Categories
अभिवादन

या दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

घडले ते फारच वाईट घडले. आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील हे सर्व आहे.

डॉ.दाभोलकरांशी माझा 30 वर्षांपासूनचा परिचय होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या कार्यक्रमानिमित्ताने आम्ही दीर्घकाळ संपर्कात होतो. त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचे कार्य पुढे नेणे. त्यामुळे आपल्यावर एका बाजूने ती जबाबदारी आहे. आणि दुसर्‍या बाजूने निर्धार पण आहे. आपण कार्यकर्त्यांनी त्या निर्धारावर अधिक भर दिला पाहिजे.

जेव्हा आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे समाजसेवा पुरस्कार द्यायला सुरवात केली तेव्हा आमचा परिचय झाला. आमची वैचारिक तार जुळली. याला कारणीभूत त्यांचे विचार आणि व्यक्तीमत्व. 2005 साली आम्ही त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेला बोलावले होते. फाऊंडेशनतर्फे त्यांना ‘या दशकातला सर्वोत्तम कार्यकर्ता’ म्हणून आम्ही त्यांना 10 लाख रूपयांचा पुरस्कार दिला होता. हा महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार. ही रक्कम त्यांनी संघटनेस दिली.

उत्तर महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे वॉशिंग्टन डी.सी., न्यू.जर्सी, शिकागो, न्यूयॉर्क शहरांमध्ये मी त्यांच्याबरोबर फिरलो व त्यांचे कार्यक्रम केले. सोनाली कुलकर्णी पण बरोबर होत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनुषंगाने लोकांशी संवाद साधणे व पुरोगामी विचारांची त्यांना ओळख करून देणे ह्या उद्देशाने हे कार्यक्रम आखले होते. येथील काही लोकांच्या वर सनातनी विचारांचा प्रभाव आहे. तसेच आर.एस.एस.चा पण पगडा आहे. याचे कारण बहुतांशी लोक उच्चभ्रू व उच्चवर्णीय आहेत. श्रोत्यांकडून बहुधा असे प्रश्न येत की, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे श्रद्धेला विरोध का? यावर दाभोलकर म्हणत तुमच्या श्रद्धेमुळे तुमचे वर्तन जर नैतिक घडत असेल तरच अशी श्रद्धा कामाची; अन्यथा नाही.

दाभोलकरांचे मला भावलेले गुण म्हणजे त्यांची नम्रता व साधेपणा. बहुतांशी समाजसेवक दाढी वाढवून, भकास चेहर्‍याने समाजासमोर वावरतात. पण दाभोलकर त्याला अपवाद होते. त्यांची कार्यपद्धती अतिशय वेगळी व संवादकौशल्य अतिशय प्रभावी होते. संघटन, नियोजन व अंमलबजावणी या सर्वच स्तरांवर ते भर देत. त्यांची कार्यक्षमता एखाद्या मोठ्या कंपनीच्या सी.ई.ओ.ला लाजवावी अशी होती.

भारतातील समाजजीवनात अनेक अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा अजूनही आहेत. ज्या दूर करणे आवश्यक आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या ह्या गोष्टी समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. नेमके हेच महत्वाचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य दाभोलकर गेली अनेक वर्षे करत आले आहेत. समाजकार्य हे दोन प्रकारचे असते. एक कल्याणकारी आणि दुसरे परिवर्तनवादी. कल्याणकारी कार्य करणे फार सोपे असते. परंतु परिवर्तनवादी कार्य करणे कठीण व आव्हानात्मक आहे. आम्ही अमेरिकेतून भारतीय समाजासाठी डॉलर्स किंवा महागड्या/उंची वस्तू पाठवू शकतो. अमेरिकेत येण्याआधी भारतात माझे सांगली परिसरात वास्तव्य होते. जर एखाद्या गावातील चौकात मी उभे राहून लोकांना सांगू लागलो की, अंधश्रद्धा जोपासू नका, व्यसनापासून दूर रहा इ. तर तू आम्हाला हे कोण शिकवणार असे म्हणून मला गावाबाहेर काढले जाईल. परंतु हेच समाजपरिवर्तनाचे काम दाभोलकरांनी करून दाखवले आहे.

मी महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांसाठी अंनिस वार्तापत्राची सलग तीन वर्षे वर्गणीसाठी आर्थिक सहकार्य देऊ केले. आम्ही भारतीय मंडळी ज्या भारतीय समाजात आपण वाढलो त्यासाठीची कृतज्ञता म्हणून अंनिसच्या प्रबोधन कार्याला हातभार लावतो. पण अंनिसच्या कार्याला विरोध करणारी मंडळी दाभोलकर परदेशातील ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून मदत घेतात असा अपप्रचार करतात. त्याबाबत माझे मत असे आहे की, जे लोक वैचारिक लढाई हरतात तेच अशा प्रकारचा पवित्रा घेतात. दाभोलकरांची राहणी वयाच्या 65 व्या वर्षी किती साधी होती. त्यांच्या संस्थेचे कोठेही कार्यालय नाही. अंगावर दोन कपड्यांचे जोड यापलिकडे कोणतीही संपत्ती नाही. अशा व्यक्ती/संस्थेवर असे आरोप होणे हे हास्यास्पद आहे. अशा लोकांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे हे लक्षण आहे. ज्यांचा स्वत:चा वैचारिक पराभव होतो त्यांची ती प्रतिक्रिया आहे.

दाभोलकरांच्या खूनाची बातमी अतिशय सुन्न करणारी होती. परंतु येथून पुढे जर त्यांचे कार्य पुढे नाही गेले तर समाजातील (मूलतत्ववादी) लोकांचा विजय होईल. म्हणूनच मी निर्धार केला आहे की, त्यांचे कार्य पुढे न्यायचे.

दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेवर अमेरिकेत विविध माध्यमातून प्रतिक्रिया आल्या. अमेरिकेतील सर्वात मोठ्या व आदरणीय वर्तमानपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये मोठी बातमी आली. महाराष्ट्र फाऊंडेशन आणि बृहनमहाराष्ट्र मंडळाने दाभोलकरांवर लेख प्रकाशित केले आहेत. दोघांनी आदरपूर्वक या घटनेची दखल घेतली आहे.

सुनील देशमुख