Categories
आवाहन

मराठा परिवार, सांगली तर्फे आवाहन

जून – २०१२

सध्या लग्नविधीला समारंभाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्वत:च्या अनिच्छेने किंवा परिस्थितीनुसार ऐपत नसतानाही नाईलाजाने वारेमाप खर्च केला जात असून त्याचे परिणाम संबंधितांना बराच काळ भोगावे लागतात आणि त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. यावर विचार होणे जरूरीचे आहे व यथायोग्य बदल करणे गरजेचे आहे. या संदर्भात खालील बाबींवर विचार करावा.

1) पत्रिकेला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे पत्रिकेवर जास्त भर न देता मुलां-मुलींची वैद्यकीय तपासणी जरूर करावी.

2) लग्न समारंभ जवळचे नातेवाईक व मित्र परिवार एवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा. विवाह नोंदणी करून नोंदणी दाखला घ्यावा.

3) वाजंत्री बँड बेंजो कमी करून सनईच्या टेपरेकॉर्डरचा वापर करावा. त्याचप्रमाणे शोभेची दारू, औट गोळे इत्यादीमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होत असल्याने आणि त्याचा अवाजाचा आजारी माणसांना त्रास होत असल्याने तसेच पर्यावरण संतुलनासाठी सदर बाबी टाळाव्यात. लग्नविधी नंतर वापरला जाणारा स्प्रे आरोग्यास घातक आहे.

4) सामाजिक संबंधांना बाधा येऊ नये म्हणून आहेराची देवाण घेवाण करू नये. न्याहरी, रूखवत मंडपात मांडू नयेत.

5) लग्न कार्य साध्या पद्धतीने, आवश्यक तेवढाच खर्च करून करावे आणि बचतीची रक्कम वधुवरांच्या भावी काळातील आवश्यक खर्चासाठी राखून ठेवावी.

6) सर्वसामान्यपणे शेवटी म्हटली जाणारी मंगलअष्टका आली लग्न घटी समीप ही सुरवातीला म्हणावयाची आहे. कारण या मंगलअष्टकेमध्ये शांंत राहणेचे व गलबला न करण्याचे आवाहन केले आहे ते प्रथमच करणे योग्य आहे. एकूण पाच मंगलअष्टका म्हणाव्यात. सुरवातीस लोकांना माईकवरून तशी कल्पना द्यावी.

7) अक्षतांचे पावित्र्य राखणेसाठी स्टेजवरील मोजक्याच लोकांना अक्षता द्याव्यात. तशी माईकवरून सुरवातीस लोकांना कल्पना द्यावी.

8) स्टेजवर मोजक्याच गरज असणार्‍या लोकांनीच थांबावे. लग्नानंतर नवरानवरी एकमेकांना हार घालताना त्यांना कोणीही उचलू नये. आपणही आपले मित्र परिवार, नातलग, ग्रामस्थ यांना याबाबतीत प्रबोधन करावे आणि लग्नविधीचे पावित्र्य राखून लग्न समारंभ साध्या पद्धतीने करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. वरील सर्व बाबींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि समाज बांधवांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करावा.


            मराठा परिवार गेली काही वर्षे सातत्याने सामाजिक रूढी परंपरांमध्ये कालानुरूप आवश्यक आणि योग्य तो बदल करणेसाठी प्रयत्नशील आहे. सध्या व्यक्तीच्या निधनानंतर मराठा समाजामध्ये दहा दिवसांचे सुतक पाळले जाते. परंतु सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या काळात दहा दिवसांचे सुतक पाळणे, तेराव्या दिवशी उत्तर कार्य करणे व चौदाव्या दिवशी गोड करणे गैरसोयीचे व अडचणीचे झाले आहे. शिवाय वरील सर्व विधी करताना लोकांच्या मनाची फारच कुचंबणा होत आहे. यातून मार्ग काढणेसाठी अभ्यासू लोकांशी चर्चा करून, अंतेष्ठीचे सर्व विधी तिसर्‍या दिवशी पूर्ण करणेचा निर्णय परिवारातर्फे घेणेत आला आहे.

            सर्व विधी तीन दिवसांत पुढीलप्रमाणे करावेत. तिसरे दिवशी फक्त घरच्या व जवळच्या संबंधित लोकांनी रक्षा विसर्जनास जावे. सर्व रक्षा गोळा करून ती रक्षा नदी, ओढ्यात न टाकता अगोदर काढलेल्या शेतातील अगर सार्वजनिक ठिकाणच्या खड्यात घालून तेथे वृक्षारोपण करावे.

* अन्नाची नासाडी टाळावी. साधा भाजी भाकरी, वरण-भात असा नैवेद्य असावा. रक्षाविसर्जन सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. एक अस्थिकलश घरी आणावा.

* पै पाहुणे, स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवार यांची घरी किंवा सोयीच्या ठिकाणी थांबणेची व्यवस्था करावी. आणलेला अस्थिकलश तेथे दर्शनास ठेवावा.

* सकाळी 10.30 वाजता श्रद्धांजली वाहून प्रार्थना सभेचे आयोजन करावे. त्यावेळी संत तुकाराम यांचा आम्ही जातो आमुच्या गावा… हा अभंग म्हणावा आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम करावा. तसेच या सुतकाचे कालावधीमध्ये दुसरे सुतक आल्यास पहिले सुतक दुसर्‍या सुतकाचे निवारण करीत असलेने, पहिल्याच्या सर्व विधीबरोबर दुसर्‍याचे सर्व विधी पूर्ण करावेत. काही अपरिहार्य कारणामुळे अंतेष्ठीचे सर्व विधी तीन दिवसांत पूर्ण करणे शक्य न झाल्यास सुतक मात्र तिसर्‍या दिवशी संपवावे. असे करण्याने भाऊबंदांची निष्कारण गैरसोय आणि कुचंबणा होणार नाही.

सुबराव पाटील(परिवार प्रमुख) फोन-255540, ए.के.पाटील-2467574, एन.बी.धनवडे-240752, बी.एम.खराडे-पाटील-2373223, शिवाजीराव पाटील(पवार गुरूजी)-2310514