Categories
कथा

मासिक भविष्य

वार्षिकांक – २०१४

मासिक ‘प्रगती’च्या कचेरीत दाबके लगबगीनं प्रवेशले. आल्या आल्या त्यांनी समोरचाच एक भला मोठा कागद उचलला आणि त्यानं आपल्या टकलावरचा घाम खसाखसा पुसला. मग दुसर्‍या एका अशाच कागदानं चेहरा पुसला.

घाम पुसण्यासाठी प्रेसमधला कागद या पद्धतीनं दाबके गेली कित्येक वर्षं वापरत होते. त्यामुळं खिशातल्या रूमालाचं आयुष्य वाढतं, असा त्यांचा सिद्धांत होता.

धनकवडीहून लुना ताबडत भर उन्हातान्हात सदाशिव पेठेपर्यंत आल्यामुळं दाबके यांना चांगलीच धाप लागली होती. स्वत:शीच चिडून त्यांनी ‘प्रगती’चा अंक टेबलावर आपटला. मग आजूबाजूच्या भकास कचेरीकडं एक संतापजनक दृष्टिक्षेप टाकून दाबके स्वगत म्हणू लागले:

“प्रगती’! कसली ‘प्रगती’ डोंबलाची? एक भोसडीचा पैसे टाकून मराठी मासिक विकत घेत असेल, तर शपथ! दिवसेंदिवस मासिकाचा खप कमी कमी होत चाललाय. या महाराष्ट्रात इंग्रजी ‘वीकली’ विकला जातो, पण इथं दर महिन्याला गठ्ठेच्या गठ्ठे परत. आता मासिक बंद होईपर्यंत कसंबसं चालवायचं, एवढंच काय ते!’

स्वगत संपल्यावर दाबकेंनी भानावर येऊन बाजूला दृष्टी फिरवली.

‘प्रगती’चा सगळा स्टाफ(म्हणजे अरूण बोबडे नि ज्योती तांबे) टेबलाभोवती जमा झाला होता.

अरूण बोबडे हा नंबर एकचा कळकट माणूस. खादीचा भरड गुरूकुडता आणि मळकट पायजमा हाच त्याचा कायमचा पोशाख. अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीमिशा. शिवाय बटबटीत डोळे आणखीनच बटबटीत बनवणारा जाड भिंगांचा चष्मा.

दाबकेंच्या मनात आलं,

‘ही असली माणसं जोवर मराठी पत्रकारितेमध्ये आहेत, तोवर मराठी पत्रकारिता काही सुधारण्याची शक्यता नाही.’

पण अरूण बोबडेवर रागावून चालणार नव्हतं. तीन महिने पगार न घेता दाबकेंच्या हातांखाली काम करायला दुसरा कोणता माणूस तयार होणार होता?

प्रीतीश नंदी?

ज्योतीकडं बघून त्यांना जरा बरं वाटलं.

जर्नालिझम कोर्समध्ये शिकणारी ही तरूणी इंटर्नशीप करण्यासाठी रस्ता चुकून ‘प्रगती’च्या वाटेला आणि वाट्याला आली होती. तिच्यामुळं ‘प्रगती’च्या कचेरीत जरा चैतन्य आल्यासारखं झालं होतं.

‘पण या दळभद्री मासिकात तिला काय शिकायला मिळणार?’ दाबकेंनी स्वत:लाच प्रश्न विचारला.

‘बोला, काय काम काढलंयत?’ दाबकेंनी चेहर्‍यावर उसनं हासू आणत प्रश्न केला.

‘तुम्हीच काल म्हणाला होतात ना, आज मिटींग आहे, म्हणून?’ ज्योती म्हणाली.

‘अरे, हो हो हो…. पाहिलंत? वय…! वय झालं, त्यामुळं हे असं होतं. बरं का, अरूण, आता तुमच्यासारखे तरूण पुढं आले पाहिजेत आणि ‘प्रगती’ची ही धुरा आता तुम्ही आपल्या खांद्यांवर घेतली पाहिजे.’

पगार नाही, तर नाही, चार गोड उत्तेजनपर शब्द तरी द्यावेत, म्हणून दाबके म्हणाले.

पण अरूण निर्विकार होता. तो शांतपणे म्हणाला,

‘मला जर दुसरीकडं कुठं नोकरी मिळाली, तर मी हे मासिक सोडून जाणार-कुठं कारकुनाची नोकरी मिळाली, तरी चालेल?’

‘नो नो नो…. मी तुला सोडणार नाही. बाबा, रे, मराठी पत्रकारिता हे ‘सतीचं वाण’ आहे. चार पैसे मिळावेत, म्हणून टिळकांनी ‘केसरी’ काढला नाही….!’

‘चला, मिटींग सुरू करा!’ अरूण तुटकपणे म्हणाला.

‘हां…. तर मी मीटिंग अशासाठी बोलावली, की जानेवारीपासून आपण ‘प्रगती’चं स्वरूप बदलणार आहोत. नव्या वाचकांना काय हवं आहे, याचा मला नेमका अंदाज आता आलेला आहे.’

‘काय?’

‘चहा…. अगोदर चहा ऑर्डर करतो.’ दाबके म्हणाले.

टेबलावरची बेल तीनदा वाजवली, तरी कुणीच फिरकलं नाही.

