Categories
मानसमित्र

अंनिसचे चाळीसगाव मानसिक आरोग्य केंद्र

चाळीसगाव येथील मानसिक आरोग्य परिषदेत ‘मानसमित्र’ ही संकल्पना मांडली गेली. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अंनिसतर्फे राज्यात विविध ठिकाणी शिबिरेही घेण्यात आली व मानसमित्राचा हा प्रयोग चाळीसगाव येथे राबविण्यात आला. त्याची माहिती देत आहेत डॉ.प्रदीप जोशी….

जळगावात स्मिता शिरसाळे या प्राध्यापिका कार्यकर्तीचे लग्न होते. त्या लग्नाच्या कार्यालयातच वरती महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांची मिटींग भरली होती व त्या मिटींगला डॉ.नरेंद्र दाभोलकर, डॉ.श्याम महाजन उपस्थित होते. मानसिक आजारांवरील असलेल्या अंधश्रद्धांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी चाळीसगाव येथे एक मानसिक आरोग्य परिषद घेण्याचे तिथे ठरले आणि नोव्हेंबर 2011 मध्ये अशी परिषद चाळीसगाव येथे डॉ.श्याम महाजन यांच्या पुढाकाराने संपन्न झाली. संपूर्ण दिवस चाललेल्या या परिषदेला डॉ.मोहन आगाशे उद्घाटक म्हणून आले होते. चाळीसगाव येथील रामोशीबाबाच्या दर्ग्यातील मनोरूग्णांच्या कहाण्या त्यावेळी मांडल्या गेल्या आणि त्यातून मनोरूग्णांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज अधिक प्रकर्षाने पुढे आली. दर्ग्याला आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली आणि तेथील मनोरूग्णांच्या हालाचे स्वरूप स्वतःच्या डोळ्यांनी बघितले.

दर्ग्यावरील उपचारांसाठी लोक येतात यासाठी केवळ त्या लोकांनाच दोष देऊन उपयोग नाही, दर्गा आणि देवळातील मौलाना आणि पुजारी यांनाच दोष देऊन उपयोग नाही, तर मानसिक आजारांविषयी सर्व सामान्यात जागृती करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि योग्य उपचार उपलब्ध करून देणे. या सगळ्यांची गरज असल्याचे लक्षात आले. ‘मानसमित्र’ ही कल्पना अंनिसमध्ये चर्चेला होतीच. यातूनच पुढची पाऊले टाकण्याचा विचार आला.

चाळीसगावच्या परिषदेतील उत्तम प्रतिसादानंतर डोंबिवली, लातूर, सातारा सारख्या ठिकाणीही आपण शिबीरे घेतली. या सर्व शिबिरात मोठ्या संख्येने लोकांनी, तरूणांनी उत्साहात सहभाग घेतला. याचाच अर्थ मानसिक आजारांविषयी मूलभूत माहिती जाणून घेण्याची इच्छा अनेकांमध्ये आहे, हे लक्षात आले.

यातूनच अशी कल्पना पुढे आली की, आपण दर्ग्यातील पेशंटच्या नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानसमित्रांना प्रशिक्षण देणे व समाजात रोजच्या वापरात त्यांनी मानसिक उपचाराविषयीची समज सहजगत्या रूजवणे असे अपेक्षित होते. शिवाय दर्ग्यातील मनोरूग्णांच्या नातेवाईकांशीही संवाद साधून त्यांना योग्य उपचाराकडे वळवणे ही जबाबदारी मानसमित्रावर देण्याची कल्पना होती.

चाळीसगावातून पहिले अशा प्रकारचे मानसमित्र प्रशिक्षण घ्यावे असे ठरले. कोण कोण तयार आहेत असा प्रश्न केल्यावर सहजगत्या 12/13 नावे पुढे आली. या सगळ्यांना दर रविवारी जळगावला येऊन चार ते पाच तासांची एक एक कार्यशाळा घ्यावी असे ठरले. सर्वजण तयार होते. माझ्या मनात साशंकता हेती असे एकूण दहा ते बारा रविवार जळगावला यावे लागेल अशी कल्पना मी सर्वांना दिली. गंमत म्हणजे सगळे क्षणाचाही विलंब न करता हो म्हणाले. त्यांनी इच्छा प्रकट केली की, पहिली कार्यशाळा ही चाळीसगावलाच आपण घ्यावी. माझ्या मनात विचार आला, म्हणजे जळगावला येण्यासाठी जरा नाराजच दिसताहेत पण म्हटले ठीक आहे, पहिले चाळीसगाव तर चाळीसगावला….

