरून आम्ही डाऊनलोड केलेल्या त्यांच्या व्हिडीओज् ची सी.डी. असा सर्व दस्तऐवज अधीक्षकांचे पर्सनल असिस्टंट मनोज लांडगे यांच्याकडे सुपूर्द केले.

ख्रिस्तीबांधवांशी संवाद

दरम्यानच्या काळात आम्ही वसईमधील स्थानिक ग्रामस्थ व ख्रिश्चन समुदायातील समविचारी लोक यांच्याशी संवाद साधत होतो. वसईमधील सेवादलाच्या कार्यकर्त्या जयश्री सामंत व अ‍ॅड.भाते सर यांच्या पुढाकाराने आम्ही दि.14 एप्रिल 2015 रोजी वसई येथे एक बैठक बोलावली. यामध्ये वसईतील धर्मगुरू फादर मायकेल जी. व त्यांच्या संपर्कातून अनेक ख्रिश्चन बांधव, ज्यामध्ये मनवेल तुस्कानो व पायस मचॅडो हे निर्भय मंचचे कार्यकर्ते; तसेच फ्रान्सिस डिमिल्लो, रॉबर्ट गोम्स, पॅट्रिक फर्नांडिस, जॉन परेरा व इतर काहीजण ज्यामध्ये काही धर्मगुरू, काही हिलिंग्जवर विश्वास असणारे व त्याचे प्रयोग सतत करणारे तर काहीजण आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे समर्थक होते. तसेच जयश्री सामंत यांच्या संपर्कातून राष्ट्रसेवा दलाचे दयानंद वर्तक, दिनेश सामंत, सुनील महामुनी, विलास शशी व इतर कार्यकर्ते होते. ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे अ‍ॅड.भाते सर, भाते मॅडम, विजय परब, शुभदा निखार्गे, श्रीकांत अत्रे व मी उपस्थित होतो. ही चर्चा खूप चांगली झाली. सुरुवातीला अनेक ख्रिश्चन बांधवांचा असा गैरसमज झाला होता की, ‘महाराष्ट्र अंनिस’ ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनांना विरोध करत आहे. पण त्या चर्चेमध्ये आम्ही प्रार्थना केंद्रात केले जाणारे अनेक खोटे दावे, उपचारासाठी वापरली जाणारी अशास्त्रीय पद्धती, लोकांच्या मनात पसरवली जाणारी मानसिक गुलामी व तिथे चालणारा लाखोंचा आर्थिक व्यवहार हे सर्वांना समजावून सांगितले. तेव्हा सर्वांनी याला कडाडून विरोध केला. ख्रिश्चन धर्मामध्ये आणि बायबलमध्ये कोठेही असा उल्लेख नाही की, तुम्ही औषधे व दवाखाने सोडून फक्त प्रार्थना करत राहा. शिवाय मार्टिन याद्वारे पैसे कमावत आहे आणि त्याचे तो काय करतो हे सुद्धा तपासायला हवे, असे सर्वांचे मत झाले. मार्टिनच्या समर्थकांना सुद्धा या ख्रिश्चन बांधवांनी प्रश्न विचारले. पण त्यातील एकाही प्रश्नाला धड उत्तर मार्टिनच्या त्या समर्थकांना देता आले नाही. शेवटी सर्वांनी एकमताने ‘आपण त्याच्याशी याबाबत संवाद करण्याचा प्रयत्न करू. नाही तर त्याच्या विरोधात एकमताने आवाज उठवू’- असे ठरवले.