‘हा रघ्या कुठं मेला, कुणास ठाऊक?’ ते चिडचिडत म्हणाले.

‘त्याला तुम्हीच नाही का काल कामावरून काढलं? कंपनीला परवडत नाही, म्हणून!’ अरूण म्हणाला.

‘अरेच्या! खरंच की! मरू दे चहा…. मुद्द्याचं बोलू. तर आपलं मासिक आपण अगदी वेगळ्या ढंगात काढायचं जानेवारीपासून!’ दाबके रंगून बोलू लागले, ‘बहुरंगी मुखपृष्ठ, पहिला फॉर्म ऑफसेटवर….. आणि कंटेंटही दर अंकात जोरदार द्यायचा!’

दर डिसेंबरमध्ये दाबके हेच बोलतात, हे अरूणला ठाऊक असल्यानं तो त्यांच्या देखत कंटाळवाण्या जांभया देत राहिला. दाबके त्याचं ‘मोराल’ ‘बूस्ट अप’ करण्यासाठी, म्हणजे नीतीधैर्य वाढवण्यासाठी त्याला म्हणाले,

‘आपण दर अंकात एका मोठ्या माणसाची किंवा बाईची मुलाखत देऊ. फोटो बिटो टाकायचे आणि ही मुलाखत तुम्ही दोघांनी घ्यायची…. काय, ज्योती?’

‘होऽऽ, घेईन की.’ ज्योती उत्साहानं म्हणाली.

अरूणनं मात्र त्यावर प्रतिक्रिया म्हणून आणखी एक विश्वरूप दर्शन घडवणारी प्रदीर्घ जांभई दिली.

‘माझ्या डोळ्यांसमोर काही नावं आहेत. टाटा, बिर्ला, अमिताभ बच्चन…’

‘अमिताभची मुलाखत मी घेईन…’ ज्योती पटकन म्हणाली.

‘ओ.के. पण नो पोलिटिकल क्वेश्चन्स. स्वित्झर्लंडमधील ‘स्वि’ सुद्धा उच्चारायचा नाही. फक्त सिनेमाबद्दल प्रश्न विचारायचे. फोटो त्यालाच मागायचे. तो काही पैसे घेणार नाही त्याचे. झालंच, तर काही एक्झिक्युटिव्हज् घेऊ. मंत्री घेऊ. सुरूवात आपण उद्योगपतीपासून करू. का, म्हणून विचारा.’

‘त्यात काय विचारायचंय त्यांच्याकडून जाहिराती मिळवायच्या असणार.’ अरूण तिरसटपणे उत्तरला.

‘बरोबर! जाहिराती चार पानं मिळाल्या, की आपला अंक नफ्यात गेलाच, म्हणून समजा आणि शिवाय त्यांच्या कारखान्यातल्या कर्मचार्‍यांना वाटण्यासाठी ते अंकाचे गठ्ठेच्या गठ्ठे विकत घेणार. डबल बेनेफिट योजना…. कशी आहे?’

अरूणनं मराठी पत्रकाराला साजेशी आणखी एक कंटाळवाणी जांभई देऊन या प्रश्नाचं जणू काही उत्तरच दिलं.

पण ज्योतीनं मात्र खूपच दखल घेतली, एवढंच नव्हे, तर ती कामालाही लागली होती.

दाबकेंना वाटलं, इंटर्नशीपसाठी म्हणून का होईना, पण मराठी मासिकाच्या अभ्युदयार्थ आजकाल एवढे कष्ट कोण घेणार आहे?

‘बोल, ज्योती, काय प्रगती? कोणता उद्योगपती ठरवलास?’ दाबकेंनी आठवड्यानंतर उत्साहानं प्रश्न केला.

‘टाटा, बिर्ला यांना फोन करायचे होते. पण आपली बिलं थकल्यानं फोन काढून नेला आहे.’

‘ते ठीक आहे. इथलं कुणी घ्यायचं…. बजाज म्हणा किंवा फिरोदिया….’

‘त्यांना वेळ नाही.’

‘बरोबर आहे. मराठी मासिकासाठी कसा वेळ असेल? बरं मग किर्लोस्कर, गरवारे यांना गाठायचं. मराठी मासिकाबद्दल त्यांना आस्था असणारंच.’

आता मात्र अरूणनं हस्तक्षेप केला. तो म्हणाला,

‘दाबके, कामाची माणसं आहेत ती. त्यापेक्षा मी एक छोटा उद्योगपती तुम्हाला सुचवतो. तयार कपड्यांचा हा कारखानदार आहे. त्याला जाहिरातीसाठीसुद्धा तयार करणं अवघड नाही.’

‘बरं…. बरं…. तूच घेऊन ये मुलाखत त्याची. नाव काय त्याचं?’

‘सूरजमल बगाडिया.’

सूरजमल बगाडियाच्या मुलाखतीनं जानेवारीचा अंक सजला. कव्हरवर सूरजमल, आत सूरजमल, मलपृष्ठावर सूरजमल… असा सगळा अंक सूरजमलीन झाला. आत सूरजमलचे पिताश्री, माताश्री, बंधुश्री, भगिनीश्री, पत्नीश्री, कामगाराश्री अशा सर्व श्रींच्या मुलाखती छापल्या होत्या. सगळ्यांनी सूरजमलची लालेलाल करून सोडली होती. सूरजमलच्या पिताश्रींचा एक उघडा फोटो छापला होता आणि शेजारीच एक ‘सूरज’ बनियान घालून दुसरा फोटो छापला होता.

