डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यातल्या त्यात पुण्यासारख्या विवेकी आणि विचारी शहर अशी ख्याती असलेल्या ठिकाणी त्यांची हत्या झाली याचं विशेष वैषम्य वाटतं. विचारानं विचाराचा प्रतिकार करावा. मात्र, सध्या हा विवेकच हरवताना दिसतो. नरेंद्र दाभोलकर अतिशय मनापासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आंतरजातीय विवाह, जादूटोणा विरोध आदी विषयांवर काम करत होते. शिवाय त्यांचं हे काम अतिशय शांतपणे सुरू होतं. ते स्वत: आक्रमक नव्हते किंवा त्यांची चळवळही तशी नव्हती. समाजातील तळागाळातील वर्गावर पिढ्यान्पिढ्या झालेले कुसंस्कार नष्ट करण्याचं काम ही चळवळ करत होती. इतक्या प्रदीर्घ कामाची अशा प्रकारे इतिश्री होणं अस्वस्थ करणारं आहे. अर्थात, अशा भ्याड हल्ल्यामुळे चळवळी थंडावत नाहीत. उलट, त्या नव्या जोमानं कार्यरत होतात. नरेंद्र दाभोलकर हे अतिशय साधेपणानं जगणारी व्यक्ती होती. मनापासून पटलेलं काम तडीस नेणं हे त्यांचं स्वभाववैशिष्ट्य. एकेक मिशन हाती घेऊन त्यांनी त्यावर जिवापाड मेहनत घेतली. आनंदवनात देखील त्यांचे व्यसनमुक्तीचे अनेक कार्यक्रम पार पडले. दुर्दैवानं त्यांच्याशी माझा फारसा संबंध आला नाही. मात्र, बाबा असताना आनंदवनमधील अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असे. त्यांच्या निधनानं समाजाचं फार मोठं नुकसान झालं आहे. मात्र, यामुळे खचून न जाता कार्यकर्त्यांनी धडाडीनं पुढे येण्याची आणि जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून घेण्याची आवश्यकता आहे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
–डॉ. प्रकाश आमटे