Categories
चळवळ

विवेकी व्यक्ती घडवणे व विवेकी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करणे हेच महाराष्ट्र अं.नि.स. चे ध्येय आहे!

वार्षिकांक – २०१४

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चालू झाले त्यावेळी बुवाबाजी, भूत भानामती, जादूटोणा अशा गोष्टींच्या विरोधात लढणारी, परिवर्तनाला पूरक, पण दुय्यम चळवळ असे तिच्याकडे पाहिले जात होते. गेल्या 20 वर्षांत ही वाटचाल अंधश्रद्धांचे निर्मूलन-शास्त्रीय विचार पद्धती-वैज्ञानिक दृष्टिकोन-धर्मचिकित्सा-धर्मनिरपेक्षता-विवेकवाद या मार्गांनी हळूहळू, पण निश्चितपणे परिवर्तनाचा मुख्य भाग बनण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. या विवेकवादाच्या टप्प्यावरही दोन महत्वाच्या गोष्टींचे भान आम्ही बाळगत आहोत. एक म्हणजे देव आणि धर्माच्या सहाय्याने जे नीतीने वागू इच्छितात, त्यांच्याबद्दल समितीला आदर आहे; परंतु समिती मात्र स्वत:च्या सद्सद्विवेकाच्या सहाय्याने नीतीने वागू इच्छिते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे विवेकशक्ती संघटित करून शांततामय सनदशीर पण प्रखरपणे समाज जीवनात हस्तक्षेप करावयास हवा आणि आजचे जग आहे यापेक्षा अधिक चांगले घडवावयास हवे. हे आवश्यक आहे, शक्य आहे. आजच्या विवेकवादी चळवळीचे ते कार्यच आहे.

विवेकी व्यक्ती घडवणे व विवेकी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करणे हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ध्येय आहे. समितीचे प्रधान कार्यक्षेत्र अंधश्रद्धा निर्मूलन आहे हे खरेच, पण या क्षेत्राकडे ही समिती ‘विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद चालू करण्याचा ‘प्रारंभबिंदू’ याच दृष्टीने पहाते. मात्र या संदर्भात नेहमी एक प्रश्न विचारला जातो, त्याचे थोडे विवेचन आवश्यक आहे.

