Categories
कार्याध्यक्षांची डायरी

पोहरागड लक्षचंडी यज्ञापासून व्हा सावधान! प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा

एप्रिल – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेली जवळपास 28 वर्षे देवा-धर्माच्या नावाने केली जाणारी बुवाबाजी, चमत्कारांचा दावा, अघोरी-अमानुष अंधश्रद्धा, कालबाह्य-शोषण करणार्‍या रूढी-प्रथा-परंपरा आणि पर्यावरणाचा व मानवतेचा र्‍हास करणार्‍या कर्मकांडांच्या विरोधात प्रबोधन, संघर्ष, रचनात्मक मार्गाने कार्य करीत आहे हे आपण जाणत असाल, अशी अपेक्षा आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथील बंजारा समाजाचे देवस्थानाच्या पुढाकाराने दि. 24 मार्च ते 4 एप्रिल 2017 दरम्यान लक्षचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. त्यामधे 60 टन साजूक तूप, हजारो क्विंटल धान्य आदी जीवनापयोगी पदार्थ जाळण्यात येणार आहेत. हे करण्यामागे पोहरागड येथील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सेवालाल महाराज मंदिर देवस्थानचे पुजारी रामरावबापू महाराज यांचा पुढाकार आहे, असे समजते. त्यासाठी बंजारा समाजातील बांधवांच्या गाव तांड्यांमधून प्रत्येकी धान्य, वस्तू, रोख रक्कम देणगी स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला असल्याचे समजते. यामधून जमा होणा-यातील 5 ते 10 कोटी रुपये लक्षचंडी यज्ञासाठी खर्च केले जाणार असल्याबाबत बंजारा समाज बांधव व इतर समाजात जोरदार चर्चा आहे.

अशा प्रकारे बंजारा समाजातील लोकांच्या भावनांना आवाहन करून, श्रद्धेला हात घालून त्यांना यज्ञासारख्या अवैज्ञानिक कृती करायला बाध्य करणे चुकीचे आहे. यज्ञ संस्कृतीचा निषेध व विरोध प्राचीन चार्वाक-लोकायत परंपरेपासून बुद्ध, महावीर, संत, समाजसुधारक फुले-शाहू-आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत अनेकांनी अनेकदा केलेला आहे. यज्ञाच्या कर्मकांडाचे केले जात असलेले विविध दावे विवादास्पद भ्रमित करणारे आहेत. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, कार्यकारणभाव नाही. लक्षचंडी यज्ञ आयोजित करणार्‍यांवर, समर्थन करणार्‍यांवर आणि त्यानिमित्ताने बंजारा समाजात दहशत निर्माण करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.

लक्षचंडी यज्ञाच्या निमित्ताने केले जाणारे विविध चमत्कार व वादग्रस्त ठरणारे दावे, धाकदपटशा, धार्मिक-जातीय दहशत दाखवून जमा केली जाणारी संपत्ती; यज्ञामध्ये जाळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तूप, दूध, दही, कडधान्ये आणि फळे-फुले आदी जीवनावश्यक वस्तूंचा गैरवापर आणि त्याचवेळी दिशाभूल, फसवणूक व मानसिक गुलामीला प्रोत्साहित करणारे वर्तन यासाठी जबाबदार आयोजक पोहरागड येथील सेवालाल मंदिराचे पुजारी रामरावबापू महाराज आणि इतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात येत आहे. चमत्कारी दावे करण्याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत यज्ञाच्या नावाने वादग्रस्त दावे करून वस्तु व देणगी संकलन करण्याच्या विरोधात ग्राहक संरक्षण कायदा, भारतीय दंड विधान 420 कलम, धर्मादाय विश्वस्त संस्थाविषयक कायदा, आयकर विनिमय कायदा (इन्कम टॅक्स) या अंतर्गत; तसेच यज्ञात जीवनावश्यक वस्तू जाळण्याच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण वाशिम जिल्हा यंत्रणेतील संबंधित अधिकारी वर्गाला सूचित करावे आणि तातडीने कारवाई करण्यास सांगावे अशी आमची अपेक्षा आहे. कारण पोहरागड येथे उद्यापासुन म्हणजे दि. 24 मार्च 2017 पासून लक्षचंडी यज्ञाला आरंभ केला जात आहे. त्यामार्फत होणारी दिशाभूल, फसवणूक व चमत्कारी दाव्यांमुळे बंजारा समाजातील भक्तगणांना वाचविता येऊ शकेल असे वाटते.

आपण पुढाकार घेऊन वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून अधिकारांचा वापर कराल, अशी रास्त आशा आम्ही बाळगून आहोत.

– अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस

संपर्क ः 9422790610