प्रख्यात मानसशास्त्रज्ञ बी.एफ.स्किनर याने कबुतरांवर प्रयोग केला. प्रयोगाचा हेतू होता अंधश्रद्ध वर्तणुकीचा शोध स्किनरने कबुतरे वेगवेगळ्या पिंजर्यात ठेवली व तो त्यांना ठराविक वेळाने दाणे टाकू लागला. काही मिनिटे असे केल्यावर त्याने कबुतरांचे बारकाईने निरीक्षण केले. तो जेव्हा पिंजर्याजवळ जाई तेव्हा वेगवेगळ्या पिंजर्यातील कबुतरे वेगवेगळी हालचाल करीत असल्याचे त्याला दिसून आले. काही कबुतरे आपली मान खालीवर हलवीत होती, काही पिंजर्यात वर्तुळाकार फिरत होती तर काही आपली डोकी पिंजर्याच्या वेगवेगळ्या फटीत घुसवत होती. स्किनरच्या असं लक्षात आलं की, या पक्षांना दाणे टाकण्या अगोदर ती जी कृती करीत होती तीच कृती ते पक्षी स्किनर जवळ येताच करू लागली. आपण जी कृती केली तिचा परिणाम म्हणून आपणास खाऊ मिळाला ही त्यांची समजूत. मान खालीवर केली की, दाणे खायला मिळतात असे कबुतराला वाटणे ही झाली त्यांची अंधश्रद्धा. दाणे मिळण्याअगोदर वेगवेगळी कबुतरे वेगवेगळी कृती करत होती. म्हणून त्या कृती कबुतरांनी दाणे मिळण्याशी जोडल्या व आचरण्यात आणल्या. गोल गोल फिरणे, किंवा मान खालीवर करणे ह्या कृती म्हणजे कबुतरांची कर्मकांडे किंवा विधी. दाणे मिळण्यापूर्वी कबुतरे जी कृती करीत होती किंवा जे वर्तन करीत होती त्याचा दाणे मिळण्याशी संबंध जोडणे म्हणजे कोंबडा आरवला म्हणून उजाडले असे मानण्यासारखे नाही काय? अशा घटना मानवी वर्तनातही घडतात. त्याला तार्किक संबंध नसतो. असा चुकीचा कार्यकारणभाव म्हणजे अंधश्रद्धा. माणसं या कबुतराप्रमाणे वागू लागली की, ती अंधश्रद्धेची बळी ठरतात. योगायोग अंधश्रद्धेकडे नेतात या वर्तनक्रियेला मानसशास्त्रज्ञ Operant Conditioning असे म्हणतात. या कल्पनेचा प्रसार स्किनरने वर वर्णन केलेल्या कबुतरांच्या वर्तनावर शोधनिबंध लिहून केला.
अंधश्रद्धेची काही मासलेवाईक उदाहरणे पाहू या. थरवश इेससी हा प्रसिद्ध बेसबॉल खेळाडू प्रत्येक सामन्याअगोदर चिकन खाई. चिकन खाऊन मैदानात उतरले की, विजयी फटके मारण्यात यश मिळते असे तो मानी. Wade Boggs हा प्रसिद्ध खेळाडू प्रत्येक सामन्याच्या सुरवातीला ओकार्या काढी. इेीस हा टेनीसपटू टेनिस मोसमाच्या संपूर्ण काळात दाढी करीत नसे. आपल्याकडचे क्रिकेटपटू अशाच विविध अंधश्रद्धा बाळगून असतात.
