Categories
अभिवादन

पुरोगामी चळवळ मागे पडणार नाही.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

नरेंद्र दाभोलकर एक समन्वयवादी, सर्वसमावेशक, एक चांगला कुशल संघटक, सहसा कुणाशी अतिरेकी पद्धतीने न वागणारा असा होता. त्याच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झाला, हे समजल्यावर धक्का बसला. यामागे असा तर संदेश द्यायचा नाही ना, की पुरोगामी लोकांमधली सौम्य माणसेसुद्धा आम्हाला चालणार नाहीत. जो जो विरोध करेल त्याला आम्ही संपवू, असे वातावरण तयार होत आहे. नरेंद्र मोदी आल्यापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ तयार करायचा आहे, असे म्हटले जाते आहे. याचा अर्थ काय तर आम्हाला पुरोगामी विचार, स्वातंत्र्यलढ्यातून आलेले विचार, जाती-धर्म निरपेक्षता यांच्यापासून भारत देश मुक्त करायचा आहे, असाच होतो ना!

हत्या केल्यामुळे चळवळीची हानी होते, असे मला वाटत नाही. कारण हत्या करण्याने कोणतीच चळवळ आणि विचार संपत नाही. उदाहरण द्यायचे झाले, तर गांधीजींचे देता येईल. महात्मा गांधींची हत्या केली तर त्यांचा विचार संपेल, असे हत्या करणार्‍यांना वाटले असेल. पण असे काही झाले नाही. उलट जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने जगामध्ये गांधीजी हे आदर्श मानले जातात. त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमुळे चळवळ मागे जाईल, असे मला वाटत नाही. माझे मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, की जादूटोणाविरोधी बिल हे संमत करावे. ते नाही केले, तर ‘हत्या केल्याने संपते सगळे’, हा विचार रूजण्याची दाट शक्यता आहे आणि पुढेही अशा हत्या होत राहतील. हत्या झाली म्हणून तुम्ही एखादे बिल रोखू शकत नाही, हा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. राजकीय पक्षांशी बोलणी करून, थोडाफार बदल करून हे बिल लवकरात लवकर संमत करावे. अशा प्रकारची हत्या होणे हा मानवतेला कलंक आहे. माणसाने माणसाशी संवाद करावा, यासाठीच माणसाला विचार करण्याची शक्ती दिली आहे. माणूस माणसाला संपवतो हा रानटीपणा आहे. या हत्येमुळे पुरोगामी चळवळ बिलकूल मागे पडणार नाही. ज्या चळवळीसाठी एखाद्याचे बलिदान होते, त्या चळवळीसाठी पाठबळ मिळते, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.

कुमार सप्तर्षी