मार्टिनला आव्हान

या चर्चेनंतर आम्ही फादर मायकेल जी. यांच्याशी चर्चा करून पत्राचा एक नमुना तयार केला आणि तो आम्ही आशिर्वाद प्रार्थना केंद्राच्या ई-मेलवर पाठवला. त्यामध्ये सेबेस्टियन मार्टिनला संवादासाठी निमंत्रण दिलेले होते. त्याच्या अगोदर आम्ही फादर मायकेल जी. यांच्यामार्फत आशीर्वाद केंद्रात फोन करून मार्टिनला संवादासाठी आमंत्रण दिले होते. पण फोन घेणार्‍या त्याच्या कार्यकर्त्यांनी ते मान्य केले नाही व आम्हाला मार्टिनचा मोबाईल नंबरसुद्धा दिला नाही. म्हणून आम्ही शेवटी ‘आशीर्वाद’च्या वेबसाईटवर दिलेल्या ई-मेलवर ईमेल करून संवादाचे आमंत्रण दिले. पण त्याला आजतागायत काहीही उत्तर आलेले नाही. त्यानंतर आम्ही तिथल्या ख्रिश्चन बांधव, समविचारी संघटना व स्थानिक नागरिकांशी संवाद, बैठका व चर्चा चालूच ठेवल्या होत्या. मधल्या काळात आम्ही वसई चर्चचे प्रमुख बिशप मचॅडो यांनासुद्धा फादर मायकेल जी. यांच्यामार्फत पत्र पाठवून याबाबत संवादासाठी निमंत्रण दिले होते. परंतु त्यांच्याकडून सुद्धा काहीही प्रतिसाद आला नाही.

आम्ही दि.2 जुलै 2015 रोजी महाराष्ट्र अंनिसच्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे, विरारची कार्यकर्ती आदिती कुलकर्णी, पालघरचे अ‍ॅड.भाते सर व मी पालघरच्या नवीन पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांना भेटलो. त्यांना सर्व हकिकत व कागदपत्रे दिली आणि लॅपटॉप वरील व्हिडीओ दाखवले. त्यावर त्यांनीसुद्धा हा बोगस प्रकार असल्याचे मान्य केले व पुढील तपास वसईचे पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले यांच्याकडे सोपवला जाईल, असे सांगितले. परंतु त्यांनीसुद्धा याबाबत कोणाची तरी तक्रार यायला हवी, असेच सांगितले.

निष्क्रिय पोलीस प्रशासन

दोन महिने उलटून गेले. काहीच कार्यवाही नाही. 12 सप्टेंबर रोजी वसईचे पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले यांना भेटलो. आमच्या तोंडून आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे नाव ऐकताच त्यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली- आम्ही त्याबाबतीत काहीही करू शकत नाही. तो धार्मिक मुद्दा आहे. त्यामुळे धार्मिक दंगली उद्भवण्याची शक्यता आहे. सबब आम्ही काहीही हस्तक्षेप करणार नाही- त्यांच्या या प्रतिक्रियेने आम्ही चकितच झालो. मग आम्ही त्यांना आतापर्यंत आम्ही वसईतील धार्मिक लोकांशी, स्थानिक नागरिकांशी व पालघरच्या पोलीस अधीक्षकांशी केलेला संवाद सांगितला व येथील ख्रिश्चनधर्मीय लोकांचा सुद्धा त्याला विरोध आहे आणि पोलीस अधीक्षकांनी आम्हाला पुढील तपास तुमच्याकडे सोपवत आहे, असे सांगितलंय हे त्यांना सविस्तर सांगितले, मग त्यांनी वसई गाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना फोन केला व आमच्या तक्रारीवर पुढील कार्यवाही करायला सांगितले. त्यांचे शब्द होते- ‘हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याकडे आले आहेत. यांचं असं म्हणणं आहे की, आशीर्वाद केंद्रात जे चालतं, ती अंधश्रद्धा आहे. तर त्यांचा अर्ज मी तुमच्याकडे पाठवतोय तुम्ही तो बघा आणि आपल्या परीने चौकशी करा- त्यानंतर आम्ही अर्जाची पोच घेऊन तिथून निघालो.

आयबीएन लोकमतचा पाठपुरावा

अशातच दि.28 जानेवारी 2016 रोजी आय.बी.एन.लोकमत या टी.व्ही.न्यूज चॅनेलने ‘आशीर्वाद प्रार्थना केंद्रा’चा भांडाफोड करण्यास सुरुवात झाली. आय.बी.एन.ने माझी आणि नंदकिशोर यांची मुलाखत घेतली. मी आतापर्यंत ‘महाराष्ट्र अंनिस’ने प्रशासकीय पातळीवर केलेल्या कार्यवाही आणि पाठपुराव्याबद्दल दोन मिनिटांत सांगितले. त्यानंतर आम्हाला असे समजले की, तोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून ‘आमच्याकडे या संदर्भात तक्रारच आली नाही’ असे म्हटले जात होते. पण जेव्हा नंदकिशोर सरांनी(माझ्या अगोदर झालेल्या त्यांच्या बाईटमध्ये) आपण पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारींचे अर्ज आय.बी.एन.च्या बातमीमध्ये दाखवले. त्यानंतर पोलिसांना बोलायला जागाच राहिली नाही.