अंधश्रद्धाळू वर्तणूक केवळ खेळाच्या क्षेत्रात पहायला मिळते असे नाही. ज्युरॅसिक पार्क या कादंबरीचा लेखक Michel Cridhori हा नवीन कादंबरी लिहीत असताना लंचमध्ये प्रत्येक दिवशीचा मेनू तोच ठेवीत असे. विशिष्ट कपडे घालणे, विशिष्ट पेन वापरणे, नशीबाची गाणी ऐकणे, परीक्षा हॉलच्या दरवाजावर टकटक करणे, हॉलला प्रदक्षिणा घालणे अशी विविध कर्मकांडे विद्यार्थी व इतर लोक करताना दिसतात. जेवणाच्या पंगतीतील पाहुण्यांची संख्या 13 झाली तर अशा वेळी खास निमंत्रित पुरवणारी एक कंपनी फ्रान्समध्ये आहे. जुगार खेळणारे तर योगायोगाच्या घटनांना महत्व देऊन अंधश्रद्धाळू वर्तन करण्यात अग्रेसर असतात.
एक दोनदा चिकन खाल्ल्यावर षट्कार व चौकार मिळाले तर चिकनमुळे हे घडले म्हणजे ही तर्कहीन वर्तणूक का घडते?
याचं महत्वाचं कारण म्हणजे परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसणं हे होय. समोरचा बॉलर चेंडू कसा टाकतो, ग्राऊंडवर चेंडू कसा उसळी घेतो, समोरचे फिल्डींग, मारलेल्या तडाख्याचा जोर असे अनेक घटक क्रिकेटपटूच्या नियंत्रणात नसतात. म्हणूनच धोनी किंवा युवराजने पहिला षट्कार मारला तर लगेचच्या चेंडूत ते आऊट होऊ शकतात. ही अनिश्चितता अटळ असते. पण माणसाच्या आयुष्यात जिंकण्याची अनिवार ओढ असते. पण परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. म्हणून मी जिंकलो मी लढलो किंवा मी लढलो मी हरलो हीच वृत्ती बाळगणे योग्य जीवनाच्या लढाईत हार-जीत पेक्षा लढाई महत्वाची असे जे मानतात ते अंधश्रद्धांना बळी पडत नाहीत. पण यशाच्या अनिवार ओढीने (Wishful thinking) जे अंधश्रद्धेचा आश्रय घेतात ते बौद्धिक अपराध करतात. साध्या कमी हानीकारक अंधश्रद्धाचा विचार बाजूला ठेवू या. पण देवानेच ज्यूची हत्या करण्यास मला आज्ञा केली असं हिटलर समजला व लाखो ज्यूंची कत्तल झाली. अशा अंधश्रद्धांचा गंभीर परिणाम तर्कहीनतेतूनच होतो ना? म्हणून एकूणच अंधश्रद्धाळू वर्तन हे केव्हांही अपराधच मानावयास हवे. माणसं कबुतर नाहीत हे त्यांना कसे समजवणार?
मराठीच्या प्रसारासाठी विकासनिधी जाहीर
बेळगाव सीमावर्ती भागात नारायण अतिवाडकर अंनिसचे कार्य करतात 81 वर्षे. या वयातही त्यांचा अंनिसचा जागर सुरू आहे. सीमा भागात मराठीचा विकास होण्यासाठी महाराष्ट्राचा निधी जाहीर झाला. अनेक ग्रंथालयांना व संघटनांना तो मिळाला. व्यक्तीगत पातळीवरील मराठी विकासासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यात नारायण अतिवाडकर अग्रभागी आहेत. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना 1 लाख रू.मराठीच्या विकासनिधीतून जाहीर झाले. त्यांचे अंनिसतर्फे जाहीर अभिनंदन!
-संपादक
दु:खद निधन अलिबाग अंनिसच्या शाखेचे कार्यकर्ते रोहिदास जिजाबा गायकवाड यांचे वडील जिजाबा आप्पाजी गायकवाड यांचे 13 फेबु्रवारी 2012 रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलेले आहे. तसेच पुणे अंनिसच्या कार्यकर्त्या मृणालिनी आठल्ये यांच्या मातोश्रींचे दि. 3 मार्च 2012 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खात अंनिस परिवार सहभागी आहे.