Categories
पुरस्कार

‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान

एप्रिल – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणारा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान करण्यात आला…! तसेच ’जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाअंतर्गत अनेक अडचणींना तोंड देत विवाहबद्ध होऊन वेगळी वाट चोखाळणार्‍या नंदना गजभिये आणि तुषार शिंदे या नवदांपत्याला राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘नरहरी राऊत स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला…! या दोघांनीही पुरस्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतातून मअंनिस परिवाराचे आभार मानले…आणि विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू…असा निर्धार व्यक्त केला..!

निखिल वागळे यांनी 1977 साली पत्रकारितेस आरंभ केला. ‘माणूस’, ‘सोबत’, ‘साधना’ अशा नियतकालिकांमधील सदरे, ‘साप्ताहिक दिनांक’, ‘आपलं महानगर’ मधील संपादकीय लेख येथपासून ते टेलिव्हिजनवरील ‘आमने – सामने’ यांसारखे टॉक शो, ’आयबीएन लोकमत’ आणि ‘महाराष्ट्र वन’ वरील ‘ग्रेट भेट’, ‘आजचा सवाल’ यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले व नाव कमावले. या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना अनेकदा सामाजिक आणि राजकीय रोषासही बळी पडावे लागले…! ह्या सगळ्या विरोधालाही न जुमानता त्यांनी वृत्तसृष्टित आपली धडाडी आणि निर्भीडता अखंड जपली आहे…! आणि म्हणूनच हा राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार निखिल वागळे यांना प्रदान करण्यात आला…!

हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र अं.नि.स.च्या राज्यकार्यकारिणी बैठकीत राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेत 25 फेब्रुवारी 2017 रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर (ता. माणगाव जि. रायगड) येथे पार पडला…! यावेळी राज्य सरचिटजीस नितीन राऊत, जेष्ठ कामगार नेते दत्ता इसवलकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते…! 2016 वर्षासाठीचा हा पुरस्कार थॉट अँड अ‍ॅक्शन मासिकाचे संपादक असलेले ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत आणि शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला…! या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले…त्यांनी प्रास्ताविकात या पुरस्कारामागची भूमिका विषद केली…! प्रभाकर नानावटी यांनी आपल्या मनोगतात सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या उत्तुंग कार्याचा आलेख मांडला…! आणि पुरस्कारप्राप्त निखिल वागळे यांच्या कामास सदिछा व्यक्त केल्या…!

निखील वागळे म्हणाले की, पुरस्कार देऊन तुम्ही मला दटावणीच दिलेली आहे की, आता तुम्हाला हा मार्ग सोडता येणार नाही. पण पुरस्कार मिळाल्यावर पाठीवर थाप मारल्यासारखं होतं, तुम्ही जे करता ते योग्य आहे, असं सांगितलं जातं! आणि पुढेही तुम्हाला हे करायचं आहे, असंही बजावलं जातं! 1977 पासून माझी पत्रकारितेत 40 वर्षे झाली आणि जी काही आणखी वर्षे पत्रकारितेत जातील, ती सर्व ही विवेकवादी पत्रकारिता करण्यामध्ये जातील, असं त्यांनी श्रोत्यांना आश्वस्त केलं…! तुषार आणि नंदना या तरुण दाम्पत्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांनी विवाह करताना प्रस्थापित समाजापेक्षा वेगळी वाट निवडली आहे, म्हणून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो…! हा पुरस्कार स्वीकरताना नरेंद्र दाभोलकरांची आठवण प्रकर्षाने येत असल्याचे त्यांनी नमूद केलं…!

संघटना चालवत असताना नवनवीन माध्यमे हाताळावी लागतील हे सांगताना त्यांनी सोशल मीडियाच्या वापराबद्दल आग्रही प्रतिपादन केलं…! मी तुमचाच आणि तुमच्यातलाच माणूस आहे, हे सांगून त्यांनी महिन्याला एक या प्रमाणे वर्षातले 12 दिवस तुमच्या संघटनेला देईन… असे आश्वासन दिले…! महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचं नेतृत्व अंनिसने करावं… असा आशावादही त्यांनी संघटनेकडून व्यक्त केला…! त्यांनतर कामगार नेते दत्ता इसवकर यांनी या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या…!

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या मनोगतात चळवळीच्या पुढील ध्येयधोरणांचा पुनरुच्चार केला… निखिल वागळे यांनी संघटनेकडून व्यक्त केलेल्या अपेक्षाबद्दल सकारत्मक प्रतिसाद देऊन त्यानी त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छाही व्यक्त केल्या…!

या कार्यक्रमाचे आभार राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी मानले आणि सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले…! या कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून जवळपास 200 लोक उपस्थित होते…!

विनायक होगाडे