ठरवून एका रविवारी चाळीसगावला एका पतपेढीच्या ऑफीसमध्ये बसून आम्ही पहिला तास पार पाडला. सर्वच उत्साही होते. पुढच्या रविवारपासून सर्वांनी जळगावला दर रविवारी यावयाचे असे ठरले. मनात मी म्हणालो मला चाळीचगावात आपण ‘हा तास घेतला म्हणून एवढे आलेत, दर रविवारी जळगावला यातले कितीक येणार आहेत?’

पण पुढच्या रविवारी ठरल्याप्रमाणे अगदी वेळेत जवळ जवळ सर्वजण एकत्रितपणे माझ्या हॉस्पिटलला हजर! असा क्रम पुढचे 10/12 रविवार चालला होता.

सर्वजण एकत्रित येत होते. रेल्वेने यावयाचे व एकत्रित परत जायचे. ठरलेला दिवस चुकला नाही आणि क्वचितच एखाद-दुसरा गैरहजर रहात असे. एकूणच त्यांचा उत्साह आणि शिकण्याची, जाणून घेण्याची तळमळ पाहता आपण उगाचच सुरवातीला यांच्याविषयी साशंक होतो अशी भावना माझ्या मनात येऊन गेली.

संपूर्ण अभ्यासक्रमाचे 10 ते 12 विभाग केले.

1) मेंदू, त्याची रचना, मन व मनाची रचना

2) मानसिक आजार-प्रकार

3) न्यूरोसिस

4) अंगात येणे

5) मानसिक आजाराची कारणे

6) मानसिक आजारासाठीच्या उपचार पद्धती.

7) आर.ई.बी.टी.व समुपदेशन

9) रूग्ण व नातेवाईकांशी वागताना मानसमित्राने घ्यावयाची काळजी.

10) मतीमंदता

11) मानसिक चाचण्या.

यातील मतीमंदता आणि मानसिक चाचण्याविषयीचे मार्गदर्शन क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट डॉ.नीरज देव यांनी केले. हे सर्व मार्गदर्शन आमच्या हॉस्पिटलमध्येच घेतले गेले. त्यामुळे प्रत्यक्ष रूग्ण पाहणे, त्यांच्याशी व नातेवाईकांशी बोलणे, याची प्रात्यक्षिकेही सहज देता आली. पेशंटची माहिती घेणे, नातेवाईकांकडून व रूग्णांकडून याचीही प्रात्यक्षिके देता आली.

सर्वजण उत्साही होते. खूप चर्चा करत असत अनेक शंका विचारीत असत, त्यामुळे सगळ्यांच्याच मनातले मनोविकारांची संकल्पना अधिकाधिक स्वच्छच होत गेली.

यानंतर दर्ग्यात जाऊन या सर्वांनी तिथे येणारे पेशंट व नातेवाईकांशी संवाद साधावयाचा प्रयत्न करीत राहिले. एकदम सगळे न जाता 1-1, 2-2 असे जात असत ज्यामुळे दर्ग्यातील अधिकार वर्गाचा रोष न ओढवता हे काम करावयाचे असे ठरले, तसेच त्यांच्या ओळखीत, नात्यात, शेजारी-पाजारी असलेल्या कसेशीही ते चर्चा करू लागले. त्यांना वाटणार्‍या शंका प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर विचारू लागले.

नुसती आजाराविषयी माहिती दर्ग्यापर्यंत पोचवून उपयोग नव्हता. दर्ग्यावर येणार्‍या रूग्णांच्या बाबतीत एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे योग्य उपचाराचा अभाव किंवा पैशाअभावी योग्य उपगार घेण्याची क्षमता नसणे. तेव्हा असा विचार आला की, या अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर दर्ग्यात येणार्‍या रूग्णांसाठी तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था करता येईल का?

