Categories
चळवळ

बदल घडतोय : जातपंचायतीने केला अंनिसच्या अ‍ॅड. रंजनाताईंचा गौरव

एप्रिल – २०१७

भटक्या जोशी समाजातील प्रमिला कुंभारकरने आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचांनी तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. पुढे प्रमिला जातीबाहेरच्या पुरुषापासून गरोदर असल्याचे समजल्यावर, दुसर्‍या जातीच्या पुरुषाचा वंश तिच्या पोटात वाढतो म्हणून प्रमिलाच्या वडिलांवर आणखी दबाव आणला. त्यासंबंधाने कृष्णा चांदगुडे व नाशिकमधील अंनिसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तशी तक्रार केली. तक्रारीचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून जातपंचांना अटक करणे भाग पाडले. या प्रकरणात कार्यकर्त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. राजकीय हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात झाला. या प्रकरणातूनच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली ‘जातपंचायत मूठमाती अभियाना’ची सुरुवात झाली. कार्यकर्ते आपापल्या परीने काम करत राहिले.

जोशी समाजाने ही काळाची पावले ओळखून ‘जात पंचायत’ बरखास्त केली. त्यांनी अखिल भटका जोशी समाजसेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. यावर्षी त्यांनी या जोशी समाजाची परिवर्तन परिषद बहुजन क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली. या परिषदेत विधवा व घटस्फोटित स्त्रियांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, अशी परिवर्तनवादी भूमिका घेऊन प्रबोधन केले. या परिषदेसाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. 17 तारखेला मी, संगमनेरचे कार्यकर्ते प्रशांत पानसरे, अश्विन बोर्डे, श्रीरामपूरचे आनंदा साळवे, अंनिसचे मार्गदर्शक कॉ. बाबा आरगडे, शेवगावचे डॉ. लढ्ढा, गायकवाड सर व अन्य साथी परिषदेला हजर होते. जोशी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वामन मापारी, जालिंदर गोंडे, शिवाजी पोटे, नारायण गदाई, डॉ. बाजीराव अटक व अन्य सुमारे सहाशे बांधव उपस्थित होते. त्यात त्यांनी समाजाच्या मुलांचे शिक्षण, नोकर्‍या, व्यवसाय या संबंधाने महत्त्वाचे निर्णय घेतले. समाजापुढील प्रश्न प्रश्न मांडण्यात आले. कार्यकर्त्यांचे चिवटपणे, संयमी वृत्तीने चालणारे काम, पीडितांना मिळालेला न्याय यातून समाजातही जातपंचायतीच्या शोषणाविरोधात चांगली जागृती झाली. एवढेच नाही, तर विरोध करणार्‍या जातपंचांची व त्यांना बळ देणार्‍या घटकांचीही मानसिकता बदलली. त्याच बदललेल्या मानसिकतेचा परिपाक म्हणजे दिनांक 17 मार्च 2017 रोजी मढी येथे अखिल भटका जोशी समाजाने मानपत्र व ‘समाजभूषण पुरस्कार देऊन केलेला माझा सत्कार. हा सन्मान माझा म्हणजे कुणा व्यक्तीचा नाही, तर तो महाराष्ट्र अंनिसचा सत्कार आहे. जोशी समाजापासून सुरू झालेली ही लढाई सत्कार व मानपत्रापर्यंत येऊन ठेवली आहे. समाज बदलतो आहे. शासन त्वरेने कायदा करेल व पीडितांना न्याय मिळेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. लढेगे-जितेंगे.

– अ‍ॅड. रंजना गवांदे, संगमनेर