‘मी इथं आलो, तेव्हा असा उघडाबागडा होतो. अंगात घालायला साधं बनियानसुद्धा नव्हतं. पण सूरजच्या कारखान्यात आता एवढे बनियान तयार होतात, की मी एका वेळी दोन बनियानसुद्धा अंगात घालू शकेन.’ अशी हृदयाला हात घालणारी वाक्यं त्यांच्या फोटोखाली पेरलेली होती.

हा अंक बाजारात आला. दाबकेंनी सूरजमलला दहा अंक भेट म्हणून दिले. तेच त्यानं कामगारांना वाटले. (नवीन विकत घेण्याच्या नावानं बोंब!) जाहिरातींचे पैसे आता हा कधी देतोय, इकडे दाबक्यांचे डोळे लागले होते; आणि….

हृदयविकाराचा झटका येऊन सूरजमल एका झटक्यात मरून गेला. हे एकदम विपरीतच घडलं. अंक बाजारात आला, न आला, तोच सूरजमल गचकला. मराठी मासिकाच्या या अभूतपूर्व तत्परतेनं सबंध पत्रकारितेच्या विश्वाला हादरा बसला.

दाबके मात्र जाहिरातीच्या पैशामुळं व्याकुळ झाले. अरूणला त्यांनी दोनदा पाठवलं, पण सूरजमलचा बाप म्हणाला,

‘हा वेळ-बखत कोंचा हाये, ते तर, साला, बगा. इकडे पोराचा जीव गेला आनि ह्येंचा पैशासाठी जीव चाललाय्’

दाबके दु:खी अंत:करणानं पुढच्या अंकाची तयारी करायला लागले. अजून जाहिरातींचे पैसे न आल्याने अमिताभचा बेत रद्द करावा लागला. मग कोणता बरं नट घ्यावा? विनोद खन्ना? नसीरूद्दिन? मिथुन? अशोक सराफ? निळू फुले…. असं करत करत अखेर मराठीतील ज्येष्ठ जानेमाने नट (सध्या विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले) पांडुरंग तथा दादा ढमाले यांची मुलाखत घ्यायची ठरली. दादा कोणतेही आढेवेढे न घेता तयार झाले. जुने फोटो त्यांच्यापाशी होतेच. नुकताच त्यांचा एक्क्याऐंशीवा वाढदिवस घरगुती स्वरूपात साजरा झाला होता. तेही फोटो काढलेले होतेच.

फेबु्रवारीचा अंक बाजारात आला. आला, म्हणजे मोठ्या मुश्किलीनं आणला. वर म्हातार्‍याचा फोटो. तोही काळा-पांढरा(रंगीत नाही) बघून, एजंट अंकाला हात लावायलाच तयार होईनात. अंक रडतखडत पाच तारखेला स्टॉलवर मात्र झळकला आणि….

त्या तारखेला दादा उडाले. वय झालेलंच होतं. दादांना मरण्यापूर्वी गौरवांक बघायला मिळाला, म्हणून त्यांच्या कन्येचं आभार मानणारं एक पत्र आलं.

पुन्हा एकदा ‘प्रगती’च्या औचित्याचा जर्नालिझमच्या विश्वात बोलबाला झाला. पण दादांबद्दल ते जगले काय आणि मेले काय, कोणालाच त्याचं फारसं सोयरसुतक नव्हतं. त्यामुळं अंकाचे गठ्ठे पडूनच राहिले.

इकडं अरूण सूरजमलच्या बापाला भेटून आला.

सूरजमलचा बाप म्हणाला,

‘सूरजमलनी तर काय जाहिरातीच्या पैशाचा मला सांगितला नाय. तेवा त्ये पैशे मी कशे काय देनार?’

हे उत्तर ऐकून दाबकेंना ‘प्रगती’तल्या फोटोतल्या सूरजमलच्या बापाच्या अंगावरचा बनियान टराटरा फाडावासा वाटला.

‘ही…. ही…. तुझी दरिद्री आयडिया. मी म्हणत होतो, बजाज किंवा किर्लोस्कर घेऊ. तर तू हा अंडरपँट-गंजीफ्रॉकवाला काढला.’ दाबके संताप अनावर होऊन अरूणवरच ओरडले.

अरूण मात्र दाढी खाजवत शांत बसून होता.

‘आता बुडले ना पैसे? कसे करणार मी तुमचे पगार? बोल….’

‘मी एक आयडिया सुचवते…’ ज्योती म्हणाली.

‘बोल-बोल. पण पैसा मिळणारी पाहिजे.’ दाबके घाईघाईनं म्हणाले.

‘माझा एक मामा आहे. त्यांचा उदबत्तीचा कारखाना आहे.’

‘उदबत्तीचा? मग तो काय पैसे देणार?’ निराश होऊन दाबके म्हणाले.

‘तो रोख पाच हजार रूपये आत्ता द्यायला तयार आहे. अंक छापण्याच्या अगोदर.’ ज्योती म्हणाली.

‘काय? काय म्हणतेस? पाच हजार रूपये अ‍ॅडव्हान्स? बघ, बघ-अरूण, ज्योतीची मराठी पत्रकारितेवरची निष्ठा बघ-ठीक आहे. आपण त्यांची मुलाखत छापू.’