चाळीसगावच्या कार्यकर्त्यांकडे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर होतेच. लगेच त्यांनी शोध सुरू केला. दर्ग्याजवळच एक राष्ट्र सेवा दलाची जागा होती. तिथेच तात्पुरती शेड उभारून आपल्याला असे उपचार केंद्र सुरू करता येईल असा विचार आला. नुसती तपासणी करून काय मिळणार? ज्यांना शक्य नाही अशांना नियमितपणे औषधोपचार करता आले पाहिजेत यासाठी फुकट औषधेही देता आली पाहिजेत. यासाठी औषध कंपन्यांशी बोलायचे मी ठरवले. सुदैवाने पहिल्यांदा ज्यांच्याशी बोललो, त्या टोरेंट फार्मा कंपनीने जबाबदारी उचलली आणि एक मोठीच अडचण दूर झाली.

यामुळे उत्साहात राष्ट्र सेवा दलाच्या जागेवर एक तात्पुरता तंबू उभारून 10 ऑक्टोंबर 2012 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाला सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या हस्ते या मानसिक आधार केंद्राचे आपण उद्घाटन केले. उद्घाटन केले खरे, पण निदान तपासण्यासाठी, लोकांना बसण्यासाठी किमान एखादी शेड तरी उभी केली पाहिजे ना? म्हणून ‘शेड’ उभी करण्यास सुरवात झाली.

छोटीशी शेड म्हणता म्हणता हेही असू द्या, ते पण असू द्या असे म्हणत म्हणत एक टुमदार जागाच तयार झाली. श्री.बंग आणि सहकार्‍यांनी मनावर घेऊन छान हॉल, कन्सल्टींग रूम, टॉयलेट वर गच्चीवर टेपरल शेड आणि मोकळ्या जागेत सुंदर बगीचा अशी रम्य वास्तूच तयार झाली.

काम वाढल्याने अर्थातच महिनाभरात तयार व्हायच्या जागेला सहा महिने लागले खरे, पण अतिशय उत्तम, सर्वांना सतत उपयोगी पडेल अशी ही इमारत झाली.

शेवटी 2 जून 2013 रोजी प्रत्यक्ष रूग्ण तपासणीला सुरवात झाली. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ही तपासणी होऊ लागली. आपले मानसमित्र सर्वच आधीपासून दर्ग्यावर जाऊन रूग्ण व नातेवाईकांशी बोलून ठेवत होते व त्या दिवशी सर्वांना आठवण देऊन येण्यास सांगत होते. सर्वांचे मोबाईल नंबर जवळ ठेवले होते.

पहिल्या दिवसापासूनच दर्ग्यातील सुमारे 30-40 रूग्ण आधारकेंद्रात आले होते. त्यांची संख्या दर भेटीत वाढत गेली. या सर्व रूग्णांचे रेकॉर्ड ठेवण्यात आले. फॉलोअपसाठी केव्हा यावयाचे तेही त्यांना आठवण देऊन सांगण्यात येऊ लागले.

काम जसे वाढले, तशी कामाची विभागणी करण्याची गरज वाटू लागली. मग दोघा-दोघांची टीम तयार झाली. 1 टीम दर्ग्याला भेट देते, दुसरी प्रत्यक्ष तपासणीच्या वेळी पेशंट आत-बाहेर पाठवणे, त्यांचा क्रम ठरवणे, एक टीम पेशंट व नातेवाईकांकडून माहिती गोळा करणे, एक टीम पेशंटना औषधे काढून देणे तर एक टीम फोलोअप करणे, अशी विभागणी झाली. यातच पेशंटच्या नातेवाईकांसाठी दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी नातेवाईकांचा मेळावा घेणे सुरू झाले. त्यावेळी नातेवाईक त्यांना येणार्‍या अडचणी, शंका मांडतात व आपले मानसमित्र त्यांना मार्गदर्शन करतात.

या मधल्या काळात कोणतीही अडचण आल्यास नातेवाईकांकडे आपल्या काही मानसमित्रांचे फोन नंबर असतात. त्यांच्याशी ते केव्हाही संपर्क साधू शकतात. स्वत:च्या स्तरावर समस्या सोडवता न आल्यास फोनवरून माझ्याशी चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन आपले मानसमित्र करतात.

