नरेंद्रचा खून होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. नरेंद्र हा माझा खूप जवळचा मित्र होता. त्यामुळे त्याचं जाणं माझ्यासाठी वेदनादायी आहे. नरेंद्र करत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल मला प्रचंड आदर होता. त्याच्या या कार्यात मी मला जितकी जमेल तितकी मदत करायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी नेहमीच व्हायच्या. आम्ही भेटलो की आमचे गप्पांचे फड रंगायचे. मी अनेकवेळा त्याची चेष्टा करायचो. त्यामुळे त्याच्या जाण्याने माझ्या मनावर मोठा आघात झाला आहे.
मी गेली अनेक वर्षं त्याला ओळखत आहे. त्याने कधीही कोणाला दगड तरी फेकून मारला असेल किंवा ‘अरे’ला ‘का रे’ केलं असेल असंही मला वाटत नाही. त्याच्यासोबत अनेकांची वैचारिक लढाई होती. त्याचे आणि अनेकांचे विचार वेगळे होते. पण त्याच्याविषयी कोणाला इतका राग होता आणि असेलच तर तो कोणत्या कारणासाठी होता की त्यांनी त्याचा खून केला हे मला काहीच कळत नाहीये. एखाद्या व्यक्तीला जर कोणाचा विचार पटत नसेल तर त्याला तुम्ही विरोध दर्शवू शकता. पण ज्याने आयुष्यभर अहिंसात्मक मार्ग अवलंबला, त्याचा अशा प्रकारे खून होणं हे खरंच अतिशय वाईट आहे.
माझे आणि नरेंद्रचे कौटुंबिक संबंधही खूप चांगले होते. त्यामुळे आता माझी मुलगी आणि नातू माझ्याकडे येणार असल्याचंही त्याला माहीत होतं. त्यांना भेटण्यासाठी तो येणार असल्याचंही तो मला बोलला होता. कारण त्याचं माझ्या कुटुंबियांशीही तितकंच जवळचं नातं होतं. माझी आणि त्याची शेवटची भेट या महिन्याच्या सुरवातीलाच झाली होती. आम्ही दोघं नगरला गेलो होतो. तिथे सोनईमध्ये दलित समाजाच्या मुलाने मराठा समाजातील तरूणीशी लग्न केल्याबद्दल त्याची आणि त्याच्या दोन भावांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या कुटुंबियांना भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही त्यांना भेटून 60 हजारांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर माझी आणि त्याची भेट काही होऊ शकली नाही. पण दरम्यानच्या काळात दोनदा-तिनदा त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालं होतं.
नरेंद्र जाण्याने समाजाची मोठी हानी तर झाली आहेच. पण मी एक खूप जवळचा आणि चांगला मित्र गमावला आहे.
–सदाशिव अमरापूरकर