‘कव्हरवर फोटो….’

‘देऊ ना.’

‘नाही… त्या फोटोसमोर उदबत्त्या जळताहेत, असं हवं, आणि त्या उदबत्त्या ‘नंदकिशोर सुगंधी उदबत्ती’च्या पुड्यातल्याच असल्या पाहिजेत.’

‘एवढंच ना? नंदकिशोर अगरबत्ती जाळू फोटोपुढं, मात्र त्याचा वाससुद्धा आला पाहिजे, अशी अट नाही ना तुझ्या मामाची?’ दाबक्यांनी विनोदानं विचारलं.

‘छे, छे-तशी अट मामा घालूच शकणार नाही. कारण त्याच्या उदबत्त्यांना वासच नसतो. तो घरी म्हैसुरची दुसर्‍या कंपनीची चंदनी उदबत्ती लावतो.’ ज्योती गंभीरपणे उत्तरली.

‘घरचं कार्य’ म्हणून ज्योतीनं मामाला थोडी जास्त पानं दिली. दाबकेंनीही तिकडं थोडा कानाडोळा केला. नाहीतर उरलेल्या पानांवर तरी असा काय भारी मजकूर छापण्यासाठी म्हणून वाट पाहत उभा होता?

नंदकिशोर धारप यांच्या मुलाखतीची एक झलक:

ज्योती : धारप, तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळलात?

धारप : मी मॅट्रिकला तिसर्‍यांदा नापास झालो होतो. वडिलांनी मारहाण केली होती. आईनं बोलणं टाकलं होतं. मी रूसून बसलो होतो. एवढ्यात कोपर्‍यातून प्रसन्न असा सुगंध माझ्या नाकात शिरला. मी वळून बघितलं. उदबत्ती! बस्स, तोच क्षण. ठरवलं, आपलं आयुष्यही असंच दुसर्‍यांना सुगंध लुटण्यात खर्ची घालायचं आणि मी उदबत्तीच्या धंद्यात शिरलो.

आगाऊ पैसे हाती असल्याने मार्चचा अंक बरोबर एक मार्चला स्टॉलवर झळकला. कव्हरवर नंदकिशोर धारपांचा उग्र, कुरूप चेहरा बघून एजंट यादी वेळी अंकाला हात लावायला तयार नव्हतेच. पण तरीही गेल्या वेळच्या म्हातार्‍यापेक्षा हा तरणा बरा, असा त्यातल्या त्यात विचार त्यांनी केला, पण अर्धाअधिक अंक स्वत: धारपांनीच उचलला. आपले नातेवाईक, इष्ट-मित्र-मैत्रिणी, कामगार, सहकारी यांना वाटण्यासाठी. (त्यामुळं दाबकेंनी तर आनंदानं ‘दिवाळी दिवाळी आली’ असं उड्या मारत नाचायचंच काय ते बाकी ठेवलं.)

अंक एक मार्चला बाजारात आला आणि पाच मार्चला धारपांना तो दुर्दैवी अपघात झाला. पापडाचा पाट वाळवण्यासाठी म्हणून पत्र्यावर ठेवायला ते गेले आणि पाय घसरून ते खाली पडले, ते थेट स्वर्गातच गेले.

कव्हरवर धारपांच्या फोटोसमोर लावलेल्या उदबत्त्यांना एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. पत्रकारितेच्या विश्वात ‘प्रगती’ची आता उघड उघड टिंगल होऊ लागली. “प्रगती’नं मुलाखत छापली, की हमखास माणूस जाणार,’ याची संपादकांना खात्री पटल्यामुळंच त्यांनी उदबत्त्यांसकट फोटो टाकला, असे विनोद लोक करू लागले. दाबकेंनाही गेल्या अंकात ज्याचा पुरता उदो उदो करायचा, त्यालाच पुढच्या अंकात श्रद्धांजली व्हायची, या प्रकाराचा, नाही म्हटलं, तरी कंटाळा आला. बरं, पूर्वीच्या अंकात मृत व्यक्तीबद्दल अगोदरच इतकं काही लिहिलेलं असायचं, की नव्यानं ‘श्रद्धांजली’त काय लिहायचं, हा संपादकांपुढं गहन प्रश्नच निर्माण होत असे.

‘या वेळी… बरं का, अरूण….’ नंदकिशोर धारपांवर श्रद्धांजलीपर अग्रलेख लिहिता लिहिता दाबके म्हणाले, ‘आपण ज्या कुणाची मुलाखत घेणार आहोत, त्याच्याविषयी थोडं हातचं राखूनच छापू. पुढच्या अंकात ‘श्रद्धांजली’ वाहण्याचीच वेळ आली, तर लिहायला वेगळे असे एक-दोन तरी नवे मुद्दे हातात असू द्यावेत, काय?’

‘म्हणजे तुम्हांलाही असंच वाटतंय, की काय, आपण मुलाखत छापली, रे छापली, की हमखास माणूस गचकतो, म्हणून?’ अरूणनं प्रश्न केला.

