विवेकी व्यक्ती घडविणे व विवेकी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करणे हेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ध्येय आहे. गेल्या पंचवीस वर्षात ह्या ध्येयाकडची वाटचाल अंधश्रद्धा निर्मूलन – शास्त्रीय विचार पद्धती – वैज्ञानिक दृष्टीकोन – धर्मचिकित्सा – धर्मनिरपेक्षता – विवेकवाद या मार्गाने हळूहळू का होईना पण निश्चितपणे होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघाड्यांवर पुण्यात जानेवारी 1989मध्ये झालेल्या जाहीरनामा परिषदेपासून आजतागायत अंनिस कार्यरत आहे. यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वाटा फारच मोठा आणि मोलाचा आहे.
अंनिसच्या झुंजार पंचविशीचा या विभागात परामर्श घेतलेला आहे. तसेच अंनिसची भविष्यातील वाटचाल काय असणार आहे, याचाही ऊहापोह केलेला आहे. त्याचप्रमाणे अंनिस बाहेरच्या हितचिंतकांनीही अंनिसच्या वाटचालीबद्दलचे आपले मत व्यक्त केले आहे.