दुसर्‍याच दिवशी दि.29 जानेवारी रोजी आय.बी.एन. लोकमतचे रिपोर्टर विवेक कुलकर्णी यांच्यासह मी वसईमध्ये आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या ठिकाणी गेलो. तेथील ग्रामस्थांना बोलावून त्यांच्या प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. तसेच त्यावेळी नालासोपारा येथील दोन तक्रारदार वैभव राऊत व दिप्तेश पाटील हे सुद्धा तेथे आले व त्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार मीडियासमोर दिली. नंतर आम्ही वसईचे पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना संपर्क करून भेटण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण दिवसभर वाट पाहून सुद्धा पोलिसांनी पत्रकारांना काहीही प्रतिसाद दिला नाही. मग आम्ही परत माघारी गेलो. त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता मला वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा फोन आला व ‘कोणत्या कायद्यांतर्गत सेबेस्टियन मार्टिनवर कारवाई करावी असे तुमचे मत आहे?’ या विषयी चौकशी केली. त्यावेळी अर्धवट झोपेत असतानाही मी त्यांना जादूटोणा विरोधी कायद्यातील 2, 3 व 5 कलम आणि इतर कायदे याविषयी सांगितले. त्यावर त्यांनी ‘उद्या संध्याकाळी वसई पोलीस स्टेशनला येऊन सरकारी वकिलांना हे समजावून सांगा’ असे सांगितले. त्यांना होकार देऊन मी लगेच नंदकिशोर सरांना फोन करून याबद्दल सांगितले. उद्याच्या नियोजनाविषयी थोडक्यात आम्ही चर्चा केली.

अखेर गुन्हा दाखल

दुसर्‍या दिवशी दि.30 जानेवारी रोजी नंदकिशोर तळाशीलकर, वंदना शिंदे, अनिल करवीर, राजू देशपांडे, सतीश उगले, श्रीकांत अत्रे, किशोर पाटील व मी असे आम्ही सर्वजण वसई पोलीस स्टेशनला पोहोचलो. तेथे गेल्यावर बराच वेळ चर्चा करून, सरकारी वकिलांशी व पोलीस उपअधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व इतर अनेक पोलीस अधिकारी या सर्वांशी बराच वेळ खल घालून आम्ही त्यांना कायद्यांविषयीची माहिती दिली. त्याच वेळी अ‍ॅड.मुक्ता दाभोलकरांचा फोन आला. त्यांनीसुद्धा सरकारी वकिलांना कायद्याविषयी माहिती दिली. त्याचवेळी आय.बी.एन.च्या संपर्कातून आलेला तक्रारदार त्या ठिकाणी पोहोचला व त्याने लेखी तक्रार दिली. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने माझ्या नावाने आम्ही लेखी निवेदन दिले व रात्री उशिरा साधारण 11.30 च्या सुमारास त्याच्यावर (सेबेस्टियन मार्टिनवर) गुन्ह्याची नोंद झाली आणि तत्क्षणी वसईचे पोलीस ‘आशीर्वाद प्रार्थना केंद्र’ बंद करण्यासाठी भुईगावला रवाना झाले. पोलिसांनी आशीर्वाद केंद्राला टाळे ठोकले. तेथील व्यवस्थापकाला पोलीसांनी अटक केली. पोलीसकारवाईच्या भीतीने दुसर्‍याचे आजार बरा करणारा मार्टिन आजारी पडला. ठाण्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाला.

शोषणाविरुद्धची लढाई किती अवघड असते याचा हा कटू अनुभव. डोळ्यादेखत अन्याय घडत असताना सर्वसामान्य माणूस काही करायला जात नाही. आपण जातो; पण सत्ता म्हणजे पोलीस आपणाला मदत करीत नाहीत. मीडियाने आवाज उठवला तेव्हा पोलीस हलले. बुवाबाजी हटविण्यासाठी पोलीस यंत्रणा हलविण्याची चळवळ उभारावी लागणार काय?

-सचिन थिटे

लेखक संपर्क : 8424041159