‘नॉन्सेन्स!’ दाबके चिडलेच. ‘संबंध काय दोन्हीचा? आता या नंदकिशोर धारपाला….’ आजूबाजूला ज्योती नाही, अशी खात्री एकदा करून घेऊन ते पुढं म्हणाले, ‘…. या धारपाला पत्र्यावर पापड वाळत घालायला जा, असं काय आपण आपल्या अंकात लिहिलं होतं, की काय? मी…. मी…. हे चालू देणार नाही. अरे, एके काळी ‘प्रगती’नं अंधश्रद्धेविरूद्ध केवढी मोहीम उचलली होती….’

‘पण आता आपल्या अंकाला मुलाखत द्यायला कुणीच तयार होणार नाही. परवा ‘पत्रकार संघा’त गेलो होतो, तिथं पत्रकारांनी कुचेष्टेनं मला विचारलं, ‘काय, यावेळी कुणाला मारणार आहात?’ असा एकदा समज जर सर्वत्र पसरला, तर कोण आपला जीव धोक्यात घालून मुलाखत देईल?’ अरूणनं प्रामाणिकपणे शंका मांडली.

‘अरूण, बंद कर तुझं तोंड. एक अक्षर ऐकून घ्यायची माझी इच्छा नाही.

‘प्रगती’ला प्रबोधनाची किती वर्षांची परंपरा आहे, ठाऊक आहे तुला? ‘प्रगती’तला माझा सहकारी या पद्धतीची भाषा बोलतो, याचीच मला अगदी लाज वाटते… दाबके सात्विक संतापानं अगदी बेभान झाले होते.

एवढ्यात तिथं ज्योती आली. तिचा चेहरा बघितला, की दाबक्यांना प्रेसच्या रूक्ष वातावरणात शरदाचं चांदणं (ओरिजिनल; टी.व्ही.वरच नव्हे) पसरल्यासारखं वाटायचं.

‘काय, ज्योती? या वेळी कुणाची मुलाखत घ्यायची आपण? तू भेटलीस का त्या नाट्यसम्राज्ञी शैला सावर्डेकरला?’

‘भेटले’ ती म्हणाली, ‘मुलाखत द्यायला माझी ना नाही, पण ‘प्रगती’त नको. दुसरीकडं कुठंही येणार असेल, तर मी पाचच काय, दहा पानं मुलाखत देते!’

‘असं… असं…. म्हणाली ती….?’ काही क्षण रागातिरेकानं दाबकेंना शैला सावर्डेकरला कोणती शिवी द्यावी, तेही सुचेना. ‘बरं मरू दे ती. तिथंच तो नाट्यसम्राट शांताराम वाघोलीकर होता. त्याला गाठायचं तिथल्या तिथं.’

‘त्यानंच शैलाला सावध केलं. तो म्हणाला, ‘या मासिकाची जरा वेगळी भानगड आहे. इंटरव्हलला तिला बोलाव.’ इंटरव्हलला मी गेले, तेव्हा या नाट्यसम्राटानं तिचे काय कान फुंकले होते, कुणास ठाऊक, पण शैलानं मला आपल्या मासिकासाठी मुलाखत द्यायला नकार दिला.’

दाबके काही काळ डोकं गच्च धरून गप्प बसले. महाराष्ट्रात ही असली नवी अंधश्रद्धा डोकं वर काढते आहे, याचा त्यांना मनस्वी खेद होत होता, पण करणार काय?

‘येऊ का, संपादकमहाशय?’ दाबक्यांच्या कानांवर प्रश्न पडला.

खरं तर त्यांना आता कुणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती. त्यातून हा प्रश्न विचारणारा ज्योतिषमार्तंड गजाननशास्त्री ढेरे हा मुलुखाचा पीळ माणूस म्हणून ख्यातनाम होता. मुंबईच्या एका प्रख्यात मराठी दैनिकात हा राशीभविष्य लिहायचा. त्यामुळं तो स्वत:ला जेवढा ‘ज्योतिषी’ समजायचा, तेवढाच ‘पत्रकार’ही समजायचा.

‘काय… आमची कुंडली मांडायला आलात, की काय?’ दाबकेंनी विनोदाच्या अंगानं प्रश्न केला.

‘अहो, मराठी मासिकाचं भविष्य सांगायला कुंडलीची आवश्यकता नाही. ते सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.’ शास्त्रीबुवा विनोदाच्या अंगानं सत्य बोलले.

‘मग इकडे वाट कशी काय चुकलात? आम्ही तुमची मुलाखत छापू, असं वाटलं, की काय?’ दाबकेंनी गमतीनं विचारलं.

‘छे, छे, तसा गैरसमज मी कशाला करून घेईन? अहो, उभ्या महाराष्ट्रात ‘पुरोगामी मासिक’ म्हणून तुमची ख्याती…. तुम्ही कशाला आमच्यासारख्या पोटभरू ज्योतिष्याची मुलाखत छापाल?’ गजाननशास्त्री म्हणाले.

‘तुम्ही देताय् का मुलाखत? याच अंकात टाकतो.’ हे दाबके खरं तर अगदी सहज-शास्त्रीबुवांची टिंगल करायसाठी म्हणून म्हणाले होते. पण तेवढ्यात त्यांच्या डोक्यात कल्पना चमकली. खरंच, काय हरकत आहे शास्त्रीबुवांची मुलाखत टाकायला? (नाहीतरी दुसरा माणूस मिळत नाहीच) आपले जे ज्योतिषशास्त्राबाबत विचार आहेत, ते अग्रलेखातून स्वतंत्रपणे मांडता येतीलच. त्यांनी शास्त्रीबुवांना पकडायचंच ठरवलं. अनायासे ते आपल्या पावलांनी चालत आले होते.

