Categories
फसवे विज्ञान

फसवे विज्ञान : डोळ्याविना दृष्टी

फेब्रुवारी – २०१५

केवळ हस्तस्पर्शाने डोळे बंद करून वस्तू ओळखण्याचे प्रयोग विविध काळात रशिया व जगभर केले जात होते. चिकित्सेच्या प्रकाशात हे प्रयोग म्हणजे बुवाबाजीच होती. सहावे ज्ञानेंद्रिय उत्तेजित करून अचाट ज्ञान सामर्थ्य येते असे दावे अधूनमधून काही मंडळी करतात पण पडताळा घेतल्यावर ते उताणे पडतात. सहावे इंद्रिय हे वास्तव नाही. जगभरातील डोळे बंद स्थितीत पाहण्याच्या प्रयोगाची(eyeless vision) लाट आता भारतातही पोचली आहे. अशा फसव्या प्रयोगांचा पर्दाफाश जगभर कसा झाला त्याचा रिपोर्ट सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल.

डोळ्याविना दृष्टीचे प्रयोग जगभरातील जादूगार करत आले आहेत. या प्रयोगात ते नाकफटी तंत्राचा उपयोग करतात. डोळे बांधले तरी नाकाजवळ बारीक फट राहतेच. या फटीतून पाहता येते. मोठ्याने श्वास घेऊन ही फट बनविता येते. सरावाने हे कौशल्य मिळविता येते.

डोळे बांधून देखील नाकफटीतून पहाता येते. या तंत्राचा वापर करून, रशियन बाई रोझा कुलेशोव्हा हिने वैज्ञानिक व मानसशास्त्रज्ञ यांना उल्लू बनविले. तिच्या प्रयोगानंतर डोळ्याविना पहाण्याच्या प्रयोगाची लाटच रशियात पसरली. तिचे लोण अमेरिका व युरोपमध्येही पसरले. कुलजिना या रशियन बाईने वैज्ञानिकाच्या समोर डोळेबंद स्थितीत केवळ स्पर्शाने वस्तू ओळखल्या.

डोळ्यांवर कापड व त्याखाली कापसाचे बोळे ठेवून पट्टी बांधून कोणत्याही वस्तू ओेळखणे किंवा गणिते सोडविणं इत्यादी गोष्टी या कोणासही सहज करता येतात. हा एक जादूचा प्रकार आहे. तो सरावाने कोणासही करता येतो. त्यासाठी एमबीएचा कोर्स करण्याची गरज नाही. जर एमबीएचा पुरस्कर्ता ही जादू दाखविण्यास तयार झाला तर त्याच्या संपूर्ण चेहर्‍यावर जाड कापड टाकून चेहरा झाका. आणि डोळ्यांवर पट्टी बांधा आणि पुन्हा त्यावर एक जाड कापड घालून चेहरा झाका. फक्त डोळे झाकायचे नाहीत. आणि चाचणी घ्या. बिंग फुटेल. कारण डोळे व नाक यांच्यामध्ये असणारी फट या लहान मुलांना सर्व काही दाखविते. ही फट पूर्ण झाकली गेल्यावर काहीही दिसत नाही.

अशा प्रयोगातील खोटेपणा वैज्ञानिकांनाही कळत नाही पण जादूगार त्यातील युक्ती ओळखू शकतात. नाक फटीतून पहाता येणार नाही अशी व्यवस्था केली व पूर्ण नियंत्रितपणे प्रयोग केले तर कोणालाही नजरेशिवाय पाहणे अशक्य होते. या चाचणीसाठी अ‍ॅल्युमिनियमच्या पेटीचा उपयोग करता येतो. ही पेटी मानेपर्यंत पोचणारी असते. श्वास घेण्यासाठी पेटीच्या मागील बाजूस छोटी छिद्रे ठेवावी लागतात. डोक्यापासून मानेपर्यंत सर्व शरीर या पेटीने झाकले जाते. ही पेटी वापरून घेतलेल्या चाचणीत कुलजिना बाई व इतर मंडळी नापास झाली. (पेटीऐवजी जाड काळे कापड वापरून अशी चाचणी आपण घेऊ शकतो.)

‘जादूगारा’ची मदत घेऊन पूर्ण नियंत्रित स्थितीत घेतलेल्या चाचणीत डोळ्याविना पाहण्याच्या सामर्थ्याचे पितळ उघडे पडले आणि असे प्रयोग बंद झाले.

जगाच्या पातळीवर निकालात निघालेले अचाट दृष्टीचे प्रयोग आता महाराष्ट्रात सुरू झालेत. तथाकथित मिडब्रेनचा वापर करून अचाट स्मृती मिळविता येते असा प्रचार करून वीस हजार रूपये फी घेऊन मुलांना ट्रेनिंग देण्याची ही आधुनिक बुवाबाजी आहे. नियंत्रित चाचणीसाठी मिडब्रेनचा प्रचार करणारी मंडळी तयार होत नाहीत. विज्ञानाच्या नावाखाली अज्ञानाचे समर्थन म्हणजे फसवणूकच होय.

जादूगाराची हातचलाखी व इतर कौशल्य आपणाला कळत नाही. त्यामुळे आपण सहज फसतो. पण जादूगार आपणाकडे कोणतेही अचाट सामर्थ्य नाही हे कबूल करतात. परंतु मिडब्रेन किंवा इतर फसवे विज्ञान वापरणारी मंडळी जादूगाराचेच तंत्र वापरत आपणाला फसवितात पण सांगतात मात्र सहाव्या इंद्रियाचेच सामर्थ्य. अशी मंडळी विज्ञानाचा वापर करून अज्ञान वाढवितात व पैसे कमावतात. त्यांचेपासून सावध रहा

प्रा..रा.आर्डे