माहिती-ज्ञान-शास्त्रीय विचारपद्धती ही पहिली साखळी आहे. सध्याच्या इंटरनेट जमान्यात अफाट माहिती मिळते आपल्या दृष्टीने त्यातील कोणते ज्ञान आवश्यक आहे याचा विचार व्यक्तीला करावा लागतो. उदा. आरोग्याबाबत प्रचंड माहिती आहे; परंतु आपल्या आरोग्याच्या संदर्भात आहार, व्यायाम याबाबतचे त्यातील हवे ते ज्ञान पारखून घ्यावे लागते. हे ज्ञान उपयोगात आणताना उघडच शास्त्रीय विचारपद्धतीने वापरावे लागते. उदा.विशिष्ट प्रकाराच्या व्यायामाचे वा आहाराचे अनेकविध प्रकार असतात. त्यातील इष्टानिष्टता ठरवणे याचाच अर्थ शास्त्रीय विचारपद्धतीने त्या त्या बाबी तपासणे. आजच्या सुशिक्षित समाजात इथपर्यंतची वाटचाल सहज साध्य होते. प्रश्न त्यानंतर निर्माण होतो. आहाराचे, व्यायामाचे, आरोग्याचे, कोणत्याही तंत्रवैज्ञानिक कौशल्याचे ज्ञान वापरण्यासाठी माहिती-ज्ञान व शास्त्रीय विचारपद्धतीचा वापर केला जातो. त्या पुढच्या टप्प्यावर मात्र यशस्वीता, सफलता यासाठी पारंपरिकतेचा मार्ग शोधला जातो. यश मिळवण्यासाठी शास्त्रीय विचारपद्धतीने काम करावेच लागते; पण त्याबरोबर यशस्वी होण्यासाठी परंपरेने सांगितलेले जे जे मार्ग असतात ते ते सर्व म्हणजे जपजाप्य, होमहवन, ताईततोडगे, पूजा अर्चा, यज्ञयाग, गंडेदोरे, उपासतपास हे सर्वही बहुधा यथासांगपणे पार पाडले जातात. नेमक्या शब्दात बोलावयाचे, तर व्यवहारातील यशस्वीतेसाठी शास्त्रीय विचारपद्धती वापरली जाते, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाला संपूर्ण फाटा दिला जातो. शास्त्रीय विचारपद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यात मूलभूत फरक आहे, हे लक्षातच घेतले जात नाही. शास्त्रीय विचारपद्धतीत निरीक्षण, तर्क, अनुमान, गणिती प्रचिती व प्रयोग यांचा समावेश असतो. ‘शोधकता’ हे मूल्य फक्त एवढ्या बाबीपुरतेच संबंधित असते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ यामुळे निर्माण होणारी जीवनदृष्टी शास्त्रीय विचारपद्धतीत अभिप्रेत नसतेच. त्यामुळे शास्त्रीय विचारपद्धतीने विचार करणारे लोक बिनदिक्कतपणे सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचा वापर करतात. त्यात त्यांना काही अयोग्यही वाटत नाही. शास्त्रीय विचारपद्धती ‘गणिती’ विचार करते. वैज्ञानिक दृष्टिकोन ही पुढची पायरी ‘मूल्यविचार’ करते. ही एका अर्थाने हनुमान उडी आहे. शास्त्रीय विचारपद्धतीत निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग या मार्गाने फक्त ‘शोधावयाचे’ असते. ‘शोधकता’ हे एकच मूल्य असते आणि त्याला यशस्वी होण्यासाठी ‘पारंपरिकता’ या वास्तवाशी हातमिळवणी करण्यात अजिबात चूक वाटत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनात शोधकता असावीच लागते; परंतु त्याबरोबरच सम्यकता, निर्भयता, कृतीशीलता आणि नैतिकता असते. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा माणूस एक जीवनदृष्टी बाळगत असतो. त्यामुळे तो ‘शोधकता’ सम्यकपणे वापरतो. आपल्या कार्याविषयी संबंधित यशापयश हे कोणत्याही बाह्य दुष्ट वा सुष्ट शक्तींवर अवलंबून नाही, हे त्याला पक्के ठाऊक असते. हे विश्व स्वायत्तपणे अस्तित्वात आहे, ही त्याची ठाम भावना असते. ही सम्यकदृष्टी त्याला आपोआपच निर्भय बनवते. दैववाद, अगतिकता यापासून दूर नेते. आणि ही निर्भयता त्याला कृतीशीलही बनवते. वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारासार विचाराचे दुसरे रूप असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी व्यक्ती ही नैतिक असण्याची शक्यता अधिक असते. याचे साधे कारण म्हणजे माझ्याशी दुसर्‍यांनी जसे वागलेले मला आवडत नाही, तसे-मी दुसर्‍याशी वागू नये आणि दुसर्‍यांनी माझ्याशी जसे वागलेले मला आवडते, तसे मी त्यांच्याशी वागावे हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील कार्यकारणभाव त्याला सहज समजतो, त्याच्या नैतिकतेचा आधार असतो. अर्थात, विवेकवादी व्यक्ती नितीमान समाजनिर्मितीला सर्वाधिक महत्व देते; त्यामुळे देव आणि धर्म कल्पनेच्या आधारे नीतीने वागणार्‍या व्यक्तींचाही ती आदरच करते.

मात्र परत परत प्रश्न उपस्थित केला जातो की, सुशिक्षित व्यक्ती, विज्ञानाच्या अभ्यासक व्यक्तीही अंधश्रद्धेला बळी कशा पडतात? याचे उत्तर असे की, स्वत:च्या भौतिक स्वार्थापुरता वा अभ्यासापुरता शास्त्रीय विचारपद्धतीचा वापर केला की, मग व्यक्तीचा प्रवास पारंपरिकतेकडे होतो. ते स्वाभाविक आहे, कारण त्या विचाराचा पगडा काही हजार वर्षांचा असतो. त्याला धर्माचे अधिष्ठान असते. आजूबाजूच्या सर्व समाजाला मान्य असलेले ते वर्तन असते. या सर्वांच्या प्रभावातून मानसिक गुलामगिरी निर्माण होते. ही गुलामगिरी अधिक घातक असते. कारण राजकीय वा आर्थिक गुलामगिरीतील शोषण स्पष्ट असते. त्याविरूद्ध प्रबोधन व संघर्ष होऊ शकतो. अगदी नेमके त्याच्या उलट मानसिक गुलामगिरीबद्दल असते. ही गुलामगिरी स्वीकारणार्‍यांना ती सोईची व सुखकारक वाटते. त्यामुळे त्या गुलामगिरीचे समर्थन, संरक्षण, संघटन, संवर्धन व उदात्तीकरण केले जाते. स्वाभाविकच हा संघर्ष अवघड बनतो. नुसत्या प्रबोधनाने तो लढता येत नाही, त्याला सम्यक स्वतंत्र विचार, निर्भय मानस व खंबीर कृती हे तिन्ही लागते. नैतिकतेचे भान तर लागतेच लागते.

-डॉ. नरेंद्र दाभोलकर