‘काय हो, शास्त्रीबुवा, ‘सहज विचारतो, ‘तुम्ही तुमची कुंडली पाहिली असेल ना?’

‘हो, का बरं?’

‘नाही, मला सांगा, तुमचं आयुष्य किती आहे?’

‘भरपूर. अगदी नव्वदीपर्यंत तर काही मरण नाही.’ शास्त्रीबुवा आत्मविश्वासानं म्हणाले.

‘मग तर मी तुमची मुलाखत खरोखरच टाकतो या अंकात. नाहीतरी तुम्ही तक्रार करताच: ‘आमची बाजू कुणी छापत नाही’, म्हणून मी छापतो. अगदी ‘प्रगती’ला शिव्या द्यायच्या असल्या, तरी द्या. तुमच्या मुलाखतीमुळं दोन गोष्टी साध्य होतील.’

‘कोणत्या?’

‘एक तर ज्योतिषशास्त्राला ‘प्रगती’सारखं व्यासपीठ लाभेल आणि दुसरी गोष्ट आमची सध्याची जी ‘इमेज’ झाली आहे, ती सुधारेल.’

‘कसली, बुवा, इमेज?’ वेड पांघरून पेडगावला जात शास्त्रीबुवांनी प्रश्न केला.

‘हीच. आमच्या मासिकात मुलाखत आली, की तो माणूस मरतो, ही. तुमच्या कुंडलीत काही साठीला मरणयोग नाही. नव्वदीपर्यंत तुम्ही जगणार. तेव्हा लोकांमधील ही जी अंधश्रद्धा आहे, तीही दूर होईल; आणि तुमचं ज्योतिषशास्त्र खरं आहे, हेही तुम्हाला सिद्ध करता येईल. काय? एका दगडात दोन पक्षी…. कसं?’

‘छे छे….. मी फार लहान माणूस आहे. निघतो मी.’ शास्त्रीबुवा उठलेच. त्यांचा चेहरा भयभीत झाला होता.

‘कमाल आहे, तुम्ही मागं दोन वेळा मला ‘माझी मुलाखत घ्या’, म्हणून मागं लागला होतात. या वेळी तुम्हाला तुमचं ज्योतिषशास्त्र जाहीरपणे सिद्ध करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे, आणि….’

‘मला तरी सध्या आकाशातल्या ग्रहतार्‍यांपेक्षा तुमच्या मासिकाची ताकद जास्त दिसते आहे. जाणूनबुजून विषाची परिक्षा कशाला घ्या? निघू…?’

‘बसा, बसा शास्त्रीबुवा. तुम्ही तर सपशेल शरणागतीच पत्करलीत. अहो, ‘प्रगती’सारखं पुरोगामी मासिक तुमची मुलाखत कशाला छापेल? सहज गंमत केली तुमची…’

सुटकेचा नि:श्वास टाकून शास्त्रीबुवा खाली बसले. त्यांची आणखी थोडी मजा करावी, म्हणून दाबके म्हणाले, ‘आम्ही पुढच्या अंकात मुख्यमंत्र्यांची मुलाख टकतो आहोत. फोनवर त्यांनी होकारही दिलाय्. उद्याच मी मुंबईला जातोय.’

शास्त्रीबुवांचा चेहरा उजळला, स्वत:चं मरण टळलं, म्हणून शास्त्रीबुवा खुश झाले असणार, हे उघड होतं.

पण त्यांचा चेहरा उजळायला तेवढंच कारण नव्हतं, हे दाबकेंना रविवारी समजलं. लगेचच्याच रविवारी शास्त्रीबुवांनी आपल्या दैनिकाच्या नेहमीच्या साप्ताहिक सदरात खास चौकट टाकून ‘भविष्यवाणी’ केली होती. राहू सप्तमात, शनी, वक्री, रवी मसनात वगैरे पाल्हाळ लावून ‘मुख्यमंत्र्यांच्या जिवाला पुढच्या महिन्यात धोका आहे…. त्यांनी पत्रकारांपासून सावध रहावं’ असा गंभीर इशारा शास्त्रीबुवांनी दिलेला होता. आपल्या ‘प्रगती’चा या कुडमुड्या ज्योतिष्यानं असा गैरफायदा घ्यावा, याचा दाबकेंना प्रचंड संताप आला.

पण रागवायला, चिडायलाही वेळ नव्हता. पंधरा तारीख उलटून गेली, तरी कुणी मुलाखत देणारा सापडत नव्हता. मुलाखतीची कल्पनाच रद्द करावी लागणार, असं दिसत होतं. खरं तर, तेही करायला हरकत नव्हती, पण एकूणच हा मूर्खपणा दाबकेंना असह्य होत होता. त्यांनी ‘मुलाखत’ हा प्रतिष्ठेचाच प्रश्न केला होता. एप्रिलच्या अंकात मुलाखत ही येणारच, हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. फक्त ती कुणाची, हाच मोठा प्रश्न होता.