एकूण रूग्णांचा रिस्पॉन्स फारच सकारात्मक दिसून येत आहे. औषधांनी फरक पडतोय म्हटल्यावर गुजराथ, मध्यप्रदेश, नाशिक, जळगाव, मराठवाडा इथून आलेल्या पेशंटसलाही धीर येऊ लागला व पुढील मार्गदर्शनासाठी त्यांना स्थानिक मार्गही दाखवण्यात येऊ लागले.

सुरवातीपासून सगळ्यात मोठी शंका होती ती दर्ग्यातील मौलवी, व इतर अधिकारी मंडळी काय भूमिका घेतात याची.

पण आपल्या मानसमित्रांनी दर्ग्यात अत्यंत सबुरीची भूमिका घेतली. या आजारावर औषधांचाही उपयोग होतो असे सांगून त्यांनी नातेवाईकांचे मन वळवले. कुठेही दर्ग्यावर विरोधी भूमिका घेतली नाही, कोणावरही टीका केली नाही त्यापुढे दर्ग्यातील अधिकारी मंडळींचेही सहकार्य मिळत राहिले. त्यांचे बिनशर्त सहकार्य हा या मानसमित्रांचा मोठाच विजय होता आणि त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. व्यवस्थित रेकॉर्ड ठेवण्यासाठी आता एक सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्याचे काम सुरू असून पुढील महिन्यात ते कार्यरत होईल अशी आशा आहे.

लवकरच आणखी मानसमित्रांची टीम तयार करून इतर मानसोपचार तज्ञांना आपल्या कार्याशी निगडित करून घेण्याची गरज निर्माण होत आहे. त्या दृष्टीने इतर मानसोपचारतज्ञांनी सहकार्याचा हात पुढे केला आहेच.

या दर्ग्यावर येणारे, राहणारे सगळेच मनोरूग्ण होते असे नाही. ‘हजेरी येते, हजेरी येते’ म्हणून दर्ग्यावर राहण्यास आलेल्या काहींशी बोलतांना असे लक्षात आले की, त्यांना खरे म्हणजे कौटुंबिक व सामाजिक समस्या आहेत. घरात न पटणे, मुले, बायको, नवर्‍याशी भांडणे होणे, विवाहबाह्य संबंध असणे अशा अनेक कौटुंबिक समस्या काही जणात आढळल्या. काहींना समाजाकडून गावच्या लोकांकडून कोणत्या तरी कारणाने त्रास दिला जात होता.

अशा त्रासातून काही काळ का होईना सुटका मिळवण्यासाठी काहीजण हजेरी घेण्याचे ‘नाटक’ करीत होते. सहा महिने, बारा महिन्यातून एकदा पंधरा तीन आठवडे दर्ग्यवर येऊन राहणे ते पसंत करीत होते. असे राहून गेल्यावर मग छान वाटते व घरी परत जाऊन काम धंदा चांगला होतो असे त्यांचे सांगणे होते.

हे म्हणजे आपण वर्षातून 8-15 दिवस सुटीवर एखाद्या ट्रीपला जातो. वर्षभराचा कामाचा बोजा उतरवतो आणि पुन्हा फ्रेश होऊन नेहमीच्या कामाला लागतो; तशातलाच हा प्रकार नव्हे काय?

तेव्हा याला मानसिक आजारांबरोबरच महत्वाचा असा सामाजिक पदरही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

एकूणच उत्साही कार्यकर्ते, चाळीसगावकरांचे आर्थिक सहकार्य शारीरिक मदत सामंत मॅडम, दिलीप चव्हाण सर, निकम सर, दीपक, सुनील, संगीता, सचीन इतर सर्व कार्यकर्त्यांचे जेवढे कौतुक करावे व आभार मानावे तेवढे कमीच.

कम्युनिटी सायकीअ‍ॅट्रीच्या दृष्टीने हा एक चांगलाच धडा अं.नि.स.लाच नव्हे तर सायकीअ‍ॅट्रीच्या जगतालाही मिळाला आहे असे मला वाटते.

डॉ. प्रदीप जोशी

लेखक संपर्क : 9422603390