मे 2012 अंकातील ‘उगम अंधश्रद्धेचा’ हे सदर वाचनीय
संजय सावरकर यांचं ‘उगम अंधश्रद्धेचा’ हे सदर अभ्यासपूर्ण व वाचनीय असतं. मे 2012 च्या अंकामध्ये त्यांनी नरबळीच्या प्रथेचा वेध घेतला आहे. यात एक महत्वाचा मुद्दा राहून गेला आहे तो म्हणजे आजही ही प्रथा प्रतिकात्मक रित्या चालूच आहे. माणसाच्या डोक्याशी साधर्म्य असलेलं फळ म्हणजे सोललेला नारळ, म्हणून नारळाला ‘शिरफळ’ असं म्हणतात. ‘श्रीफळ’ हे त्याचं उदात्तीकरण करणारं नाव. नारळ फोडणं हे माणसाचं डोकं फोडून त्याचा बळी देण्याच्या रानटी कृतीचं प्रतीक. काही ठिकाणी त्यावर गुलाल टाकतात ते रक्ताचं प्रतीक. एखाद्या व्यक्तीचा सत्कार करताना किंवा बाईची ओटी भरताना दिला जाणारा नारळ ही सुद्धा याच प्रथेची खूण. एखाद्या कामाची सुरवात करताना किंवा अमावास्येला नारळ फोडताना(स्वयंपाकासाठी नव्हे!) त्याची शेंडी काढलेली काही लोकांना चालत नाही. का तर म्हणे शेंडी काढली तर तो ‘मुसलमान’ होतो. अलिकडे नारळ फोडणे याऐवजी ‘श्रीफळ वाढवणे’ असा शब्दप्रयोग केला जात असला तरी त्यामागची मूळ कल्पना नरबळीचीच. तेव्हा असल्या गोष्टींसाठी आपण नारळाचा वापर करणं म्हणजे आंधळेपणानं नरबळीची प्रथा चालू ठेवण्यासारखचं आहे.
–डॉ.आशुतोष मुळ्ये, रत्नागिरी.
मा.अमरसिंह देशमुख यांचे अनुकरण करण्यासारखे
एप्रिल 2012 चा अंक मिळाला. सांगली जि.प.चे नूतन तडफदार प्रसन्न व्यक्तीमत्व असलेले मा.अमरसिंह देशमुख यांचा छायाचित्रासह आलेला परिचय वाचला. अंनिस मित्र मा.देशमुख यांनी स्थापन केलेली 30 विद्यालये व त्या माध्यमातून त्यांचा वैज्ञानिक बोध, प्रचार इतर जि.प.अध्यक्षांनी अनुकरण करण्यासारखा आहे.
-रमेश थेटे, चिंचवड, पुणे