-आणि देवदूत यावा, तसे आमदार संपतराव खबडे(पाटील) मुद्दाम दाबकेंच्या भेटीला आले. दाबकेंनी याच संपतरावांच्या भ्रष्टाचारावर सणसणीत अग्रलेख लिहून त्यांना अगदी आडवंतिडवं केलं होतं.

‘बोला, काय काम काढलंत?’ दाबकेंनी विचारलं.

‘काम होणार आसलं, तर सांगण्यात मजा. तुम्ही म्हंजी बाणेदार, नि:स्पृह का काय तसले पत्रकार!’

आपला लेख संपतराव अजून विसरले नाहीत, हे बघून दाबकेंतला पत्रकार जरा सुखावला. दाबके म्हणाले, ‘मी त्या वेळी पत्रकार या नात्यानं माझं कर्तव्य केलं.’

‘पटलं आपल्याला बरोबर केलंत तुम्ही. असो, आमच्यावरबी अंकुश पायजेच की लोकशाहीत…. ’ पुढं संपतराव दहा मिनिटं लोकशाहीवर भाषण देत होते.

‘…. आमचं यवढंच म्हननं हाये, की तुम्ही पत्रकारांनी आमच्या विधायक कामालाबी प्रसिद्धी दिली पायज्ये.’ या वाक्यानं त्यांनी भाषणाचा समारोप केला.

अरूणचं औचित्य दाखवून ‘थम्स-अप’ मागवलं होतं. ती बाटली तोंडाला लावून संपतराव म्हणाले,

‘आता कामाचं….’

‘बोला.’

‘आमच्या तीन-चार कारखान्यांच्या जाहिराती द्यायच्यात तुमच्या मासिकाला. स्पेस हाये ना?’

‘तुमच्यासाठी, नसली, तर करू, संपतराव.’ दाबके ओशट हसत म्हणाले.

‘कव्हर दोन, तीन, चार बुक करा-दहा हजार पुरतील ना?’

‘हो, हो, भरपूर झाले.’

‘ठीक हाये-दिले दहा हजार. पन त्येवढं त्या अंकात मुलाखतीचाही जमवलं पायजे’ संपतराव बारीक डोळा करून म्हणाले.

आंधळा मागतो एक डोळा…. अशी दाबकेंची अवस्था झाली. ते उत्साहानं म्हणाले,

‘हो, हो, जरूर देऊ मुलाखत. पाच-सहा… शक्य झाल्यास दहा पानं टाकू. फोटोबिटो भरपूर टाकू. सहकार क्षेत्रातलं तुमचं विधायक कार्य लोकांच्या डोळ्यांसमोर आलं पाहिजे. झकासपैकी रंगीत फोटो छापू तुमचा कव्हरवर.’

‘भले! आमची मुलाखत छापायला हा नजराणा तुम्हाला दिला, आसं वाटलं का काय तुम्हाला? छ्या! छ्या! अहो, आम्ही कामं करणारी मानसं, प्रसिद्धीपास्नं लांब र्‍हानारी आनि आता आमची कसली मुलाखत छापताय? ग्रामीण भागात नव्यानं जे नेतृत्व उदयाला येत्ंय, त्यांची मुलाखत छापा. आमच्या भागातनं निवडून आलेला आणि लहान वयात शिक्षण खात्याचा राज्यमंत्री झालेला आमचा बजरंग टोपले हाये. त्याची मुलाखत छापा. यंग ब्लड हाये. त्याची जोरदार प्रसिद्धी झाली पायज्ये. दहाच्या जागी पंधरा लागले, तरी हरकत नाही….’ संपतराव म्हणाले.

दाबकेंच्या डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला.

बजरंगराव टोपले विरोधी गटातले…. त्यांनी मंत्रीपद पटकावून संपतरावांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणलेलं. तेव्हा ‘प्रगती’त मुलाखत छापून आणवून बजरंगरावांना ठार करण्याचा कुटील डावच संपतराव खेळत होते. राजकीय कारकीर्द संपत आलेल्या या धूर्त संपतरावानं आपला उपयोग एखाद्या भाडोत्री मारेकर्‍याप्रमाणे करावा, याची दाबकेंना तिडीकच आली. एरवी त्यांनी संपतरावांना बाहेरचा रस्ता दाखवला असता; पण आत्ताची वेळ बरी नव्हती. त्यामुळं सबुरीनं काम घेणं जरूरीचं होतं, नाही म्हटलं, तरी दहा-पंधरा हजारांचा प्रश्न होता. आणि घरी चालत आलेल्या लक्ष्मीला लाथाडणं दाबकेंच्या जिवावर आलं होतं. अखेर ‘प्रगती’च्या अस्तित्वाचाच प्रश्न समोर उभा होता.

‘पण बजरंगराव देतील का मुलाखत?’ दाबकेंनी विचारलं.

‘देईल की- त्याला प्रसिद्धीची नशा आहे, नशा. पत्रकारांना खूश करण्यात पटाईत गडी. हिथं फुकटात मुलाखत येतीय्, म्हटल्यावर न्हाई कशाला म्हनंल?’

तसंच झालं.

बजरंगरावांनी व्यवस्थित मुलाखत दिली, त्यात संपतरावांच्या गटाला व्यवस्थित शिव्या घातल्या, स्वत:ची प्रतिमा जेवढी उजळ करून घेता येईल, तेवढी ती करून घेतली. शेवटी ते म्हणाले, ‘मिस्टर दाबके, तुम्हाला त्या संपतरावानं पाठवलंय, हे मला चांगलं ठाऊक आहे, पण मासिकात मुलाखत दिल्यानं कुणी मरत नसतं. माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवर. अहो, सत्यशोधकी परंपरेत वाढलेलो आहे मी.’

आता असं म्हटल्यावर दाबकेंना नामदार साहेबांकडं सरकारी जाहिराती मागायलाही तोंड उरलं नाही.

दाबकेंनी ‘प्रगती’ची दैनिकांमधून जोरदार जाहिरात केली. ना. बजरंगराव टोपले यांची मुलाखत येणार, म्हटल्यावर पुन्हा एकदा गजाननशास्त्री ढेर्‍यानं ‘शिक्षण खात्याच्या राज्यमंत्र्याच्या जिवाला धोका’ अशी ‘भविष्यवाणी’ आपल्या रविवारच्या सदरात वर्तवली.

अंक बाहेर आला. ऑफसेट छपाई, कव्हरवर बजरंगरावांचा रंगीत फोटो, आत ‘एक्सक्लुजिव्ह’ इन्टरव्ह्यू, उत्तम ले आऊट, भरपूर फोटो-सगळी भट्टी कशी जमून आली होती.

संपतरावांचा फोन आला:

‘वा वा वा! अंक झ्याक जमलाय्. द्या धाडून बजरंगाला. कर म्हणावं, थोडे दिवस दिवाळी.’

संपतरावांचा शब्द प्रमाण मानून दाबकेंनी नामदार बजरंगरावांना सर्व अंक ‘सप्रेम भेट’ धाडून दिले.

या अंकामुळं बजरंगराव मनापासून खूश झाले. त्यांनी अंक वर्तमानपत्राकडं धाडून उत्तम परीक्षणं लिहवून आणली. आपल्या भागात अंक फुकट वाटून स्वत:ची ‘इमेज’ चांगलीच वाढवली. कव्हरवरचा रंगीत फोटो एवढा चांगला आला होता, की पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक पक्ष कार्यकर्त्याच्या घरी तो फ्रेम करून झळकावण्यात आला. संपतरावांची संपत आलेली राजकीय करीअर या अंकामुळं पूर्ण संपली.

संपतराव गालांतल्या गालांत हसत होते. बजरंगरावांच्या या गमजा काही दिवसांतच संपणार होत्या. मग पुन्हा नव्या जोमानं ते राजकारणात उतरणार होते.

संपतरावांच्या या मूर्खपणाला बजरंगराव गालांतल्या गालांत हसत होते.

दाबकेही आपल्या ‘प्रगती’ची बदनाम झालेली इमेज आता बदलणार, या आनंदात गालांतल्या गालांत हसत होते.

अंक बाजारात येऊन आठवडा झाला. दाबकेंच्या मागे देणेकर्‍यांचे तगादे सुरू. कागद, छापखाना, टाईप-सेटींग-लाख भानगडी. त्यांनी पंधरा हजारांची आठवण करण्यासाठी संपतरावांना फोन लावला.

‘देतो, हो. पैसे कुठं पळून जातायत् का?’

‘नाही. पण अंक बाजारात आला. इथं देणेकरी मला तोंड वर काढू देत नाहीत. तेव्हा….’ दाबके अजिजीनं म्हणाले.

‘हे बघा, अंकाचा गुण कुठं आलाय?’ उर्मट सुरात संपतरावांनी विचारलं. ‘पण तुम्ही सांगितल्याप्रमाणं माझं काम मी केलं, बाकी मला ठाऊक नाही.’ दाबके म्हणाले,

‘वा वा! म्हंजे माज्या खर्चानं माझी पोलिटिकल करीअर संपवायला आन् बजरंगाची लाल करायला मी पंधरा हजार दिऊ होय? अंकाचा गुण आला, की पैसे मिळतील, मला तवर डिस्टर्ब करू नका.’

संपतरावांनी फोन खाली ठेवला.

अंकाचा गुण काही आला नाही. येणारच नव्हता.

आठवडा झाला.

दोन आठवडे झाले.

चार आठवडे झाले.

महिना झाला.

‘प्रगती’चा पुढचा अंक निघणंच शक्य नव्हतं. ‘प्रगती’च्या कचेरीला टाळं लागलं. ‘प्रगती’चं दिवाळं वाजलं.

दाबकेंना दु:खात सुख एवढंच होतं, की अंकात मुलाखत आली, की तो माणूस मरतो; हा समज तरी शेवटच्या अंकानं खोटा ठरवला होता, पण हा समज खोटा ठरवण्यासाठी दाबकेंना फार मोठी किंमत चुकवावी लागली.

संपतरावांचं तर उभ्या महाराष्ट्रात हसू झालं.

शेवटच्या मुलाखतीनं नामदार बजरंगराव तेवढे सोडून तिघांचा बळी घेतला, दाबकेंचा, संपतरावांचा आणि ‘प्रगती’ मासिकाचाच.(चौथा ‘पोट’बळी अरूण बोबडेचा म्हणता येईल.)

महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणार्‍या मराठी मासिकाचा ‘असा’ दुर्दैवी अंत झाला.

मुकुंद टाकसाळे

लेखक संपर्क : 9850817210